गूढ विद्या आणि अष्टसिद्धी : एक अध्यात्मशास्त्रीय विवेचन !

सनातन भारत : समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्यासंबंधी प्रासंगिक सूत्रांवर भाष्य करणारे सदर

फेब्रुवारी २०२६ मध्ये जागतिक वैज्ञानिक वर्तुळात ‘क्वांटम एंटँगलमेंट’ (Quantum Entanglement) या विषयावर चीनच्या शास्त्रज्ञांकडून एक क्रांतीकारक प्रयोग झाला. त्यातून त्यांनी सिद्ध केले की, दोन अणू कण एकमेकांपासून सहस्रो मैल दूर असूनही एकाच क्षणी एकमेकांशी संवाद साधू शकतात. या बातमीने आधुनिक जग थक्क झाले; पण भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक मात्र स्मितहास्य करत होते; कारण सहस्रो वर्षांपूर्वी महर्षि पतंजलींनी ‘योगसूत्रां’मध्ये हेच तत्त्व ‘प्राप्ती’ आणि ‘दूरश्रवण’ या सिद्धींच्या माध्यमातून मांडले होते. आज जेव्हा आपण ‘मेटाव्हर्स’ (आभासी ब्रह्मांड), ‘टेलिपोर्टेशन’ (अदृश्य वहन) किंवा ‘माईंड रिडिंग’ (दुसर्‍याच्या मनातील विचारांचे वाचन) यांच्या गोष्टी करतो, तेव्हा नकळत आपण त्याच गूढ विद्येच्या उंबरठ्यावर उभे असतो, जिला आपल्या पूर्वजांनी ‘अष्टसिद्धी’ म्हटले होते. ही केवळ चमत्कारांची कथा नाही, तर मानवी चेतनेच्या अफाट क्षमतेचे एक प्रगत अध्यात्मशास्त्रीय समीकरण आहे.

या मालिकेतील पहिला लेख वाचण्यासाठी क्लिक करा → ज्योतिषपीठ शंकराचार्य वाद : न्यायालयीन प्रक्रिया नको, धर्मनिर्णय हवा !

१. गूढ विद्या : लपलेल्या सत्याचा शोध

१ अ. गूढ विद्या हा संशयास्पद प्रकार नाही ! : सध्या अमेरिकेत ‘एपस्टीन फाइल्स’ उघडकीस येत असतांना प्रसारमाध्यमे एपस्टीनला ‘गूढ विद्यावादी (Occult)’ संबोधत आहेत. मुळात गूढ किंवा गुप्त विद्या काय असतात, याविषयी जगभर चर्चा चालू आहे. किंबहुना या शब्दाकडे संशयास्पद भूमिकेतून पहाण्याची मनोवृत्ती बळावत आहे.

‘गूढ’ (Occult) या शब्दाचा अर्थ आहे, ‘लपलेले’. थोडक्यात ‘गूढ’, म्हणजे जे चर्मचक्षूंना दिसत नाही; पण ज्याचे अस्तित्व अनुभूतीला येते.

सृष्टीचे दोन स्तर आहेत – एक स्थूल (Physical) आणि दुसरा सूक्ष्म (Subtle). आपण विज्ञानाच्या साहाय्याने स्थूल जगाचे नियम समजून घेतले आहेत, उदा. गुरुत्वाकर्षण किंवा प्रकाश. गूढ विद्या ही मात्र सूक्ष्म जग आणि ऊर्जा यांच्या नियमांशी संबंधित आहे. सृष्टीमधील स्थूल नियम (Physical Laws) जे विज्ञानाला ज्ञात असतात; मात्र सूक्ष्म नियम (Metaphysical Laws) हे केवळ आध्यात्मिक साधनेने जाणता येतात.

१ आ. गूढ विद्यांमागील अध्यात्मशास्त्र : गूढ विद्या, म्हणजे अशा शक्तींचा अभ्यास, ज्याद्वारे मनुष्य त्याच्या पंचेंद्रियांच्या मर्यादा ओलांडून विश्वाच्या सूक्ष्म लहरींशी संपर्क साधू शकतो. यात मंत्रशक्ती, यंत्रशक्ती आणि तंत्र यांचा समावेश होतो. तंत्रशास्त्रानुसार हे संपूर्ण विश्व ‘शिव’ आणि ‘शक्ती’ (पदार्थ अन् ऊर्जा) यांचे मिलन आहे. जो साधक स्वतःच्या शरिरातील कुंडलिनी शक्ती जागृत करतो, त्याला या विश्वातील गुप्त रहस्यांचे ज्ञान प्राप्त होते.

भारतीय परंपरेत गूढ विद्येला ‘गुप्त विद्या’ही म्हटले जाते. याचे कारण असे की, अपात्र व्यक्तीच्या हाती ही विद्या लागल्यास तिचा स्वार्थासाठी दुरुपयोग होऊ शकतो. मंत्रांमधील ध्वनीलहरी (Vibrations), यंत्रांमधील भूमितीय ऊर्जा आणि तंत्रातील प्राणशक्ती यांचा वापर करून निसर्गाच्या सामान्य नियमांना वळसा घालणे, हा गूढ विद्येचा गाभा आहे. जेव्हा एखादा साधक स्वतःचे शरीर आणि मन एका विशिष्ट ऊर्जेच्या पातळीवर नेतो, तेव्हा त्याला विश्वात्मक ऊर्जेशी (‘कॉस्मिक एनर्जी’शी) थेट संवाद साधता येतो.

🪷 ‘अध्यात्मात सिद्धींचा वापर केवळ ‘लोककल्याणासाठी’ करणे अभिप्रेत आहे, स्वार्थासाठी नव्हे.’

🪷 ‘अध्यात्म हे प्रगत विज्ञान आहे, हे तथाकथित विवेकवाद्यांना कोण सांगणार ?’

– श्री. चेतन राजहंस

२. अष्टसिद्धींचे योगशास्त्र

योगशास्त्रानुसार मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. जेव्हा एखादा योगी ध्यान आणि ‘संयम’ यांद्वारे या ५ तत्त्वांवर पूर्ण विजय मिळवतो, तेव्हा त्याला ८ प्रकारच्या अलौकिक शक्ती प्राप्त होतात, ज्यांना ‘अष्टसिद्धी’ म्हणतात.

२ अ. अष्टसिद्धींचे प्रकार

श्री. चेतन राजहंस

१. अणिमा (सूक्ष्मत्वाचा अनुभव) : अणिमा सिद्धी प्राप्त झालेला योगी स्वतःचे शरीर अणुइतके लहान करू शकतो. अध्यात्मशास्त्रीय भाषेत ही ‘अहंकाराच्या संपूर्ण विसर्जनाची’ अवस्था आहे. जेव्हा माणूस स्वतःला ‘शून्य’ मानतो, तेव्हा तो विश्वाच्या लहानात लहान कणात प्रवेश करू शकतो. हनुमानजींनी लंका प्रवेशाच्या वेळी याच सिद्धीचा वापर करून सूक्ष्म रूप धारण केले होते.

२. महिमा (विराट स्वरूप) : स्वतःचे शरीर अफाट मोठे करण्याची क्षमता म्हणजे महिमा. हे केवळ शारीरिक विस्तार नसून ‘चेतनेचा विस्तार’ आहे. जेव्हा योगी स्वतःला संकुचित शरिराच्या पलीकडे नेऊन संपूर्ण विश्वाशी एकरूप मानतो, तेव्हा तो विराट होतो. ‘श्रीमद्भगवद्गीते’त भगवान श्रीकृष्णाने दाखवलेले ‘विश्वरूप दर्शन’ हे महिमा सिद्धीचे सर्वोच्च आध्यात्मिक उदाहरण आहे.

३. लघिमा (गुरुत्वाकर्षणापलीकडे जाणे) : लघिमा म्हणजे शरिराचे वजन कापसापेक्षाही हलके करणे. जेव्हा साधक आपल्या शरिरातील ‘उदान वायू’वर नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होतो. ‘हवेत तरंगणे (Levitation) किंवा पाण्यावरून चालणे या क्रिया लघिमा सिद्धीमुळे शक्य होतात’, असे योगशास्त्र सांगते.

४. गरिमा (अभेद्य स्थिरता) : महिमाच्या उलट म्हणजे गरिमा. यात शरीर इतके जड केले जाते की, जगातील कोणतीही शक्ती त्या साधकाला हलवू शकत नाही. हे मन आणि शरीर यांच्या अढळ एकाग्रतेचे अन् पृथ्वी तत्त्वावरील पकडीचे प्रतीक आहे.

५. प्राप्ती (अंतराची मर्यादा संपवणे) : प्राप्ती म्हणजे केवळ भौतिक वस्तू मिळवणे नव्हे, तर ‘स्पेस-टाइम’ (स्थळ आणि काळ) यांवर मात करणे. या सिद्धीद्वारे साधक एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकतो किंवा दूरवर असलेल्या वस्तू स्वतःच्या संकल्पशक्तीने जवळ आणू शकतो.

६. प्राकाम्य (इच्छाशक्तीचे सामर्थ्य) : प्राकाम्य म्हणजे साधकाच्या शुद्ध इच्छाशक्तीचे वास्तवात रूपांतर होणे. जर अशा साधकाने मनात आणले की, निसर्गाचा एखादा नियम पालटावा, तर त्याच्या प्रबळ संकल्पापुढे सृष्टीला झुकावे लागते. ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनाचे पूर्णतः शुद्धीकरण होणे आवश्यक असते.

७. ईशित्व (सृष्टीचे अधिपत्य) : ईशित्व म्हणजे निसर्गाच्या शक्तींवर नियंत्रण मिळवणे. पाऊस पाडणे, नैसर्गिक आपत्तींना थोपवणे. पदार्थाचे स्वरूप पालटण्याची क्षमता ईशित्व सिद्धीतून येते. ही अवस्था साधकाला ईश्वरी गुणांच्या जवळ नेते.

८. वशित्व (विश्वावर नियंत्रण) : वशित्व म्हणजे संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या प्रभावाखाली आणणे. या सिद्धीचा साधक हिंसक प्राण्यांनाही प्रेमपूर्ण शांत करू शकतो. हे केवळ संमोहन नसून आत्मबलाचा असा दिव्य प्रभाव असतो की, समोरची व्यक्ती किंवा वस्तू स्वयंचलितपणे साधकाच्या आज्ञेत आणि लहरीत रहाते.

२ आ. अष्टसिद्धींमागील अध्यात्मशास्त्र : अध्यात्मशास्त्र सांगते की, स्वतःचे शरीर हे विश्वाचे एक लहान रूप (Microcosm) आहे. आपल्या शरिरात ७ चक्रे असतात. जेव्हा साधक प्राणायाम आणि ध्यान यांद्वारे प्राणशक्तीला मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत नेतो, तेव्हा त्याच्या शरिरातील सुप्त केंद्रे (Latent Centers) जागृत होतात.

या जागृतीमुळे मेंदूच्या अशा भागांना ऊर्जा मिळते, जी सामान्यतः सुप्त असते. यातूनच दूरदृष्टी (Clairaudience) यांसारख्या शक्ती विकसित होतात. सिद्धी प्राप्त होणे, म्हणजे जादू नसून मानवी चेतनेचा (Consciousness) निसर्गाच्या सूक्ष्म नियमांशी झालेला संवाद आहे.

थोडक्यात अध्यात्मशास्त्र या सिद्धींकडे निव्वळ चमत्कार म्हणून पहात नाही. त्यामागे एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. तो साधनेमुळे झालेल्या ७ चक्रांच्या जागृतीचा परिणाम असतो. याची उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. खालची चक्रे (मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर) : या चक्रांच्या शुद्धीमुळे शारीरिक शक्ती आणि पंचेंद्रिये यांवर ताबा मिळतो.

२. हृदय चक्र (अनाहत) : इथून साधकामध्ये विश्वाप्रती प्रेम आणि नैसर्गिक ऊर्जेशी तादात्म्य पावण्याची क्षमता येते.

३. उच्च चक्रे (विशुद्धी आणि आज्ञाचक्र) : जेव्हा ऊर्जा आज्ञाचक्रापर्यंत (भ्रूमध्य) पोचते, तेव्हा साधकाला ‘त्रिकालदर्शी’ होण्याचे सामर्थ्य मिळते. दूरदृष्टी आणि विचार संक्रमणाची (Telepathy) शक्ती इथूनच उगम पावते.

२ इ. अष्टसिद्धींची प्राप्ती म्हणजे साधकासाठी सुवर्णपाश ! : अध्यात्मशास्त्रानुसार सिद्धी प्राप्त होणे, हे साधनेचे अंतिम ध्येय नाही. भगवान श्रीकृष्ण आणि महर्षि पतंजलि यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ‘सिद्धी हे साधकाच्या मार्गातील सर्वांत मोठे ‘सुवर्ण पाश’ (Golden Shackles) आहेत.’ याची कारणे पुढे दिली आहेत.

१. अहंकाराचा धोका : सिद्धी प्राप्त झाल्यावर साधकाला ‘आपण देवासारखे आहोत’, असा भास होऊ शकतो. हा अहंकार त्याला मुक्तीपासून दूर नेतो.

२. शक्तीचा दुरुपयोग : जर साधकाने स्वार्थ किंवा चमत्कार यांसाठी या शक्तींचा वापर केला, तर त्याची अधोगती निश्चित असते.

३. अंतिम ध्येय ‘मोक्ष’ : योगशास्त्राचा मूळ उद्देश वा ध्येय ‘कैवल्य’ किंवा ‘मोक्ष’ आहे. सिद्धी या प्रवासातील केवळ विश्रामस्थाने आहेत.

इतक्या मोठ्या शक्ती प्राप्त झाल्यावर कोणताही सामान्य माणूस भरकटू शकतो. म्हणूनच भारतीय ऋषिमुनींनी या सिद्धींविषयी अत्यंत कडक चेतावणी दिल्या आहेत. महर्षि पतंजलि योगसूत्रात म्हणतात, ‘ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः’ (प्रकरण ३, श्लोक ३७). याचा अर्थ असा, ‘या शक्ती साधनेच्या मार्गातील ‘उपसर्ग’ किंवा अडथळे आहेत.’ जर साधक या शक्तींच्या प्रदर्शनात, लोकांनी केलेल्या आपल्या कौतुकात किंवा स्वतःच्या अहंकारात अडकला, तर त्याचा ‘मोक्ष’ किंवा ‘आत्मसाक्षात्कारा’चा प्रवास तिथेच संपतो. सिद्धी प्राप्त होणे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळण्यासारखे आहे. ती त्याला पुढील अभ्यासासाठी साहाय्य म्हणून दिली जाते; पण जर तो त्या पैशांच्या उन्मादात वहावत गेला, तर तो कधीही पदवीधर (सिद्ध पुरुष) होऊ शकणार नाही. अध्यात्मात सिद्धींचा वापर केवळ ‘लोककल्याणासाठी’ करणे अभिप्रेत आहे, स्वार्थासाठी नव्हे.

३. अध्यात्म हे प्रगत विज्ञान आहे !

गूढ विद्या आणि अष्टसिद्धी या गोष्टी मानवी क्षमतेच्या अफाट व्याप्तीची जाणीव करून देतात. गूढ विद्या आपल्याला आठवण करून देते की, आपण केवळ हाडामासाचे शरीर नसून अनंत ऊर्जेचा अंश आहोत. एकाग्रता, संयम आणि निःस्वार्थ भावनेने आपण आपल्या मर्यादा ओलांडू शकतो. अष्टसिद्धी तर मानवी उत्क्रांतीचे शिखर आहेत. विज्ञानाने आपल्याला बाह्य जगावर ताबा मिळवून दिला आहे, तर गूढ विद्येचे हे अध्यात्मशास्त्र आपल्याला अंतर्विश्वावर विजय मिळवण्याची वाट दाखवते. हे सर्व लिहिण्याचे कारण, म्हणजे गूढ विद्यांकडे अंधश्रद्धा म्हणून पहाणारे स्वतःला ‘विज्ञानवादी’ समजतात; पण त्यांची विज्ञानाच्या प्रगत अवस्थांकडे डोळसपणे पहाण्याची दृष्टी नसते. त्यामुळे विज्ञानाच्या संदर्भात तेच खरे ‘अंधश्रद्ध’ ठरतात ! अध्यात्म हे प्रगत विज्ञान आहे, हे तथाकथित विवेकवाद्यांना कोण सांगणार ?

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.