आज भारत प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत असला, तरी सामाजिक, मानसिक आणि नैतिक पातळीवर अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभु श्रीरामाचे जीवन केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित न रहाता व्यापक सामाजिक मार्गदर्शन म्हणून समोर येते. ३ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प्रभु श्रीराम म्हणजे आजच्या युवकांसाठी प्रभावी आदर्श, स्त्रीसन्मान आणि श्रीराम अन् आजच्या प्रशासनाने ‘रामायणा’चा आदर्श घ्यावा’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग २
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा →https://sanatanprabhat.org/marathi/1025522.html

१. स्थैर्य हेच खरे सामर्थ्य !
आधुनिक जीवनात मानसिक अस्थिरता ही मोठी समस्या आहे. श्रीरामाचे जीवन, म्हणजे मानसिक संतुलनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रत्येक संकटाला त्यांनी शांतपणे सामोरे जात विवेकपूर्ण निर्णय घेतले. आत्मनियंत्रण आणि स्थितप्रज्ञता, हेच त्याच्या व्यक्तीमत्त्वाचे बलस्थान होते.
२. संकट व्यवस्थापन
प्रभु श्रीरामाचे जीवन हे संकट व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मर्यादित साधनसामग्रीतून त्याने अशक्य वाटणार्या गोष्टीही शक्य केल्या. योग्य संघटन, स्पष्ट ध्येय आणि नैतिकता यांच्या आधारावर यश मिळवले.

३. स्पष्टवक्तेपणा आणि संवादकौशल्य
‘रामो द्विर्नाभिभाषते ।’, म्हणजेच राम कधीही दुटप्पी बोलत नाही. त्याच्या मनात जे होते, तेच ओठांवर असायचे आणि तेच त्याच्या कृतीत उतरत असे. त्याच्या संवादात स्पष्टता, संयम आणि सन्मान होता. आजच्या काळात प्रभावी संवाद ही यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या नेत्याच्या बोलण्यात संभ्रम नसतो, त्याच्या पाठीशी लोक खंबीरपणे उभे रहातात. वनवासाचा निर्णय असो किंवा बिभीषणाला अभय देण्याचे वचन असो; श्रीरामाच्या संवादात कधीही द्विधा मनःस्थिती नव्हती. त्याच्या नेतृत्वाचे खरे सामर्थ्य ही स्पष्टताच होती.
संवाद साधतांना केवळ सत्य बोलणे पुरेसे नसते, तर ते अशा पद्धतीने बोलायला हवे की, समोरच्याला त्याचा अपमान झाल्याचे वाटू नये. श्रीरामाची वाणी ‘कटू सत्य’सुद्धा अत्यंत सन्मानपूर्वक मांडण्यात पटाईत होती. शत्रूचा पराभव केल्यानंतरही त्याने कधीही अपशब्दांचा वापर केला नाही. रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी संवाद साधतांनाही त्याने कधी मर्यादा ओलांडली नाही. आजच्या सामाजिक माध्यमांच्या युगात जिथे शब्दांचा गैरवापर करून द्वेष पसरवला जातो, तिथे रामाचा ‘मर्यादशील संवाद’ आपल्याला माणुसकी टिकवून ठेवण्याची दिशा देतो.
४. रामराज्य – सुशासनाचा आदर्श !
रामराज्य ही न्याय, समता आणि पारदर्शकता यांच्यावर आधारित व्यवस्था होती. ‘प्रजाहिते सुखं राज्ञः ।’ (अर्थ : प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते.) हा त्याचा मूलमंत्र होता. पारदर्शक प्रशासन, सामाजिक न्याय, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आणि सर्वसमावेशक विकास हेच आजच्या भारतासाठी आदर्श मार्गदर्शक ठरतात.
५. स्वार्थापासून समाजहिताकडे !
आज ‘मी आणि माझे’ ही वृत्ती वाढत आहे. प्रभु श्रीरामाने मात्र वैयक्तिक सुखाचा त्याग करून समाजहिताला प्राधान्य दिले. प्रत्येक नागरिकाने ‘माझ्या कृतीने समाजाला काय लाभ ?’, हा विचार केला, तरच खर्या अर्थाने रामराज्याची निर्मिती होईल ! भारत आज संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. भौतिक प्रगतीसह नैतिक मूल्ये जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. श्रीरामाचे विचार हे केवळ धार्मिक नाहीत, तर राष्ट्रनिर्मितीसाठी व्यावहारिक मार्गदर्शक आहेत.
(समाप्त)
– अधिवक्ता चेतन चौधरी, सामाजिक आणि राजकीय विश्लेषक, पत्रकार, नंदुरबार.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?