महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने लोलकाद्वारे केलेले श्रीरामाशी संबंधित स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर यांच्या संदर्भातील संशोधन !

‘एखाद्या देवतेचे स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. येथे श्रीरामाशी संबंधित संशोधन दिले आहे.

१. चाचणीतील घटक

या संशोधनात्मक प्रयोगात पुढीलप्रमाणे श्रीरामाशी संबंधित स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर निवडण्यात आले.

१ अ. श्रीरामरक्षास्तोत्र : ‘अध्यात्मशास्त्रात मंत्रयोगाला पुष्कळ महत्त्व आहे. श्रीरामरक्षास्तोत्र हा मंत्रच आहे. रामरक्षेच्या प्रारंभीला ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ असे म्हटले जाते. मंत्र म्हणजे इष्टसाधक आणि अनिष्टनिवारक वर्णसमूह. मंत्र म्हणजे एक नाद (ध्वनी), एक अक्षर, एक शब्द किंवा शब्दांचा समूह. ज्या वेळी ठराविक लयीत आणि सुरात एखादा मंत्र जपला जातो, त्या वेळी त्या जपातून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते. याकरिता रामरक्षास्तोत्र विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे.

‘स्तूयते अनेन इति’ म्हणजे ज्यायोगे देवतेचे स्तवन केले जाते ते स्तोत्र’, अशी ‘स्तोत्र’ या शब्दाची व्याख्या आहे. स्तोत्रात देवतेच्या स्तुतीबरोबरच स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्तीही असते. स्तोत्रांमध्ये दिलेल्या फलश्रुतीमागे रचयित्याचा संकल्प असल्याने ते पठण करणार्‍याला फलश्रुतीमुळे फळ मिळते.’

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘श्रीरामरक्षास्तोत्र’)

या प्रयोगात श्री रामरक्षेतील पहिले कडवे निवडण्यात आले.

चरितं रघुनाथस्य, शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरम् पुंसाम्, महापातकनाशनम् ॥ १ ॥

अर्थ : रघुनाथ (रघुकुलात श्रेष्ठ, रघुकुलाचा स्वामी) रामाच्या चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांएवढा आहे. यातील एकेक अक्षर(सुद्धा) मानवाच्या महापातकांचा नाश करणारे (करण्यास समर्थ) आहे.

१ आ. श्रीरामाचा नामजप – ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ : ‘कलियुगात नामजप हीच सर्वोत्तम साधना आहे आणि नामजपाला पर्याय नाही’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

सौ. मधुरा कर्वे

‘श्रीराम जय राम जय जय राम’ यातील शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

श्रीराम : हे श्रीरामाचे आवाहन आहे.

जय राम : हे स्तुतिवाचक आहे.

जय जय राम : हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतिदर्शक आहे.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्रीराम’)

१ इ. श्रीरामाचा मंत्र : ‘श्री रामचन्द्राय नमः ।’ याचा अर्थ ‘श्रीरामचंद्राला नमस्कार’, असा आहे. यात प्रभु श्रीरामाला ‘रामचंद्र’ या नावाने संबोधले आहे.

१ ई. श्रीरामाचे यंत्र : यंत्र म्हणजे एक विशिष्ट आकृतीबंध. (श्रीरामाच्या यंत्राचे छायाचित्र बाजूला दिले आहे.)

१ उ. श्रीरामाचे बीजाक्षर : ‘रां’ हे श्रीरामाचे बीजाक्षर आहे.

लोलकाद्वारे चिकित्सा

२. चाचणीतील घटकांच्या नोंदी

वरील घटकांची संगणकीय प्रत काढून त्यांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. कोणत्याही घटकांत नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

या घटकांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

३. निष्कर्ष

श्रीरामरक्षास्तोत्र, श्रीरामाचा नामजप, श्रीरामाचा मंत्र, श्रीराम यंत्र आणि श्रीरामाचे बीजाक्षर या सर्वांमध्ये उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. देवतेचे स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर उत्तरोत्तर अधिकाधिक सूक्ष्म असल्याने ते अधिक प्रभावी आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने आहेत.

या संशोधनात्मक प्रयोगात निवडलेले स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर हे सर्व श्रीरामाशी संबंधित आहेत. या सर्वांद्वारे श्रीरामाचेच तत्त्व (चैतन्य) मिळत असले, तरी त्यात आध्यात्मिकदृष्ट्या भेद आहे. त्यामुळे ‘देवतेचे स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र किंवा बीजाक्षर यांचा उपयोग कुणी, कधी, कसा आणि कोणत्या उद्देशाने करावा ?’, हे अध्यात्मातील जाणकार (संत) सांगू शकतात.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.८.२०२५)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक