मारुतिस्तोत्राचा अर्थ

२ एप्रिल या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मारुतिस्तोत्र (अर्थासहित) प्रसिद्ध करत आहोत. मारुतिस्तोत्रात उच्चाराच्या दृष्टीने दोन शब्दांत स्वल्पविराम दिले आहेत. स्तोत्रांचा उच्चार कसा करायचा ? या संदर्भात सोपा नियम म्हणजे आ, ई, ऊ यांचा उच्चार जाणीवपूर्वक जरा दीर्घ करावा. ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि ‘मारुतिस्तोत्र’ यांचा उच्चार कसा करायचा, हे कळावे म्हणून सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर अनुक्रमे https://www.sanatan.org/mr/a/522.html आणि https://www.sanatan.org/mr/a/521.html या मार्गिकांवर ‘ऑडिओ’ विनामूल्य उपलब्ध आहेत.

(भाग १)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024861.html

श्री हनुमान

मारुतिस्तोत्राचा अर्थ

समर्थ रामदासस्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती केली आहे. स्तोत्रातील आरंभीचे तेरा श्लोक स्तुतीपर आणि वर्णनपर अन् नंतरचे श्लोक फलश्रुतीचे आहेत.

मारुतीची विविध नावे आणि त्या नावांचे अर्थ

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥ १ ॥

१.१. भीमरूपी महारुद्रा : भीमरूप म्हणजे प्रचंड, महाकाय शरीर असलेला. रुद्रांची संख्या अकरा आहे. मारुति या एकादश रुद्रांपैकी एक आहे. याकरता मारुतीला ‘भीमरूपी महारुद्रा’ असे म्हटले आहे.

१.२. वज्र हनुमान : मारुति जन्मल्यावर, उगवत्या सूर्यबिंबाला फळ समजून त्याने ते गिळण्यासाठी उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने त्याचे वज्र मारुतीवर फेकून मारले असता ते त्याच्या हनुवटीला लागले आणि ती छाटली गेली. तेव्हापासून मारुतीला ‘हनुमान’ म्हणू लागले. याकरता येथे समर्थांनी ‘वज्र हनुमान’ असे संबोधले आहे.

१.३. मारुति : मरुताचा, म्हणजे वायूचा पुत्र असल्याने त्याला ‘मारुति’ हे नामाभिधान प्राप्त झाले.

१.४. वनारी : लंकेत सीतेचा शोध घेत असता मारुतीची अशोकवनात तिच्याशी भेट झाली. त्यानंतर रावणाला अतिशय प्रिय असलेल्या अशोकवनाचा मारुतीने पूर्ण विध्वंस केला; म्हणून त्याला ‘वनारी’ (वनाचा अरि म्हणजे शत्रू, नाश करणारा) असे म्हटले आहे.

१.५. अंजनीसुत : मारुति हा अंजनी या वानरीचा पुत्र असल्याने  ‘अंजनीसुत’ म्हटले आहे.

१.६. रामदूत : मारुति रामाचा दूत बनून सीतेचा शोध घ्यायला लंकेत गेला आणि रामाने दिलेली खुणेची मुद्रिका तिला दाखवून धीर दिला. यासाठी त्याला ‘रामदूत’ म्हटले आहे.

१.७. ‘प्रभंजन’ :  हे वायूचे एक नाव आहे. तसेच सोसाट्याचा, वादळी वारा असाही ‘प्रभंजन’ या शब्दाचा एक अर्थ आहे. मारुति वादळी वार्‍याप्रमाणे वेगाने जाणारा आणि शत्रूला छिन्नविच्छिन्न करणारा असल्याने त्याला ‘प्रभंजन’ म्हटले आहे.

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ॥ २ ॥

२.१. महाबळी : मारुति हा महासामर्थ्यवान होता. त्याने अंगच्या शक्तीने अचाट, साहसी कृत्ये केली आहेत; म्हणून त्याला ‘महाबळी’ म्हटले आहे.

२.२. प्राणदाता : तो ‘प्राणदाता’, म्हणजे जीवन देणारा आहे. हृदयस्थ वायूला प्राण म्हटले जाते. तसेच इंद्रजिताने सोडलेली शक्ती लागून लक्ष्मण मूर्च्छित झाला असता मारुतीने द्रोणागिरि आणून त्याचे प्राण वाचवले होते.

प्राण आणि शक्ती देऊन सर्वांना कार्यासाठी उद्युक्त करणारा असल्याने ‘सकळां उठवी बळें’ असे म्हटले आहे. (हे मारुतीचे विशेषण आहे. – संकलक)

२.३. सौख्यकारी शोकहर्ता : मारुति त्याची भक्ती करणार्‍याला सौख्य प्राप्त करून देतो आणि वाईट शक्तींचा नाश करून शोक (दुःख) नाहीसा करतो, याकरता त्याला ‘सौख्यकारी शोकहर्ता’ असे म्हटले आहे.

२.४. धूर्त : मारुति अतिशय बुद्धीमान आणि राजकारणपटू असल्याने काही प्रसंगी रामानेही त्याचा समादेश (सल्ला) घेतलेला आहे; म्हणून त्याला ‘धूर्त’ म्हटले आहे.

२.५. वैष्णव : मारुति शिवाचा अवतार असूनही प्रखर रामभक्त असल्यामुळे त्याला ‘वैष्णव’ असे म्हटले आहे.

२.६. गायका : मारुतीला गायनकला उत्तम प्रकारे येत असल्याने आणि तो रामनामाचे सतत गायन (जप) करत असल्याने ‘गायका’ असे म्हटले आहे.

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पाताळदेवताहंता, भव्य सिंदूरलेपना ॥३॥

३.१. दीनानाथ : दीनांचा नाथ या अर्थी मारुतीला ‘दीनानाथ’ म्हटले आहे.

३.२. हरिरूपा : ‘हरि’ या शब्दाचे अर्थ आहेत वायू, वानर, शिव, विष्णु इत्यादी. मारुति वायुदेवाचा मुलगा, वानररूप, शिवाचा अवतार आणि रामभक्तीमुळे त्याच्यातील विष्णुतत्त्व अधिक असलेला आहे; या कारणांमुळे मारुतीला ‘हरीरूपा’ म्हटले आहे.

३.३. सुंदरा : तो रूपाने देखणा, सुंदर असल्याने ‘सुंदरा’ असे म्हटले आहे.

३.४. जगदंतरा : सर्व जगताच्या अंतरात वास करणारा म्हणून ‘जगदंतरा’ म्हटले आहे.

३.५. पाताळदेवताहंता : अहिरावण आणि महिरावण यांच्याशी रामाचे युद्ध झाले असता मारुतीने स्वत:च्या पराक्रमाने रामाचे रक्षण केले. याकरता त्याला ‘पाताळदेवताहंता’ असे म्हटले आहे.

३.६. भव्य सिंदूरलेपना : रामाचे आयुष्य वाढावे; म्हणून मारुतीने सर्वांगाला शेंदूर फासून घेतला, अशी कथा आहे. मारुतीच्या संपूर्ण मूर्तीला शेंदूर वहाण्याची (लावण्याची) प्रथा आहे. याकरता त्याला ‘भव्य सिंदूरलेपना’ असे म्हटले आहे.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)

(क्रमश:)