परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपाय पद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

‘वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमण केले. त्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनाही आध्यात्मिक त्रास होऊ लागला. या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना साधकांना होणारे त्रास सांगितले. त्यानंतर त्या संतांनी साधकांसाठी केलेल्या नामजपादी उपायांचा परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः अभ्यास केला. त्यातूनच पुढे अभ्यास करत परात्पर गुरु डॉक्टरांनी विविध प्रकारच्या उपायपद्धती शोधून काढल्या. २९ मार्च या दिवशी साधकांसाठी नामजप करणे, सप्तदेवतांच्या नामजपाचा प्रयोग याविषयी माहिती घेतली. आज पुढील भाग पाहूया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1023551.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३. आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः शोधलेले विविध उपाय 

३ ऊ. ‘प्रत्येक १ ते २ घंट्यांनी अत्तर आणि कापूर यांचे उपाय केल्याने साधकांना त्याचा अधिक लाभ होत आहे’, असे लक्षात येणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘पंचमहाभूतांची तत्त्वे असणार्‍या वस्तूंमुळे आध्यात्मिक लाभ होतात’, हे साधकांच्या लक्षात आणून दिले, उदा. तीर्थ, अत्तर, विभूती, कापूर, रिकाम्या खोक्याचे उपाय आदी. अत्तर लावणे म्हणजे पृथ्वीतत्त्वाचे उपाय, तीर्थ अंगावर शिंपडणे-पिणे हे आपतत्त्वाचे उपाय, कापूर तेजतत्त्वाचे आणि रिकामे खोके समोर ठेवून नामजप करणे, म्हणजे आकाशतत्त्वाचे उपाय होत ! अशा प्रकारे उपाय केल्याने ‘साधकांच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत आहे’, असे लक्षात आले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी दिवसभरात प्रत्येक १ ते २ घंट्यांनी साधकांना अत्तर आणि कापूर लावण्याचे उपाय करण्यास सांगितले, तसेच रिकामे खोके समोर ठेवून नामजप करायला सांगितला. ‘या उपायांमुळे साधकांना अधिक प्रमाणात लाभ होत आहे’, असे लक्षात आले. साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्यावर ते इतरांचे साहाय्य न घेता स्वतःच्या स्तरावर अशा प्रकारचे उपाय करून त्या त्रासाला काही प्रमाणात सामोरे जाऊ लागले. यामुळे आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांच्या मनात थोड्या प्रमाणात आत्मविश्वासही निर्माण झाला.

३ ए. आकाशाकडे पाहून आणि कोवळ्या उन्हात बसून नामजप केल्याने आध्यात्मिक उपाय अधिक परिणामकारक होणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे आध्यात्मिक उपायांचे संशोधन प्रतिदिन चालूच होते. एक दिवस त्यांनी साधकांना आकाशाकडे पाहून नामजप करण्यास सांगितला. त्या वेळी काही साधकांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी साधकांना कोवळ्या उन्हात १५ – २० मि. बसून नामजप करण्यास सांगितले. त्या वेळीही असेच झाले, तेव्हा ‘साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींना या उपायांचा त्रास होत आहे’, हे लक्षात आले. यातून ‘निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या या गोष्टींमुळेही आध्यात्मिक त्रास न्यून होण्यास साहाय्य होत आहे’, हे लक्षात आले.

३ ऐ. साधकांना स्वतःच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढायला शिकवणे : काही काळाने परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून स्वतःच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण त्यांना स्वतःलाच काढायला सांगितले. ‘सनातन-निर्मित उदबत्ती पेटवून तिच्या धुराने, आवरण असलेल्या अवयवाच्या ठिकाणी रिकामे खोके ठेवून, स्वतःच्या देहाभोवती मोरपीस फिरवून आवरण काढण्यास शिकवले. नंतर त्यांनी स्वतःच्या हाताच्या बोटांनीही आवरण काढायला शिकवले. हातांच्या बोटांतून पंचमहाभूतांची तत्त्वे प्रक्षेपित होत असल्याकारणाने बोटांनी आवरण काढतांना ते परिणामकारकरित्या निघत असल्याचे लक्षात आले.

३ ओ. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर ‘विविध सात्त्विक वस्तूंचा काय परिणाम होतो ?’, यांविषयी प्रयोग करणे आणि यांतून वाईट शक्तींची शक्ती न्यून होऊ लागणे : वर्ष २००६ पासून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर विविध सात्त्विक वस्तूंचा काय परिणाम होतो ?’, यांविषयी प्रयोग घ्यायला सांगितले, उदा. ‘संतांनी वापरलेल्या विविध वस्तू, टाळाचा नाद, शंखनाद, मोरपीस, निर्माल्य, संतांच्या आवाजातील भजने’, असे अनेक प्रयोग घेण्यात आले. यांतून ‘सात्त्विक स्पंदनांमुळे आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यास साहाय्य होत आहे’, असे लक्षात आले. वाईट शक्तींची शक्ती न्यून करण्यासाठी प्रयोग हे एक माध्यम झाले होते. असे सहस्रो प्रयोग घेण्यात आले.

३ औ. बिंदूदाबन उपचारामुळे साधकांच्या देहातील त्रासदायक शक्ती न्यून होऊ लागणे : याचसमवेत परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘शारीरिक व्याधींवरील उपाचार पद्धतींमुळेही आध्यात्मिक उपाय होतात का ?’, याचा अभ्यास करण्यास साधकांना शिकवले, उदा. बिंदूदाबन, रंगांची उपचारपद्धत (कलर थेरपी). बिंदूदाबन केल्यावर ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांच्या देहातील त्रासदायक शक्ती न्यून होत आहे’, असे लक्षात आले. असा अभ्यास करतांना परात्पर गुरु डॉक्टर अनेक साधकांना सहभागी करून घेत असत. आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे, अशा अनेक साधकांसाठी केलेल्या उपायांचा अभ्यास केल्यावर त्याचा निष्कर्ष अचूकतेने निघण्यास साहाय्य होत असे.

३ क. परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन-निर्मित सप्तदेवतांच्या नामपट्ट्या किंवा चित्रे सप्तचक्रांवर लावण्याचा उपाय सर्व साधकांना सांगणे : वर्ष २००८ पासून परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन-निर्मित सप्तदेवतांच्या नामपट्ट्या किंवा चित्रे साधकांनी स्वतःच्या सप्तचक्रांवर लावण्याचा एक आध्यात्मिक उपाय सांगितला. आधी हा उपाय केवळ तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना सांगितला होता. त्यानंतर ‘सर्वच ठिकाणच्या साधकांचा आध्यात्मिक त्रास वाढत आहे’, हे पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी हे उपाय सर्वच साधकांना करण्यास सांगितले. ‘सप्तचक्रांपैकी कोणत्या चक्रावर कोणत्या देवतेचे चित्र कशा प्रकारे लावायचे ?’ आणि ‘ते किती काळासाठी लावायचे ?’ याविषयी परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्म-परीक्षण करून सांगत. सप्तचक्रांवर देवतांची चित्रे लावण्याची पद्धत २ प्रकारे होती. त्यात देवतांची चित्रे असलेली बाजू आतील बाजूने लावणे, म्हणजे ‘सगुण’ आणि देवतांची चित्रे बाहेरच्या बाजूने लावणे, म्हणजे ‘निर्गुण’ असे होते.

४. साधकांनी देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या लावून सलग काही घंटे उपाय केल्यावर चित्रे अन् नामपट्ट्या यांवर त्रासदायक शक्तीचे आवरण येणे, नंतर त्यांची शुद्धी केल्यावर ती पुन्हा वापरण्यायोग्य होणे 

सर्व ठिकाणच्या साधकांना हे उपाय कळावेत, यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधूनही याविषयीची सविस्तर चौकट छापून येत असे. सप्तचक्रांवर लावायच्या नामपट्ट्या किंवा चित्रे यांचे साधकांना २ संच करायला सांगितले होते. एक संचाने काही घंटे उपाय झाल्यावर तो काढायचा आणि दुसरा संच उपायांसाठी वापरायचा. याचे कारण चित्रे आणि नामपट्ट्या यांचा सलग काही घंटे उपायांसाठी वापर केल्यावर त्यावर साधकांच्या देहातील त्रासदायक शक्तीचा परिणाम होत असे. त्यामुळे तो संच चैतन्याने भारित होण्यासाठी सनातन-निर्मित ग्रंथात ठेवण्यास सांगितले होते. दुसरा संच घेऊन उपाय करण्यापूर्वी साधक चित्रे आणि नामपट्ट्या यांची धूप किंवा उदबत्ती यांनी शुद्धी करत असत. असे केल्याने हे उपाय परिणामकारक होत असत. या उपायांमुळे साधकांना आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला.

(क्रमश:)

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२५)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024491.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर,  राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत  सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र  त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा  प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते,  तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक