हनुमान जयंतीच्या निमित्ताने मारुतिस्तोत्र (अर्थासहित) प्रसिद्ध करत आहोत. मारुतिस्तोत्रात उच्चाराच्या दृष्टीने दोन शब्दांत स्वल्पविराम दिले आहेत. स्तोत्रांचा उच्चार कसा करायचा ? या संदर्भात सोपा नियम म्हणजे आ, ई, ऊ यांचा उच्चार जाणीवपूर्वक जरा दीर्घ करावा. ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि ‘मारुतिस्तोत्र’ यांचा उच्चार कसा करायचा, हे कळावे म्हणून सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर अनुक्रमे https://www.sanatan.org/mr/a/522.html आणि https://www.sanatan.org/mr/a/521.html या मार्गिकांवर ‘ऑडिओ’ विनामूल्य उपलब्ध आहेत. १ एप्रिल या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित श्लोक देत आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024861.html

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ॥ ११ ॥
अर्थ : मारुति सीतेला अशोकवनात भेटल्यावर, मारुतीने तिला आपल्यासमवेत येण्याची प्रार्थना केली. त्या वेळी त्याचे लहान रूप पाहून सीतेने त्याच्या बळाविषयी शंका व्यक्त केल्यावर मारुतीने ‘सारे ब्रह्मांड थिटे पडेल’, एवढे महाविशाल रूप धारण केले. ते एवढे प्रचंड होते की, मेरु (स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक या लोकांस आधारभूत असा सोन्याचा पर्वत) अन् मंदार (समुद्रमंथनासाठी वापरलेला पर्वत) हेसुद्धा त्यापुढे लहान वाटू लागले.
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके ।
तयासी तुळणा कैंचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२ ॥
अर्थ : सीतेच्या शोधप्रसंगी समुद्र ओलांडून जाण्याकरता वानरांनी मारुतीची स्तुती करून त्याला स्वसामर्थ्याची जाणीव करून दिली. त्या वेळी मारुतीने ‘आपल्या वज्रासमान शेपटीने सार्या ब्रह्मांडाला विळखा पडेल’, एवढे विशाल रूप धारण केले. त्याच्या तोडीचा सार्या ब्रह्मांडात कुणीही नाही.
आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥
अर्थ : नुकत्याच जन्मलेल्या मारुतीने उगवत्या लालभडक सूर्यबिंबाला फळ समजून ते गिळण्यासाठी आकाशात झेप घेतली आणि ‘अनंत आकाशाला भेदून जाईल’, एवढे विराट रूप धारण केले.
मारुतिस्तोत्राच्या पठणाची फलश्रुती
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ॥ १४ ॥
अर्थ : हे स्तोत्र पठण करणार्याला धनधान्य, पशूधन, पुत्रपौत्र (संतती) या सार्याचा आणि उत्तम रूपविद्यादिकांचा लाभ होतो.
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ॥ १५ ॥
अर्थ : भूत, प्रेत, समंध आदींची बाधा, सगळे रोग, व्याधी (त्रिविध ताप) नष्ट होतात. मारुतीच्या दर्शनाने सारी चिंता दूर होते आणि आनंद होतो.
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ॥ १६ ॥
अर्थ : हे पंधराश्लोकी स्तोत्र मारुतीच्याच कृपेने आपणाला लाभले आहे. त्याच्या पठणाने ‘वाढत्या चंद्रकलेप्रमाणे उत्तरोत्तर वाढते फळ मिळते’, यात मुळीच संशय नाही.
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ॥ १७ ॥
अर्थ : मारुति सार्या रामाच्या दासांमध्ये (भक्तांमध्ये) श्रेष्ठतम आहे. तो वानरकुळाला भूषणरूप आहे. अशा रामरूप झालेल्या अंतरात्म्याच्या दर्शनाने (आत्मज्ञानाने) सर्व दोष (विविध ताप) नष्ट होतात.
॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
अर्थ : अशा प्रकारे सर्व संकटांचे निरसन करणारे रामदासस्वामी विरचित मारुतिस्तोत्र समाप्त झाले. हे श्रीसीतारामचंद्राच्या चरणी अर्पण असो.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)
(समाप्त)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?