परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपायपद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

‘वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमण केले. त्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनाही आध्यात्मिक त्रास होऊ लागला. या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना साधकांना होणारे त्रास सांगितले. त्यानंतर त्या संतांनी साधकांसाठी केलेल्या आध्यात्मिक उपायांचा परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः अभ्यास केला. त्यातूनच पुढे अभ्यास करत परात्पर गुरु डॉक्टरांनी विविध प्रकारच्या उपायपद्धती शोधून काढल्या. या विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपायांमुळे अनेक साधकांच्या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता अल्प झाली. त्याविषयीची माहिती येथे थोडक्यात दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘सूक्ष्मातून वाईट शक्तींची आक्रमणे वाढत आहेत’, हे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिवसातून तीन वेळा ध्यान लावणे

‘सूक्ष्मातून वाईट शक्तींची आक्रमणे वाढत आहेत’, हे लक्षात आल्यावर आरंभीच्या काळात, म्हणजे वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर दिवसातून ३ वेळा ३० मिनिटे घंटा ध्यान लावू लागले. त्या वेळेत त्यांनी सर्व साधकांना बसून नामजप करण्यास सांगितले. सकाळ-संध्याकाळ ७.३० वाजता आणि दुपारी ४.३० वाजता साधक नामजपाला बसू लागले. या कालावधीत साधकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढू लागली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी करायच्या नामजपाचा कालावधी वाढवत नेला.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी समाजातील विविध संतांची भेट घेणे आणि संतांनी साधकांच्या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपाय करणे

याचसमवेत परात्पर गुरु डॉक्टर साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी समाजातील काही संतांना भेटले. त्यामुळे विविध साधनामार्गातील संतांनी सनातनच्या आश्रमांत येऊन साधकांसाठी नामजपादी उपाय केले. सनातनचा हा सूक्ष्मातील लढा सप्त पाताळातील वरिष्ठ आणि सहस्रो वर्षांची साधना असणार्‍या वाईट शक्तींशी चालू होता. त्यामुळे काही अपवाद सोडले, तर बहुतांश संतांनी केलेल्या उपायांचा परिणाम हा तात्कालीक स्वरूपाचा होता. काही संत सनातनला साहाय्य करत असल्याने त्या संतांवरही वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमणे चालू केली. यावरून सूक्ष्मातील युद्धाची तीव्रता लक्षात येते. काही संतांना ‘वाईट शक्ती म्हणजे केवळ भुते हाच प्रकार ठाऊक आहे’, असे लक्षात आले. ‘भुतांपेक्षाही शक्तीशाली अन्य काही प्रकारच्या वाईट शक्ती असतात’, हे त्या संतांना ठाऊक नसल्याने त्यांचे आध्यात्मिक उपाय एका टप्प्यापर्यंत मर्यादित होते.

३. आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः शोधलेले विविध उपाय

३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी १६ ते १८ घंटे नामजप करतांना नवीन उपायपद्धतींचा शोध लावणे आणि सूक्ष्म-सेवेतील संबंधित साधकांना नामजपादी उपाय करण्यास शिकवणे : काळ पुढे जाऊ लागला, तसतशी साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांची तीव्रताही वाढू लागली. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी नामजप करण्याचा कालावधीही वाढवला. हा कालावधी आरंभी २ घंटे होता. नंतर त्यांनी तो वाढवत १६ ते १८ घंट्यांपर्यंत नेला. या कालावधीत त्यांनी विविध प्रकारच्या उपायपद्धतींचा शोध लावला. प्रथम त्यांनी ‘हाताच्या बोटांनी साधकांच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, हातांच्या बोटांनी न्यास आणि मुद्रा करणे, तसेच साधकांच्या देहातील त्रासदायक शक्तीचे सूक्ष्मातील स्थान शोधणे’ या गोष्टी शोधल्या. या गोष्टी स्वतः करण्यासमवेत त्यांनी त्या सूक्ष्म-सेवेतील साधकांनाही शिकवल्या. चांगल्या क्षमतेची सूक्ष्म-कर्मेंद्रिये असणार्‍या साधकांना त्यांनी इतरांसाठी नामजपादी उपाय करण्यास शिकवले आणि चांगल्या क्षमतेची सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये असणार्‍या साधकांना त्यांनी सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगितले. (सूक्ष्म-सेवेतील साधक : सूक्ष्म-कर्मेंद्रिये आणि सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये यांची क्षमता चांगली असल्याने आध्यात्मिक उपाय करू शकणारे साधक)

३ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांची लहानपणापासूनची छायाचित्रे मागवून त्यांच्या आध्यात्मिक त्रासांचे विश्लेषण करणे, तसेच त्यांना उपायांविषयी सांगणे : परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये संशोधक वृत्ती असल्याने त्यांनी साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांचा वेगवेगळ्या पैलूंनी अभ्यास केला. त्यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांची लहानपणापासूनची छायाचित्रे मागवली आणि त्यांचे सूक्ष्म परीक्षण केले. त्या वेळी ‘बर्‍याच साधकांना जन्मतःच तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होता’, असे लक्षात आले. साधकाच्या एकूण आध्यात्मिक त्रासाच्या टक्केवारीतही ‘त्या साधकाचे प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, वाईट शक्तींशी असलेला देवाण-घेवाण हिशोब’, यांचीही त्यांनी टक्केवारी काढून आध्यात्मिक त्रासांचे विश्लेषण केले. ज्या साधकांना पूर्वजांच्या कारणामुळे आध्यात्मिक त्रास अधिक होत आहेत, अशा साधकांना त्यांनी काही विधीही करण्यास सांगितले, तसेच ‘त्या साधकाने त्रास न्यून होण्यासाठी प्रतिदिन किती घंटे नामजप करायला हवा ?’, तेही सांगितले.

३ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सप्तदेवतांच्या नामजपाचा प्रयोग करण्यास सांगणे : आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ वर्ष २००५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सप्तदेवतांच्या नामजपाचा प्रयोग करायला शिकवले. ‘श्रीराम, श्रीकृष्ण, श्री गणपति, हनुमान, दत्त, शिव आणि श्री दुर्गादेवी’ या सप्तदेवतांचा नामजप प्रत्येकी २ – २ मिनिटे करून ‘कोणत्या नामजपाने शारीरिक अथवा मानसिक त्रास अधिक होतो ?’, त्या देवतेचा नामजप साधकांना करण्यास सांगितले. त्याचसमवेत ‘नामजप तारक किंवा मारक कशा प्रकारे केल्यावर अधिक परिणामकारकता जाणवते ?’, तशा प्रकारचा नामजप त्यांनी करण्यास सांगितला.

३ ई. साधकांच्या आध्यात्मिक त्रासांच्या तीव्रतेनुसार त्यांना सगुण-निर्गुण स्तरावरील नामजप शोधून सांगणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्यावर त्यांना देवतांच्या नामजपाचा प्रयोग करून नामजप शोधायला जमत नसे. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर स्वतः किंवा सूक्ष्म सेवेतील साधक अशा साधकांना नामजप शोधून देत. यात ‘पंचतत्त्वांशी संबंधित नामजप (अग्निदेव, वायुदेव, तसेच आकाशदेव), सगुण (देवतांचे नामजप), निर्गुण स्तरावरील (शून्य, महाशून्य आणि ॐ) नामजप, अंकजप, बीजमंत्र आदींचा समावेश असे. त्या वेळी साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांच्या तीव्रतेनुसार सगुण-निर्गुण स्तरावरील नामजपाचा उपाय सूक्ष्म परीक्षणातून येत असे.

३ उ. सूक्ष्म-सेवेतील साधकांवर सूक्ष्मातील आक्रमणे होऊन त्यांची आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता न्यून होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपाय होतील, अशी साधने शोधणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म-सेवेतील साधकांना आध्यात्मिक उपायांचा भाग शिकवला; परंतु आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढू लागल्यावर त्या साधकांवरही सूक्ष्मातील आक्रमणे होऊ लागली. त्यामुळे त्यांची उपाय करण्याची क्षमता न्यून झाली. आरंभी वर्ष २००३ मध्ये सूक्ष्म-संबंधित सेवा करणारे २७ साधक होते. त्यानंतर ती संख्या ९ झाली आणि नंतर ती संख्या ३ वर आली. ‘साधकांवर आध्यात्मिक उपाय होऊन त्यांचे त्रास न्यून व्हायला हवेत’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ होती. त्यांच्या तळमळीमुळे त्यांनी वर्ष २००५ पासून साधकांसाठी आध्यात्मिक उपाय होतील, अशी वेगवेगळी साधनेही शोधली.    (क्रमशः)

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२५)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024054.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर,  राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत  सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र  त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा  प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते,  तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.