परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !

भाग १ 

१. स्वमर्जीतील विद्यार्थ्यालाच वर्गात प्रथम क्रमांक मिळवून देण्याची काही प्राध्यापकांची वृत्ती

सध्याच्या ‘पेपर फुटीच्या’च्या संकटावर बोलण्यापूर्वी ५ वेगळ्या आठवणी मनात येतात, ज्यामुळे संस्थात्मक उत्तरदायित्वावर मोठे प्रश्न निर्माण होतात. मी जेव्हा राजस्थान विद्यापिठात पत्रकारितेचे शिक्षण घेत होते, तेव्हा ‘तेथे केवळ मुलीच पत्रकारीतेमध्ये उच्च पदावर पोचतात’, असा नियम होता. तरीही माझी तेथे पोचण्याची काहीच शक्यता नव्हती. तो १ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम होता, म्हणजेच एका वेळी केवळ एकच तुकडी असायची आणि तिचे संपूर्ण व्यवस्थापन एकाच प्राध्यापकाकडून केले जात असे. तो विभाग, म्हणजे जणू त्यांची वैयक्तिक जहागीरच होती. सकाळच्या वर्गांनंतर त्यांच्याभोवती सतत विद्यार्थिनींचा गराडा असायचा आणि मुलींनी त्यांना उपाहारगृहामध्ये बाहेर घेऊन जाण्याची एक विचित्र परंपराच चालू केली होती.

त्या वर्षी आमच्या तुकडीमधील एका दंगेखोर मुलाने विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे ठरवले. माझे दोन जवळचे मित्र लखन, जो पुढे बसपाचा राजकारणी झाला आणि सरताज, जो आता बँकेत वरिष्ठ अधिकारी आहे, हे दोघे मी बिनविरोध निवडून यावे, यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिले. तरीही जेव्हा परीक्षा जवळ आल्या, तेव्हा सर्वांना ठाऊक होते की, प्राध्यापक त्यांच्या मर्जीतील विद्यार्थ्यालाच वर्गात प्रथम क्रमांक मिळवून देतील. नेमके तेच घडले. केवळ कठोर परिश्रमाच्या जोरावर मी ३ रा क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले. त्या काळात या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराकडे आमची डोळेझाक होत होती. त्यामुळे कोणताही खरा निषेध किंवा प्रतिकार झाला नाही. विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यकाळात मी तत्कालीन विधानसभा अध्यक्षांना आमंत्रित केले, ‘मीडिया क्विझ’सारखे (माध्यमांवरील प्रश्नमंजुषांसारखे) कार्यक्रम आयोजित केले आणि एका तीव्र वादाच्या वेळी विद्यार्थी अन् प्राध्यापक यांच्यमध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली. हे वर्ष १९९३ होते, एक असे युग जेव्हा मित्र सर्व काही एकत्र करत असत. आम्ही एकत्र प्रवास करायचो, अभ्यास करायचो आणि एकत्र जेवायचो. त्यांच्यासमवेत असतांना माझी सुरक्षितता पूर्ण होती.

डॉ. क्षिप्रा माथूर

२. प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षकांची ओळख करून देत प्रश्नपत्रिकेची माहिती मिळवून देण्याचे आमीष दाखवणे

जेव्हा माझ्या पदव्युत्तर पदवी परीक्षेची वेळ आली, तेव्हा त्याच प्राध्यापकाने आपले सरंजामशाहीचे चाळे सोडण्यास नकार दिला. सुदैवाने एका ‘मीडिया हाऊस’ने (माध्यम समुहाने) राजस्थानचा पत्रकारितेतील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू केला होता आणि संस्थेने चंदीगडहून एका अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणतज्ञांना प्राचार्य म्हणून नियुक्त केले होते; मात्र राजस्थान विद्यापिठातील त्या प्राध्यापकाने जे वास्तविक हिंदी साहित्याचे पदवीधर होते आणि त्यांची राज्याच्या जनसंपर्क विभागातील एका निवृत्त अधिकार्‍याशी घनिष्ठ मैत्री होती. ही जोडी घराणेशाही आणि वशिलेबाजी यांचे जिवंत प्रतीक होती. परीक्षा जवळ आल्यावर त्या प्राध्यापकाने २ बाह्य परीक्षकांची नावे सांगितली आणि माझी त्यांच्याशी ओळख करून देण्याची सिद्धता दर्शवली. ‘तुम्हाला प्रश्नपत्रिकांची एक झलक मिळेल’, असा त्यांनी आग्रह धरला. मी क्षणाचाही विचार न करता नकार दिला. मला असेही सांगण्यात आले की, त्या परीक्षकांपैकी एक माझे सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक होते. मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि एकही प्रश्नपत्रिका आधी न पहाता वर्गात प्रथम आले. आम्हाला शिकवणारे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ प्रा. एन्.के. सिंघी यांनी नंतर मला ते काम करत असलेल्या प्रतिष्ठित अशा ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज्’मध्ये नोकरीचा प्रस्ताव दिला. तो एक अविश्वसनीय सन्मान होता; पण माझ्या पुढील अभ्यासावर आणि आयुष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी तो नाकारला.

३. उघड झालेले शोधनिबंध स्वीकारणे आणि प्राध्यापकांची मर्जी राखणे यांना नकार दिल्याने ‘पीएच्.डी.’ परीक्षेवर झालेला परिणाम

फुटलेले शोधनिबंध स्वीकारण्यास किंवा प्राध्यापकांसह उपाहारगृहामध्ये जाण्यास दिलेल्या नकारामुळे अखेरीस माझ्या ‘पीएच्.डी.’ (विद्यावाचस्पति) पदवीवर मोठा परिणाम झाला. त्यांनी माझ्याकडून त्यांचे लेखन आणि संपादन करवून घेतले, एका संशोधन नियतकालिकाचा संपूर्ण कारभार सांभाळायला भाग पाडले आणि त्याचे श्रेय मला कधीच दिले नाही. जेव्हा कधी ते मला संशोधनाच्या चर्चेसाठी त्यांच्या घरी बोलावत, तेव्हा ते स्वतःच्या दुःखांवर रडत, अत्यंत वैयक्तिक आणि अस्वस्थ करणार्‍या संभाषणांमध्ये रमून जात. त्यांच्या एका माजी विद्यार्थिनीने एका व्यंगचित्रकाराशी लग्न केले होते, या विचाराने ते इतके खचले होते की, केवळ ती गोष्ट सांगतांनाही त्यांना रडू कोसळत असे. त्यांच्या या लहरी स्वभावामुळे मला पुष्कळ अस्वस्थ वाटत असे; म्हणून मी त्यांच्यापासून एक सुरक्षित अंतर राखले. ते नेहमी त्यांच्या घरातील ग्रंथालयातच भेटण्याचा आग्रह धरत जिथे त्यांच्या कुटुंबियांचे सततचे टोमणे भिंतींमधून आतपर्यंत पोचत. मी हमखास भावनिकदृष्ट्या खचून तिथून निघत असे.

४. शोधनिबंधात स्वतःची स्तुती असणारे प्रकरण लिहिण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर दबाव आणणे

जेव्हा याच प्राध्यापकाने माझ्या प्रबंधात त्यांची स्तुती करणारा एक संपूर्ण अध्याय लिहिण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला, तेव्हा माझ्या सहनशक्तीची मर्यादा ओलांडली गेली. मी त्यांना स्पष्ट उत्तर दिले की, मी स्वतःची अशी मानहानी करण्यापेक्षा ‘पीएच्.डी.’ सोडून देईन. मी त्यांच्या वृत्तीमुळे दुखावलेली आणि संतप्त झालेली होते. त्यामुळे मी इतिहास विभागात गेले आणि तिथे माझ्या ‘पीएच्.डी.’ची पुन्हा नोंदणी केली. त्यावर मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, ‘‘जर तुम्हाला तुमच्या महानतेची स्तुती करणारे चरित्र हवे असेल, तर त्यावर ‘पीएच्.डी.’ लिहिण्यासाठी अन्य कुणाला तरी शोधा; पण मी माझ्या प्रबंधाला तो डाग लागू देणार नाही.’’ त्या वेळी मी एक कार्यरत पत्रकार असल्यामुळे मला विरोध करण्यासाठी पुरेसा वाव मिळाला. सार्वजनिक अपमानाच्या भीतीने त्या प्राध्यापकांनी स्वतःचे वर्तन आवरले आणि मला माझ्या मूळ नोंदणीवर परत आणले. या त्रासानंतर मी माझी ‘पीएच्.डी.’ पूर्णपणे माझ्या स्वतःच्या अटींवर पूर्ण केली. माझ्या आयुष्यातील एक कटू आणि थकवणारा अध्याय अखेर संपला. त्याच सुमारास देशातील पाठ्यपुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्या देहलीस्थित एका निवृत्त प्राध्यापकाने काही पैशांच्या मोबदल्यात माझा संपूर्ण प्रबंध लिहिण्याची सिद्धता दर्शवली आणि मी एकाच वेळी गोंधळले आणि चकित झाले.

५. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील अपेक्षित प्रश्न प्राध्यापकाकडून मिळवण्यासाठी विद्यार्थ्याचा प्रयत्न

पुढचा प्रसंग माझ्या लहानपणीच्या एका शेजार्‍यांशी संबंधित होता. वर्ष १९७० च्या दशकापासून आमच्या भागात केवळ आमच्याच घरात दूरभाष होता. माझ्या वडिलांच्या दूरसंचार विभागातील नोकरीमुळे त्यांना सरकारी दूरभाष मिळाला होता.  परीक्षेच्या काळात ‘बी.एस्सी.’चा (विज्ञान शाखेच्या पदवीचा) अभ्यास करणारा एक शेजारी मुलगा दूरभाष करण्याच्या बहाण्याने सतत आमच्या घरी यायचा आणि पुष्कळ वेळ गप्पा मारायचा. आमच्यापैकी कुणालाच ते आवडत नसे. अखेरीस माझ्या लक्षात आले की, तो नेहमी पेन (लेखणी) आणि कागद घेऊन यायचा अन् दूरभाषवरून ऐकत असतांनाच काहीतरी पटापट लिहून घ्यायचा. जेव्हा मी त्याला याविषयी विचारले, तेव्हा त्याने सहजपणे मान्य केले की एक विशिष्ट प्राध्यापक त्याला ‘अपेक्षित पेपर (परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न)’ सांगत होते. तो म्हणाला, ‘तुम्हालाही ते हवे असतील, तर मला सांगा.’ मी स्वतः तेव्हा केवळ ‘बी.एस्सी.’च्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होते. मला चांगलेच ठाऊक होते की, जर कुणाला हे कळले, तर शिक्षेचा फटका आम्हालाच बसेल. त्यानंतर आम्ही त्या मुलाशी सर्व संबंध तोडले आणि त्याला आमच्या घरात येण्यास बंदी घातली.

६. प्रात्यक्षिक परीक्षेत बाह्य परीक्षकांशी संधान साधून चांगले गुण मिळवण्याचा विद्यार्थ्याचा प्रयत्न

माझी तिसरी आठवण मला त्या पदवीच्या दिवसांमध्ये घेऊन जाते. आमच्या ‘बी.एस्सी.’च्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच एक मोठी धावपळ असायची. प्रत्येक जण बाह्य परीक्षकाची ओळख उघड करण्याचा आटोपशीरपणे प्रयत्न करत होता; कारण त्यांना वाटायचे ‘एकदा नाव कळले की बाकी सगळे निभावून नेता येईल.’ तेव्हा परीक्षांमध्ये १०० गुणांचा लेखी पेपर आणि ५० गुणांचा प्रात्यक्षिक पेपर असायचा. त्या वयात केवळ अधिक गुण मिळवण्यासाठी लोक जे हेराफेरीचे जाळे विणतात, ते मला खर्‍या अर्थाने कळले नव्हते. मी माझ्या वडिलांना सहजच सांगितले की, माझे अनेक वर्गमित्र परीक्षकाचे नाव शोधण्यात व्यस्त आहेत. त्या दिवशी मला मिळालेला तो ओरडा आजही माझ्या मनात घर करून आहे. त्यांचा सावधगिरीचा सल्ला घेऊन मी स्वतःला अभ्यासात झोकून दिले आणि त्याच वेळी विद्यार्थी राजकारणातही थोडेफार सक्रीय झाले. जेव्हा मी महाविद्यालयाची उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आली, तेव्हाच माझ्या वडिलांना कळले की, मी विद्यार्थी नेतृत्वात सक्रीय आहे; पण मी माझे गुण कधीच घसरू दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

७. पेपरफुटींच्या प्रकरणांमध्ये शिक्षक हे शिक्षण माफियांचे दलाल असल्याचे उघड

चौथा प्रसंग तेव्हा घडला, जेव्हा मी दुसर्‍या बाजूला जाऊन स्वतः एक शिक्षक झाले. फसवणुकीची ही विकृती किती खोलवर रुजली आहे, हे पाहून धक्काच बसला. ही विकृती सार्वत्रिकपणे स्वीकारली गेली होती. आज ही तडजोड एखाद्या लाडक्या विद्यार्थ्याने अनुकूल मूल्यमापनकर्ता शोधणे किंवा भ्रष्ट परीक्षा नियंत्रकाने वेगळ्या जागांची व्यवस्था करणे, यांपेक्षाही अधिक भयावह बनली आहे. आधुनिक पेपरफुटींनी आपल्या उदात्त शिक्षणपद्धतीत जे एक संपूर्ण कलंक आहेत, अशा व्यक्तींचा बुरखा फाडला आहे. हे शिक्षक म्हणजे शिक्षण माफियांचे मुख्य दलाल बनलेले शिक्षक.

‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या विनाशकारी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अन्वेषणाचेच उदाहरण घ्या. झारखंडच्या हजारीबागमध्ये राष्ट्रीय परीक्षा केंद्रांचे उत्तरदायित्व असलेले ‘ओएसिस स्कूल’चे प्राचार्य एहसानुल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज आलम यांनीच ‘डिजिटल लॉकर हॅक’ करण्यासाठी अंतर्गत मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप आहे. बिहारमध्ये सिकंदर यादवेंदू यांसारख्या शालेय शिक्षकांना आणि शिकवणी मार्गदर्शकांना थेट सुरक्षित ठिकाणे चालवल्याकारणाने आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी लाखो रुपयांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना पेपरफुटीच्या चाव्या सक्रीयपणे दिल्याकारणाने अटक करण्यात आली.

(क्रमशः)

लेखिका : डॉ. क्षिप्रा माथूर, अभ्यागत प्राध्यापिका आणि पत्रकार, जयपूर, राजस्थान.

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1047488.html