मंदिर परिषदेतून झाले मंदिरांचे प्रभावी आणि कृतीशील संघटन !

अशी झाली मंदिर परिषद…

  • प्रारंभी सद्गुरु स्वाती खाडये, फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, तसेच अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर वेदमूर्तींनी केलेल्या वेदमंत्रपठणाने चैतन्यमय अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 
  • उपस्थितांचे स्वागत, प्रस्तावना झाल्यावर श्री. सुनील घनवट यांनी मंदिर न्यास परिषदेचा उद्देश, कार्य आणि बीजवक्तव्य केले. 
  • विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनासह फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांच्या भाषणाने शासन मंदिराच्या प्रश्नांवर गंभीर असून मंदिरांच्या भूमींवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांच्यावर प्रसंगी बुलडोझर कारवाईचे आश्वासन मिळाले.
  • मंदिर अभ्यासक, कायद्याचे अभ्यासक यांचे मार्गदर्शन, विविध विश्वस्तांनी दिलेला लढा, मनोगत यांसह विश्वस्त, प्रतिनिधी यांना दिशादर्शक ठरतील असे २ परिसंवाद झाले. 
  • कायदेशीरविषयक विशेष चर्चासत्राद्वारे मंदिरांना येणार्‍या कायदेशीर अडचणी, त्यांवरील उपाय यांवर सखोल चर्चा झाली. 
  • समारोपीय मार्गदर्शनात वर्षभर नियमित करावयाच्या कृतींवर चर्चा होऊन ध्येयनिश्चिती झाली. ठराव संमत करून संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सांगता झाली.

मंदिरांत वस्त्रसंहितेप्रमाणे ‘संस्कार संहिता’ लागू करण्याची वेळ ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्राचीन काळी आपली मंदिरे केवळ पूजास्थाने नव्हती, तर ती १४ विद्या आणि ६४ कला यांचे ज्ञान देणारी महान विद्यापिठे होती. आक्रमकांनी आपली ही गुरुकुल पद्धती उद्ध्वस्त केली, ज्याचा परिणाम आजचा दिशाहीन समाज भोगत आहे. आता वेळ आली आहे की, प्रत्येक मंदिर विश्वस्ताने स्वत:चे नैतिक आणि आध्यात्मिक दायित्व ओळखून मंदिरांना पुन्हा एकदा ‘राष्ट्रनिर्मितीची केंद्रे’ बनवण्यासाठी कंबर कसावी. ज्याप्रमाणे मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ यशस्वी झाली, त्याचप्रमाणे आता ‘संस्कार संहिता’ लागू करण्याची वेळ आली आहे.

विभक्त कुटुंबपद्धती आणि पालकांकडे वेळेचा अभाव यांमुळे मुलांमधील संवाद हरवला आहे. ‘भ्रमणभाष’ हेच मुलांचे दैवत बनले असून त्यातून व्यसनाधीनता आणि नैराश्य वाढत आहे. अपयशाच्या भीतीमुळे होणार्‍या आत्महत्या हे मुलांचे मनोबल ढासळल्याचे लक्षण आहे. या समस्यांवरील एकमेव प्रभावी उपाय म्हणजे मंदिरांमध्ये ‘संस्कार केंद्र’ निर्माण करणे.

मंदिरे व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांना जोडणारा अभेद्य सेतू ठरू शकतात. ‘मी हिंदु का आहे ?’ हे जगाला गर्जून सांगणारा ‘धर्मप्रेमी युवक’ घडवणे, हेच या वर्गांचे मुख्य ध्येय आहे. मंदिरे जर केवळ दर्शनापुरती मर्यादित राहिली, तर समाज दिशाहीन होईल; परंतु जेव्हा मंदिरे संस्कारांची केंद्रे बनतील, तेव्हाच राष्ट्र बलशाली होईल, हा विचार घेऊन प्रत्येक मंदिराने आता सक्रीय व्हायला हवे.

मंदिरात हवेत संस्कारवर्ग !

‘सनातन संस्कार प्रशिक्षणवर्ग’ असा सनातन संस्थेच्या वतीने मंदिर विश्वस्तांसमोर एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सुट्यांमध्ये ३ ते ५ दिवसांचे ‘विशेष प्रशिक्षण’ आणि त्यानंतर आठवड्यातून एक दिवस नियमित ‘संस्कारवर्ग’ घेतला जावा. त्यात ‘मंदिरात दर्शन कसे घ्यावे ?’ नामजप, श्लोकपठण, सणांचे शास्त्रीय महत्त्व आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारे खेळ असावेत. सनातन संस्थेद्वारे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल, त्याचा लाभ घ्यावा.

– सद्गुरु स्वाती खाडये

मंदिरे केवळ दर्शनाची नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची केंद्रे ! – गिरीश शहा, सुप्रसिद्ध मंदिर अभ्यासक

हिंदूंची मंदिरे ही समाजाच्या भविष्याचा आराखडा आहेत. मंदिरे केवळ दर्शनाची नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची केंद्रे आहेत. आजवर ४ लाखांहून अधिक मंदिरांच्या भूमी केवळ विश्वस्तांचा निष्काळजीपणा आणि कायद्याचे अज्ञान यांमुळे सरकारने बळकावल्या आहेत. आता सरकारने ‘स्वामित्व कायदा’ आणला आहे. जर मंदिरांच्या भूमींची कागदपत्रे स्पष्ट नसतील, तर त्या भूमींचे सरकारीकरण होण्याचा मोठा धोका आहे.

मंदिराची महत्त्वाची कागदपत्रे ‘लॅमिनेशन’ (प्लास्टिकचे आच्छादन) करून सुरक्षित ठेवा. प्रतिवर्षी मंदिराच्या मालमत्तेचे विवरण आणि वार्षिक लेखापरीक्षण अहवाल अद्ययावत् ठेवा. आपल्या मंदिराच्या भूमीच्या चारही दिशा निश्चित करून त्याला तात्काळ संरक्षक भिंत घाला, अन्यथा अतिक्रमणांचा धोका वाढेल. विश्वस्तांमधील अंतर्गत वाद न्यायालयात नेण्याऐवजी आपापसांत सामोपचाराने सोडवा, जेणेकरून प्रशासनाला हस्तक्षेप करण्याची संधी मिळणार नाही.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून मंदिरांचे अस्तित्व जपा ! – दिलीप देशमुख, माजी सहधर्मादाय आयुक्त

मंदिरे ही केवळ भक्तीची केंद्रे नसून ती एक कायदेशीर संस्थाही आहे. मंदिरांचे व्यवस्थापन सुविहित चालण्यासाठी आणि भविष्यातील कायदेशीर संकटे टाळण्यासाठी प्रत्येक मंदिराची ‘धर्मादाय आयुक्त’ (चॅरिटी कमिशनर) कार्यालयात नोंदणी असणे अनिवार्य आहे. कायद्याचे पालन करणे, हे केवळ कर्तव्य नसून मंदिराच्या सुरक्षिततेचे माध्यम आहे.

ज्या जिल्ह्यात मंदिराचे किंवा ट्रस्टचे मुख्य कार्यालय आहे, त्याच जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीचे आवेदन करावे लागते. आवेदनाचा नमुना भरतांना माहिती अचूक असणे आवश्यक आहे. मंदिराचे नाव निश्चित करण्यापूर्वी त्या नावाने अन्य कोणता न्यास (ट्रस्ट) आधीच नोंदणीकृत आहे का ? याची पडताळणी कार्यालयातील सूचीद्वारे करणे श्रेयस्कर ठरते. विश्वस्त पालटण्याची पद्धत हा जिव्हाळ्याचा विषय असला, तरी त्यात पारदर्शकता हवी.‘महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट’नुसार विश्वस्तांना स्वतःचे नियम सिद्ध करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. विश्वस्तांचा कार्यकाळ (उदा. ३ किंवा ५ वर्षे) आणि त्यांची निवड प्रक्रिया नियमावलीत स्पष्ट असावी. ‘ट्रस्ट’कडे किती चल (रोख, दागिने) आणि अचल (भूमी, वास्तू) संपत्ती आहे याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.

भूमीचा सर्वे क्रमांक अचूक हवा आणि त्यावर कोणताही बोजा (कर्ज किंवा वाद) आहे का ? याची स्पष्टता हवी. मंदिरांना मिळणार्‍या देणग्या आणि अर्पण हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. ट्रस्टच्या मालमत्तेच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय घेतांना किंवा मालमत्तेची विल्हेवाट लावतांना ‘कलम ३६’नुसार धर्मादाय आयुक्तांची अनुमती घेणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. ‘आम्हाला याची आवश्यकता नाही’, असे म्हणून चालणार नाही; अन्यथा भविष्यात कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. मागील ३ वर्षांतील सरासरी उत्पन्न आणि खर्च यांचा तपशील व्यवस्थित ठेवणे, हे सुप्रशासनाचे लक्षण आहे. मंदिरांची घटना आणि नियमावली सिद्ध करतांना पूर्ण काळजी घेतली पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून मंदिराचे पावित्र्य आणि व्यवस्थापन टिकवणे, हेच विश्वस्तांचे मुख्य दायित्व आहे, असे आवाहन त्यांनी केले. धर्मादाय कायद्याचे सूक्ष्म ज्ञान असणे, ही काळाची आवश्यकता आहे.

हिंदु मंदिरांची अतिक्रमण झालेली भूमी पुन्हा मिळवू ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

राज्यातील मंदिरांच्या भूमी लाटण्याचे षड्यंत्र उघड झाले असून त्यावर महासंघाने कडक प्रहार केला आहे. सोमेश्वर मंदिराची ५० कोटी रुपयांची ५ एकर भूमी केवळ ९६० रुपयांना विकली गेली. हा हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान नाही का ? वर्ष २०१८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० हेक्टर देवस्थान भूमींवरील देवस्थानाचे नाव हटवून परस्पर ‘महाराष्ट्र शासन’, असे नाव लावण्यात आले. हा प्रशासकीय अत्याचार थांबवून पुन्हा देवाचे नाव लावल्याविना हिंदू गप्प बसणार नाहीत !

‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात असलेली ३९ लाख एकर भूमी ही हिंदूंचा हक्क हिरावून घेणारी आहे. केंद्रशासनाने वक्फ कायद्यात सुधारणा केल्याविषयी आम्ही अभिनंदन केले असले, तरी हिंदूंची एक इंचही भूमी वक्फच्या कह्यात जाऊ देणार नाही. पंढरपूर, शेगाव यांसारख्या मोठ्या देवस्थानांच्या यात्रांमध्ये ८० ते ९० टक्के दुकाने ही मुसलमानांचे असतात, जिथे हिंदु महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडतात. हिंदु मंदिरांच्या आवारात व्यवसाय करण्याचा अधिकार केवळ हिंदूंनाच असावा. कर्नाटक सरकारने मंदिरांच्या उत्पन्नावर १० टक्के कर लादण्याचा जो प्रयत्न केला, त्याला मंदिर महासंघाने ‘जिझिया कर’ ठरवून विरोध केला आहे.

मंदिरांच्या ५०० मीटर परिघात मद्य आणि मांस विक्रीची दुकाने

हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरांच्या १०० मीटर परिघात मद्य आणि मांस विक्रीची दुकाने असता कामा नयेत. १०० मीटरची मर्यादा वाढवून ती किमान ५०० मीटर करावी, जेणेकरून भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत.

– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिर महासंघाने आम्हाला दिशा द्यावी, सत्तेच्या माध्यमातून कार्यवाही करू ! – मंत्री भरतशेठ गोगावले

तुम्हा सर्वांना (मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी यांना) पहाण्यासाठी या परिषदेला यायचे मी ठरवले होते. आळंदी, पंढरपूर, देहूला जाणे होते. मी वारकरी नाही; मात्र पंढरपूर आणि आळंदीची वारी चुकवलेली नाही. देवाचा भक्त बनून तुमच्यासमोर आलो आहे.

मंदिर महासंघ जागरणाचे जे काम करत आहे, ते कौतुकास्पद आहे.

मंदिर भूमींच्या हस्तांतरणासाठी लागणारे मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) रहित करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. मंदिर महासंघ जे जागरणाचे काम करत आहे, ते कौतुकास्पद आहे. तुम्ही आम्हाला दिशा द्या, आम्ही सत्तेच्या माध्यमातून त्याची कार्यवाही करू, अशा शब्दांत मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी मंदिर प्रतिनिधींना आश्वस्त केले. ‘मंदिर महासंघाने एकत्र येऊन जी वज्रमूठ बांधली आहे, तिला शासनाचे पूर्ण पाठबळ राहील’, असे गोगावले यांनी सांगितले.

मंदिरांना अधिक साहाय्य दिले जाईल !

विशाळगड आणि पन्हाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याचे काम चालू झाले आहे. वेळ आली, तर मंदिरांच्या भूमीसाठी ‘बुलडोझर’ चालवण्यास आम्ही मागे-पुढे पहाणार नाही. मंदिरांना अधिक निधी मिळावा यासाठी ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील मंदिरांचे पुनर्गठन करून त्यांना भरीव साहाय्य दिले जाईल. नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभपर्वासाठी शासन आतापासूनच सिद्धता करत असून तिथे कोणतीही उणीव भासू दिली जाणार नाही.

– श्री. भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री


चर्चासत्रात मान्यवरांचा निर्धार

मंदिरांचे रक्षण आणि पुजार्‍यांचे हित यांसाठी संघटित होऊया !

मंदिरांच्या बळकावलेल्या भूमी मुक्त करणे, पुजार्‍यांना कायदेशीर संरक्षण मिळवून देणे आणि मंदिरांमधील सात्त्विकता टिकवणे, यांसाठी आता ‘समस्त हिंदु समाजा’ने संघटित होऊन लढा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन मान्यवरांनी येथे केले. मंदिर परिषदेत ‘मंदिर संस्कृतीवरील आघात आणि उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात विविध मान्यवर सहभागी झाले होते.

  • तुळजापूर येथील ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या पुनर्बांधणीचे काम मंदिर महासंघाने केलेल्या आंदोलनामुळेच चालू होऊ शकले आहे. – श्री. किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, तुळजाभवानी पुजारी मंडळ
  • मंदिरांचे नोंदणीकरण करून कायदेशीर गुंतागुंत टाळावी, तसेच विश्वस्त पालटण्यासाठी येणारा खर्च टाळण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे थेट आवेदन करावे. – दिलीप देशमुख, निवृत्त धर्मादाय आयुक्त
  • पुजार्‍यांना मौलवींप्रमाणे वेतन नको, तर कायदेशीर संरक्षण हवे आहे. सरकार आणि मंदिर महासंघ यांनी पुजार्‍यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ‘मंदिर विश्वस्त अधिनियमा’त सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. – अधिवक्ता सुरेश कौदरे, अध्यक्ष, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान
  • महासंघाने वर्ष २०२३ मध्ये १ सहस्र ५०० एकर भूमी मंदिरांना परत मिळवून दिली आहे. अहिंदूंनी बळकावलेल्या १०० कोटी रुपयांच्या मालमत्ता कायदेशीररित्या मुक्त केल्या आहेत. मंदिरांच्या नोंदी अद्ययावत् ठेवाव्यात; अन्यथा मंदिरांचे सरकारीकरण होईल. – श्री. अनुप जयस्वाल, राज्य कोअर कमिटी सदस्य, महाराष्ट्र मंदिर महासंघ
  • श्री तुळजाभवानी देवस्थानातील सोने-नाणे आणि हुंडी यांमधील दान अन् ५ सहस्र एकर भूमी यांवर विविध प्रशासकीय अधिकार्‍यांनी डल्ला मारला आहे. मंदिर महासंघाने न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली. सरकारने अधिवक्ता नेमले आणि त्यातून दुर्दैवाने भ्रष्ट अधिकार्‍यांची सुटका झाली. यावर उपाय म्हणजे संघटित होऊन प्रयत्न करणे. न्यायप्रक्रियेला किती विलंब होईल, हे सांगता येत नाही. यामध्ये तलाठी, कारकून यांना दोषी ठरवले जाते. – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद
  • पुजार्‍यांनी ईश्वरी अधिष्ठान ठेवून आदर्श जीवन जगले पाहिजे. त्यांनी शुद्ध आचरण ठेवले, तर मंदिरांना पुन्हा चांगले दिवस येतील आणि लवकरात लवकर ‘हिंदु राष्ट्र’ येईल. – प्रसाद पंडित, पिठासीन धर्माधिकारी, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ ट्रस्ट
  • आता केवळ आंदोलने करण्याची नाही, तर सरकारला आदेश देण्याची वेळ आली आहे. मंदिर विश्वस्तांमध्ये अहिंदू आणि नास्तिक नकोत, तर भक्त विश्वस्त हवेत. जो मंदिरांच्या हिताचे काम करील, तोच देशावर राज्य करील. – श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
  • मंदिराचे आर्थिक व्यवहार इतके पारदर्शक ठेवा की, कुणालाही भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही. तरच भाविकांचे अर्पण सत्कारणी लागेल. मंदिरांचे सरकारीकरण हा मोठा धोका आहे. सध्या धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असल्याने मंदिरांसाठी सुगीचे दिवस आहेत, याचा लाभ घेऊन मंदिरांचे रक्षण करा. काळाप्रमाणे चालत सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडिया) प्रभावी वापर करून धर्माचा प्रसार करा. – योगी निरंजन नाथ महाराज, प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री क्षेत्र आळंदी
  • आपली साडी असो वा खाद्यसंस्कृती, प्रत्येक गोष्टीचे मूळ मंदिरात आहे. बनारसी किंवा संभलपुरी साडीवरील नक्षीकाम हे मंदिराच्या शिखरांपासून प्रेरित आहे. जर मंदिरे नसती, तर आज आपण केवळ ‘बर्गर’ खात असतो आणि परकीय कपडे घालत असतो. जगन्नाथ पुरीसारख्या मंदिरांमुळेच तांदळाच्या ४०० हून अधिक देशी प्रजाती आजही टिकून आहेत. पाश्चात्त्य देशांनी आणलेला बटाटा किंवा टोमॅटो आपल्या प्रसादात नसतो, तिथे केवळ देशी भाज्या आणि अन्नाचा वापर होतो. मंदिरे निसर्ग आणि पशू-पक्षी यांना जपण्याचे कार्य करतात. – श्री. संदीप सिंह, मंदिर अभ्यासक