चेतनेच्या विविध टप्प्यांनुसार जिवात निर्माण हाेणार्‍या प्रेरणा आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे विवेचन !

‘भारतीय तत्त्वज्ञानानुसार जिवाच्या सूक्ष्मदेहात अन्नमयादी ५ कोष असतात. या ५ कोषांमध्ये चेतना कार्यरत असते. प्रत्येक कोषातील चेतनेनुसार व्यक्तीच्या मनात निराळ्या प्रेरणा कार्यरत असतात. चेतनेच्या विविध टप्प्यांनुसार जिवात निर्माण होणार्‍या प्रेरणा आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे विवेचन या लेखात केले आहे.                          

(भाग १)

१. जिवातील चेतनेविषयी तात्त्विक विवेचन

१ अ. जिवातील चेतनेमुळे त्याच्या मनात उन्नतीची प्रेरणा निर्माण होणे : जिवाच्या जन्मोजन्मीच्या जीवनप्रवासात त्याची चेतना उत्तरोत्तर विकसित होत असते; म्हणजे संकुचिततेकडून व्यापकतेकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जात असते. ते तिचे स्वाभाविक ध्येयच असते. जिवातील चेतनेमुळे त्याच्या मनात पुढे जाण्याची आणि व्यापक होण्याची उर्मी निर्माण होत असते. याला आपण ‘प्रेरणा’ म्हणतो. ही आंतरिक प्रेरणाच मनुष्याला उन्नतीकडे नेत असते. ती त्याचे जणू इंधन असते. चेतनेच्या प्रत्येक टप्प्यावर जिवाला निराळ्या प्रकारच्या आवश्यकतांची (गरजांची) पूर्तता करावी लागते. चेतना खालच्या टप्प्यांवर असेल, तर व्यक्तीला स्थूल गोष्टींद्वारे सुख प्राप्त करण्याची ओढ असते. याउलट चेतना वरच्या टप्प्यांवर असेल, तर सूक्ष्म गोष्टींद्वारे आनंद प्राप्त करण्याची ओढ असते. या माध्यमातून त्या-त्या स्तरावरील सुख अनुभवून जिवाला समाधानी व्हायचे असते, तसेच पूर्णत्वाकडे जायचे असते. पूर्णत्वामध्ये असलेले व्यापकत्व, ज्ञान, शांती आणि आनंद त्याला स्वाभाविकपणे आकर्षित करत असतात.

१ आ. चेतनेच्या विविध टप्प्यांनुसार जिवात निर्माण होणार्‍या प्रेरणांचे स्वरूप : हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानात चेतनेच्या विकासाचे टप्पे नेमकेपणाने विशद केले आहेत. ‘पंचकोष’ ही त्यांपैकी एक उत्कृष्ट मांडणी आहे. कोष म्हणजे शुद्ध चैतन्यावर असलेले प्रकृतीचे आवरण. प्रत्येक कोष म्हणजे चेतनेच्या विकासाचा एक टप्पा आहे. प्रत्येक टप्प्यानुसार जिवात निर्माण होणार्‍या प्रेरणांचे स्वरूप पुढे दिले आहे.

श्री. राज कर्वे

१ आ १. अन्नमय स्तर : अन्नमय स्तर हा चेतनेचा पहिला टप्पा आहे. या स्तरावरील चेतना जिवाला त्याच्या शरिराचे पोषण करणे, संरक्षण करणे आणि वंशवृद्धी करणे यांसाठी प्रेरित करते. ही चेतना मनुष्याला त्याचे शारीरिक अस्तित्व टिकवण्यासाठी साहाय्य करते. ती चेतना इंद्रिये आणि भौतिक वस्तू यांद्वारे सुख मिळवण्याचा प्रयत्न करते, उदा. अन्न, वस्त्र, निवारा, निद्रा, इंद्रियसुख इत्यादी. ही चेतना मूलाधार आणि स्वाधिष्ठान या चक्रांशी संबंधित आहे.

१ आ २. प्राणमय स्तर : प्राणमय स्तरावरील चेतना जिवाला बाह्य परिस्थितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रेरित करते. ही चेतना संग्रह करणे आणि स्वामित्व मिळवणे या माध्यमांतून सुख मिळवते, उदा. धनसंग्रह करणे, स्थावर संपत्ती बाळगणे; पराक्रम, अधिकार, वर्चस्व गाजवणे; प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवणे इत्यादी. ही चेतना मनुष्याला कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान बनवते. ही चेतना मणिपूरचक्राशी संबंधित आहे.

१ आ ३. मनोमय स्तर : मनोमय स्तरावरील चेतना ही जिवाला इतर व्यक्ती अाणि परिस्थिती यांचा विचार करण्यास आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यास प्रोत्साहित करते, उदा. कुटुंबीय, जोडीदार, नातेवाईक, मित्र, लोकांचा समूह, समाज इत्यादी. अन्नमय आणि प्राणमय स्तरांवरील चेतना अधिकतर स्वकेंद्रित असते; परंतु मनोमय स्तरावर पोचल्यावर तिच्यात व्यापकता येते. मनोमय स्तरावरील चेतनेच्या क्षेत्रात नीती, मूल्ये, कर्तव्ये, प्रेम, सद्भाव आदी समावेशक तत्त्वांना महत्त्व असते. ही चेतना व्यक्तीला समाज आणि संस्कृती यांचा भाग बनवण्यास साहाय्य करते, तसेच मनुष्याला खर्‍या अर्थाने ‘मानव’ बनवते. ही चेतना अनाहतचक्राशी संबंधित आहे.

१ आ ४. विज्ञानमय स्तर : विज्ञानमय स्तरावरील चेतना ही मनुष्याला विश्वाचे भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक सत्य जाणण्यासाठी प्रेरित करते. या सत्याच्या बोधातून मिळणारा आनंद सामान्यतः विद्या, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान, चिंतन, संशोधन आदींद्वारे मिळतो. ही चेतना नाविन्यता, सर्जनशीलता (नवनिर्मिती) आणि अद्वितीयता यांचा पुरस्कार करणारी आहे. ‘सत्याचे ज्ञान’ हे या चेतनेचे सार आहे. सत्य-ज्ञानाचा स्पर्श झाल्यामुळे अशी व्यक्ती ही समाजाला उन्नतीची दिशा दाखवण्यास पात्र असते. ही चेतना विशुद्धचक्राशी संबंधित आहे.

१ आ ५. आनंदमय स्तर : आनंदमय स्तरावरील चेतना ही मनुष्याला एकत्व, अखंडत्व, अनंतत्व आणि पूर्णत्व यांची अनुभूती घेण्यास प्रेरित करते. ही सर्वाेच्च चेतना असून ती जिवाला समस्त सृष्टीच्या मुळाशी असलेले अद्वैततत्त्व उलगडून दाखवते. या स्तरावरील व्यक्ती (विभूती) ही आत्मज्ञानी, प्रीतीमय आणि आनंदमय असून ती विश्वाकडे समग्र आणि व्यापक दृष्टीने पहाते. ती समाजाचा आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी कार्य करते. ही चेतना आज्ञा आणि सहस्रार या चक्रांशी संबंधित आहे.

१ इ. चेतनेची कार्यप्रणाली

१ इ १. संकुचिततेकडून व्यापकतेकडे होणारा चेतनेचा विकास : अन्नमय कोषापासून आनंदमय कोषापर्यंतचा क्रम पाहिला, तर ‘चेतनेच्या विकासाची दिशा ही अज्ञानाकडून ज्ञानाकडे, स्थुलाकडून सूक्ष्माकडे, संकुचिततेकडून व्यापकतेकडे आणि भेदाकडून अभेदाकडे आहे’, हे लक्षात येते. समस्त सृष्टीची रचना हे चेतनेचे प्रकटीकरण आणि तिचा विकास, यांकरिता आहे. सृष्टीरूपी पडद्यामागे चेतना तिचे विकासात्मक कार्य हळूवारपणे आणि जिवांच्या नकळत करत असते.

१ इ २. प्रत्येक कोषामधील चेतनेचे प्राबल्य आणि परिपक्वता निराळी असणे : प्रत्येक व्यक्तीमध्ये पाचही कोष अस्तित्वात असतात; पण त्यात सक्रीय असलेल्या चेतनेचे प्राबल्य आणि परिपक्वता वेगवेगळी असते. पाचही कोषांपैकी ज्या कोषातील चेतना अधिक सक्रीय असेल, त्या कोषाशी संबंधित वैशिष्ट्ये व्यक्तीत दिसून येतात. त्याला आपण त्या व्यक्तीचे ‘व्यक्तीमत्त्व’ म्हणतो, उदा. प्राणमय स्तर प्रधान असता व्यक्ती महत्त्वाकांक्षी, उतावीळ, वर्चस्ववादी असू शकते; मनोमय स्तर प्रधान असणारी व्यक्ती भावनाशील, करुणामयी, परोपकारी असू शकते इत्यादी.

१ ई. व्यक्तीमधील चेतनेचे स्वरूप कोणत्या घटकांवर अवलंबून असते ?

व्यक्तीमधील चेतनेचे स्वरूप हे अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये व्यक्तीवरील पूर्वजन्मांचे संस्कार, वर्तमान जन्मातील संस्कार, बालपणीचे अनुभव, शिक्षण, कौटुंबिक स्थिती, सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी यांचा प्रभाव, जीवनातील एकंदर अनुभव, क्रियमाण कर्म इत्यादी अनेक घटक अंतर्भूत असू शकतात. ही व्यवस्था अतिशय गुंतागुंतीची असून तिचा स्पष्ट बोध होणे, हे कदाचित् मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे.

२. चेतनेचे विविध टप्पे आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग

ज्योतिष हे मानवी जीवनाशी संबंधित शास्त्र आहे. आकाशातील ग्रह हे कालपुरुषाच्या चेतनेचे प्रतिनिधी आहेत. विशिष्ट ग्रहयोग हे चेतनेचे विशिष्ट पैलू दर्शवतात. मनुष्यातील चेतनेचे विविध टप्पे आणि त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे ग्रहयोग पुढे दिले आहेत.

२ अ. अन्नमय स्तरावरील चेतनेशी संबंधित ग्रहयोग : ‘बुध’ आणि ‘शुक्र’ हे ग्रह अन्नमय स्तरावरील चेतनेचे कारक आहेत. त्यांचे अन्य ग्रहांशी होणारे योग, हे शारीरिक स्तरावरील आवश्यकतांच्या पूर्तीची इच्छा दर्शवतात.

२ अ १. बुध, शुक्र आणि राहू यांच्यातील योग : बुध, शुक्र आणि राहू यांच्यात असणारे परस्पर योग सुखवस्तूपणा, भौतिक वस्तूंचे आकर्षण इत्यादी दर्शवतात. ते अन्न, वस्त्र, धन, वाहन, साधनसुविधा आदी स्थूल गोष्टींतून सुख मिळवण्याची इच्छा दर्शवतात.

२ अ २. चंद्र, शुक्र आणि मंगळ यांच्यातील योग : चंद्र, शुक्र आणि मंगळ यांच्यात असणारे परस्पर योग विलासीवृत्ती अन् कामनाप्रधानता दर्शवतात. ते शारीरिक आकर्षण, सौंदर्य, मनोरंजन, संपत्ती आदींच्या द्वारे सुख मिळवण्याची इच्छा दर्शवतात.

वरील ग्रहयोग कुंडलीतील २, ४, ८, १० आणि ११ या स्थानांत अन् वृषभ, कर्क, वृश्चिक, मकर आणि कुंभ या राशींत असल्यास बलवान असतात.

२ आ. प्राणमय स्तरावरील चेतनेशी संबंधित ‘मंगळ’ ग्रहाचे योग : ‘मंगळ’ ग्रह प्राणमय स्तरावरील चेतनेचा मुख्य कारक आहे. त्याचे अन्य ग्रहांशी होणारे योग हे परिस्थितीवर वर्चस्व मिळवण्याची आकांक्षा दर्शवतात.

२ आ १. मंगळ, बुध आणि चंद्र यांच्यातील योग : मंगळ, बुध आणि चंद्र यांच्यात असणारे परस्पर योग हे स्वभावात आग्रहीपणा, उतावीळपणा, चातुर्य, व्यवहारीपणा, आत्मकेंद्रितपणा आदी दर्शवतात. हे ग्रहयोग असणारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत तिचा ऐहिक लाभ साधण्याचा प्रयत्न करते.

२ आ २. मंगळ, रवि आणि चंद्र यांच्यातील योग : मंगळ, रवि आणि चंद्र यांच्यात असणारे परस्पर योग हे स्वभावात साहस, धैर्य, उदारता, नेतृत्वगुण आदी वैशिष्ट्ये दर्शवतात. हे ग्रहयोग असणारी व्यक्ती इतरांवर वर्चस्व ठेवणे, समूहाचे नेतृत्व करणे, कठीण दायित्व पार पाडणे आदी गोष्टींतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करते. उच्चपद आणि अधिकार मिळवण्याकडे तिचा अधिक कल असतो.

२ आ ३. मंगळ, रवि आणि गुरु यांच्यातील योग : मंगळ, रवि आणि गुरु यांच्यातील परस्पर योग हे स्वभावात महत्त्वाकांक्षा, धाडस, कार्यतत्परता, ध्येयवाद आणि उत्साह दर्शवतात. हे योग असणारी व्यक्ती उद्योग उभारणे, संघटन करणे, समाजात योगदान देणे, विधायक कार्य करणे आदी गोष्टींतून सुख मिळवते. तिला समाजाकडून सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा असते.

वरील ग्रहयोग कुंडलीतील १, ३, ५, ७, ९ आणि १० या स्थानांत अन् मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि मकर या राशींत असल्यास बलवान असतात.

(क्रमशः)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.२.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1017105.html