प्रभु श्रीरामाचे तत्त्वज्ञान : आधुनिक भारतासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ !

आज भारत प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत असला, तरी सामाजिक, मानसिक आणि नैतिक पातळीवर अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभु श्रीरामाचे जीवन केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित न रहाता व्यापक सामाजिक मार्गदर्शन म्हणून समोर येते.

भाग १ 

१. प्रभु श्रीराम म्हणजे आजच्या युवकांसाठी प्रभावी आदर्श !

युवा पिढी आज संधी आणि कोलाहल यांच्या कोंडीत अडकलेली आहे. करिअर (नोकरी / व्यवसाय), नातेसंबंध आणि जीवनाचा उद्देश यांविषयी त्यांच्यात अस्थिरता दिसून येते. अशा वेळी श्रीरामाचे व्यक्तीमत्त्व संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनाची दिशा दाखवते. संयम, निष्ठा आणि कर्तव्यभावना यांना प्राधान्य देत त्याने दीर्घकालीन यशाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे प्रभु श्रीराम आजच्या युवकांसाठी प्रभावी ‘आदर्श’ ठरतो.

अधिवक्ता चेतन चौधरी

२. श्रीरामाकडून स्थितप्रज्ञता शिकावी !

मानसिक आरोग्य हा आजच्या समाजातील गंभीर प्रश्न झाला आहे. तणाव, असुरक्षितता आणि स्पर्धेचा दबाव यांमुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन ढासळते. श्रीरामाने कठीण परिस्थितीतही आत्मनियंत्रण ठेवून शांतता राखली. त्याच्या जीवनातून ‘स्थितप्रज्ञता’ हा गुण शिकण्यास मिळतो. हा गुण आधुनिक जीवनात अत्यावश्यक आहे.

३. नात्यातील विश्वास, प्रेम आणि समर्पण यांचे महत्त्व

प्रभु श्रीरामाने नात्यांमध्ये स्वार्थाला नव्हे, तर विश्वास, प्रेम अन् समर्पण यांना महत्त्व दिले. आजच्या तुटलेल्या नात्यांच्या युगात हा दृष्टीकोन अधिक आवश्यक ठरतो. त्याने रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन मानवी संबंधांची व्याप्ती वाढवल्यामुळे सामाजिक ऐक्य वाढले.

४. स्त्रीसन्मान आणि श्रीराम !

४ अ. स्त्रीच्या प्रतिष्ठेचे रक्षण : स्त्री सन्मानाच्या संदर्भातही प्रभु श्रीरामाचा दृष्टीकोन अत्यंत प्रगत होता. त्याने स्त्रीला सन्माननीय स्थान दिले आणि तिच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले. आज स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेला गती मिळत असतांना हा दृष्टीकोन अधिक सुसंगत वाटतो.

४ आ. स्त्री सन्मान : मूल्याधिष्ठित दृष्टीकोन !

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।। – मनुस्मृति (अध्याय ३, श्लोक ५६)

अर्थ : जिथे स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवता वास करतात आणि जिथे त्यांचा अपमान होतो, तिथे सर्व कर्मांचे महत्त्व अल्प होते.

हा विचार श्रीरामाने आचरणातून सिद्ध केला. ‘एकपत्नीव्रत’ स्वीकारून त्याने स्त्रीच्या निष्ठेचा सन्मान केला. शबरीच्या भक्तीचा स्वीकार करून त्याने सामाजिक समतेचा आदर्श ठेवला.

४ इ. स्त्रीचा सन्मान म्हणजेच रामराज्य होय ! : स्त्रीचा सन्मान म्हणजे तिची पूजा नव्हे, तर तिला समान संधी, निर्णयाचा अधिकार आणि सुरक्षितता देणे होय. ज्या समाजात स्त्री सन्मानित आहे, तिथेच खरे ‘रामराज्य’ निर्माण होते.

४ ई. स्त्री सन्मान हा रामविचारांचा आत्मा आहे आणि हाच आत्मा राष्ट्रनिर्मितीला अजेय (अजिंक्य) शक्ती देतो.

५. वनवासातही निसर्गाशी संवाद साधणे

पर्यावरणाच्या संदर्भात ‘प्रभु श्रीरामाचा वनवास हा निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा आदर्श नमुना आहे’, असे म्हणता येईल. आजच्या पर्यावरणाच्या संकटांच्या पार्श्वभूमीवर मानवाने निसर्गाशी संतुलित नाते निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

६. आजच्या प्रशासनाने ‘रामायणा’चा आदर्श घ्यावा !

व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले, तर ‘रामायण’ म्हणजे प्रभावी ‘केस स्टडी’ (घटनेचा सखोल अभ्यास) ठरतो. संकटात निर्णयक्षमता असणे, योग्य सहकार्‍यांची निवड करणे आणि सामूहिक प्रयत्नांतून यश मिळवणे, ही तत्त्वे आजच्या प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

७. श्रीराम : व्यक्ती नव्हे तत्त्वज्ञान !

श्रीराम एक जिवंत तत्त्वज्ञान आहे. त्याच्याकडे कर्तव्य, नैतिकता आणि दायित्व यांचा सुंदर समन्वय दिसतो. त्याच्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू ‘कर्तव्य’ हा होता. त्यांनी वैयक्तिक स्वार्थाला कधीही प्राधान्य दिले नाही. आजच्या व्यक्तीवादी समाजात हा दृष्टीकोन विशेष महत्त्वाचा आहे.

८. जनतेचा राजा

श्रीराम केवळ राजा नव्हता, तर जनतेशी जोडलेले नेतृत्व होते. त्याने सत्तेला दायित्व म्हणून स्वीकारले. त्याच्या प्रत्येक निर्णयात प्रजेचे हित केंद्रस्थानी होते. आजच्या लोकशाही व्यवस्थेसाठी हा आदर्श ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

९. आचरणातील पारदर्शकता

श्रीरामाने स्वतःला कधीही नियमांपेक्षा उच्च दर्जाचे मानले नाही. समाजाच्या विश्वासासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्यात कठोर निर्णय घेतले. ‘पारदर्शकता ही केवळ घोषणांमध्ये नव्हे, तर आचरणात दिसली पाहिजे’, हा संदेश त्याच्या जीवनातून मिळतो.

प्रभू श्रीराम व भरत

१०. बंधुत्वाचा आदर्श – प्रभु श्रीराम !

रामायणातील नातेसंबंध स्वार्थावर नव्हे, तर विश्वासावर आधारित आहेत. राम-भरत, राम-लक्ष्मण यांचे नाते त्याग आणि निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. आजच्या काळातही हीच मूल्ये नात्यांना टिकवून ठेवू शकतात.

जेव्हा भरताला कळले की, आपल्या आईमुळे (कैकयीमुळे) श्रीरामाला वनवास झाला आणि भरताला राज्य मिळाले, तेव्हा त्याने त्या राज्याचा स्वीकार करण्याऐवजी त्याचा धिक्कार केला. भरताने अयोध्येच्या गादीवर बसण्यास नकार देऊन श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या. स्वतः एका सेवकाप्रमाणे १४ वर्षे नंदीग्रामात राहून राज्याचा कार्यभार सांभाळला. रामाच्या मनातही भरताविषयी कधीही शंका आली नाही. त्यांनी बंधूप्रेमाचा सर्वोच्च सन्मान राखला.

लक्ष्मणाचे श्रीरामावर असलेले प्रेम हे सेवेचे सर्वोच्च उदाहरण आहे. लक्ष्मणाला वनवासाची कोणतीही आज्ञा नव्हती, तरीही केवळ थोरल्या भावाच्या सेवेसाठी त्याने सुख, पत्नी आणि राजवैभव यांचा त्याग केला. १४ वर्षे त्याने झोप न घेता (निद्रा त्यागून) श्रीराम आणि सीता यांचे रक्षण केले. लक्ष्मणाने कधीही रामाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. रामाचा शब्द हाच त्याच्यासाठी कायदा होता. जेव्हा लक्ष्मण युद्धात मूर्च्छित झाला, तेव्हा प्रभु श्रीराम एका सामान्य माणसाप्रमाणे रडला होता; यातून श्रीरामाच्या हृदयात भावाचे काय स्थान होते, हे स्पष्ट होते.

श्रीरामाचे बंधुत्व केवळ अयोध्येच्या राजवाड्यातील ४ भावांपुरते मर्यादित नव्हते. त्याने निःस्वार्थ भावनेने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींना स्वतःचे भाऊ मानले. निषादराज गुह हा शृंगवेरपूरचा राजा ! वनवासाच्या काळात प्रभु श्रीरामाशी त्याचे सखोल आणि आत्मीय संबंध प्रस्थापित झाले. श्रीरामाने त्याला सख्ख्या भावासारखा मान दिला. सुग्रीवाचे दुःख पाहून श्रीरामाने त्याचे राज्य मिळवून दिले, तर शत्रूचा भाऊ असूनही बिभीषणाला ‘लंकेचा राजा’ म्हणून स्वीकारले. ‘जो मला शरण येतो, तो माझा भाऊच आहे’, हा उदात्त विचार त्यांनी जगाला दिला.

आज भूमीच्या छोट्याशा तुकड्यावरून किंवा पैशांवरून भावाभावांमध्ये न्यायालयात खटले चालतात. अशा वेळी राम-भरताचे उदाहरण आपल्याला अंतर्मुख करते. ‘माझे-तुझे’च्या त्यागामुळे कौटुंबिक कलह कायमचे संपू शकतात. एकमेकांच्या प्रगतीत आनंद मानणे अन् कठीण काळात ढाल बनून उभे रहाणे, हीच खरी ‘रामवृत्ती’ आहे.

रामायणातील बंधुत्व आपल्याला शिकवते की, संपत्ती येते आणि जाते; पण भावांमधील प्रेम हे जीवनाचे सर्वांत मोठे संचित आहे. प्रभु श्रीरामाने स्ववर्तनातून हे सिद्ध केले, ‘एक ‘आदर्श बंधू’ तोच आहे, जो त्याच्या भावाच्या सुखासाठी स्वतःच्या अधिकाराचा त्याग करण्यास सदैव तत्पर असतो !’

११. युवा पिढीसाठी श्रीराम म्हणजे स्थैर्य आणि शिस्त यांचा मार्ग !

आजची युवा पिढी वेग आणि तात्काळ यश यांच्या मानसिकतेत अडकलेली आहे. अशा वेळी श्रीरामाचे जीवन संयम, सातत्य आणि संघर्ष यांचे महत्त्व शिकवते. श्रीरामाने कधीही ‘शॉर्टकट’ (जवळचा मार्ग) स्वीकारला नाही. वनवासासारख्या कठीण प्रसंगाचेही त्याने संधीमध्ये रूपांतरित केले. ‘यश हे सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असते’, हा संदेश त्याच्या जीवनातून मिळतो.

  (क्रमश:)

– अधिवक्ता चेतन चौधरी, सामाजिक आणि राजकीय विश्लेषक, पत्रकार, नंदुरबार.

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026024.html