इराणशी चालू असलेले युद्ध : दळणवळण बंदीचा काळ विसरायला लावेल इतका भयावह परिणाम !

इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांची आक्रमणे चालू होऊन आता एक महिना होऊन गेला. ‘पहिल्या ७२ घंट्यांत इराणी शिया राजवट सत्तेवरून खाली येईल आणि स्वतःची गुलामी राजवट इराणवर येऊन आपण हा विषय मार्गी लावू, मग क्युबाचा घास घ्यायला मोकळे होऊ’, ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची योजना काही पूर्ण होतांना दिसत नाही.

इराणी सैन्याने पहिल्या काही दिवसात हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. आता इराण सध्या काही देशांच्या नौका आणि तेल टँकर्स प्रत्येकी १८ कोटी रुपये घेऊन काही देशांच्या नौका हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून जाऊ देत आहे. त्यात भारतीय नौकासुद्धा आहेत. या युद्धाचा ‘सामान्य माणसाच्या आयुष्यावर याचे परिणाम काय ?, पेट्रोकेमिकलवर आधारित औषध उद्योग, तसेच खते आणि कृषी उत्पादन’, यांवर कसा परिणाम झाला आहे, ते १ एप्रिल या दिवशीच्या लेखात वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

( भाग  २ )

भाग १ वाचण्यासाठी लिंक : https://sanatanprabhat.org/marathi/1024746.html

१. ‘सल्फर’ टंचाई

अरब देशांचा ‘सल्फर’ उत्पादनात ५० टक्के जागतिक वाटा आहे. जवळपास सर्व रिफायनरी इराणी आक्रमणामुळे प्रभावित झालेल्या आहेत किंवा हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने सिद्ध असलेले उत्पादन जागतिक बाजारात जायला मार्ग उपलब्ध नाही. याचा परिणाम सल्फर आधारित खतांच्या पुरवठ्यावर झाला आहे. याखेरीज याचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

‘सेमीकंडक्टर’ उद्योगात अत्यंत शुद्ध ‘सल्फ्युरिक ॲसिड सिलिकॉन वेफर्स’च्या उत्पादन प्रक्रियेत वापरले जाते. त्याच्या टंचाईने ही प्रक्रिया धीमी पडत आहे. याखेरीज इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी उद्योगात कॉपर, निकेल, कोबाल्ट यांच्या उत्पादनात ‘सल्फ्युरिक ॲसिड अत्यावश्यक असल्याने सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आस्थापने सध्या चिंतेत आहेत. याचा परिणाम सरसकट सगळ्या बॅटरी उद्योगावर होणार आहे.

श्री. विनय जोशी

२. ‘हेलियम शॉक’ आणि डिजिटल उद्योग

नैसर्गिक वायू प्रक्रियेच्या वेळी उपउत्पादन म्हणून हेलियम काढला जातो. जेव्हा ‘एल्.एन्.जी.’ (द्रवीभूत नैसर्गिक वायू) उत्पादन थांबते, तेव्हा हेलियमचा पुरवठा बंद होतो. कतारमधील ‘रास लाप्फान कॉम्प्लेक्स’वर झालेल्या आक्रमणानंतर हेलियम उत्पादन ठप्प आहे. इथे जगातील सर्वाधिक हेलियम उत्पादन होते. जागतिक पुरवठ्यापैकी अनुमाने ३० ते ३६ टक्के भाग इथून पुरवला जातो. ‘रास लाप्फान’ची उत्पादन क्षमता न्यून होणे आणि मालवाहतुकीच्या अडचणी यांमुळे हे संकट अधिक गंभीर झाले आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी पाश्चात्त्य नौकांसाठी बंद झाल्यामुळे हेलियमचे कंटेनर्स आखाती देशांत अडकून पडले आहेत.

द्रव हेलियम क्रायोजेनिक साठवणुकीमध्ये असूनही सतत बाष्पीभूत होत असते. जर हे कंटेनर अनुमाने ४५ दिवसांच्या आत स्थलांतरित केले गेले नाहीत, तर गॅस टँकर्समधील मोठा भाग कायमचा नष्ट होतो. याचा परिणाम बाजारात आधीच दिसत असून अतीशुद्ध हेलियमच्या किमती २ आठवड्यांत दुप्पट झाल्या आहेत.

अ. वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या ‘एम्.आर्.आय. स्कॅनिंग मशिन्स’मधून (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग  स्कॅनिंग यंत्र) निर्माण होणार्‍या चित्रामध्ये स्पष्टता येण्यासाठी त्या मशीनमध्ये मॅग्नेट सतत गार रहावी लागतात. त्यासाठी अत्यंत अल्प तापमान रहाणे अतिशय आवश्यक असते, हे केवळ हेलियममुळे साध्य होते. त्यामुळे हेलियम तुटवड्याचा यावर लगेच परिणाम होणार आहे.

आ. हेलियम तुटवड्याचा ‘सेमीकंडक्टर’ उद्योगावर आणि ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) उद्योगावर होणारा परिणाम : याचा सर्वांत तात्काळ आणि गंभीर परिणाम पूर्व आशियातील सेमीकंडक्टर उद्योगावर होत आहे. ‘सेमीकंडक्टर’ बनवण्याच्या प्रक्रियेत हेलियम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ‘सेमीकंडक्टर’मधील ‘वेफर्स’ थंड करण्यासाठी याचा वापर होतो. याखेरीज ‘व्हॅक्यूम सिस्टम’मध्ये गळती पडताळण्यासाठी हेलियमला अन्य पर्याय उपलब्ध नाही.

५ नॅनोमीटरपेक्षा न्यून असलेल्या चिप्समध्ये निर्माण प्रक्रियेत थोडी जरी उष्णता निर्माण झाली, तरी उत्पादनात मोठी घट होऊ शकते किंवा उत्पादन पूर्णपणे थांबू शकते. यामुळे दक्षिण कोरियामधील चिप उद्योग सध्या संकटात आहे; कारण कोरिया त्याच्या आवश्यकतेच्या दोन-तृतीयांश हेलियम कतारमधून आयात करतो. ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘एस्.के. हायनिक्स’ यांसारखी आस्थापने, जी ‘एआय एक्सिलेटर’साठी आवश्यक असलेल्या ‘हाय-बँडविड्थ मेमरी’ पुरवठ्यात जगात आघाडीवर आहेत, त्यांनी आधीच हेलियम वाचवण्यासाठी पावले उचलायचा प्रारंभ केला आहे.

यामुळे वर्ष २०२६ मध्ये डिजिटल उपकरणे, विशेषतः भ्रमणभाष संच, भ्रमणसंगणक, ‘टॅब्लेट’सह सैनिकी आणि नागरी उपयोगाची ड्रोन यांच्यासह सध्या बोलबाला असलेले ‘एआय’ तंत्रज्ञान यांना न्यून उत्पादन आणि वाढलेला व्यय अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागेल.

३. अल्युमिनियम टंचाई आणि बियर, ‘सॉफ्ट ड्रिंक’ (शीतपेय), मेडिकल उपकरणे आणि ‘पॅकिंग’ (बांधणी) उद्योग

‘बहरीन अल्युमिनियम कंपनी अल्बा’ ही जगातील एक प्रमुख अल्युमिनियम कंपनी आहे आणि जगातील सर्वांत मोठी ‘सिंगल साईट स्मेल्टिंग फॅसिलिटी’ म्हणून ओळखली जाते. इराणी आक्रमणामुळे या कंपनीने तिची ३ युनिट बंद केली. परिणामी जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आला अन् त्यामुळे बियर आणि ‘सॉफ्ट ड्रिंक कॅन’चे दर वाढत आहेत. या पेयांना लागणार्‍या काचेच्या बाटल्यासुद्धा गॅसच्या कमतरतेमुळे महाग झाल्या आहेत. याचा परिणाम या पेयांची पॅकेजिंग २० ते ४० टक्के महाग होणार आहे. याखेरीज औषध उद्योगात असलेली शस्त्रकर्माची उपकरणे, ‘फॉईल्स’ आणि अन्नपदार्थ पॅकेजिंगमधील अल्युमिनियम वापराचे दरही महागणार आहेत. याचा एकाच वेळी अनेक उद्योगांवर परिणाम होणार आहे.

४. याखेरीज आणि यापेक्षा…

अ. पेट्रोल, डिझेल यांची टंचाई आणि वाढलेले उद्योग हे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीच्या किमतीवर परिणाम करणार आहेत. अजून भारतात म्हणावे तसे दर वाढलेले नाहीत; पण लवकरच ते वाढतील. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढणार आहेतच. त्यामुळे विमान प्रवास महाग होईल.

आ. अन्नधान्य, भाजीपाला, दूध, शिक्षण, रोजगार यात इंधन दरवाढ मोठा परिणाम करणार आहे. प्लास्टिक टंचाई आणि महाग प्लास्टिक यांमुळे पॅकेजिंग महाग होईल. यामुळे ई-कॉमर्स कंपन्या, तयार अन्नाची पाकिटे घरपोच देणे यांना दणका बसेल. गृहउद्योग आणि लघु उद्योग यांत सर्वाधिक फटका खातील.

इ. भारताच्या कानाकोपर्‍यात फोफावलेला घरगुती पर्यटन उद्योग, बांधकाम उद्योग हा सुद्धा मोठ्या संकटात जाईल. यामुळे सामूहिक शहाणपणा आणि खबरदारी यांची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

ई. सरकारने ‘कोरोना’ महामारीच्या काळातील दळणवळण बंदीच्या समस्येची आठवण करून देण्याच्या मागे हेच मोठे कारण आहे; कारण लांबलेले युद्ध आपल्याला कदाचित तो काळ विसरायला लावेल, इतका काळ आणि त्यापेक्षा मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात !

(समाप्त)

– विनय जोशी, दिसपूर, गौहत्ती, आसाम.

(साभार : ‘आय.सी.आर्.आर्.’चे संकेतस्थळ)