शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर ‘आय.डी.एफ्.सी. फर्स्ट’ बँकेने केली कर्जदाराची क्षमायाचना !

  • कर्जदाराची आर्थिक लुबाडणूक करण्याचा चालवला होता मनमानी प्रयत्न !

  • कर्जदाराला अश्‍लाघ्य शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या !

डावीकडे शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. राहुल पांडे

नागपूर – येथील एका ग्राहकाने ‘आय.डी.एफ्.सी. फर्स्ट’ बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते; मात्र व्यवसाय न चालल्याने कर्जाचा हप्ता भरता आला नाही. बँकेने त्या ग्राहकाला ‘वन टाईम सेटलमेंट’ (एकाच टप्प्यात सर्व रक्कम भरणे) करण्यास सांगितले. ग्राहकाने बँकेने सांगितलेली रक्कम भरली; पण त्याला कर्ज फेडल्याचे प्रमाणपत्र (लोन क्लियरन्स सर्टिफिकेट) देण्यात आले नाही. बँकेच्या अधिकार्‍यांनी वारंवार संपर्क करून त्याला आणखी १ लाख रुपये भरण्यास सांगितले. या वेळी त्यांनी अत्यंत खालच्या थराला जाऊन शिवीगाळ केल्याचा आरोपही या कर्जदाराने केला.

बँकेने कर्जदाराचे लग्न तुटण्यापर्यंत मारली मजल !

बँक केवळ एवढ्यावरच थांबली नाही, तर तिच्या अधिकार्‍यांनी पीडित ग्राहकाची भावी पत्नी आणि सासू-सासरे यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे लग्न तुटण्याची वेळ आली होती. यानंतर ग्राहकाने शिवसेनेकडे साहाय्य मागितले. शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. राहुल पांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बँकेत आंदोलन केले. या वेळी शिवसैनिकांनी बँकेच्या कार्यालयात जाऊन १५ ते २० किलो सडलेले टॉमेटो फेकले, तसेच क्षमापत्र आणि कर्ज फेडल्याचे प्रमाणपत्र न दिल्यास अजून मोठ्या आंदोलनाची चेतावणी दिली. त्यानंतर बँकेने प्रमाणपत्र, तसेच क्षमापत्र दिले. श्री. राहुल पांडे यांनी यासंदर्भातील माहिती ‘सनातन प्रभात’ला दिली. (श्री. राहुल पांडे आणि सर्व शिवसैनिक यांचे अभिनंदन ! असे शिवसैनिकच जनतेची खरी शक्ती होत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • केवळ क्षमा मागून विषय न संपवता ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करणार्‍यांना ‘आय.डी.एफ्.सी. फर्स्ट’ बँकेतून पदच्युतच करायला हवे !
  • स्वत:ला ‘कॉर्पोरेट’ म्हणवून घेऊन सर्व मानवी मूल्ये पाळण्याचा टेंभा मिरवणार्‍या अशा बँकांच्या विरोधात जनतेने आवाज उठवणे आवश्यक !