‘काही दशकांपूर्वी मुलांचे संगोपन नैसर्गिक, शिस्तबद्ध आणि संस्कारप्रधान वातावरणात होत असे. कुटुंब, शाळा आणि समाज यांच्या प्रयत्नांतून मुलांमध्ये नैतिक मूल्ये अन् राष्ट्रप्रेम विकसित होत होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाषचा वाढता वापर यांमुळे मुलांच्या जीवनशैलीत पालट झाले आहेत. यातून गंभीर सामाजिक आणि नैतिक आव्हानेही निर्माण झाली. यावर ‘बालसंस्कार’ हेच उत्तर आहे.

१. काही दशकांपूर्वीच्या बालकांचे संस्कारमय जीवन
१ अ. नैसर्गिक संगोपन : मूल जन्माला आले की, त्याला आईचे दूध मिळायचे. गायीच्या किंवा बाहेरच्या दुधावर त्याला अवलंबून रहावे लागत नव्हते; कारण माता वात्सल्यभावाने मुलांना दुग्धपान करत. आताच्या माता स्वतःच्या शरिराकडे अधिक लक्ष देत असल्याने मुलाला दुग्धपान करतातच, असे नाही. गायीचे दूध मुलांना देणे त्यांना योग्य वाटते.
१ आ. नामकरणामागील संस्कार : पूर्वी मुलांची नावे देवतांच्या नावांवरून ठेवली जात; कारण ‘देवाच्या नावामुळे मुलात देवाचे गुण यावेत आणि तो पुढे मोठा व्हावा’, अशी भावना त्यामागे असे.
१ इ. बालपणीचे खेळ आणि आनंदी जीवन : मुले एकत्रित खेळायची. काही मुली भातुकली खेळायच्या. कधी कधी एकमेकांशी भांडणे व्हायची; पण ती टोकाला जात नसत. मुलांना त्यातून आनंद मिळायचा. मुलांना मैदानी खेळांत समाधान वाटायचे. ‘भारतीय खेळांविषयी श्रद्धा निर्माण होईल’, असे वातावरण शिक्षक निर्माण करत.
१ ई. आरोग्यदायी आहार : सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणाचा विचार करून आई मुलांसाठी प्रेमाने जेवण बनवत असे. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. व्यायामामुळेही त्यांची प्रकृती चांगली रहात होती.
१ उ. भारतीय खेळांचे महत्त्व : भारतीय प्रकारच्या खेळांविषयी मुलांमध्ये श्रद्धा असायची. कबड्डी, हुतुतू, आट्यापाट्या, गलोरी, मल्लखांब, ‘जिम्नॅस्टिक्स’ (व्यायामकला), जोर-बैठका, सूर्यनमस्कार, योगासने आदी गुंतवणूक नसलेले व्यायाम करण्याची पद्धत होती. मुले आनंदाने तालमीत किंवा सकाळी किंवा शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी जात. त्यासाठी शुल्क आकारले जात नसे. मुले शरीरयष्टीकडे लक्ष देत. त्यांचे मनही चांगले रहायचे. त्यातून राष्ट्रासाठी चांगल्या नागरिकाची उभारणी होत होती.
२. सध्याची पालटती जीवनशैली आणि तिचे विपरीत परिणाम

२ अ. ‘फास्ट फूड’ (कु)संस्कृती : सद्यःस्थितीत वर सांगितलेल्या सर्व गोष्टींपासून विद्यार्थी दूर जात आहेत. आईच्या हातच्या जेवणाची जागा ‘फास्ट फूड’ने (पॅकबंद जेवण किंवा झटपट तयार होणारे अन्न) घेतली आहे. ते जेवण किती दिवसांपूर्वीचे असते, त्यात किती जंतू असतात, याचा विचार विद्यार्थी करत नाहीत.
२ आ. भ्रमणभाषचा अतिरेकामुळे संस्कारहीनता : सध्या खेळाची जागा भ्रमणभाषने घेतली आहे. मैदानावर जाणे तर सोडाच, मैदान पहाण्यासाठीही बाहेर पडण्याची सिद्धता अनेकांमध्ये दिसत नाही. व्यायाम करणे किंवा नवीन कौशल्ये शिकणे हेही होत नाही. याचे मुख्य कारण, म्हणजे सामाजिक माध्यमे, भ्रमणभाष आणि ‘पॉर्न’ व्हिडिओ यांचा मुलांवर वाईट परिणाम होत आहे. भ्रमणभाषमुळे मुले, घर, कुटुंब, समाज, देश आणि राष्ट्र यांच्यावर गंभीर अन् हानीकारक परिणाम झालेले आहेत. पुढील पिढ्या व्यसनाधीन होत आहेत. सध्याची मुले अभ्यास किंवा जेवण यांचा विचार न करता भ्रमणभाष पहातात. त्यांच्या पहाण्यात व्यत्यय आणल्यास मुले रागावतात किंवा भांडतात. भ्रमणभाष हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. यामुळे मुले संस्कारहीन होत आहेत. अभ्यासाऐवजी भ्रमणभाष पहाणार्या मुलांना ‘आपण अधोगतीकडे जात आहोत’, हे कळत नाही.
२ इ. मालिका ते वासनावृद्धी ! : सध्याच्या मालिकांमध्ये पती-पत्नीतील वाद, फसवणूक, भ्रष्टाचार, मारामार्या, व्यभिचार, बलात्कार, खून आणि अनैतिकता असे विषय असतात. अशा विषयांचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. परिणामी ते तसेच अनुकरण करतात.
बलात्कार किंवा अनैतिक वर्तन अशी दृश्ये पाहिल्याने चुकीचे संस्कार निर्माण होतात. वासना वाढल्याने अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त होते.
२ ई. वासनांधता आणि व्यसनी वृत्ती यांच्यात वाढ : अश्लील चित्रपट पहाणे, जुगार खेळणे अशा सवयी त्यांना लागतात. कामुक व्हिडिओंमधील दृश्ये वास्तवात आणण्याचा मुले प्रयत्न करतात. परिणामी त्यांना बहीण, भाऊ, परस्त्री यांचे भान रहात नाही. मुले वासनेत अडकत जातात.
भावाने बहिणीवर बलात्कार करणे, म्हणजे वासनांधतेची परिसीमाच !
‘वेळ रात्री ८.३० ! रस्त्यावर दिवे नव्हते. सर्वत्र अंधार होता. १८ वर्षांची तरुणी दुचाकीवरून घरी जात असतांना ती एकटी असल्याचे पाहून दोन दुचाकींवरील ४ मुले तिच्या मागे लागली. त्यांनी तिला पकडून एका इमारतीतील खोलीत नेले. तेथे त्यांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. घरी आल्यावर तिने आई-वडिलांना घडलेला प्रसंग सांगितला आणि रडू लागली. याच वेळी तिचा भाऊ घरी आला. त्या वेळी तिने त्याला ओळखले की, तोही त्या ४ मुलांपैकी एक होता; पण तेव्हा त्याच्या चेहर्यावर मास्क (मुखपट्टी) असल्याने ती त्याला ओळखू शकली नव्हती. या प्रसंगातून वासनांधतेची परिसीमा दिसून येते. अशा घटनांचा समाजावर किती गंभीर परिणाम होतो, याचा विचार होणे आवश्यक आहे.’
– श्री. मधुसूदन कुलकर्णी
३. उपाययोजना
३ अ. कुटुंबाची भूमिका : आई-वडिलांनी मुलांना लहान वयात भ्रमणभाष आणि सामाजिक माध्यमे पहाण्यास प्रोत्साहन देऊ नये. मुलांसमोर भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी यांचा अतिरिक्त वापर टाळावा. त्यांना संस्कारक्षम कार्यक्रमच दाखवावेत.
३ आ. केंद्र सरकारची भूमिका : १६ वर्षांखालील मुलांना अश्लील सामग्रीपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी कायदा असायला हवा. कायद्याची कार्यवाही भारतातील प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत काटेकोरपणे झाली, तर अनेक विद्यार्थी या विळख्यातून बाहेर पडू शकतील. ‘फेस रिकग्निशन (चेहरा ओळखणे) तंत्रज्ञाना’द्वारे जर वापरकर्त्याचे वय १६ वर्षांपेक्षा न्यून असेल, तर अश्लील सामग्री आपोआप बंद होईल, अशी व्यवस्था विकसित करावी.
३ इ. शिक्षकांची भूमिका : मनाचे श्लोक, रामरक्षा, हनुमत्कवच, हनुमान स्तोत्र, गणपति स्तोत्र, दत्ताचे श्लोक, शिवस्तोत्र, देवीकवच, विविध देवतांचे महत्त्व, नामस्मरण आणि नैतिक मूल्ये यांची माहिती मुलांना सांगितली पाहिजे. शाळेत आठवड्यातून किमान १ घंटा संस्कारवर्गासाठी राखून ठेवल्यास ती माहिती त्यांच्या पुढील आयुष्यात उपयुक्त ठरेल.
– श्री. मधुसूदन कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१३.६.२०२६)
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
मुलांच्या जीवनशैलीत सकारात्मक पालट होण्यासाठी ‘बालसंस्कार’ हे एकमेव प्रभावी माध्यम आहे !
आधी मन शुद्ध करावे !