परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपाय पद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

‘वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमण केले. त्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनाही आध्यात्मिक त्रास होऊ लागला. या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी अभ्यास करत परात्पर गुरु डॉक्टरांनी विविध प्रकारच्या उपायपद्धती शोधून काढल्या.  

३० मार्च या दिवशी आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः शोधलेले विविध उपाय याविषयी माहिती घेतली. आज अंतिम भाग पाहूया. 

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024054.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५. ‘विविध प्रकारचे उपाय, नामजप आणि सात्त्विक वस्तूंचे प्रयोग’, यांतून आध्यात्मिक उपायांचा मारा चालू ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींची शक्ती न्यून करणे 

‘देवतांची चित्रे अथवा नामपट्ट्या सप्तचक्रांवर लावणे, सगुण-निर्गुण स्तरावरील नामजप करणे, न्यास-मुद्रा करून नामजप करणे, देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, आकाशाकडे पाहून, तसेच सूर्यप्रकाशात बसून नामजप करणे, अत्तर, कापूर लावणे, रिकामे खोके समोर ठेवून नामजप करणे, दृष्ट काढणे, बिंदूदाबन करणे’, आदी अनेक उपाय साधक करत असत. या उपायांच्या समवेत सात्त्विक वस्तूंच्या उपायांचेही प्रयोग चालूच होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा प्रकारे साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींवर आध्यात्मिक उपायांचा मारा चालू ठेवला होता.

वाईट शक्तींचे विविध प्रकार आहेत. त्यात भुते ही अल्प शक्ती असणारी वाईट शक्ती असून त्यानंतर ‘काळे नाग, चेटकीण, पिशाच, राक्षस आणि मोठ्या वाईट शक्ती’, असे प्रकार आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा प्रकारे आध्यात्मिक उपायांचा मारा सतत चालू ठेवल्यामुळे एवढ्या शक्तीशाली वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांत साधक जिवंत राहू शकले.

६. साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून पुन्हा एकदा आध्यात्मिक उपाय करणार्‍या साधकांची फळी उभी करणे आणि नंतर सनातनच्या संतांनी साधकांसाठी नामजप करण्यास आरंभ होणे 

कालांतराने वर्ष २००९ मध्ये काही साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन ‘ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी या साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांच्या समोर बसून नामजप करण्यास सांगितले. परिणामी आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर त्या नामजपाचा परिणाम होऊन साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींची शक्ती न्यून होऊ लागली. त्या काळात परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक साधकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले आणि पुन्हा एकदा नामजपादी उपाय करणार्‍या साधकांची फळी उभी केली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या आध्यात्मिक सामर्थ्यावरच ही फळी उभी झाली. हे साधक नामजपादी उपाय करण्यास सक्षम असल्यामुळे त्यांनी समष्टीसाठी नामजपादी उपाय करण्याचे सत्र पुन्हा चालू झाले. त्यानंतर वर्ष २०११ पासून सनातनचे साधक संतपदी विराजमान होण्याचे प्रमाण वाढू लागले आणि हे संतच साधकांसाठी नामजपादी उपाय करू लागले.

७. परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपाय करणार्‍या संतांना ‘प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत’ सर्व साधकांना शिकवण्यास सांगणे आणि उपायांच्या संदर्भातील २ ग्रंथ प्रकाशित करणे 

काही काळाने परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपाय करणार्‍या संतांना प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत सर्व साधकांना शिकवण्यास सांगितले. त्यानुसार साधक स्वतःच्या देहातील आध्यात्मिक त्रासांची स्थाने आणि नामजप शोधू लागले. हे करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यातील बारकाव्यांचा अभ्यास साधकांना करण्यास सांगितला, तसेच पुढे येणार्‍या कठीण काळात समाजातील व्यक्तींनाही या उपायपद्धतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय’ आणि ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’, हे दोन ग्रंथही प्रकाशित केले. त्याचा अनेकांना लाभ होत असल्याचे लक्षात येत आहे.

८. परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींना लगेच नष्ट न करता टप्प्याटप्प्याने त्यांची शक्ती न्यून करणे 

‘साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास समूळ नष्ट करण्याचे सामर्थ्य परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये होते आणि आहे’, हे अनेक साधकांनी अनेकदा अनुभवलेले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत टप्प्याटप्प्याने त्यांची शक्ती न्यून केली. जवळजवळ २५ वर्षांनंतर आता वर्ष २०२५ मध्ये बर्‍याच साधकांचे आध्यात्मिक त्रास उणावला आहे. यावरून या सूक्ष्मातील युद्धाची तीव्रता लक्षात येते. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांचा आध्यात्मिक त्रास आता मध्यम आणि मंद स्वरूपाचा झाला आहे. ही सर्व परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रकारचे आध्यात्मिक उपाय शोधून संपूर्ण मानवजातीवर मोठी कृपा केली आहे. या सगळ्या उपायपद्धतींचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना होणार आहे. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’      (समाप्त) 

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२५)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर,  राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत  सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र  त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा  प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते,  तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक