स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध !

सनातन भारत : समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भात प्रासंगिक सूत्रांवर भाष्य करणारे सदर

‘स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध’ ही त्रिसूत्री प्रामुख्याने राष्ट्रवाद, संस्कृती अन् भूराजकीय (जिओपॉलिटिकल) संदर्भात वापरली जाते. कोणत्याही जिवंत समाजाला किंवा राष्ट्राला जर प्रगती करायची असेल आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला या ३ गोष्टींचे अचूक भान असणे अनिवार्य आहे. हिंदु समाजाला स्वतःची खरी ओळख आणि सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हा लेख एक मार्गदर्शक ठरेल.

समाज म्हणून आपण जेव्हा ‘स्व’ विसरतो, तेव्हा आपण ‘मित्रा’ला पारखण्यात चूक करतो आणि ‘शत्रू’च्या जाळ्यात सहज अडकतो.

१. स्वबोध (Self-Identification)

‘स्वबोध’, म्हणजे स्वतःची खरी ओळख पटणे. याचे मुख्यतः २ पैलू आहेत.

१ अ. मूळ ओळख समजून घेणे : आपण कोण आहोत ? आपला गौरवशाली इतिहास काय होता ? आपल्या पूर्वजांनी जगाला काय दिले ? हे जाणून घेणे, म्हणजे स्वबोध !

१ आ. आत्मविस्मृती टाळणे : परकीय शिक्षणपद्धत आणि सांस्कृतिक आक्रमण यांमुळे आपल्यात ‘हिंदु संस्कृती हीन आहे’, असा न्यूनगंड निर्माण झाला आहे. या आत्मविस्मृतीतून बाहेर पडून स्वत्वाचा अभिमान बाळगणे म्हणजे स्वबोध !

जोपर्यंत एखाद्या समाजाला आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यांची योग्य माहिती नसते, तोपर्यंत तो समाज प्रगती करू शकत नाही.

१ इ. सामान्य उदाहरण : समजा एखादा वाघाचा बछडा मेंढरांच्या कळपात वाढला, तर तो स्वतःला मेंढरूच समजतो आणि गवत खातो; पण जेव्हा त्याला आरशात स्वतःचे रूप दिसते अन् तो स्वतःची गर्जना ओळखतो, तेव्हा त्याला ‘स्वबोध’ होतो.

१ ई. भारतियांच्या संदर्भातील उदाहरण : आपण वर्षानुवर्षे शिकलो की, भारत एक गरीब आणि मागासलेला देश होता; पण जेव्हा आपण भारतीय प्राचीन शास्त्र, गणित (उदा. शून्य, पायची किंमत) आणि वास्तूकला अभ्यासतो, तेव्हा आपल्याला कळते की, आपण ‘विश्वगुरु’ होतो. हा स्वतःच्या वारशाचा अभिमान वाटणे, म्हणजेच स्वबोध !

१ उ. स्वबोध (Self-Identification), म्हणजे आत्मबोध (Self-Realization) नव्हे ! : स्वतःची कर्तव्ये, धर्म, संस्कृती आणि पूर्वजांच्या कार्याची जाणीव होणे, म्हणजे ‘स्वबोध’, तर अध्यात्मशास्त्रानुसार ‘मी ब्रह्म आहे’, ही अनुभूती येणे, म्हणजे आत्मबोध होय. साधना करून आध्यात्मिक उन्नती केल्यानंतरच आत्मबोध होतो.

२. मित्रबोध (Identifying Friends)

श्री. चेतन राजहंस

जगाच्या पाठीवर किंवा समाजात स्वतःचे ‘खरे मित्र’ कोण आहेत ? हे ओळखणे, म्हणजे मित्रबोध ! याचेही मुख्यतः २ पैलू आहेत.

२ अ. समान मूल्ये असणारे : ज्यांचे विचार, संस्कृती आणि अंतिम उद्दिष्टे आपल्याशी सुसंगत आहेत, ते आपले नैसर्गिक मित्र.

२ आ. धोरणात्मक मैत्री (Strategic Alliance) : जे आपल्या कार्यात (धर्म किंवा राष्ट्र कार्यात) अडथळे आणत नाहीत किंवा जे आपल्या शत्रूचे शत्रू आहेत, अशांशी केलेली व्यावहारिक मैत्री.

२ इ. भारतियांच्या संदर्भात उदाहरण : वर्ष १९७१ च्या युद्धात जेव्हा अनेक पाश्चात्त्य देश भारताच्या विरोधात होते, तेव्हा रशियाने दिलेली साथ हा भारतासाठी एक महत्त्वाचा ‘मित्रबोध’ होता.

३. शत्रूबोध (Identifying Enemies)

‘शत्रूबोध’, म्हणजे जे स्वतःला, समाजाला किंवा राष्ट्राला घातक ठरू शकतात, त्यांना ओळखणे. जोपर्यंत शत्रू ओळखला जात नाही, तोपर्यंत संरक्षणाची सिद्धता करता येत नाही. याचे मुख्यतः ३ प्रकार आहेत.

३ अ. वैचारिक शत्रू : जे प्रत्यक्ष शस्त्र न धरता शिक्षण, साहित्य आणि प्रसार यांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीला अन् अखंडतेला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

३ आ. छद्मवेषातील शत्रू : जे ‘मित्राच्या’ मुखवट्यात असतात; पण त्यांचे हेतू घातक असतात. अशांच्या गोड शब्दांना न भुलता त्यांचे ‘मोडस ऑपरेंडी’ (Modus Operandi – कार्यपद्धत) ओळखणे महत्त्वाचे असते.

३ इ. प्रत्यक्ष शत्रू : जे सीमेवर किंवा उघडपणे समाजावर आघात करतात.

शत्रूबोध झाल्यानंतर शत्रूच्या कार्यपद्धतीचा (मोडस ऑपरेंडी) अभ्यास करता येतो. त्यामुळे भविष्यात त्याच्यापासून उद्भवणार्‍या संकटांपासून सावध रहाता येते.

३ ई. ऐतिहासिक उदाहरण : पृथ्वीराज चौहान यांनी महंमद घोरीला अनेकदा जीवदान दिले; कारण त्यांना शत्रूच्या क्रूर स्वभावाचा ‘बोध’ झाला नाही. परिणामी घोरीने संधी मिळताच दगा केला. शत्रूला क्षमा करणे, हे शौर्य असू शकते; पण शत्रूचा स्वभाव न ओळखणे, ही चूक आहे.

४. हिंदूंसाठी स्वबोध-मित्रबोध-शत्रूबोध

व्यावहारिक दृष्टीने लक्षात यावा, यासाठी पुढे काही सूत्रे दिली आहेत.

४ अ. व्यावहारिक ‘स्वबोध’ : केवळ वाचन नको, आचरण हवे ! : स्वबोध म्हणजे केवळ गौरवशाली इतिहास वाचणे नव्हे, तर तो इतिहास घडवणार्‍या पूर्वजांचे गुण स्वतःच्या आयुष्यात उतरवणे होय. आपल्या दैनंदिन जीवनात स्वभाषेचा वापर करणे, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरणारे अर्थकारण (Economic Swabodh) आणि आपल्या परंपरांमागील शास्त्र समजून घेऊन त्या अभिमानाने पाळणे, हा खरा जिवंत स्वबोध आहे.

४ आ. मित्रबोधाची व्यापक व्याख्या – ‘सांस्कृतिक मित्र’ ! : मित्र शोधतांना केवळ राजकीय लाभाचा विचार न करता ‘सांस्कृतिक मूल्यांचा’ विचार करा. जगातील असे सर्व घटक जे मानवी मूल्यांचा, लोकशाहीचा आणि विविधतेचा आदर करतात, ते भारताचे अन् हिंदुत्वाचे नैसर्गिक मित्र असू शकतात. अशा जागतिक मित्रांशी संवाद वाढवणे, हे राष्ट्रहिताचे आहे.

४ इ. वर्तमान काळातील ‘शत्रूबोध’ – माहिती युद्ध (Information Warfare) : आजच्या काळात शत्रू केवळ सीमेवर बंदूक घेऊन उभा नाही, तर तो आपल्या भ्रमणभाषच्या ‘स्क्रीन’मध्ये शिरला आहे. ‘नॅरेटिव्ह वॉर’ (कथानकाचे युद्ध) किंवा माहिती युद्धाच्या माध्यमातून हिंदु सणांना मागास ठरवणे, आपल्या महापुरुषांची चुकीची प्रतिमा मांडणे आणि इतिहासाचे विकृतीकरण करणे, हे आधुनिक शत्रूचे लक्षण आहे. अशा वेळी अफवांना न भूलता सत्याची पडताळणी करणे, हाच खरा शत्रूबोध ठरेल.

४ ई. जात्यंध असलेले अंतस्थ शत्रू : स्वबोध होण्यातील सर्वांत मोठा अडथळा, म्हणजे आपल्यातील ‘जातीय संकुचितता’ आहे. जोपर्यंत आपण पोटजातींच्या भिंतींमध्ये अडकून रहातो, तोपर्यंत आपल्याला व्यापक ‘हिंदु’ म्हणून स्वबोध होऊ शकत नाही. आपल्याच समाजाला जाती-पातीत विभागून एकमेकांविरुद्ध लढवणारे घटक हे ‘छुप्या शत्रू’चाच भाग आहेत, हे ओळखणे काळाची आवश्यकता आहे.

आदर्श उदाहरण : छत्रपती शिवाजी महाराज !

महाराजांनी स्वबोध, मित्रबोध अन् शत्रूबोध ही त्रिसूत्री वापरूनच ‘हिंदवी स्वराज्य’ उभे केले.

अ. स्वबोध : वयाच्या १६ व्या वर्षी ‘आम्ही कुणाचे गुलाम रहाण्यासाठी जन्मलो नाही, हे राज्य श्रींची इच्छा आहे’, हा विचार करणे, म्हणजे पराकोटीचा स्वबोध होता. त्यातूनच त्यांनी स्वतःची राजमुद्रा, किल्ले आणि नौदल उभे केले.

आ. मित्रबोध : महाराजांनी केवळ माणसांची पारख केली नाही, तर मावळ्यांमध्ये ‘स्वराज्य’ या एकाच विचाराने मैत्रीची वीण गुंफली. जीवा महाले, तानाजी मालुसरे हे केवळ सेवक नव्हते, तर ध्येयाने प्रेरित मित्र होते, तसेच आवश्यकतेनुसार कुतूबशाहशी केलेली मैत्री ही धोरणात्मक मित्रबोधाचे उदाहरण आहे.

इ. शत्रूबोध : ‘अफझलखान भेटीला बोलावून दगा करणार’, हे महाराजांनी आधीच ओळखले होते. औरंगजेबाचा कपटी स्वभाव ओळखून आगर्‍याहून सुटका करून घेतली, तसेच स्वराज्याला फितुरीने धोका पोचवणार्‍या स्वकियांना (उदा. खंडोजी खोपडे) शिक्षा करून त्यांनी कठोर शत्रूबोध दर्शवला.

– श्री. चेतन राजहंस

५. आवाहन

• स्वबोध नसेल, तर तुम्ही न्यूनगंडात जगाल.

• मित्रबोध नसेल, तर तुम्ही एकटे पडाल.

• शत्रूबोध नसेल, तर तुमचा नाश होईल.

‘समाज म्हणून आपण जेव्हा ‘स्व’ विसरतो, तेव्हा आपण ‘मित्रा’ला पारखण्यात चूक करतो आणि ‘शत्रू’च्या जाळ्यात सहज अडकतो. म्हणून जागृत व्हा (स्वबोध), संघटित व्हा (मित्रबोध) आणि सावध व्हा (शत्रूबोध) !

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२९.३.२०२६)

तुलनात्मक अध्ययन

जेव्हा समाजाला आपला ‘स्व’ कळतो, तेव्हाच तो त्याचा मित्र आणि शत्रू यांमधील भेद अचूकपणे ओळखू शकतो.

– श्री. चेतन राजहंस