U.S. – Iran War : इराणच्या राष्ट्राध्यक्षांकडून युद्ध थांबवण्यासाठी ३ अटी !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान

नवी देहली – अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या आक्रमणामुळे गेले १३ दिवस चालू असलेले युद्ध थांबवण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ३ अटी ठेवल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले की, हे युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या अटी मान्य करणे, हा एकमेव मार्ग आहे. यांत ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणच्या सार्वभौम  अधिकारांचा स्वीकार करणे, युद्धात झालेल्या हानीसाठी योग्य ती आर्थिक किंवा राजनैतिक भरपाई देणे आणि भविष्यात इराणवर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होणार नाही, अशी आंतरराष्ट्रीय समुदायाने ठोस सुरक्षा हमी देणे’, या सूत्रांचा समावेश आहे.

राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारच्या अटी ठेवल्या असल्या, तरी इराणी सैन्याला हे मान्य आहे का ? हे समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी पेझेश्कियान यांनी शेजारील देशांवर आक्रमण करणार नसल्याची घोषणा केली होती; मात्र सैन्याने ही घोषणा फेटाळत आक्रमण चालूच ठेवल्यावर पेझेश्कियान यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकेने युद्ध केव्हाच जिंकले आहे; पण लक्ष्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत अमेरिकी सैन्य तैनात असेल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय नौकांसाठी हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडल्याचे वृत्त चुकीचे ! – इराण

हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय नौकांना प्रवास करण्याची अनुमती दिल्याचे वृत्त इराणने फेटाळले आहे. ‘भारताचा झेंडा असणार्‍या तेल टँकरना हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून प्रवासाची मुभा देण्यात आली नाही’, असे वृत्त इराणी सूत्रांच्या माध्यमातून ‘रॉयटर्स’ने प्रसिद्ध केले आहे. ‘भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि इराणी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी साधलेल्या संवादानंतर इराणने भारताच्या नौकांना हॉर्मुझ समुद्रधुनीमधून प्रवासाची मुभा दिली’, असे सांगितले जात होते. कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस यांच्या वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा सागरी मार्ग भारतासाठी उघडण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत होता; परंतु आता इराणने हा दावा फेटाळून लावला आहे. आतापर्यंत केवळ चीनच्या तेल टँकरला येथून जाण्याची अनुमती देण्यात आली आहे.इराणने सर्व देशांसमोर अट ठेवली आहे. ‘इस्रायली राजदूताला जर एखादा देश बाहेर काढत असेल, तर त्याला हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून प्रवासाची अनुमती देण्यात येईल’, असे इराणने म्हटले आहे. इराणच्या ताज्या विधानावर भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही. याआधी भारतीय सूत्रांनी दावा केला होता की, भारतीय टँकर ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे हॉर्मुझमधून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत.

नौकांना हॉर्मझमधून जाण्यासाठी आमची अनुमती घ्यावी लागेल ! – इराण

दुसरीकडे इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने चेतावणी दिला की, हॉमुर्झ सामुद्रधुनीतून जाणार्‍या सर्व नौकांना आता इराणची अनुमती घ्यावी लागेल. अनुमती न घेतल्यानेच थायलंडच्या नौकेवर आक्रमण करण्यात आले. युद्धामुळे हॉर्मुझ बंद करण्यात आल्याने सहस्रो नौका अडकून पडल्या आहेत. यात भारतीय ध्वज असणार्‍या ३७ नौकांचा समावेश आहे. यांत १ सहस्र १०९ खलाशी आहेत.

सौदी अरेबियाहून तेल टँकर मुंबईत पोचला !

सौदी अरेबियाहून कच्चे तेल घेऊन येणारा लायबेरियाचा झेंडा लावलेला तेल टँकर हॉर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करून मुंबईत पोचला आहे. या नौकेचा कॅप्टन भारतीय होता. युद्धामुळे हॉर्मुझमधील वाहतूक ठप्प झाली आहे. त्या वेळी भारतात पोचणारी ही पहिली नौका ठरली आहे.

भारताकडे येणार्‍या थायलंडच्या नौकेवर हॉमुझजमध्ये झाले आक्रमण !

भारताच्या गुजरातमधील कांडला बंदराकडे जाणार्‍या थायलंडची व्यापारी नौका ‘मयूरी नारी’ हिच्यावर हॉर्मुझमध्ये आक्रमण करण्यात आले. यामुळे तिच्या इंजिन रूममध्ये आग लागली. या नौकेत २३ कर्मचारी होते. आक्रमणानंतर ओमानच्या नौदलाने २० कर्मचार्‍यांना वाचवून खसाब शहरात पोचवले, तर ३ खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत.

इराणचा अमेरिकी तेलवाहू टँकर ‘सेफसी विष्णू’वरील आक्रमणात एका भारतियाचा मृत्यू

इराणने इराकजवळ अमेरिकेच्या मालकीच्या ‘सेफसी विष्णु’ या तेलवाहू नौकेवर लहान नौकेद्वारे केलेल्या आत्मघाती आक्रमणात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या युद्धात ३ भारतियांचा मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

ओमानच्या तेल साठ्यावर इराणचे ड्रोनद्वारे आक्रमण

इराणकडून ओमानच्या सालालाह बंदरावरील तेल साठवण्याच्या टाक्यांना लक्ष्य करत ड्रोनद्वारे आक्रमणे करण्यात आले. या आक्रमणानंतर ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल्-सैद यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संपर्क साधला आणि ओमानच्या भूभागावर होत असलेल्या या आक्रमणांवर अप्रसन्नता व्यक्त करत निषेधही केला. या वेळी ओमानच्या सुलतानांनी या युद्धात त्यांच्या तटस्थ भूमिकेचा पुनरुच्चार केला, तसेच ‘सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी ओमान सर्व आवश्यक उपाययोजना करेल’, असेही स्पष्ट केले.

कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोचू शकतात ! – इराण

इराणने चेतावणी दिली आहे की, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रती बॅरलपर्यंत (१८ सहस्र ४०० रुपयांपर्यंत) पोचू शकतात.

इराण आत्मघातकी ड्रोनद्वारे अमेरिकेच्या किनार्‍यांवर आक्रमणे करण्याच्या सिद्धतेत !

इराण अमेरिकेच्या समुद्रकिनार्‍यांवर एका अज्ञात नौकेद्वारे घातकी ड्रोन पोचवण्याच्या प्रयत्नात आहे. या ड्रोनद्वारे इराण अमेरिकेवर आक्रमण करणार आहे. याच ड्रोनना थोपवण्यात यापूर्वी अमेरिका अपयशी ठरली आहे. आखाती देशांतील अमेरिकेच्या सैन्यतळांवर, तसेच दूतावासांवर या आत्मघातकी ड्रोनद्वारेच आक्रमणे करण्यात आली आहेत. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आणि संरक्षण संस्था असल्याने हे राज्य इराणचे लक्ष्य असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे कॅलिफोर्नियासह संपूर्ण अमेरिकेत सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. विमानतळ, बंदरे आणि सरकारी इमारती यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

तेल घेण्यासाठी भारताला कुणाची अनुमती लागणार नाही : रशियाच्या राजदूतांनी अमेरिकेला सुनावले

रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव

रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव यांनी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारताला रशियाकडून तेलखरेदी करण्याची संमती दिल्याच्या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, भारताला कुणाकडूनही यासाठी अनुमती घेण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दावा केला होता की, अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सवलत दिली आहे.