घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार : सनातनचा नूतन ग्रंथ

आपत्काळात डॉक्टर आदी उपलब्ध नसतांना विशेष उपयुक्त !

सनातनचा नूतन ग्रंथ

ग्रंथाचे मुखपृष्ठ

मनोगत

‘होमिओपॅथी’ ही रुग्णाचे शारीरिक आणि मानसिक विकार दूर करणारी सोपी उपचारपद्धत असून ती आर्थिकदृष्ट्या परवडणारीही आहे. ‘व्यक्तीला आपत्काळात, तसेच एरव्हीही स्वतःवर आणि कुटुंबियांवर न्यूनतम तरी औषधोपचार करता यावेत’, या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे.

या ग्रंथात १०० हून अधिक शारीरिक आणि मानसिक विकारांवरील औषधे, तसेच १३ संसर्गजन्य अन् तत्सम विकारांवरील प्रतिबंधात्मक औषधे सांगितली आहेत. ग्रंथामध्ये छोट्या कालावधीच्या आजारांवर, तसेच दीर्घकालीन (chronic) आजारांमध्ये जेव्हा त्यांची लक्षणे मध्ये मध्ये डोके वर काढतात (acute flare ups), तेव्हा उपयुक्त असलेल्या होमिओपॅथी, तसेच बाराक्षार औषधांची माहिती दिली आहे.

भावी आपत्काळाचा सामना करण्यासाठी बहुमोल आणि सोप्या रितीने मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘अनेक संतमहात्मे, भविष्यवेत्ते आदींनी ‘भावी काळ हा नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध अशा भीषण संकटांनी युक्त असेल’, असे म्हटले आहे. अशा भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत. इतकेच नव्हे, तर आपत्काळ संपल्यानंतरही वैद्यकीय व्यवस्था सुरळीत व्हायला काही काळ जाऊ शकतो. अशा वेळी जीवितरक्षणासाठी जितकी संसाधने आपल्या हाताशी असतील, तेवढे लाभदायक आहे. ‘होमिओपॅथी औषधे’ त्यांपैकीच एक सोपे साधन आहे. या औषधांच्या वापराविषयी प्रस्तुत ग्रंथ सुलभ मार्गदर्शन करतो.

२. ॲलोपॅथी औषधांच्या तुलनेत होमिओपॅथी औषधे सूक्ष्म स्तरावर कार्य करणारी असल्यामुळे होमिओपॅथी उपचारपद्धत ही विकारांमागील मूळ कारणे दूर करण्यासाठी तुलनेत अधिक उपयुक्त आहे. 

३. ‘व्यष्टी साधना’ म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे, तर ‘समष्टी साधना’ म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे. काळानुसार व्यष्टी साधना ३५ टक्के, तर समष्टी साधना ६५ टक्के महत्त्वाची आहे. साधना करता येण्यासाठी देहाचे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे असते. या दृष्टीकोनातून ‘आपत्काळात जेव्हा व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येते, तेव्हा तिला साहाय्य करणे’, ही मोठी समष्टी साधनाच आहे. यासाठीच या ग्रंथाचा समाजात अधिकाधिक प्रसार करणे, ही समष्टी साधनाच आहे. यास्तव सर्वांनी या ग्रंथाचा अधिकाधिक प्रसार करावा.’ 


– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हा ग्रंथ सामान्य वाचकाच्या दृष्टीने लिहिलेला असल्यामुळे या ग्रंथाच्या साहाय्याने स्वउपचार करण्यासाठी वैद्यकीय ज्ञानाची किंवा होमिओपॅथी शास्त्रातील प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. होमिओपॅथीमधील औषधे नैसर्गिक स्रोतांपासून बनलेल्या घटकांची असतात, तसेच ती अनेक निरोगी व्यक्तींवर चाचणी करून सिद्ध केलेली असतात. त्यामुळे या औषधांमुळे रुग्णाची हानी होणे अशक्य असते. स्वउपचार करतांना रुग्णाने चुकून अयोग्य औषध निवडले, तरी ‘रुग्णाला मूळ आजाराहून अधिक त्रास सहन करावा लागेल’, असे नाही.


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी लेखकांची कृतज्ञता !


‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) स्वतः आधुनिक वैद्यकशास्त्रातील उच्चशिक्षित डॉक्टर (‘ॲलोपॅथी’चे डॉक्टर) असले, तरी त्यांचा अन्य पॅथींकडे पहाण्याचा दृष्टीकोन व्यापक आहे. गुरुदेवांनी आम्हाला आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘होमिओपॅथी’च्या संदर्भातील ग्रंथ संकलित करण्याची प्रेरणा दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी ‘ग्रंथाच्या लिखाणाची मांडणी कशी असावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शन करण्यापासून ते ग्रंथाचे संकलन पडताळून देण्यापर्यंत सर्व केले. ग्रंथाच्या निर्मितीमागे गुरुदेवांचा संकल्प आहे. त्यामुळे रुग्णांनी या ग्रंथाचा वापर श्रद्धेने करावा. गुरुदेवांनी ही सेवा आमच्याकडून करवून घेतली, यासाठी त्यांच्याप्रती आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत.’ – लेखक

ग्रंथात औषधांची संख्या न्यूनतम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाचकांना स्वतःला लागणारी औषधे खरेदी करून ठेवणे सोपे जाईल. महापूर, भूकंप, महायुद्ध अशा आपत्कालीन परिस्थितींत घराबाहेर पडून डॉक्टरांकडून किंवा पेठेतून (बाजारातून) औषध आणणे कठीण असते. अशा परिस्थितींतही आधीच घरी खरेदी करून ठेवलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे म्हणजे जणू संकटसमयी धावून आलेले देवदूतच !

ग्रंथानुसार स्वतःवर किंवा कुटुंबियांवर उपचार चालू करण्यापूर्वी ग्रंथातील ‘प्रकरण १’ ते ‘प्रकरण ४’ यांत दिलेली सर्व माहिती नीट समजून घ्यावी. गंभीर दुखापत आणि आजार यांवर तज्ञांचा वैद्यकीय निर्णय घेऊनच उपचार करावेत. अशा प्रसंगी वैद्यकीय साहाय्य त्वरित उपलब्ध होत नसेल, तर ते मिळेपर्यंत रुग्णाला होमिओपॅथी औषध देऊ शकतो.

या ग्रंथाच्या वाचनाचा एक लाभ हाही होईल की, जेव्हा आपण होमिओपॅथी वैद्यांकडून उपचार घेणार असू, तेव्हा ‘आपल्याविषयी वैद्यांना कशा प्रकारची माहिती देणे आवश्यक असते ?’, याचा अभ्यास आपला आधीच झालेला असेल.

‘हा ग्रंथ ‘घरगुती होमिओपॅथी उपचार’ या दृष्टीने लिहिण्यात आलेला असल्यामुळे हा ग्रंथ, म्हणजे ‘होमिओपॅथी वैद्यांना पर्याय’ नव्हे’, हेही वाचकांनी लक्षात घ्यावे.

‘या ग्रंथाचा लाभ घेऊन सर्वांना निरामय जीवन प्राप्त होवो’, ही श्री गुरुचरणी अनन्यभावे प्रार्थना !’ – लेखक

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७