हनुमान आणि आयुर्वेद

आज चैत्र पौर्णिमा या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने…

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना पंचमहाभूते असे म्हणतात. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका की, जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तीमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावला ! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे; मात्र तो स्वतःच्या शरिरासाठी उपकारक व्हावा, याकरता त्याला आटोक्यात ठेवणे, हे आवश्यक असते.

१. अभ्यंगाचे महत्त्व

शरिरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग, म्हणजे प्रतिदिन अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर रहातोच; मात्र त्वचेचे रोगही होत नाहीत. याखेरीज शरिराला बळकटी येऊन ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वहाण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्त्व तर शिकवत नसेल ?

२. सुंठ म्हणजे पौरुषशक्ती आणि हनुमंत म्हणजे साक्षात् पौरुषशक्तीच !

हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा सिद्ध केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण आणि विपाकाने (चयापचयानंतर होणारा रस) मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात न्यून करण्यास उपयुक्त आहे, असे नसून ती ‘वृष्य’ आहे, असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय, तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात् पौरुषशक्तीच नव्हे का ?

वैद्य परीक्षित शेवडे

३. हनुमंताच्या मुलाचे नाव आणि आयुर्वेद रसशास्त्रात  ‘मकरध्वज’ नावाचे औषध !

आणखी एक महत्त्वाची गोष्ट; हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदाच्या रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याविना करण्याचा विचारही करू नये !) पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही का ?

४. उत्तम आचार कसे असावे, याचीच शिकवण देणारा हनुमान !

आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धीमान असूनही प्रभु श्रीरामचंद्राच्या चरणी विनम्र भाव ठेवणारा हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे, याचीच शिकवण देत नाही का ?

आपले शास्त्र, परंपरा यांतून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे, हे निश्चित ! आवश्यकता आहे, ती त्याला डोळसपणे आणि श्रद्धेने नीट अभ्यासण्याची ! ‘नाही रे’, असे म्हणणे पुष्कळ सोपे असते. ‘आहे रे’, असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि हिंदु संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.