…तर ‘नाटो’चे भविष्य अंध:कारमय ! – Donald Trump

युद्धाच्या १७ वा दिवशी हताश झालेले ट्रम्प यांची बळजोरी चालूच !

डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन/तेल अवीव/तेहरान – युद्ध चालू होऊन १७ दिवस झाले आहेत. अशात अमेरिकेने आता ‘नाटो’च्या सदस्य राष्ट्रांना चेतावणी देत युद्धात सहभागी होण्यासाठी बळजोरी चालू केली आहे. हताश झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चेतावणी दिली की, जर ‘नाटो’मधील राष्ट्रांनी ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करण्याच्या कामात अमेरिकेला साहाय्य केले नाही, तर ‘नाटो’चे भविष्य अंध:कारमय असेल. इराणविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेला पाठिंबा देण्यात युरोपीय राष्ट्रे अपयशी ठरल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

चीनलाही ट्रम्प यांची तंबी !

ट्रम्प यांनी चीनलाही तंबी दिली आहे. ते म्हणाले की, जर चीनने हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यास साहाय्य केले नाही, तर ते या महिन्याच्या शेवटी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत होणारी शिखर परिषद पुढे ढकलू शकतात. ट्रम्प ३१ मार्चला चीनला जाणार आहेत.

पोप लिओ यांनी युद्ध थांबवण्याचे केले आवाहन !

ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप लिओ यांनी आवाहन केले की, मध्य पूर्वेतील परिस्थिती भयानक आहे आणि युद्ध त्वरित थांबवले पाहिजे. सर्वांनी हिंसाचार थांबवून संवाद चालू करावा. शाळा, रुग्णालये आणि घरे यांच्यावर झालेल्या आक्रमणांमध्ये ज्यांनी कुटुंबातील सदस्य गमावले आहेत, त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो.

सहस्रावधी इराणी नागरिकांनी गाठले शेजारील अफगाणिस्तान अथवा पाकिस्तान ! – संयुक्त राष्ट्रे

इराणमधील सहस्रावधी लोकांनी देशातून पलायन केले आहे. ते शेजारील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांचे आश्रय घेत आहेत. अनेक इराणी शहरांमध्ये घरे आणि आवश्यक सेवा उद्ध्वस्त झाल्या आहेत, ज्यामुळे लोकांना सुरक्षिततेचा शोध घ्यावा लागत आहे. यांपैकी अनुमाने ३२ सहस्र लोक अफगाणिस्तानमध्ये पोचले आहेत, तर साधारण ४ सहस्र लोकांनी पाकिस्तान गाठले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली.

ट्रम्प यांच्या आवाहनाला जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी दाखवली केराची टोपली !

हॉर्मुझ सामुद्रधुनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि इराणशी दोन हात करण्यासाठी ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना त्यांच्या युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. यावर जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे.

१. ऑस्ट्रेलिया : अमेरिकेच्या दबावाला झुगारून ऑस्ट्रेलियाच्या नौदलाने ‘नौकांची पाठवणी करण्याची कोणतीही योजना नाही’ असे स्पष्ट केले आहे. कॅबिनेट मंत्री कॅथरीन किंग यांनी सांगितले की, हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असला, तरी ऑस्ट्रेलियाला कोणतीही औपचारिक विनंती मिळालेली नाही. सध्या तेथे सैन्य तैनात करण्याची कोणतीही योजना नाही.
२. जपान : जपानने सांगितले की, समुद्री सुरक्षेसाठी कोणतीही सैनिकी कारवाई करण्यास आम्ही मान्यता दिलेली नाही. जपानी संसदेला संबोधित करतांना पंतप्रधान सनाए ताकाइची म्हणाल्या की, युद्धनौका पाठवण्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि कायदेशीर चौकटीत राहून जपान स्वतंत्रपणे कार्य करू शकतो.
३. दक्षिण कोरिया : दक्षिण कोरियाने सावध भूमिका घेत म्हटले की, अमेरिकेशी चर्चा चालू असून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचे सखोल परीक्षण केले जाईल.
४. ब्रिटन : पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी जागतिक सागरी वाहतुकीतील अडथळे अल्प करण्यासाठी सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याविषयी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे.

नेतन्याहू यांनी जिवंत असल्याचा व्हिडिओ केला प्रसारित !

नेतन्याहू

नेतान्याहू हे इराणच्या आक्रमणात मारले गेल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. इराणी आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी त्या पसरवल्या होत्या. अशातच भारताचे आदित्य राज कौल नावाचे पत्रकार यांनी नेतान्याहू यांच्या ठिकाणाची माहिती सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचा खोटा दावाही करण्यात आला होता. त्यामुळे नेतान्याहू मारले गेल्याचे सांगण्यात येत होते.

या सर्व अफवांना पूर्णविराम लावत नेतान्याहू यांनी स्वत:चा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. नेतान्याहू यांनी तेल अविवमधील एका कॉफी दुकानात ते हसत-खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला. यातून त्यांनी सर्व अफवांची थेट खिल्ली उडवली. ‘इस्रायली जनतेचा पाठिंबा मला, सरकारला, इस्रायली संरक्षण दलाला, ‘मोसाद’ला आणि आमच्या विविध संस्थांना बळ देतो. आम्ही सध्या अशा काही गोष्टी करत आहोत, ज्यांची माहिती मी आता उघड करू शकत नाही; परंतु आम्ही निश्चितपणे कारवाई करत आहोत. आम्ही इराण आणि लेबनॉन यांवर अत्यंत जोरदार आक्रमण करत आहोत !’

भारत-इराण यांच्यात सहकार्याचा दीर्घकालीन इतिहास ! – डॉ. जयशंकर

डॉ. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारत इराणसमवेत थेट आणि निर्णायक संवाद साधत आहे. त्याद्वारे भारतीय ध्वज असलेल्या नौकांचे सुरक्षित मार्गक्रमण सुनिश्चित होत आहे. प्रत्येक भारतीय नौकेला स्वतंत्रपणे (वैयक्तिक पातळीवर) अनुमती दिली जात आहे; या उद्देशाने भारत आणि इराण यांच्यात कोणताही नवीन औपचारिक करार करण्यात आलेला नाही.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, भारतीय नौकांच्या सुरक्षित मार्गक्रमणाच्या बदल्यात भारताने इराणला कोणत्याही प्रकारची सवलत किंवा लाभ देऊ केलेला नाही. भारत आणि इराण यांच्यात सहकार्याचा दीर्घकालीन इतिहास आहे अन् याच आधारावर भारताने हा पुढाकार घेतला आहे. ही काही ‘घेणे-देणे’ स्वरूपाची व्यवस्था नाही, असेही जयशंकर यांनी ठामपणे सांगितले.

सैन्य कारवाईपेक्षा मुत्सद्देगिरी अधिक प्रभावी साधन ! – डॉ. जयशंकर

नवी देहली – हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील संकट सोडवण्यासाठी डॉ. एस्. जयशंकर यांनी अत्यंत सूचक शब्दांत अमेरिकेला एक उपाय सुचवला आहे. डॉ. जयशंकर यांनी ठामपणे सांगितले की, हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करून घेण्यासाठी युद्धनौका नव्हे, तर मुत्सद्देगिरी हेच सर्वांत महत्त्वाचे आणि प्रभावी साधन आहे.

डॉ. जयशंकर यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  भारताच्या दृष्टीकोनातून पहाता परस्पर समन्वय साधून एखाद्या तोडग्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर ठरेल; मात्र सध्या तसे घडतांना दिसत नाही. माझा असा विश्वास आहे की, या प्रक्रियेत इतर संबंधित घटकांनाही सामावून घेतले, तर ते जगाच्याच व्यापक हिताचे ठरेल.

युद्धात इराण टिकून असण्यामागे हे आहे कारण !

हॉर्मुझमधील जलसुरुंगांमुळे (‘नेव्हल माईन्स’मुळे) अमेरिका धास्तावली आहे. ‘इराणचा विनाश करणे हे अत्यंत अनिवार्य आहे’, असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. ते म्हणाले की, इराणकडे कोणती पारंपरिक नौसेना नाही, ना विमानविरोधी क्षमता आहे, ना सक्षम वायुसेना, तरीही तो लढत आहे. तो असे करू शकत आहे कारण इराणने जलमार्गांमध्ये ठिकठिकाणी जलसुरुंग पेरून ठेवले आहेत.

गेल्या आठवड्यात तेलाच्या किमतींनी १०० डॉलर्स (९ सहस्र २३३ रुपये) प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. वर्ष २०२२ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच पुन्हा खुली झाली नाही, तर या किमती गगनाला भिडून १५० डॉलर्स (१३ सहस्र ८५० रुपये) प्रति बॅरलपर्यंत पोचू शकतात. यामुळे अमेरिकेसह जगभरात मोठ्या प्रमाणावर अराजकता निर्माण होऊ शकते.