संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?

मुलांचे संगोपन हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण, त्यांच्यावरील संस्कार, विचारसरणी आणि भविष्यातील यश-अपयश यांत पालकांची भूमिका महत्त्वाची असते. आधुनिक जीवनशैलीत मुलांना प्रेम, संवाद, शिस्त, स्वावलंबन आदींचे शिक्षण देणे आवश्यक आहे. काही पालकांना वाटते की, मुलांचे दायित्व शिक्षकांवरही अवलंबून आहे; पण शिक्षकांना यासाठी उत्तरदायी धरता येत नाही; कारण ‘मुलांचे कल्याण व्हावे’, हे पालकांच्या व्यतिरिक्त कुणाला वाटणार ? शिक्षक आणि समाज हे पालकांचे केवळ साहाय्यक किंवा मार्गदर्शक आहेत. या लेखाद्वारे पालकांनी मुलांशी कसे वागावे ?, त्यांच्यात चांगल्या सवयी आणि संस्कार कसे रुजवावेत ?, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणते प्रयत्न करावेत ?, यांविषयी मार्गदर्शन केले आहे.

१. सध्याच्या मुलांची स्थिती 

एका शाळेत इयत्ता ९ वीतील मुली दारू पितांना पकडल्या गेल्या. एका शिक्षकाने ८ वीतील विद्यार्थ्याला त्याच्या चुकीसाठी कानशिलात लगावली. त्याने थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार प्रविष्ट केली. एका शाळेत भ्रमणभाष वापरण्यावर बंदी आहे; पण मुलांशी संपर्क साधण्यासाठी पालकच भ्रमणभाष देतात. काही महाविद्यालयीन मुले अर्धवेळ नोकरी करतात. त्या पैशांतून महागडे भ्रमणभाष घेतात.

श्री. धनंजय हर्षे

२. मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधा !

मुले शाळेतून घरी आल्यानंतर शाळेतील घडामोडींविषयी पालकांना सांगतात का ? हे पहायला हवे. जर असे होत नसेल, तर याचा अर्थ पालकांची मुलांशी मैत्रीच झालेली नाही. मुलांना पालकांविषयी विश्वास वाटत नाही. यासाठी पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधावा. स्वतःच्या चुका मुलांना सांगाव्यात. मुलांसमवेत खेळावे. त्यांना बाहेर घेऊन जावे. जर वडिलांचे दुकान असेल, तर शनिवारी-रविवारी किंवा सुट्टीमध्ये अर्धा दिवस तरी मुलाला तेथे न्यावे. पैसा कसा येतो ?, आई-बाबांना किती कष्ट करावे लागतात ?, याविषयी मुले शिकतात. त्यांना हिशोब येतो. आईने मुलांना भाजी आणण्यासह बँकेतही न्यावे. खाऊसाठी किंवा इतर वेळी पालक मुलांना पैसे देतात. त्याचा हिशोब घ्यावा. परिस्थिती चांगली असली, तरीही हिशोब घ्यावा; कारण यातूनच ‘मला कुणीतरी विचारणार आहे, मला पैसे नीट वापरायचे आहेत’, हे मनावर बिंबते. त्याचा संस्कार होतो.

३. स्वावलंबन

सध्याच्या १० वीतील मुलांना चहाही करता येत नाही. हेही त्यांना शिकवावे. शनिवारी-रविवारी अर्धा घंटा मुलांना स्वयंपाकघरात कामे करण्यास सांगावे. कोशिंबीर करणे, अल्पाहार बनवणे आदी सवयी लागल्यास मुले स्वावलंबी होतात.

४. पालकांच्या वागणुकीचा परिणाम

मुलांसमोर पालकांचे वर्तन आदर्श हवे. पती-पत्नीत प्रेमाचे संबंध असले, तर चांगले आहे; पण वाद होत असल्यास मुलांसमोर समस्या निर्माण होते. मुले पालकांचे अनुकरण करतात.

५. प्रेमाने घडवणे अधिक प्रभावी

एखाद्या मुलाला सतत मारावे लागते, याचा अर्थ ‘मुलांसमोर ‘पालक’ या नात्याने आपण हरलो’, असा विचार करावा. आपण चांगले पालक व्हावे; कारण व्यक्ती प्रेमानेच पालटते. आवश्यकतेनुसार शिक्षा करावी.

६. मुलांचा अभ्यास कसा घ्यावा ?

काही वेळा पालक मुलांचा अभ्यास घेतात. गृहपाठ स्वतः लिहितात किंवा स्वतःच उत्तरे सांगतात, गणिते सोडवून देतात. ही झाली पालकांची पाट्याटाकूवृत्ती ! मुलांना अभ्यास स्वतः करायला शिकवा. आवश्यकतेनुसार साहाय्य करा.

७. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या ! 

मुलांच्या प्रश्नांचा पालकांना कंटाळा येतो. उत्तर योग्य आहे कि नाही ?, हेही पडताळले जात नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी मुले पालकांपासून दुरावतात.

८. पालकांचे न ऐकणारी मुले 

शिक्षक मुलांचे म्हणणे ऐकून घेतात; पण पालक ऐकून घेत नाहीत. त्यामुळे मुले शिक्षकांचेच ऐकतात. पालकांची तक्रार असते की, मुले आमचे ऐकत नाहीत.

९. मुलांसमोर अडचणी येऊ द्या ! 

पालक मुलांसमोर अडचणी येऊ देत नाहीत. सायकल शिकतांना मुले पडणार, त्यांना खरचटणार आणि मुले रडत येणार. तेव्हा पालकांनी त्यांना जवळ घेऊन मलमपट्टी करावी; परंतु काही पालक पडायच्या आधीच अतोनात काळजी घेतात. अडचणींतूनही मुले पुष्कळ शिकतात.

१०. आदर्श शाळा

एका मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले. शाळेत सर्वांना कुंकू लावले जाते. प्रतिदिन रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, तसेच श्लोक म्हटले जातात. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती आहे.

– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सनातन संस्थेचे बालसंस्कार वर्ग आणि ग्रंथांचे महत्त्व !

सनातन संस्था मुलांसाठी विनामूल्य बालसंस्कारवर्ग घेते. आपल्या मुला-मुलींना तेथे पाठवू शकता. सनातन संस्थेने मुलांसाठी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्या ग्रंथांचे वाचन पालक आणि मुले यांनी करणेही आवश्यक आहे. पालकांच्या संदर्भातही सनातनची ग्रंथमालिका उपलब्ध आहे. पालकांनी तिचा लाभ घ्यावा.

– श्री. धनंजय हर्षे