भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !

मध्यंतरी मी एका कार्यक्रमात गेले होते. तेथे काही कुटुंबे ४ ते ८ वर्षे वयोगटातील त्यांच्या लहान मुलांना समवेत घेऊन आली होती. त्यांचे आई-वडील माझ्याशी बोलत होते; पण ही चारही मुले भ्रमणभाषमध्ये गर्क होती. प्रारंभी आई-वडिलांनी सांगितल्यावर त्यांनी मला नमस्कार केला; पण नंतर त्यांची मान भ्रमणभाष बघण्यातच खाली झुकलेली होती. मी त्यांना संभाषणात शाळेशी संबंधित प्रश्न विचारले; पण त्यांनी अनिच्छेने, भ्रमणभाषमधून डोकेही वर न काढता प्रश्नांची उत्तरे दिली; पण यामुळे त्यांचे आई-वडील ओशाळले होते.

१. भ्रमणभाषसाठी मुलांनी हट्ट केल्याने त्यांना तो द्यावाच लागणे  

मला आश्चर्य वाटले की, मुले समवयस्क असूनही त्यांचा आपापसांत काहीच संवाद नव्हता. मी न रहावून पालकांना विचारले, ‘‘तुमची मुले किती वेळ भ्रमणभाष पहातात ?’’ ते म्हणाले, ‘‘मुले ऐकतच नाहीत. भ्रमणभाष न दिल्यास रडतात, ओरडतात, भांडण करतात. मग त्यांचे आजी-आजोबा सांगतात की, द्या त्यांना थोडा वेळ भ्रमणभाष ! कशाला मुलांना रडवता ? पण १० मिनिटांचा कधी १ घंटा होतो, ते कळतच नाही.’’ कोरोना महामारीच्या काळात शिक्षणासाठी मुलांना भ्रमणभाष द्यावा लागला. त्यामुळे तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला.

सौ. शेफाली वैद्य

२. दीड वर्षाच्या मुलाच्या अंगावर कपडे अल्प; पण हातात मात्र भ्रमणभाष !

मी २ वर्षांपूर्वी तमिळनाडू येथे मंदिरे पहायला गेले होते. एका मंदिराबाहेर फुले विकणार्‍या बाईच्या शेजारी तिचा दीड वर्षांचा नातू बसला होता. अंगात केवळ शर्ट होता, खाली काहीच नाही; पण हातात मात्र भ्रमणभाष होता आणि त्यात डोके खुपसून तो बसला होता. हा केवळ विनोद नसून भयावह वस्तूस्थिती आहे.

३. संशोधन काय सांगते ? 

पुणे येथील भारती विद्यापिठाच्या संशोधनात आढळले की, कोरोना महामारीनंतर मुलांचे भ्रमणभाष पहाण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. संपूर्ण जगातील ८७ टक्के मुले ‘जागतिक आरोग्य संघटने’ने सुचवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळ भ्रमणभाष वापरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार २ वर्षांखालील मुलांना भ्रमणभाषसाठी शून्य मिनिटे वेळ (भ्रमणभाष पहाण्यास देऊ नये), २ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी दिवसाला १ घंट्यापेक्षा न्यून वेळ, तर वयाच्या ६ व्या वर्षांनंतर दिवसातून २ घंटे द्यावेत.

अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ जोनाथन हाईट यांनी वर्ष २०२४ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘द ॲन्क्शस जनरेशन’ या पुस्तकात म्हटले की, ‘स्मार्टफोन’ आणि सामाजिक माध्यमे यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये नैराश्य अन् चिंता वाढवतो.

– सौ. शेफाली वैद्य

४. भारतीय शिक्षण परंपरेचे आचरण करणारी आणि भ्रमणभाषच्या आहारी गेलेली मुले यांच्यातील भेद 

मध्यंतरी ‘वाग्यज्ञ गुरुकुलम्’ला भेट दिल्यानंतर मला जाणवले की, भारतीय शिक्षण परंपरेत मुलांच्या जडणघडणीचा विचार सुस्पष्ट होता.

बालमानसशास्त्रानुसार कंटाळा हे मुलांच्या विकासातील सर्वांत सुपीक क्षेत्र आहे. कंटाळ्यातूनच कल्पनाशक्ती जन्मते. भ्रमणभाषमुळे मुलांची कल्पनाशक्ती उमलण्याआधीच कोमेजून जाते. मुलांच्या आयुष्यात भ्रमणभाषला किती आणि इतर गोष्टींना किती वेळ द्यायचा ? हे पालकांनी ठरवायला हवे.

– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका आणि व्याख्यात्या, पुणे.


‘भ्रमणभाषपेक्षाही बाहेरचे जग मोठे आणि सुंदर आहे’, हे मुलांना दाखवण्याचे दायित्व पालकांचे आहे. सतत भ्रमणभाषकडे बघत मान खाली झुकलेली पिढी आपल्याला पालटता येईल; पण ती आपल्या स्वतःच्या उदाहरणाने, आपल्या प्रेमाने आणि आपल्या उपस्थितीने ! – सौ. शेफाली वैद्य
भ्रमणभाषच्या वाढत्या वापरामुळे बालपण आणि संवादकौशल्य यांवर विपरीत परिणाम होऊन अकाली प्रौढत्व येते !