आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘माणुसकी असणाराच खरा माणूस, आध्यात्मिक दृष्ट्या ‘माणूस’ कुणाला म्हणावे ? माणूस होण्यासाठी परमार्थ का आवश्यक ? आणि दासबोधातील मनुष्यजन्माचे महत्त्व’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ३ )
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020301.html

७. श्रेष्ठ माणसांच्या कृतीचे अनुसरण केल्यास उद्धार निश्चित !
७ अ. भारतीय संस्कृतीतील अत्युच्च कोटीतील आदर्शवत् उदाहरण ! : राजा हरिश्चंद्राने स्वप्नात गुरूंना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी राज्य त्यागले. आपण दिवसा पूर्ण शुद्धीत दुसर्याला दिलेला शब्द तरी पाळतो का ? ऐश्वर्यात जगू शकत असतांना छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे शंभूराजे यांनी केवळ आपल्यासाठी त्यांचे जीवन वेचले. वीर तानाजी मालुसरे यांनी मुलाच्या लग्नावर पाणी सोडले. (लेखाच्या शेवटी चौकटीत दिलेली टीप पहा.) बाजीप्रभु देशपांडे जेवणाच्या ताटावरून उठून छत्रपतींच्या रक्षणासाठी धावले. आमची झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि राणी चेन्नमा यांनी दिलेला लढा आपल्याला प्रतिकूलता असली, तरी पराभव न मानण्याची शिकवण देतो कि नाही ? अहिल्याबाई होळकर यांनी केलेला विविध मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि विकास आपल्याला आदर्श समाजकारण शिकवतो कि नाही ? लोकमान्य टिळक यांनी जनकल्याणासाठी मंडालेच्या कारागृहात शिक्षा भोगली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी आयुष्याचा अधिक काळ काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यात घालवला. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु अशा कितीतरी क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले. यातून राष्ट्र-धर्म यांसाठी समर्पण कसे असावे, हे समजते. स्वामी विवेकानंद आपली श्रेष्ठतम भारतीय संस्कृती, आचार-विचार यांचा डंका विश्वभरात वाजवायला शिकवला कि नाही ? आमचे हे महानायक त्यांच्या गुणांमुळे खर्या अर्थाने अजरामर झाले आहेत.

७ आ. माणसाने भव्यदिव्य नव्हे, तर आवाक्यात येणार्या गोष्टी तरी आचरणात आणाव्यात ! : अशा आमच्या आदर्श नायकांचा एकेक गुण जरी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या मनुष्यजन्माचे सार्थक झाल्याविना रहाणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘भारतीय माणसाचा दोष ‘तो भव्यदिव्य काही करत नाही’, हा नसून तो आपल्या आवाक्यातीलही काही करत नाही’, हा आहे. त्यामुळे कदाचित उपरोक्त आदर्शांचे अनुसरण करणे एक वेळ आपल्याला अशक्यप्राय वाटू शकेल; परंतु प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी १ घंटा देणे अशक्य आहे का ? प्रतिदिन १० माळा नामजप करणे अशक्य आहे का ? येता-जाता देशाच्या रक्षणासाठी प्रार्थना करणे जमण्यासारखे नाही का ? आपल्या समाजबांधवांच्या साहाय्याला धावणे, त्यांच्या रक्षणासाठी कृतीशील होणे आणि संघटित रहाणे या कृती आपल्याला साधणार्या नाहीत का ?
जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें ।
शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ।। – दासबोध, दशक १९, समास १०, ओवी १४
अर्थ : आपल्याला जे ठाऊक असते, ते हळूहळू इतरांना शिकवावे. अशा प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे.
या समर्थवचनाप्रमाणे परिसरातील लोकांना आपल्याला धर्मशिक्षण देण्यासाठी वेळ काढता येईल कि नाही ?
८. युवकांनो, संकल्प करा !
अर्थात् या सर्व गोष्टींचे चिंतन, मनन आणि कृती यांच्या स्तरावरील प्रयत्नांचा संकल्प हा आपला आपल्यालाच करावा लागणार आहे. मला वाटते, ‘युवकांनी यंदा नववर्षानिमित्त वरीलपैकी काही कृतींना आरंभ करून त्या वर्षभर सातत्याने करण्याचा संकल्प केला, तर ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ या उक्तीप्रमाणे ‘जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करील’, यात शंका नाही.
(समाप्त)
सर्वांना नववर्षानिमित्त नवसंकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा !
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.२.२०२६)
| टीप :
वीर तानाजी मालुसरे यांचा त्याग : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा गड स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा वीर तानाजी मालुसरे यांचा मुलगा ‘रायबा’ याचे लग्न होते; परंतु ‘स्वतः छत्रपती शिवराय या मोहिमेवर जाणार’, हे तानाजी यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी महाराजांना सांगितले, ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे !’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी तानाजी यांनी मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा गड जिंकला; परंतु दुर्दैवाने या चढाईत त्यांना वीरमरण आले. तेव्हापासून राष्ट्रकार्य हे प्रथम प्राधान्य यासाठी ‘आधी लगीन कोंढाण्याचे…’ ही म्हण प्रचलित झाली. |
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष