‘दादरच्या भगिनी समाजात ऑक्टोबर १९५० मध्ये दिलेल्या भाषणात सावरकर म्हणाले, ‘स्त्री जीवनाचे ध्येय निसर्गानेच निश्चित करून ठेवले आहे. स्त्रीची वाढ, विकास, परिणीती इत्यादी गोष्टी लक्षात घेता तिचे ध्येय संतान पोषण हे आहे…’ झाले, लोकांना वाटले सावरकर स्त्रीला ‘चूल आणि मूल’ यांतच बांधून ठेवू पहातात. इतर सर्वच क्षेत्रात पुरोगामी आणि क्रांतीकारी विचार मांडणारे सावरकर स्त्रियांविषयी मात्र प्रतिगामी ठरले ! पण असा विचार करणे केवळ अपरिपक्वताच दर्शवते; कारण यामागेही सावरकर यांचा राष्ट्रहिताचाच विचार आहे. ‘संतती’ हा शब्द ‘राष्ट्र’ या अर्थाने सावरकर वापरतात. केवळ घरे, पर्वत, माती या गोष्टी, म्हणजे राष्ट्र नव्हे. मागे होऊन गेले ते ‘पूर्वज’ नि पुढे होणारे संतान ते ‘वंशज’ या दोहोंशी परंपरेने, प्रेमाने, धर्माने, इतिहासाने बांधलेला जो समुदाय त्याचे नाव ‘राष्ट्र’ ! मग संतती पोषण, म्हणजेच ‘राष्ट्र संवर्धनाचे दायित्व’, म्हणजेच ‘राष्ट्रकार्य’ अशी अर्थाची वलये आपोआप उलगडत जातात. याच विचारातून सावरकर पुढे ‘स्त्री जीवनाचे ध्येय’ आणि ‘स्त्री शिक्षणविषयक मते’ मांडतात. ८ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सावरकर यांनी स्त्रियांविषयी लिहिलेल्या लेखमाला आणि ३ प्रसिद्ध स्त्रियांविषयी लिहिलेले लेख, ३ वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांविषयी सावरकर यांनी लेख लिहिण्यामागील कारणमीमांसा अन् सावरकर यांचा काळ आणि त्यांचे स्त्री स्वातंत्र्याविषयी पुरोगामीत्व’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1016150.html

४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्त्रियांना दिलेला संदेश ‘वनितांनो, विदुला व्हा !’
एकदा स्त्रियांच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, ‘आजच्या स्त्रियांमध्ये मुख्य उणीव धैर्याची आहे. देशकार्यार्थ घराबाहेर पडणार्या पुरुषाने दाराआड मुसमुसून रडणारी पत्नी पाहिली की, त्याचे धैर्य खचते; म्हणून स्त्रियांनी माता विदुलेप्रमाणे (महाभारत काळातील क्षत्रिय माता आणि राणी) आपल्या मुलांना पळून न येता लढण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. झाशीच्या राणीचा पराक्रम हा आपला आदर्श असला पाहिजे. आपल्यात सामान्य समजूत अशी आहे, ‘मुलगा हवा, मुलगी नको.’ मुलींकडे माता पुष्कळ थोडे लक्ष देतात; पण ही चूक आहे. मुलींची चांगली जोपासना केली पाहिजे; कारण ती मुलगीच पुढच्या पिढीची जननी आहे. ‘भावी पिढी तेजस्वी नि सामर्थ्यवान निपजावी आणि तिने देशाचे पारतंत्र्य घालवावे’, अशी तुमची इच्छा असेल, तर मुलींच्या जोपासनेकडेही योग्य लक्ष दिले पाहिजे.’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे वक्तव्य त्यांनी स्त्रियांना दिलेला संदेश ‘वनितांनो, विदुला व्हा !’, हा अर्थ, आशय आणि मार्गदर्शन यांच्या दृष्टीने अतिशय मूल्यवान आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत स्त्रियांचा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे सांगणारे हे वक्तव्य आहे. ‘शिवाजी’ घडवायचा असेल, तर आधी ‘जिजाऊ’ जन्माला यावी लागते’, हे अधोरेखांकित करणारे वक्तव्य आहे. यात कुठेही स्त्रीला हीन दर्जा दिलेला नाही किंवा स्त्रियांवर अन्याय्य जाचक बंधने असावीत, याचेही सूतोवाच नाही. याउलट ‘स्त्री राष्ट्राच्या हृदयस्थानी आहे’, हेच यातून स्पष्ट होते. ‘तुम्ही (स्त्रियांनी) वृत्तपत्रे वाचून देशाची आजची स्थिती ही समजून घेतली पाहिजे’, असे जाहीरपणे सांगणारे सावरकर ‘चूल आणि मूल’ हेच स्त्रीचे विश्व आहे’, असे मानणारे नव्हते, हे नक्की !
स्त्रियांना कशा प्रकारचे शिक्षण देण्यात यावे, याविषयी सावरकर यांनी दिलेला दृष्टीकोन

सावरकर यांनी स्त्रियांच्या शिक्षणाविषयीही सांगितले आहे. स्त्रीला गृहशिक्षण मिळाले पाहिजे. पुढची संतती आजच्या पिढीपेक्षा अधिक बलवान, सुंदर आणि देशाभिमानी व्हावी, असे शिक्षण स्त्रियांना मिळावे, किंबहुना स्त्री शिक्षणाचे ध्येय हेच असले पाहिजे, असे त्यांना वाटते. मुलींकरता स्वतंत्र आणि त्यांच्या विशिष्ट मनोरचनेला अनुरूप अशा शिक्षणपद्धतीची योजना सिद्ध करणे त्यांना आवश्यक वाटते.

याविषयी स्त्री शिक्षणाचे महर्षि म्हणून आपण ज्यांना गौरवतो, त्या धोंडो केशव कर्वे यांच्या मताशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जुळतात, असेच म्हणावे लागेल; कारण कर्वे यांनी याच विचारावर आधारित स्वतंत्र विद्यापिठच काढले आहे आणि आज २१ व्या शतकात स्त्री अंतराळात गेली, तरीही या ‘गृहविज्ञान’ आणि ‘गृहविज्ञान तंत्रज्ञाना’वर आधारित पदवी अन् पदव्युत्तर शिक्षण घेणार्या तरुणींची संख्या झपाट्याने वाढतच आहे. याचाच अर्थ सावरकर यांनी मांडलेला विचार आज सार्थ आणि योग्य ठरत आहे; मात्र एरव्ही विज्ञानयुगाचे स्वागत करणार्या सावरकर यांना स्त्रियांचे दुःख न्यून व्हावे; म्हणून ‘नलिका बाळाचा’, म्हणजे यांत्रिक मुले बनवण्याचा प्रयोग मात्र मान्य नाही. तसे झाले, तर माया, वात्सल्य आणि ममताच उरणार नाही अन् राष्ट्रही शिल्लक रहाणार नाही, अशी भीती त्यांना वाटते.
– डॉ. (सौ.) शुभा साठे
५. स्त्रियांनी स्वतःचे महत्त्वाचे कर्तव्य बजावल्यानंतर पुरुषांसारखेच कर्तृत्व गाजवावे !
परमेश्वराने मुळातच स्त्रीला पुरुषापेक्षा अधिक शक्ती दिली आहे आणि ती शक्ती आहे नवनिर्मितीची ! अन् हाच स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक भेद आहे. त्यामुळे ‘ही नवनिर्मितीची क्षमता हे स्वतःचे दौर्बल्य किंवा निसर्गाने स्त्रीच्या मागे लावलेली कटकट किंवा स्वतःच्या प्रगतीतील खीळ आहे’, असे न समजता ‘हे आपल्याला मिळालेले एक वरदानच आहे, असे प्रत्येक स्त्रीने समजावे’, असे सावरकर यांना वाटते; मात्र ‘नवनिर्मिती, सृजन, संतती निर्माण एवढे एकमेव स्त्री जीवनाचे ध्येय आहे’, असे सावरकर कुठेही सांगत नाहीत. ‘राष्ट्राकरता स्त्रियांना काय करता येईल ?’, या प्रश्नाच्या उत्तराचा हा केवळ पर्याय आहे, ‘हे प्रथम आणि महत्त्वाचे कर्तव्य बजावल्यानंतर ती स्त्री इतर अधिक काहीही करू शकते, अर्थात् तिच्या वैयक्तिक गुणवत्तेचा विचार करून.’ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांसारखेच कर्तृत्व गाजवावे, या गोष्टीला सावरकर यांचा कधीही तात्त्विक विरोध नव्हता.
६. सावरकर यांच्या नाटकातील वीरांगना पात्र आणि त्याद्वारे त्यांनी स्त्रियांविषयी दिलेला दृष्टीकोन सावरकर यांचा ‘स्त्रीविषयक दृष्टीकोन’ त्यांच्या साहित्यातूनही प्रकट होतो.
अ. ‘उत्तरक्रिया’ नाटक : स्त्री ही अबला नाही. ‘मानसिक शक्ती जर एकवटल्या, तर तिला अशक्य ते काय !’, हे सांगण्यासाठी सावरकर यांच्या ‘उत्तरक्रिया’ नाटकातील ‘सुनीती’ पुरेशी आहे. जी खरा सतीधर्म पाळण्यासाठी बलात्कारित अवस्थेतही आत्महत्या न करता पापाच्या प्रायश्चित्ताची वाट पहात बसते आणि संधी साधून ज्याने तिची दुर्गती केली, त्या काळसर्पाला त्याच्या अनुयायांसह मारण्याची इच्छा धरून त्याच कार्यात मरण पत्करते, ते ही दुर्जनांचे भंजन करणार्या समरभूमीवर ! ‘उत्तरक्रिया’मधील ‘सुशीला’ही वीरांगना आहे. सैन्यात स्त्रियांना शिरता येत नाही, तर सुशीला म्हणते, ‘स्त्रीस मज्जाव नाही, स्त्री वेशास मज्जाव आहे. मी पुरुष वेष करून जाईन.’
आ. ‘संन्यस्त खङ्ग’ नाटक : ‘संन्यस्त खङ्ग’ या नाटकातील सुलोचनाही अशीच आहे. जी पुरुषवेश धारण करून संग्रामात उडी घेते आणि शाक्यांची रणदेवताच बनते. तिच्या तोंडचे तेजस्वी उद्गार स्त्रीच्या मनोबलाचे सार्थ दर्शन घडवणारे आहेत. ती म्हणते, ‘मुळूमुळू रडत मलिन वदन होऊन बसण्यापेक्षा शत्रूच्या रक्तात न्हाऊन धुवून आपल्या पतीच्या सुडाची मशाल चेतवून विरहाच्या अंधःकारातून प्रियकर गेला, ती वाट काढावी आणि त्यास जाऊन भेटावे.’
इ. ‘उःशाप’ नाटक : या नाटकामध्ये अस्पृश्यतेच्या कलंकाला दूर करण्यासाठी प्रियकराने इस्लाम धर्म स्वीकारला, तर त्याची प्रिया कमलिनी ‘स्वधर्मद्रोहीनीचता’ म्हणून त्याचा धिक्कार करते; कारण तिची प्रीती केवळ ऐहिक नाही. तिला प्रियकराचाच नाही, तर त्याच्या मूल्यनिष्ठेचा ध्यास आहे.
७. सावरकर यांची स्त्रीसृष्टी एका सुंदर बलशाली विचारस्वप्नाचे प्रतीक
‘कमला’, ‘गोमंतक’ यांसारखी काव्ये ‘उःशाप’, ‘संन्यस्त खङ्ग’ आणि ‘उत्तरक्रिया’ यांसारखी नाटके किंवा ‘मोपल्यांचे बंड’ किंवा ‘काळेपाणी’ यांसारख्या कादंबर्या किंवा त्यांच्या इतर स्फुट कथांमध्ये स्त्री पात्रांना नावे वेगवेगळी असली, तरी स्वरूप आणि स्वभावधर्म तेच आहेत. ही सर्व एकाच तेजस्विनीची विविध रूपे आहेत. सावरकर साहित्यातील स्त्री विशेषांच्या दीप्तीने आपली मने दिपून जातात. ‘हिंदुत्वाच्या अपजयाचे दारूण दुःख मी जन्मभर सोसले, त्या मला मरतांना तरी हिंदु धर्माच्या जयवाद्यांच्या निनादात सुखाने मरू द्यावे’, ही ‘उत्तरक्रिये’तील सुनीतीची अखेरची इच्छा वाचून आपल्या काळजाचे पाणी होते. ‘स्त्रीला शस्त्र द्यावे, नव्हे तिने ते वापरून आपल्या पावित्र्याचे, पर्यायाने राष्ट्रशक्तीचे रक्षण करावे’, हे सावरकर यांचे स्वप्न त्यांनी त्यांच्या कलाकृतींमधून प्रत्यक्षात उतरवले आहे. सावरकर यांची स्त्रीसृष्टी एका सुंदर बलशाली विचारस्वप्नाचे प्रतीक आहे. या स्त्री पात्रांमधून सावरकर यांनी हेच दाखवून दिले आहे की, वीरता, विचार, प्रीती आणि त्याग यात स्त्री पुरुषापेक्षा कुठेही न्यून नाही, उलट काकणभर सरसच आहे.

८. भारतीय स्त्रियांकडून असलेल्या काही अपेक्षा
भारतीय स्त्रीच्या मर्यादा आणि त्यासमवेतच तिची सहनशक्तीही सावरकर जाणून होते; म्हणून आपल्या वहिनीचा निरोप घेतांना ‘माझे मृत्यूपत्र’ या कवितेत पूजनीय वहिनीसमवेत सार्याच भारतीय स्त्रियांकडून असलेल्या काही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवल्या आहेत,
‘ऐसे विवंचुनि आहे वहिनी ।
व्रताते पालोनी वर्धन करा कुल-दिव्यतेचे ।।
श्रीपार्वती तप करी हिमपार्वती ती ।
की विस्तवात हसल्या बहु राजपुती ।।
ते भारतीय अबला-बलतेजकाही ।
अद्यापि या भरतभूमित लुप्त नाही ।।
हे सिद्ध होईल असेचि उदार उग्र ।
वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र ।।’
९. …तर भारत बलशाली होण्याचे स्वप्न दूर नाही !
स्त्री सबलीकरणाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा विचार आजच्या स्त्रीसाठीही आवश्यकच आहे. आता स्त्री स्वतःला अबला समजत नाही. तिला तिच्या स्वतःच्या सबलीकरणाची जाणीव झाली आहे किंवा तिने स्वतःमधील सर्वशक्तीचे रूप दाखवण्यास प्रारंभही केला आहे. आज जेव्हा एखादी ‘डॉ. संजूक्ता पराशर’ (भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकारी) किंवा ‘लेफ्टनंट स्वाती महाडिक’ पुढे येते, तेव्हा सावरकर यांची प्रकर्षाने आठवण होते. वाटते त्यांना अपेक्षित असे हे स्त्रीरूप पाहून स्वर्गात त्यांचा आत्मा नक्कीच प्रमुदित (आनंदित) होत असेल. आज भारताच्या राष्ट्रपती एक स्त्री आहे, देशाच्या अर्थमंत्री पदी एक स्त्री आहे, लढाऊ विमान चालवणारी स्त्री आहे आणि सीमेवर प्रत्यक्ष शत्रूशी दोन हात करणारी ही रणचंडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, त्याप्रमाणे ‘ज्या स्त्रियांना हे शक्य नाही, त्यांनी इतर क्षेत्रे सांभाळून सबल, सशक्त आणि सुसंस्कारित, देशप्रेमी संतती किंवा पुढील पिढी घडवली, तर भारत बलशाली होण्याचे स्वप्न दूर नाही.’
(समाप्त)
– डॉ. (सौ.) शुभा साठे, प्रसिद्ध लेखिका, नागपूर. (१३.१.२०२६)
संपादकीय भूमिकास्त्रियांनी गृहकृत्यदक्ष होण्यासह सुसंस्कारित आणि देशप्रेमी पिढी घडवली, तर भारत लवकर बलशाली होईल ! |
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !