मारुतिस्तोत्राचा अर्थ

२ एप्रिल या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मारुतिस्तोत्र (अर्थासहित) प्रसिद्ध करत आहोत. मारुतिस्तोत्रात उच्चाराच्या दृष्टीने दोन शब्दांत स्वल्पविराम दिले आहेत. स्तोत्रांचा उच्चार कसा करायचा ? या संदर्भात सोपा नियम म्हणजे आ, ई, ऊ यांचा उच्चार जाणीवपूर्वक जरा दीर्घ करावा. ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि ‘मारुतिस्तोत्र’ यांचा उच्चार कसा करायचा, हे कळावे म्हणून सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर अनुक्रमे https://www.sanatan.org/mr/a/522.html आणि https://www.sanatan.org/mr/a/521.html या मार्गिकांवर ‘ऑडिओ’ विनामूल्य उपलब्ध आहेत.

या स्तोत्रातील काही श्लोक आणि त्यांचा अर्थ ३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध केला. आज पुढील श्लोक आणि त्यांचा अर्थ पाहूया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024473.html

श्री हनुमान

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ॥ ४ ॥

४.१.  लोकनाथ : मारुति तिन्ही लोकांचा नाथ, ‘लोकनाथ’ आहे.

४.२. जगन्नाथ : तो सार्‍या जगताचा (विश्वाचा) नाथ, ‘जगन्नाथ’ आहे.

४.३. प्राणनाथ : मारुति हृदयस्थ वायूचा (प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचप्राणांपैकी ‘प्राण’ याचा) नियंता म्हणून ‘प्राणनाथ’ आहे.

४.४. पुरातन : मारुति रामस्वरूप (ईश्वरस्वरूप) असल्याने, अनादि असल्याने त्याला ‘पुरातन’ असे संबोधले आहे.

४.५. पुण्यवंत : सत्संगती लाभणे हेच खरे पुण्य होय. प्रत्यक्ष रामप्रभूचा सहवास त्याला लाभला म्हणून ‘पुण्यवंत’ म्हटले आहे.

४.६. पुण्यशील : पुण्याने (सन्मार्गाने) वागणे हे ज्याचे शील आहे, असा मारुति होता; म्हणून त्याला ‘पुण्यशील’ म्हटले आहे.

४.७. पावना : अनेक कसोटीच्या प्रसंगीही त्याच्या मनात वाईट विचार डोकावले नाहीत. रामाच्या कृपेने तो पावन झाला असल्याने ‘पावना’ म्हटले आहे.

४.८. परतोषका : मारुतीच्या उपासनेने भक्तांना आनंद प्राप्त होतो; यासाठी दुसर्‍यांना आनंद देणारा म्हणून त्याला ‘परतोषका’ म्हटले आहे.

सनातनच्या लघुग्रंथाचे मुखपृष्ठ

मारुतीची वैशिष्ट्ये

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥ ५ ॥

अर्थ : हातात ध्वज घेतल्यावर जसा शरिराचा आकार होतो, तशा रितीने हातात गदा उगारून मारुति आवेशाने शत्रूवर चालून जातो. त्याचे हे रौद्ररूप बघून प्रत्यक्ष काळ, मृत्यू हेसुद्धा भयाने थरथर कापू लागतात.

ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ॥ ६ ॥

अर्थ : अशा वेळी ‘सारे ब्रह्मांड जबड्यात मावेल’, एवढे त्याचे तोंड आणि दंतपंक्ती वासलेली असते, डोळे आग ओकत असतात, भुवया वक्र झालेल्या असतात.

पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटि कासोटी, घंटा किंकिणि नागरा ॥ ७ ॥

अर्थ : शेपूट वर उभारलेले असते. (असे त्याचे उग्र रूप असते.) मारुतीच्या मस्तकी शोभिवंत मुकुट आहे, तसेच त्याने सुंदर कुंडले धारण केलेली आहेत. त्याच्या कटीला (कमरेला) सोन्याचा लंगोट आहे. त्याच्या कटीला बांधलेल्या घंटांचा मंजुळ असा नाद होतो.

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥

अर्थ : एखाद्या पर्वतासारखा तो भक्कमपणे उभा ठाकला आहे. त्याची शरीरयष्टी सडपातळ आणि बांधेसूद आहे. आकाशात चमकणार्‍या विजेप्रमाणे तो चपळ आहे.

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ॥ ९ ॥

अर्थ : इंद्रजिताने सोडलेल्या शक्तीने लक्ष्मण मूर्च्छित झाला असता सुषेण वैद्याने द्रोणागिरीवरून संजीवनी वनस्पती आणायला सांगितली. ती आणण्यास मारुतीने उत्तरेला कोट्यवधी किलोमीटर अंतर उड्डाण केले. मारुतीला संजीवनी वनस्पती ओळखता येईना; यास्तव त्याने मंदार पर्वताप्रमाणे विशाल असा द्रोणागिरिच रागाने जागचा उपटला.

आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती।
मनासी टाकिलें मागें, गतीस तुळणा नसे ॥ १० ॥

अर्थ : तो विशाल पर्वत त्याने हातावर उचलून आणला. औषधीच्या प्रयोगाने लक्ष्मण शुद्धीवर आल्यावर मारुतीने तो पर्वत पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवला. हे सारे त्याने मनोवेगाने केले. किंबहुना मनापेक्षाही त्याचा वेग अधिक होता. त्याची गती अतुलनीय अशी आहे.

(क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025094.html