१९ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘माणुसकी असणाराच खरा माणूस, आध्यात्मिकदृष्ट्या ‘माणूस’ कुणाला म्हणावे ? आणि माणूस होण्यासाठी परमार्थ का आवश्यक ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019917.html

६. दासबोधातील मनुष्यजन्माचे महत्त्व
समर्थ रामदासस्वामी यांनी ‘दासबोधा’मध्ये १० व्या समासात ‘नरदेहस्तवननिरूपण’ करतांना नरदेहाचे, म्हणजे माणूस म्हणून जन्माला येण्याचे आणि या जन्मातच साधना करण्याचे महत्त्व सांगितले आहे. पुढील काही ओव्यांमधून वाचकांना ते स्पष्ट होईल.
या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें ।
मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ।। १८ ।।
या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें ।
अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ।। १९ ।।
पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती ।
म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ।। २१ ।।
म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ ।
जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ।। २४ ।।
नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन ।
परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरूपें उरवावा ।। २५ ।।
सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ।। ३३ ।।
देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें ।
नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ।। ६१ ।।
या सर्व ओव्यांचा अर्थ, म्हणजे संतांचा माणसाला उपदेश करण्यामागील उद्देश ‘मनुष्यजन्माचे सार्थक व्हावे, माणसाचा जन्म निरर्थक वाया जाऊ नये, त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी’, असा आहे. या उदात्त हेतूनेच संतांनी भगवंताचा गीतोपदेश प्रमाण मानून माणसाला खर्या अर्थाने माणूस होण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच माणसाने त्या दृष्टीने प्रयत्न करणे आणि साधनेद्वारे सद्गुणवृद्धी करून खर्या आनंदाकडे वाटचाल करणे, यासाठी परमार्थपथावर मार्गक्रमण करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

७. श्रेष्ठ माणसांच्या कृतीचे अनुसरण केल्यास उद्धार निश्चित !
संतांच्या मार्गदर्शनातून माणूस होण्याचे आणि त्यासाठी परमार्थाचे अनुसरण करण्याचे महत्त्व आपल्याला समजले; परंतु आपल्या धर्मात सांगितलेल्या ज्ञानाची खोली इतकी आहे की, बर्याचदा ‘हे करू कि ते करू ?’, या विचारानेच मनुष्य गोंधळून जातो. काही वेळा तो दिग्भ्रमित होतो; म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने यावरही माणसाला गीतेच्या माध्यमातून दिशा दिली आहे.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।। – भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २१
अर्थ : श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो.
यातून आपल्या श्रेष्ठ माणसांच्या कृतीचे अनुसरण करण्याचा बोध भगवंताने करून दिला आहे. आपण भाग्यवान म्हणून भारतात एकाहून एक अशी श्रेष्ठ व्यक्तीमत्त्वे होऊन गेली आहेत. प्रत्येकाचे जीवनचरित्र विविध आदर्शांनी भारलेले आहे. या श्रेष्ठींच्या कृती आणि उपदेश यांचे अनुसरण केल्याने आपला निश्चितच उद्धार होईल.
७ अ. भारतीय संस्कृतीतील अत्युच्च कोटीतील आदर्शवत् उदाहरणे ! : वडिलांच्या शब्दासाठी श्रीरामाने १४ वर्षे वनवास भोगला. बंधूप्रेमासाठी लक्ष्मणानेही राज्यत्याग करून रामाला साथ दिली. भरतानेही राज्य न उपभोगता रामाप्रमाणे वल्कले परिधान करून नंदिग्रामी वास केला. महावीर असूनही हनुमानाने स्वतःच्या आचरणातून आपल्याला दास्यभाव शिकवला. भीष्म पितामह यांनी वडिलांसाठी केलेला त्याग आणि संकल्प ‘भीष्मप्रतिज्ञा’ म्हणून आजही ओळखला जातो. (लेखाच्या शेवटी टीप १ पहा.) राष्ट्ररक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर केलेले समर्पण, वयाच्या १८० व्या वर्षी असलेली त्यांची लढवय्या वृत्ती तरुणांना आदर्शवत् आहे. रंभेसारखी परम सौंदर्यवती प्रयत्न करूनही शुकाचार्यांना विचलित करू शकली नाही, हे आपल्याच भारतातील वैराग्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. ध्रुवबाळाने वडिलांच्या मांडीवरून खाली उतरवल्यावर कठोर तपश्चर्या करून ‘अढळपद’ मिळवले. भक्त प्रल्हादाने भगवंताच्या स्मरणासाठी प्रसंगी वडिलांशी वैर पत्करले. (लेखाच्या शेवटी टीप २ पहा.) अनंत यातना आणि पीडा झेलल्या; परंतु भगवंताचे नामस्मरण सोडले नाही. ही साधनेप्रतीची ध्येयनिष्ठा नव्हे का ? याव्यतिरिक्त सव्यसाची (धनुर्धारी) अर्जुन, बलशाली भीम, धर्मराज युधिष्ठिर, दानशूर कर्ण अशी किती उदाहरणे द्यावीत ? प्रत्येकाचे वर्तन अनुकरणीयच !
(क्रमश:)
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.२.२०२६)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020635.html
| • टीप १ : भीष्मप्रतिज्ञा : भीष्म म्हणजे अत्यंत कठीण आणि कर्तव्यकठोर. महाभारताच्या काळात राजा शंतनूचा मोठा मुलगा देवव्रत (भीष्म) याने वडिलांसाठी प्रतिज्ञा घेतली होती, ‘मी हस्तिनापूरच्या गादीवर कधीही बसणार नाही आणि राज्याचा हक्क सोडून देईन, तसेच मी आयुष्यभर अविवाहित राहीन अन् आजन्म ब्रह्मचर्य पाळीन.’ (जेणेकरून देवव्रताच्या मुलांनीही भविष्यात हस्तिनापूरच्या गादीवर हक्क सांगू नये.) देवव्रताने ही प्रतिज्ञा आजन्म पाळली. तेव्हापासून अत्यंत कठीण संकल्प करणे आणि तो आजीवन आचरणे, यांसाठी ‘भीष्मप्रतिज्ञा’ हा शब्द प्रचलित झाला.
• टीप २ : भक्त प्रल्हादाचे वडिलांशी वैर : प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू या असुराचा मुलगा होता. हिरण्यकश्यपू भगवान विष्णूला स्वतःचा कट्टर वैरी मानत असे आणि त्याने आपल्या राज्यात भगवान विष्णूच्या उपासनेवर बंदी घातली होती. असे असतांना प्रल्हादाने भगवान विष्णूची उपासना करणे चालू केले, तो रात्रंदिवस विष्णुस्मरण करत असे. तेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जिवानिशी मारण्याचा प्रयत्नही केला आणि प्रत्येक वेळी विष्णूने प्रल्हादाचे रक्षण केले अन् शेवटी प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. तेव्हापासून भक्ती कशी करावी ?, यासाठी प्रल्हादाचे उदाहरण दिले जाते. |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !