सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?

वर्ष २०२३ मध्ये द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘हिंदु धर्म हा डेंग्यू-मलेरियासारखा रोग आहे. त्यामुळे तो नष्ट केला पाहिजे’, असे विधान केले होते. त्या वेळी देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या; परंतु तत्कालीन अन्वेषण यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यानंतर १२ मे २०२६ या दिवशी तमिळनाडू विधानसभेत पुन्हा एकदा त्यांनी ‘सनातन धर्म संपवला पाहिजे’, असे वक्तव्य केले. यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, हिंदु शांतपणे सहन करतो म्हणूनच वारंवार हिंदु धर्मावर टीका करण्याचे धाडस काही नेत्यांना होते का ? इतर कोणत्याही पंथाविषयी अशी भाषा वापरण्याचे धाडस हे नेते दाखवतात का ? भारत स्वतःला ‘सेक्युलर (निधर्मी) राष्ट्र’ म्हणवतो, मग केवळ हिंदु धर्मावरच अवमानकारक वक्तव्ये का केली जातात ?

१. सनातन म्हणजे काय ?

उदयनिधी स्टॅलिन यांनी समजून घ्यायला हवे ते, म्हणजे ‘सनातन म्हणजे केवळ एक धर्म नाही, तो या जगाच्या अस्तित्वाच्या इतकाच शाश्वत आहे.’ अथर्ववेदातील काण्ड १० मध्ये म्हटले आहे,

सनातमेनमाहुरुताद्य स्यात्पुनर्णवः ।
अहोरात्रे प्र जायते अन्यो अन्यस्य रूपयोः ।।

अर्थ : शाश्वत परमेश्वराचे गुणधर्म साधकाला सतत प्रकट होत रहातात, जसे रात्रीतून दिवसाचा आणि दिवसातून रात्रीचा जन्म होतो.

भगवद्गीतेतही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।। – श्रीमद्भगवद्गीता

अर्थ : आत्म्याला कोणतेही शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही.

हाच संदेश सनातन धर्मालाही लागू होतो.

कु. पार्थ घनवट

२. तमिळनाडूची ओळखच सनातन संस्कृती

ज्या तमिळनाडूच्या भूमीतून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली जाते, त्याच तमिळनाडूमध्ये भारतातील सर्वाधिक अनुमाने ४५ सहस्र मंदिरे आहेत. मंदिरांचे वार्षिक उत्पन्न सहस्रो कोटी रुपयांमध्ये आहे. मीनाक्षी अम्मान मंदिर, वृद्धेश्वर महादेव मंदिर यांसारखी मंदिरे केवळ श्रद्धेची केंद्रे नाहीत, तर तमिळ संस्कृती, कला, वास्तूशास्त्र आणि अध्यात्म यांचे भव्य प्रतीक आहेत. तमिळनाडूमधील भरतनाट्यम्, कर्नाटक संगीत आणि मंदिर स्थापत्य या सर्वांची मुळे सनातन संस्कृतीत आहेत. ज्या राज्याची सामाजिक रचना, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि ओळखच सनातन धर्माशी जोडलेली आहे, त्या भूमीत उभे राहून ‘सनातन संपवू म्हणणे’, म्हणजे आपण किती अज्ञानी आहोत, ते सांगणे आहे.

३. इतिहास साक्षी आहे, ‘अनेक आले, अनेक गेले !’

इ.स. ७१२ मध्ये महंमद बिन कासीमच्या आक्रमणापासून महंमद गझनी, महंमद घोरी, औरंगजेब, पोर्तुगीज, मोगल आणि इंग्रजांपर्यंत अनेकांनी भारताची संस्कृती अन् सनातन परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मंदिरे तोडली गेली, ग्रंथ-पुराणे जाळली, बळजोरी धर्मांतरे झाली, हिंदु संस्कृतीला मागास ठरवण्याचे प्रयत्न झाले; पण प्रत्येक वेळी सनातन धर्म नव्या ऊर्जेने उभा राहिला; कारण सनातन हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा एका पुस्तकाचा धर्म नाही. धर्म जीवनपद्धत आहे, संस्कृती आहे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे तो कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. इतिहासात किती साम्राज्ये आली आणि नष्ट झाली; पण सनातन टिकून राहिला. मग आज काही राजकीय वक्तव्यांमुळे तो संपेल, हा विचारच किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येते.

४. हिंदु समाजाने किती दिवस शांत रहायचे ?

प्रत्येक वेळी हिंदु देवीदेवता, परंपरा किंवा श्रद्धा यांवर टीका केली जाते आणि त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली खपवले जाते; पण इतर पंथांविषयी अशी भाषा वापरली गेली, तर देशभरात तात्काळ कारवाई होते. मग हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान हा मानला जाणार नाही का ? हिंदूंनी आणखी किती दिवस संयम ठेवून स्वधर्माची टिंगल सहन करायची ? लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण एखाद्या धर्माच्या अस्तित्वालाच संपवण्याची भाषा करणे, हे द्वेष पसरवण्यासारखे आहे. अशा वक्तव्यांवर तात्काळ गुन्हा नोंद होऊन कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे.

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

श्री. पार्थ घनवट, सनातन आश्रम, फोंडा, गोवा. (२७.५.२०२