इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांची आक्रमणे चालू होऊन आता एक महिना होऊन गेला. ‘पहिल्या ७२ घंट्यांत इराणी शिया राजवट सत्तेवरून खाली येईल आणि स्वतःची गुलामी राजवट इराणवर येऊन आपण हा विषय मार्गी लावू, मग क्युबाचा घास घ्यायला मोकळे होऊ’, ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची योजना काही पूर्ण होतांना दिसत नाही.
इराणी सैन्याने पहिल्या काही दिवसांत हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. आता इराण सध्या काही देशांच्या नौका आणि तेल टँकर्स प्रत्येकी १८ कोटी रुपये घेऊन हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून जाऊ देत आहे. त्यात भारतीय नौकासुद्धा आहेत. हॉर्मुझच्या आत आणि बाहेर अनुमाने साडेतीन सहस्र नौका अन् टँकर्स अडकून पडले आहेत. आजपर्यंत इराणी सैन्याला न जुमानता बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार्या २० नौकांवर इराणी सैन्याने क्षेपणास्त्र किंवा ड्रोन डागून त्या जाळल्याने कुणीही या धाडसात उतरायला सिद्ध नाही.
भाग १

१. सामान्य माणसाच्या आयुष्यावर याचे परिणाम काय ?
जागतिक तेल पुरवठ्याच्या विस्कळीत होण्याने केवळ पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होईल, अशी सगळ्यांची धारणा असते; परंतु आधुनिक जगात कच्च्या (क्रूड) तेलापासून निर्माण होणार्या पदार्थांनी आणि वस्तूंनी इतक्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे की, क्रूड पुरवठा बंद, म्हणजे सामान्य माणसाचे आयुष्य ठप्प अशी स्थिती आहे. भारतीय संसदेत पंतप्रधान मोदी यांनी याची ‘लॉकडाऊन’शी (दळणवळण बंदीशी) केलेली तुलना ही या टोकाच्या क्रूड अवलंबनामुळेच आहे. याचे दूरगामी परिणाम लक्षात ठेवले आणि आपल्याला नेमक्या काय अडचणी येऊ शकतात, हे बघितले, तर येणारे काही महिने आपण काळजी घेऊ शकतो.
अ. गॅस तुटवडा : कतारच्या ‘रास लफ्फान गॅस टर्मिनल’वर झालेल्या इराणी आक्रमणामध्ये झालेल्या मोठ्या हानीत भारताच्या ४७ टक्के गॅस पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. यामुळे गॅसवर आधारित सगळे उद्योग अडचणीत आहेत. कोळशाला पर्याय म्हणून प्रदूषणविरहित आणि वापरायला सोपा म्हणून ‘एल्.पी.जी.’ गॅस (द्रवीभूत पेट्रोलियम वायू) कित्येक उद्योगात एकमेव इंधन स्रोत म्हणून वापरला जातो. याच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने होणारी अडचण आता समोर येऊ लागली आहे. उपाहारगृह आणि तयार अन्न उद्योगाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. याचा थेट परिणाम येणार्या काळात घरपोच अन्न पोचवण्याच्या उद्योगावर होईल. यात लक्षावधी लोक ‘डिलिव्हरी चेन’मध्ये (साखळी पुरवठ्यामध्ये) राहून रोजगार कमावतात, ते यामुळे बेरोजगार होतील.

आ. ‘सिरॅमिक’ उद्योग : जगातील क्रमांक २ चे ‘सिरॅमिक’ उत्पादन केंद्र गुजरातच्या मोर्बीमध्ये विकसित झालेले आहे. इथे देशातील ९० टक्के टाईल्स उत्पादन होते आणि यात ९ लाखांच्या आसपास माणसे काम करतात. इथे वार्षिक ५० सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होते, पैकी १८ सहस्र कोटी रुपयांची निर्यात होते. युद्ध चालू झाल्यापासून येथील ५०० कारखान्यांनी काम बंद केले आहे; कारण सध्या केवळ घरगुती गॅस पुरवठा ही सरकारची प्राथमिकता आहे. याचा परिणाम काही काळानंतर बांधकाम क्षेत्रातील (‘रिअल इस्टेट’मधील) रोजगारावर होईल; कारण घर, सदनिका बांधून झाले, तरी अंतर्गत कामे टाईल्स नसल्याने खोळंबतील.
इ. काच (क्रोकरी) उद्योग : काचेच्या बाटल्या आणि गृहोपयोगी वस्तूंच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणात गॅस वापरतात. त्या बंद करून परत चालू करण्यात मोठा वेळ जातो आणि परत चालू करतांना हानी होऊ शकते. बाटल्यांचा पुरवठा खंडित किंवा विस्कळीत झाला की, दारू, औषधे यांच्या बांधणीसाठी वापरल्या जाणार्या बाटल्या महाग होणार किंवा अपुर्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण होणार. याला पर्याय म्हणून प्लास्टिक बाटल्यांचा पर्याय बघावा, तर तो ही पेट्रोलियम पदार्थांपासून बनतो, त्यामुळे त्यातही अडचण आहेच.
२. पेट्रोकेमिकलवर आधारित औषध उद्योग
कित्येक आधुनिक औषधे पेट्रोकमिकलपासून बनतात. त्यामुळे त्याच्या अपुर्या पुरवठ्याचा परिणाम औषध उत्पादनावर होणे स्वाभाविक आहे. अनेक औषधात जवळपास सगळे घटक (इंग्रेडिएंट) पेट्रोकेमिकलमधून येतात.
अ. ‘पॅरासिटामॉल’, ‘आयबुप्रोफेन’, ‘मेटफॉर्मिन’ : आपण प्रतिदिनच्या आयुष्यात सगळ्यात अधिक वापरतो ते औषध, म्हणजे पॅरासिटामॉल. ते ‘फिनॉल’पासून सिद्ध होते. ‘आयबुप्रोफेन’ हे वेदनाशामक ‘आयसोब्युटिल्बेन्झिन’ आणि ‘प्रोपियोनिक ॲसिड’ यांच्यापासून सिद्ध होते. मधुमेह असलेले रुग्ण रक्तातील साखर न्यून करण्यासाठी वापरतात, ते मेटफॉर्मिन ८० ते ९० टक्के पेट्रोकेमिकल आधारित असते. याखेरीज अन्य औषधांसाठी लागणारा ९९ टक्के कच्चा माल पेट्रोकेमिकलपासून येतो. प्लास्टिक बनवणारे ‘क्रॅकर्स’ बंद झाले की, औषधांचा कच्चा मालही उपलब्ध व्हायचा बंद होतो.
आ. औषध उद्योगातील ‘नॅफ्था सॉल्व्हेंट’ : होर्मुझ सामुद्रधुनीमधून औषध निर्मितीसाठी लागणारा ‘नॅफ्था’ (रासायनिक घटक) जगभरात पोचतो, ती सध्या बंद आहे. नॅफ्था हा औषध उद्योगात ‘सॉल्व्हेंट’ म्हणून वापरतात आणि ‘ऍक्टिव्ह इंग्रेडियंट’ (सक्रीय घटक) वेगळा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
भारत हा जगातील ‘जेनेरिक’ औषधांचा (जेनेरिक औषधे म्हणजे रासायनिक पेटंटद्वारे संरक्षित केलेल्या औषधासारखे रासायनिक धर्म असणारे औषध !) सर्वांत मोठा पुरवठादार आहे. जगाच्या २० टक्के आणि अमेरिकेच्या ४० टक्के आवश्यकता भारत पूर्ण करतो; पण सध्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे हा उद्योग संकटात आहे. न्यून पुरवठ्यामुळे सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिल्याने उद्योगांना मिळणार्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची टंचाई निर्माण झाली आहे.
इ. औषध ‘पॅकेजिंग’ (बांधणी)मधील प्लास्टिक संकट : भारतातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’सारख्या संस्था जगाला ४० ते ५० टक्के लसी पुरवते, त्याही याच पेट्रोकेमिकल पदार्थांवर अवलंबून आहेत. लसीच्या बाटल्या, ‘सिरिंज’, ‘पॅकेजिंग’मधील अत्यंत उच्च दर्जाचे विशेष दर्जाचे प्लास्टिक आणि लसीमधील घटकही पेट्रोकेमिकलवर आधारित आहेत. त्यामुळे याच्या उत्पादन व्ययात वाढ आणि उपलब्धतेत घट होऊ घातली आहे.
३. खते आणि कृषी उत्पादन
जागतिक रासायनिक खतांच्या उत्पादनात अरब देश आणि इराण यांचा वाटा २० टक्के आहे; पण युरिया उत्पादनात हा वाटा ४६ टक्के आहे. भारत, ब्राझील, चीन हे अरब देशांचे मोठे ग्राहक आहेत. भारत त्याच्या वार्षिक आवश्यकतेच्या ५० टक्के युरिया अरब देशातून घेतो. याखेरीज अमोनियम नायट्रेटसारखी अन्य खते अरब देशातून येतात. नुकतीच रशियाने खतांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केल्याने भारतासाठी आगामी काळात वाढलेल्या दराने खते विकत घ्यावी लागतील. यासह अल्प खतांमुळे देशातील अन्न उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
खतांचा वाढलेला दर आणि अपुरा पुरवठा यांमुळे जगभरात अन्नाच्या टंचाईची शक्यता आताच सांगितली जात आहे. अन्न टंचाई आणि राजकीय स्थिरता यांचा जवळचा संबंध आहे. ‘ज्या ज्या देशात अन्न टंचाई निर्माण होते आणि महागाई वाढते, त्या त्या देशात सत्ताधारी पक्षांना आंदोलने अन् हिंसाचार यांचा सामना करावा लागतो’, असा इतिहास आहे. यामुळे आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिका येथे बरीच राजकीय वादळे येऊ घातली आहेत.
(क्रमशः)
– विनय जोशी, दिसपूर, गौहत्ती, आसाम.
(साभार : ‘आय.सी.आर्.आर्.’चे संकेतस्थळ)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025139.html
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?