पणजी येथील ‘गोवा बुक फेस्टिव्हल २०२६’ मधील सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाला जिज्ञासूंचा लाभलेला उत्तम प्रतिसाद आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बांदोडकर मैदान, पणजी येथे प्रथमच ‘गोवा बुक फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. या कक्षावर सनातनचे ‘मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि गुजराती’ या भाषांतील ग्रंथ ठेवले होते. या कक्षाला जिज्ञासूंचा लाभलेला उत्तम प्रतिसाद आणि साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे यांविषयीची माहिती पुढे दिली आहे.

१. सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाचा केलेला प्रसार

१ अ. ग्रंथप्रदर्शनासाठी निमंत्रण देणे : ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ अनेक जणांना होण्यासाठी साधकांनी नातेवाईक, तसेच स्वतःच्या संपर्कात असलेले ‘वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, अर्पणदाते’ इत्यादींना निमंत्रण दिले.

१ आ. भाव ठेवून प्रसार करणे : साधकांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले चैतन्यदायी ग्रंथ, म्हणजे ‘गुरूंचे दूत’ आहेत आणि हे ग्रंथ घराघरांत पोचवण्याचे दायित्व प्रत्येक साधकाचे आहे’, असा भाव ठेवून प्रसारसेवा केली.

१ इ. साधकांनी भ्रमणभाषवरील ‘व्हॉट्सॲप, लघुसंदेश, स्टेटस्’ इत्यादींचा उपयोग करून या ग्रंथप्रदर्शनाला प्रिसद्धी दिली.

१ ई. ग्रंथांचे महत्त्व सांगणार्‍या चौकटी बनवून त्या प्रसिद्ध करणे : ग्रंथांच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने साधकांनी काही चौकटी बनवल्या होत्या. त्यामध्ये ‘सनातनचे ग्रंथ हे आपल्या जीवनातील अनेक समस्या, उदा. मन अशांत आणि अस्थिर रहाणे, सतत ताण असणे, लहान मुलांच्या समस्या, अनेक आजार इत्यादी दूर करून जीवन आनंदी बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यासाठी ग्रंथप्रदर्शनाला अवश्य भेट द्या’, अशा आशयाच्या चौकटी बनवल्या होत्या. या चौकटींची प्रसिद्धी सामाजिक प्रसिद्धी माध्यमांतून करण्यात आली.

१ उ. महोत्सवात आलेले कवी आणि प्रसिद्ध कलाकार यांची भेट घेऊन त्यांना विषय सांगणे : ‘गोवा बुक फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी लेखक, कवी आणि काही प्रसिद्ध कलाकार यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांचे कार्यक्रम झाल्यावर साधकांनी त्यांना वैयक्तिकरित्या भेटून ‘सनातनचे कार्य सांगणे, त्यांच्या विषयाशी संबंधित ग्रंथ दाखवणे, ग्रंथ भेट म्हणून देणे आणि त्यांना सनातनच्या ग्रंथकक्षाला भेट देण्यास सांगणे’ इत्यादी प्रयत्न केले.

२. ‘बुक फेस्टिव्हल’मुळे ‘शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण होत आहे’, असे जाणवणे

सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विविध शाळांतील विद्यार्थी ‘गोवा बुक फेस्टिव्हल’ पहाण्यासाठी येत होते. त्या वेळी विद्यार्थी प्रत्येक ग्रंथकक्षावर जाऊन स्वतःच्या आवडत्या पुस्तकांची नावे लिहून घेत होते आणि नंतर पुस्तके विकत घेण्यासाठी येत होते. ‘सध्याच्या भ्रमणभाष, दूरचित्रवाणी आणि माहितीजाल (इंटरनेट) यांच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी या ‘बुक फेस्टिव्हल’मुळे नक्कीच लाभ झाला’, असे माझ्या लक्षात आले.

३. सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाला भेट दिलेल्या जिज्ञासूंचा प्रतिसाद

३ अ. प्रतिष्ठित व्यक्तींनी लहान मुलाखती (‘बाईट्स’) देणे : आलेले जिज्ञासू आणि मान्यवर वेगवेगळ्या विषयांवरील सनातनचे ग्रंथ बघून पुष्कळ प्रभावी होत होते. बर्‍याच व्यक्तींनी एक मिनिटाच्या लहान मुलाखती (‘बाईट्स’) दिल्या. यामध्ये गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सौ. सुलक्षणा सावंत, कवयित्री सौ. ज्योती कुंकळीकर (कोकणी साहित्यिका), श्री. योगेश करीकुर्वे (फाऊंडर, हॅप्पिनेस फॅक्ट्री वेलनेस), श्री. शंतनु गुप्ता (साहित्यिक आणि चित्रपट पटकथाकार), विद्यावाचस्पती डॉ. मेधा खाजगीवाले (हिप्नोथेरपिस्ट आणि व्याख्यात्या), अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या.

३ आ. पुस्तक प्रकाशकांनी ग्रंथकक्षाला भेट देणे : ‘गोवा बुक फेस्टिव्हल’मध्ये पुस्तकांचे प्रकाशकही (‘बुक पब्लिशर’ही) आले होते. काही प्रकाशकांनी सनातनच्या ग्रंथकक्षाला भेट दिली. त्यांनी सनातन संस्थेचे कार्य जाणून घेऊन रामनाथी, गोवा येथील आश्रम पहाण्याची इच्छा व्यक्त केली.

३ इ. एका विद्यार्थ्याला सनातनचा ‘अभ्यास कसा करावा ?’ हा ग्रंथ आवडणे आणि तो विकत घेण्यासाठी आईवडिलांना घेऊन तो ग्रंथकक्षावर येणे : शाळेतील विद्यार्थी सनातनच्या ग्रंथकक्षावर येत होते. तेव्हा ते त्यांना आवडणार्‍या ग्रंथांची नावे वहीत लिहून घेत होते. एका विद्यार्थ्याने सनातनच्या ‘अभ्यास कसा करावा ?’ या ग्रंथाची नोंद त्याच्या वहीत केली. सायंकाळी तो त्याच्या आई-वडिलांना घेऊन ग्रंथकक्षावर आला; मात्र त्याला तो ग्रंथ सापडला नाही. बराच वेळ शोधल्यावर त्याला तो ग्रंथ सापडला आणि त्याने तो विकत घेतला. तेव्हा तो विद्यार्थी आणि त्याचे आई-वडील यांना पुष्कळ आनंद झाला.

३ ई. एका आधुनिक वैद्यांनी स्वतःचा राग न्यून करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनाशी संबंधित ग्रंथ विकत घेणे : एक आधुनिक वैद्य सनातन संस्थेचे नाव वाचून ग्रंथकक्षावर आले आणि म्हणाले, ‘‘येथे स्वभावदोष निर्मूलन करण्याविषयीचे ग्रंथ मिळतील’, असे वाटले; म्हणून मी येथे आलो आहे.’’ त्यांनी सनातनचे स्वभावदोष निर्मूलनाविषयीचे ग्रंथ पाहिले आणि म्हणाले, ‘‘मला पुष्कळ राग येतो. तो मला न्यून करायचा आहे. मी येथील बरेच प्रदर्शनकक्ष (स्टॉल) बघितले; पण मला हवे ते ग्रंथ तेथे मिळाले नाहीत. आता हा ग्रंथ पाहून मला पुष्कळ आनंद झाला आणि माझे मन एकदम शांत झाले. या ग्रंथांत सांगितल्यानुसार मी कृती करीन.’’ असे म्हणून त्यांनी ग्रंथ घेतले.

३ उ. वाचनाची आवड असलेल्या ख्रिश्चन महिलेने सनातनच्या इंग्रजी ग्रंथांचा संच विकत घेणे : एक ख्रिश्चन महिला ग्रंथकक्षावर आली होती. तिने सनातनचे साधनेविषयीचे २ इंग्रजी ग्रंथ पाहिले आणि तिला ते पुष्कळ आवडले. त्यामुळे तिने इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथांचा संच विकत घेतला. साधकांनी तिला ‘‘तुमचे ग्रंथालय आहे का ?’’, असे विचारले असता ती स्त्री म्हणाली, ‘‘लायब्ररी नाही; परंतु मला वाचनाची पुष्कळ आवड आहे. वेळ मिळाला की, मी ग्रंथांचे वाचन करते.’’

३ ऊ. ‘साधकांनी ग्रंथांविषयीची उपयुक्त माहिती दिल्यामुळे लाभ होत आहे’, असे जिज्ञासूंनी सांगणे : ग्रंथकक्षावर आलेले काही जिज्ञासू म्हणाले, ‘‘तुमचे साधक येथे येणार्‍या प्रत्येकाला ‘या ग्रंथात काय लिहिले आहे किंवा आम्ही कोणता ग्रंथ घेतला, तर त्याचा लाभ होईल’, यांविषयी माहिती सांगत आहेत. त्यामुळे ‘आमच्यासाठी कोणता योग्य ग्रंथ आहे ?’, हे आम्हाला समजत आहे. अन्य ग्रंथकक्षांवर असे काही सांगितले जात नाही. तुम्ही छान सेवा करत आहात.’’

३ ए. अनेक जिज्ञासूंनी ‘सनातनच्या ग्रंथकक्षावर आल्यावर वेगळेपणा, प्रसन्नता आणि शांतता जाणवते’, असे मत व्यक्त केले.

३ ऐ. जिज्ञासूने सनातनच्या साधकांचे कौतुक करणे : एका जिज्ञासूने ग्रंथांची माहिती जाणून घेतली आणि काही ग्रंथही विकत घेतले. तेव्हा त्यांना छान वाटले. त्यांनी सांगितले, ‘‘ज्या संस्थेचे कार्यकर्ते चांगले असतात, त्या संस्थेची भरभराट होते आणि त्यांचे कार्य अजून चांगल्या प्रकारे होते.’’ त्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझा भाव जागृत झाला; कारण गुरुदेवांनीच सर्व साधकांना घडवले आहे.

४. ग्रंथप्रदर्शन कक्षाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

सुश्री अनुराधा जाधव

४ अ. ग्रंथकक्षाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : एका साधकाच्या ‘व्हॉटस्ॲप’चे ‘स्टेटस’ (भ्रमणभाषवर अद्ययावत् माहिती, छायाचित्रे किंवा चलत्‌चित्रे इत्यादी ठेवण्याची सुविधा) पाहून काही वाचकांनी ग्रंथांची मागणी केली. तेव्हा मला असे वाटले की, जसे गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते, तसेच ‘गोवा बुक फेस्टिव्हल’साठीही गुरुदेवांचा संकल्प, तसेच ग्रंथांचे चैतन्य कार्यरत असल्यामुळे प्रत्येक जिवाला अनेक पटींनी आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे.

४ आ. सनातनच्या ग्रंथांची गुणवत्ता चांगली वाटल्यामुळे ग्रंथांवर सवलत नसतांनाही जिज्ञासूंनी ते विकत घेणे : सनातनच्या ग्रंथकक्षावर आरंभी ग्रंथांवर काही प्रमाणात सवलत दिली होती; पण नंतर असे लक्षात आले की, ‘ग्रंथांवर दिलेली सवलत बघून एकही जिज्ञासू आला नाही. ‘ग्रंथांवर काही सवलत आहे का ?’ असेही कुणी विचारले नाही. ग्रंथांतील माहिती पाहूनच जिज्ञासू ग्रंथ विकत घेत होते. काही जिज्ञासूंनी ‘सनातनच्या ग्रंथांची गुणवत्ता चांगली असून मुखपृष्ठावरील रंगसंगती सात्त्विक आहे’, असे अभिप्राय दिले.

५. साधकांनी सेवा आणि साधना होण्यासाठी संघटितपणे आध्यात्मिक स्तरावर केलेले प्रयत्न

ग्रंथकक्षावर सेवा करणार्‍या सर्व साधकांनी प्रतिदिन ग्रंथ वितरणाचे काही ध्येय ठरवले होते. साधकांनी ‘अधिकाधिक प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करणे’, असे प्रयत्न संघटितपणे केले.

६. ग्रंथांतील चैतन्यामुळे आलेल्या अनुभूती

६ अ. ग्रंथांतील चैतन्यामुळे जिज्ञासूंनी ग्रंथकक्षावर येऊन ग्रंथ विकत घेणे : पहिल्या दिवशीच्या तुलनेत ‘ग्रंथकक्षावर शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चैतन्य वाढले आहे’, असे मला जाणवले. या चैतन्यामुळेच लोक ग्रंथकक्षावर येत होते आणि ते ग्रंथ विकत घेतल्याविना जात नव्हते.

६ आ. ग्रंथांची मांडणी केल्यावर वातावरणात चैतन्य जाणवून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी पुष्कळ कष्टाने समष्टीच्या उद्धारासाठी सुंदर ग्रंथसंपदा निर्माण केल्याने भाव जागृत होणे : ग्रंथ प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी ग्रंथकक्षावर ग्रंथांची मांडणी केल्यावर वातावरणात एकदम पालट झाला. सर्व साधकांची मने एकदम शांत आणि स्थिर झाली. एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य जाणवू लागले. ‘सनातनच्या सर्व ग्रंथांमधून चैतन्याचा स्रोत बाहेर पडत आहे आणि तेथील वातावरणात पसरत आहे’, असे मला जाणवले. हे पाहून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पुष्कळ वेळ देऊन, दिवसरात्र जागून आणि पुष्कळ कष्टाने ही सुंदर ग्रंथसंपदा समष्टीच्या उद्धारासाठी निर्माण केली आहे’, याबद्दल माझी भावजागृती झाली.

‘ग्रंथकक्षावरील सर्व सेवा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच आमच्याकडून करून घेतल्या’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री अनुराधा नंदकुमार जाधव, फोंडा, गोवा. (२३.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक