चेतनेच्या विविध टप्प्यांनुसार जिवात निर्माण होणार्‍या प्रेरणा आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे विवेचन !

‘भारतीय तत्त्वज्ञानानुसार जिवाच्या सूक्ष्मदेहात अन्नमयादी ५ कोष असतात. या ५ कोषांमध्ये चेतना कार्यरत असते. प्रत्येक कोषातील चेतनेनुसार व्यक्तीच्या मनात निराळ्या प्रेरणा कार्यरत असतात. चेतनेच्या विविध टप्प्यांनुसार जिवात निर्माण होणार्‍या प्रेरणा आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे विवेचन या लेखात केले आहे. १०.३.२०२६ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1016704.html

२. चेतनेचे विविध टप्पे आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग

२ इ. मनोमय स्तरावरील चेतनेशी संबंधित ग्रहयोग : ‘चंद्र’ आणि ‘शुक्र’ हे मनोमय स्तरावरील चेतनेचे मुख्य कारक आहेत. त्यांचे अन्य ग्रहांशी होणारे योग हे व्यक्तीला इतर लोक, समाज आदींचा विचार करण्याची आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याची प्रेरणा देतात.

२ इ १. चंद्र, शुक्र आणि रवि यांच्यातील योग : चंद्र, शुक्र आणि रवि यांच्यातील योग स्वभावात संवेदनशीलता, जिव्हाळा, सुसंवाद, परिस्थितीशी जुळवून घेणे आदी वैशिष्ट्ये दर्शवतात. हे योग व्यक्तीला इतरांकडून प्रेम, स्नेह आणि सहानुभूती मिळवण्याची इच्छा दर्शवतात. अशा व्यक्तीच्या जीवनात इतरांसोबत असलेल्या भावनिक संबंधांना पुष्कळ महत्त्व असते. तिची दृष्टी सौंदर्य शोधणारी असते, तसेच ती कलांच्या माध्यमातून तिच्यातील सर्जनशीलता (नवनिर्मिती) व्यक्त करते.

२ इ २. चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्यातील योग : चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्यातील योग स्वभावात करुणा, प्रेमभाव, इतरांचा विचार, सकारात्मकता, इतरांना सामावून घेणे, व्यापकता आदी वैशिष्ट्ये दर्शवतात. हे ग्रहयोग असणार्‍या व्यक्तीचे समाजातील पुष्कळ लोकांशी जवळचे संबंध असतात. ते संबंध लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना साहाय्य करते. सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी तिचे प्रयत्न असतात. तिचा प्रवास व्यापकतेकडे होत असतो.

वरील ग्रहयोग कुंडलीतील १, ४, ६, ७, ११ आणि १२ या स्थानांत अन् वृषभ, कर्क, कन्या, तूळ, कुंभ आणि मीन या राशींत असल्यास बलवान असतात.

श्री. राज कर्वे

२ ई. विज्ञानमय स्तरावरील चेतनेशी संबंधित ग्रहयोग : रवि, बुध, गुरु आणि हर्षल हे विज्ञानमय स्तरावरील चेतनेचे कारक ग्रह आहेत. त्यांचे अन्य ग्रहांशी होणारे योग हे व्यक्तीला बुद्धीच्या आधारे भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक विज्ञान जाणण्यासाठी प्रेरित करतात.

२ ई १. रवि, बुध आणि गुरु यांच्यातील योग : रवि, बुध आणि गुरु यांच्यात असणारे योग व्यक्तीतील जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती, ज्ञानप्राप्तीची तळमळ, शिकण्याची वृत्ती आदी दर्शवतात. व्यक्तीला एखादा विषय बारकाव्यांनिशी समजून घेण्याची इच्छा असते. तिच्यात विद्वत्ता असते. तिच्या जीवनात नैतिकता, धर्म, ज्ञान आदींना अधिक महत्त्व असते.

२ ई २. बुध, गुरु आणि हर्षल यांच्यातील योग : बुध, गुरु आणि हर्षल यांच्यात असणारे योग व्यक्तीत संशोधकबुद्धी, तर्कबुद्धी, प्रयोगशीलता आदी दर्शवतात. व्यक्तीला एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन सत्य जाणण्याची इच्छा असते. तिच्या जीवनात संशोधनाला पुष्कळ महत्त्व असते.

२ ई ३. रवि, गुरु आणि हर्षल यांच्यातील योग : रवि, गुरु आणि हर्षल यांच्यात असणारे योग व्यक्तीच्या विचारांमध्ये नाविन्यता, मौलिकता, प्रगतीशीलता आणि प्रगल्भता दर्शवतात. व्यक्तीमध्ये काळानुसार नवीन, समावेशक आणि लोकांसाठी हितकारक विचार करण्याची क्षमता असते, तसेच त्यासाठी अनुकूल व्यवस्था निर्माण करण्याकडे तिला कल असतो.

वरील ग्रहयोग कुंडलीतील १, ३, ५, ७, ९ आणि ११ या स्थानांत अन् मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशींत असल्यास बलवान असतात.

२ उ. आनंदमय स्तरावरील चेतनेशी संबंधित ग्रहयोग : ‘गुरु’ आणि ‘शनि’ हे आनंदमय स्तरावरील चेतनेशी संबंधित ग्रह आहेत. त्यांचे अन्य ग्रहांशी होणारे योग हे व्यक्तीला संकुचित अहंभावाची पायरी ओलांडून व्यापक ईश्वरी तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रेरित करतात.

२ उ १. बुध, गुरु आणि शनि यांच्यातील योग : बुध, गुरु आणि शनि यांच्यातील योग व्यक्तीमध्ये सामंजस्य, प्रौढता, विवेकबुद्धी, नि:स्वार्थता आणि अंतर्मुखता दर्शवतात. अशी व्यक्ती आत्मचिंतन, तत्त्वज्ञानाचा अभ्यास आदींद्वारे स्वतःच्या सत्य स्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी प्रयत्नशील असते. ती इतरांनाही ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी लेखन, संवाद, मार्गदर्शन आदी माध्यमांतून साहाय्य करते.

२ उ २. शुक्र, गुरु आणि शनि यांच्यातील योग : शुक्र, गुरु आणि शनि यांच्यातील योग व्यक्तीमध्ये इतरांविषयी निरपेक्ष प्रेम, त्यागी वृत्ती, व्यापकता, तत्त्वनिष्ठता आदी दर्शवतात. अशी व्यक्ती स्वतःच्या सुखाचा विचार न करता समाजाच्या कल्याणासाठी कार्य करते. तिच्या वर्तनात नि:स्वार्थता असते. तिच्यात प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता यांचा संगम असतो.

२ उ ३. रवि, गुरु आणि शनि यांच्यातील योग : रवि, गुरु आणि शनि यांच्यातील योग व्यक्तीमध्ये वैचारिक प्रगल्भता, मौलिकता, सत्यनिष्ठा आणि शाश्वत मूल्यांची जाणीव दर्शवतात. अशी व्यक्ती समाजाची मार्गदर्शक असते. ती समाजाला नैतिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते. ‘समाजाची चेतना उन्नत करणे’, हे तिचे लक्ष्य असते.

वरील ग्रहयोग कुंडलीतील १, ३, ५, ६, ९, १० आणि १२ या स्थानांत अन् मेष, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन या राशींत असल्यास बलवान असतात.

३. कुंडलीतील ग्रहयोगांच्या आधारे व्यक्तीच्या चेतनेचे स्वरूप ओळखता येणे

ग्रहयोगांच्या वरील विवेचनावरून ‘विशिष्ट ग्रहयोग त्यांच्या कारकत्वानुसार विशिष्ट कोषांशी संबंधित प्रेरणा दर्शवतात’, हे लक्षात येते. जिवाचे पूर्वजन्मांतील संस्कार, अनुभव, कर्म, साधना इत्यादींनुसार त्याच्यात जन्मतः असणार्‍या चेतनेचे विशिष्ट स्वरूप असते. त्याच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोगांच्या आधारे या चेतनेचे स्वरूप कळू शकते, उदा. ‘पाच कोषांपैकी कोणत्या कोषांमधील चेतना अधिक प्रमाणात कार्यरत आहे’, हे लक्षात येऊ शकते. त्याआधारे व्यक्तीच्या जीवनाची दिशा किंवा तिचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो, उदा. व्यक्तीच्या कुंडलीत अन्नमय आणि प्राणमय स्तरांवरील ग्रहयोग प्रधान असल्यास ती अधिकतर स्वतःपुरती विचार करणारी असू शकते. मनोमय आणि विज्ञानमय स्तरांवरील ग्रहयोग प्रधान असल्यास ती इतरांचा विचार करणारी, तसेच समाजासाठी योगदान देणारी असू शकते. आनंदमय स्तरावरील ग्रहयोग प्रधान असल्यास ती व्यक्ती जीवनातील सत्य शोधण्यासाठी प्रेरित असू शकते.

उदाहरणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. चंद्राचा अन्य ग्रहांशी योग : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीत चंद्राचा शुक्र, बुध, शनि, हर्षल आणि नेपच्यून या ग्रहांशी शुभयोग आहे. हे योग सहजता, इतरांशी जवळीक साधणे, प्रेमभाव, इतरांना सामावून घेणे, तत्त्वनिष्ठता, सूक्ष्मातील कळण्याची क्षमता अशी विविध वैशिष्ट्ये दर्शवतात. हे योग अधिकतर मनोमय कोषाशी संबंधित आहेत.

१ आ. बुध, शनि आणि हर्षल यांची युती : त्यांच्या कुंडलीत बुध, शनि आणि हर्षल यांची युती आहे. हा विशेष योग असून तो संशोधकबुद्धी, नाविन्यता, प्रयोगशीलता आणि प्रगतीशील विचार ही वैशिष्ट्ये दर्शवतो. हे योग विज्ञानमय कोषाशी संबंधित आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीत मनोमय आणि विज्ञानमय स्तरांवरील ग्रहयोग प्रधान आहेत, असे लक्षात येते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२ अ. रवि, गुरु आणि हर्षल यांचा शुभयोग : सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कुंडलीत रवि, गुरु आणि हर्षल यांचा शुभयोग आहे. हा योग जिज्ञासा, ज्ञानप्राप्तीची तळमळ, अभ्यासूवृत्ती आणि संशोधकबुद्धी दर्शवतो. हा योग विज्ञानमय कोषाशी संबंधित आहे.

२ आ. रवि, गुरु आणि शनि यांचा शुभयोग : कुंडलीत रवि, गुरु आणि शनि यांचा शुभयोग आहे. हा योग अंतर्मुखता, सत्यनिष्ठा आणि ईश्वरी अस्तित्व अनुभवण्याची तळमळ दर्शवतो. हा योग आनंदमय कोषाशी संबंधित आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कुंडलीत विज्ञानमय आणि आनंदमय स्तरांवरील ग्रहयोग प्रधान आहेत, असे लक्षात येते.

सद्गुरु अनुराधा वाडेकर

३. सद्गुरु अनुराधा वाडेकर

३ अ. मंगळ, गुरु आणि शनि यांचा शुभयोग : सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या कुंडलीत मंगळ, गुरु आणि शनि यांचा शुभयोग आहे. हा योग नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, क्रियाशीलता आणि व्यापक कार्य करण्याची क्षमता दर्शवतो. हा योग प्राणमय कोषाशी संबंधित आहे.

३ आ. रवि, शुक्र, गुरु आणि नेपच्यून यांचा शुभयोग : कुंडलीत रवि, शुक्र, गुरु आणि नेपच्यून यांचा शुभयोग आहे. हा योग प्रेमभाव, सहजता, इतरांचा विचार, इतरांशी जवळीक साधणे, इतरांना सामावून घेणे आणि इतरांच्या प्रगतीची तळमळ असणे, ही वैशिष्ट्ये दर्शवतो. हा योग मनोमय कोषाशी संबंधित आहे.

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या कुंडलीत प्राणमय आणि मनोमय स्तरांवरील ग्रहयोग प्रधान आहेत, असे लक्षात येते.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

४. पू. (सौ.) अश्विनी पवार

४ अ. चंद्र, शुक्र आणि गुरु यांचा शुभयोग : पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कुंडलीत चंद्र, शुक्र आणि गुरु यांचा शुभयोग आहे. हा योग प्रेमभाव, इतरांशी जवळीक साधणे, सहजता आणि इतरांचा विचार करणे दर्शवतो. हा योग मनोमय कोषाशी संबंधित आहे.

४ आ. शुक्र, गुरु आणि शनि यांचा शुभयोग : कुंडलीत शुक्र, गुरु आणि शनि यांचा शुभयोग आहे. हा योग मायेपासून अलिप्तता, त्यागी वृत्ती, प्रीती, नि:स्वार्थता आणि व्यापकता दर्शवतो. हा योग आनंदमय कोषाशी संबंधित आहे.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कुंडलीत मनोमय आणि आनंदमय स्तरांवरील ग्रहयोग प्रधान आहेत, असे लक्षात येते.

४. सारांश

जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती ही व्यक्तीमधील जन्मजात चेतनेचे स्वरूप दर्शवत असते. जन्मजात चेतना ही आपल्या जीवनाचा पाया असते. ‘तिथून पुढे तिचा विकास साधणे’, हे आपले क्रियमाण आहे. चेतनेचा विकास हा अहंच्या प्रमाणावर अवलंबून आहे. आपला अहं जितका न्यून (पारदर्शक) होईल, तितकी चेतना उन्नत होते. त्यामुळे कोणत्याही साधनामार्गाचे ध्येय ‘अहं न्यून करणे’, हेच असते. अहं न्यून झाल्याने व्यक्तीचे सर्व कोष शुद्ध होतात आणि तिच्यात व्यापकता येते. व्यापकत्व आल्याने ती ईश्वराच्या समष्टी रूपाशी, म्हणजे समाजाशी एकरूप होते अन् समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करते !’

(समाप्त)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.२.२०२६)