नवी देहली – इराणने जर ४८ घंट्यांच्या आत हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आक्रमण करून ते उद्ध्वस्त करेल आणि त्यास सर्वांत मोठ्या प्रकल्पापासून प्रारंभ करू, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली.
अमेरिका-इस्रायल यांचे प्रकल्प उद्ध्वस्त करू ! – इराणचे प्रत्युत्तर
ट्रम्प यांच्या चेतावणीवर इराणच्या ‘खातम अल्-अनबिया सेंट्रल कमांड’चे प्रवक्ते इब्राहिम झुल्फाघारी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, जर आमच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले गेले, तर मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी संबंधित सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर आम्हीही आक्रमण करू. समुद्राचे पाणी गोडे करणार्या प्रकल्पांवर (डिसेलिनेशन प्लांट) आणि माहिती-तंत्रज्ञान सुविधा यांवर आक्रमणे करू.
हॉर्मुझवरून संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि जपान यांच्यासह २२ देश एकत्र आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हॉर्मुझचा मार्ग रोखणे, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. इराणने आक्रमणे थांबवून सागरी मार्ग उघडावा.
शत्रू देशांव्यतिरिक्त इतर देशांसाठी सामुद्रधुनी उघडी ! – इराण
हॉर्मुझ सामुद्रधुनी सर्व देशांच्या नौकांसाठी मोकळी आहे; मात्र शत्रू देशांशी संबंधित नौकांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा इराणकडून करण्यात आली आहे. शत्रू देशांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांचा समावेश आहे. हॉर्मुझ मार्गाने जगातील अनुमाने २० टक्के तेल वाहतूक होते. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे
इराणमध्ये ४ आठवड्यांपासून इंटरनेट बंद
इराणमध्ये गेल्या ४ आठवड्यांपासून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’वर लक्ष ठेवणार्या ‘नेटब्लॉक्स’ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार बाह्य जगाशी जोडणारे इंटरनेट दुवे जवळपास पूर्णपणे तोडण्यात आले आहेत आणि देशांतर्गत इंटरनेटचा वापर अत्यंत मर्यादित राहिला आहे. सरकारने व्हीपीएन् आणि ‘सॅटेलाईट इंटरनेट’ यांच्यावरही बंदी घातली आहे; ज्यामुळे लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी आता अत्यंत मोजकेच पर्याय उपलब्ध राहिले आहेत.
श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत वाढ

श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दोन आठवड्यांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. पेट्रोलचा दर आता ३९८ रुपये प्रती लिटर झाला असून तो आधीच्या ३१७ रुपये या दरापेक्षा वाढला आहे. डिझेलच्या किमतीही वाढल्या असून त्या ३८२ रुपये प्रती लिटर इतक्या झाल्या आहेत.
राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी स्पष्ट केले की, युद्धामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो; त्यामुळे देशाने त्यासाठी आधीच सज्ज रहाणे आवश्यक आहे.
इराणने इस्रायलमधील डिमोना येथील अणू केंद्रावर डागले क्षेपणास्त्र
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांनी २१ मार्चला एकमेकांच्या सर्वांत सुरक्षित अणू केंद्रांना लक्ष्य करत युद्धाची दाहकता वाढवली. इस्रायल आणि अमेरिका यांच्या वायूदलाने इराणची मुख्य अणूभट्टी ‘नतांझ’वर भीषण आक्रमण केले. याला प्रत्युत्तर म्हणून त्याच रात्री इराणने इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेल्या डिमोना शहरातील अणू केंद्रावर आक्रमण केले. इराणने या शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र निवासी भागात पडले. यामुळे एक बहुमजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली. यामध्ये ४७ जण घायाळ झाले.
डिमोना शहर ‘लिटिल इंडिया’ : मराठी भाषिकांची संख्या अधिक !
इराणने आक्रमण केलेल्या डिमोन शहराला ‘लिटिल इंडिया’ असेही म्हटले जाते; कारण येथे भारतीय वंशाचे ज्यू मोठ्या संख्येने रहातात. येथे ३० टक्के लोकसंख्या, म्हणजे जवळपास ७ सहस्र ५०० लोक भारतीय वंशाचे असून त्यांपैकी बहुतेक मराठी भाषिक आहेत. ते महाराष्ट्रातील बेने झस्रायली आहेत. या शहरात मराठी भाषा, भारतीय खाद्यसंस्कृती आणि परंपरा यांचा ठळक प्रभाव दिसून येतो. तेथील रस्त्यांवर सोनपापडी, गुलाबजामून, पापडी चाट आणि भेळपुरी सहज उपलब्ध असतात. यासह डिमोनामध्ये क्रिकेटही अत्यंत लोकप्रिय आहे.
अमेरिका-इस्रायल प्रवासी नौकांना लक्ष्य करत आहेत ! – इराणचा आरोप
इराणी सैन्याने आरोप केला की, अमेरिका आणि इस्रायल आखाती क्षेत्रात खासगी अन् प्रवासी नौकांना लक्ष्य करत आहेत. हे थांबले नाही, तर आम्ही असे प्रत्युत्तर देऊ, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
दुसरीकडे इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, येणार्या आठवड्यात इराणवरील आक्रमणांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman