८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘२८ मे १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६ असा ८३ वर्षाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट न्याहाळला, तर लक्षात येते की, त्यांचे जीवन आणि त्यांची झुंज काही विशिष्ट ध्येयासाठी होती. विशिष्ट निष्ठांना जोपासण्यासाठी होती. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचे जीवितकार्य आणि त्यांची साहित्यसंपदा यांचा एकत्रित एकसंध अभ्यास केला, म्हणजे लक्षात येते की, हिंदुत्व, स्वातंत्र्य, विज्ञान आणि बुद्धी किंवा विवेक यांच्या निष्ठा जोपासण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा होम केला. देशभक्ती आणि हिंदुत्वनिष्ठा ही त्यांच्या सर्व जीवनकार्याची प्रेरणा आणि कारक शक्ती होती. हिंदुत्वनिष्ठा केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी त्यांचे राजकारण, वाङ्मयकारण, समाजकारण, अर्थकारण, पक्षस्वीकार इत्यादी गोष्टी केल्या. स्वातंत्र्यनिष्ठेची बीजे तर लहानपणापासूनच त्यांच्या मनात रूजलेली होती. त्यांनी बालपणी त्यांच्या कुलदेवतेसमोर केलेली भीष्मप्रतिज्ञा हेच दर्शवते, ‘मातृभूमीच्या रक्षणार्थ मारिता मारिता मरेतो झुंजेन…’, म्हणजे देशाचे स्वातंत्र्य हेच मूळ ध्येय ! मूळ निष्ठा ! ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले…’, हे शब्द अक्षरशः सत्य आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रत्येक श्वास, विचार, कृती, निर्णय केवळ न केवळ देशहितास्तवच होता. त्यांनी मांडलेले हिंदुत्व, त्यांनी केलेला सैनिकीकरणाचा पुरस्कार, त्यांचे जात्युच्छेदन, त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचे द्रष्टेपण आणि त्यांचा स्त्रीविषयक विचारही… सगळे सगळे केवळ ‘राष्ट्रहित’ या एकाच ध्येयापोटी जन्माला आले.
दादरच्या भगिनी समाजात ऑक्टोबर १९५० मध्ये दिलेल्या भाषणात सावरकर म्हणाले, ‘स्त्री जीवनाचे ध्येय निसर्गानेच निश्चित करून ठेवले आहे. स्त्रीची वाढ, विकास, परिणीती इत्यादी गोष्टी लक्षात घेता तिचे ध्येय संतान पोषण हे आहे…’ झाले, लोकांना वाटले सावरकर स्त्रीला ‘चूल आणि मूल’ यांतच बांधून ठेवू पहातात. इतर सर्वच क्षेत्रांत पुरोगामी आणि क्रांतीकारी विचार मांडणारे सावरकर स्त्रियांविषयी मात्र प्रतिगामी ठरले ! पण असा विचार करणे केवळ अपरिपक्वताच दर्शवते; कारण यामागेही सावरकर यांचा राष्ट्रहिताचाच विचार आहे. ‘संतती’ हा शब्द ‘राष्ट्र’ या अर्थाने सावरकर वापरतात. केवळ घरे, पर्वत, माती या गोष्टी, म्हणजे राष्ट्र नव्हे. मागे होऊन गेले ते ‘पूर्वज’ नि पुढे होणारे संतान ते ‘वंशज’ या दोहोंशी परंपरेने, प्रेमाने, धर्माने, इतिहासाने बांधलेला जो समुदाय त्याचे नाव ‘राष्ट्र’ ! मग संतती पोषण, म्हणजेच ‘राष्ट्र संवर्धनाचे दायित्व’, म्हणजेच ‘राष्ट्रकार्य’ अशी अर्थाची वलये आपोआप उलगडत जातात. याच विचारातून सावरकर पुढे ‘स्त्री जीवनाचे ध्येय’ आणि ‘स्त्री शिक्षणविषयक मते’ मांडतात.
१. सावरकर यांनी स्त्रियांविषयी लिहिलेल्या लेखमाला आणि ३ प्रसिद्ध स्त्रियांविषयी लिहिलेले लेख
वर्ष १९३३ मध्ये सावरकर यांनी ‘मनुस्मृतीतील महिला’ ही ४ लेखांची लेखमाला ‘स्त्री’ मासिकातून लिहिली. ही लेखमाला प्रधानतः माहितीपर असली, तरी सावरकर यांच्या स्त्रीविषयक भूमिकेचे दर्शन या लेखमालेत घडते. वर्ष १९३६ मध्ये ‘प्राचीन यहुदी योषिता’ ही ३ लेखांची लेखमाला लिहिली, तसेच ‘रशियातील घटस्फोट – स्वातंत्र्याचा प्रयोग’, ‘ललनांच्या लावण्याचे हानीलाभ’ हेही लेख लिहिले. जगात काही विशिष्ट संदर्भामुळे प्रसिद्ध असलेल्या ३ स्त्रियांवर सावरकर यांनी लेख लिहिले. चीनचे सर्वाधिकारी चंग-कै-शेक यांच्या पत्नी सौ. चंग, इटलीचे सर्वाधिकारी मुसोलिन यांच्या पत्नी सौ. मुसोलिनी आणि ॲबिसिनियाचे सम्राट रासतफारी यांची सम्राज्ञी. या तिघींचा परिचय सावरकर भारतियांना करून देतात. ‘थोर पुरुषांची स्त्री, ती थोर स्त्री किंवा जी स्त्री स्वतःच्याच थोर गुणांनी किंवा कृत्यांनी थोरपणा पावते, ती थोर स्त्री’, या अर्थांनी सावरकर या तिघींचा परिचय करून देतात. यातील पहिली राजकारण धुरंधर आहे, दुसरी उत्तम अशी गृहिणी आहे आणि तिसरी निव्वळ धर्मभोळी आहे.
सौ. चंग एक अत्यंत बुद्धीमान आणि राजकारण धुरंधर स्त्री आहेत. त्यांच्या पतीच्या बरोबरीने त्या चीनचा राज्यकारभार करतात. सौ. चंग यांच्यातील या गुणाचीच सावरकर मुक्त कंठाने प्रशंसा आणि कौतुकही करतात. याचाच अर्थ ‘राजकारणासारखा विषयही स्त्रियांना वर्ज्य नाही, याही क्षेत्रात त्या पुरुषांपेक्षाही अधिक तेजाने तळपू शकतात’, हेच सावरकर यांना अधोरेखांकित करायचे आहे.

याउलट सौ. मुसोलिनी यांना राजकारणात अजिबात रस नाही. एवढेच नाही, तर पूर्णतः तिटकारा आहे. कुटुंबाच्या बाहेर पाऊलही न टाकणारी ती अक्षरशः एक गृहिणी आहे. उभ्या जन्मात तिने कधी प्रधानमंडळात पाय टाकलेला नाही. राजकारणाची कधी चौकशी केली नाही, सार्वजनिक कामातही भाग घेण्याची त्यांना आवड नाही. त्यामुळेच मुसोलिनीनेही त्याच्या पत्नीला कधी सार्वजनिक समारंभ, सभा किंवा भोजन समारंभाला नेले नाही. याचा अर्थ ‘मुसोलिनी आपल्या पत्नीला उंबरठ्याच्या आतच डांबून ठेवतात’, असा होत नाही. उलट ‘पत्नीची इच्छा आणि आवड यांचा सन्मान ते करत. स्वतःची इच्छा अन् प्रतिष्ठा तिच्यावर लादत नसत’, असाच याचा अर्थ होतो.
सावरकर यांनी ओळख करून दिलेली तिसरी स्त्री धर्मभोळेपणाचा अतिरेक करणारी आहे. स्वातंत्र्य मिळावे म्हणून देवाची प्रार्थना करण्यात ती दंग आहे. हिंदुस्थानातील असंख्य धर्मभोळ्या, देवभोळ्या आणि अंधविश्वास असलेल्या महिलांसारखी आहे. राष्ट्रीय हितदृष्ट्या स्त्री कशी असू नये, हे दर्शवण्यासाठीच सावरकर ॲबिसिनियाच्या सम्राज्ञीविषयी लिहितात.
१ अ. सावरकर यांच्या पत्नी सौ. माई आणि सौ. मुसोलिनी यांच्यातील साम्य : स्वतः सावरकर यांच्या पत्नी सौ. माई सावरकर यांनी रत्नागिरीला समाजसुधारणेच्या कार्यास हातभार लावला. महिलांचे सार्वजनिक हळदी-कुंकू आणि सार्वजनिक सहभोजनेही केली; पण म्हणून त्यांच्यात सौ. चंग यांच्यासारखी राजकारणाचे डावपेच लढण्याची क्षमता आहे, असे होत नाही ना ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जेव्हा आरोप होतात की, ते त्यांच्या पत्नीला कधीही सार्वजनिक समारंभात व्यासपिठावर घेऊन जात नसत. ‘सावरकर स्त्रियांना न्यून लेखतात, स्त्रीने केवळ चूल-मूल सांभाळावीत’, असेच त्यांना वाटते, तेव्हा आरोप करणार्यांनी हे लेख बारकाईने वाचण्याची आणि त्यावर चिंतन, मनन करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. ‘सूज्ञ पत्नीने उचलेल, तेच कर्तव्य करत रहावे’, हा सावरकर यांचा खरा उपदेश आहे. थोर व्यक्तीमत्त्व अंगी नसतांनाही केवळ स्वतःची पत्नी जगापुढे यावी, यासाठी उठाठेव करणे त्यांना पसंत नव्हते. सौ. मुसोलिनी यांच्याच गटातील सौ. माई सावरकर होत्या. त्यांची कार्य करण्याची क्षमता ओळखूनच सावरकर यांनी त्यांना महिला हिंदु सभेत पाठवले; पण क्षमता नसतांनाही केवळ स्वतःची पत्नी आहे म्हणून त्यांना अखिल भारतीय हिंदु महासभेच्या व्यासपिठावर बसवले नाही.
२. सावरकर यांनी ३ वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांविषयी लेख लिहिण्यामागील कारणमीमांसा
थोडक्यात स्त्रीच्या वैयक्तिक गुणवत्तेवरून तिचे थोरपण आणि तिचे कार्यक्षेत्र सावरकर ठरवतात. ‘संपूर्ण स्त्री जातच कनिष्ठ आहे किंवा संपूर्ण स्त्री जातीचे चूल आणि मूल एवढेच मर्यादित कार्यक्षेत्र आहे’, असे त्यांना कदापिही म्हणायचे नाही. ‘ज्या स्त्रीच्या ठिकाणी निर्भेळ गुणवत्ता आणि कर्तृत्व असेल, तिने अवश्य ‘सौ. चंग’सारखे बनावे; पण जर तशी योग्य गुणवत्ता आणि कर्तृत्व नसेल, तर तिने ‘सौ. मुसोलिनी’सारखी उत्तम गृहिणी बनून स्वतःचे दायित्व पार पाडावे’, असे ते सांगतात; मात्र ‘ॲबिसिनियाच्या सम्राज्ञीप्रमाणे अंधविश्वास अन् देवभोळेपणा यांच्या अतीआहारी जाऊन राष्ट्रकर्तव्याचा विसर पडू देऊ नये’, असे ३ महत्त्वाचे संदेश देण्यासाठीच सावरकर यांनी हा लेखन प्रपंच केला.
३. सावरकर यांचा काळ आणि त्यांचे स्त्री स्वातंत्र्याविषयी पुरोगामीत्व !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्त्री स्वातंत्र्याविषयी चिंतनपर लिहिले नाही किंवा स्त्री स्वातंत्र्यासाठी कोणतीही चळवळ केली नाही’, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. ‘सावरकर यांनी स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न हा स्त्रीच्या जन्म-मरणाचा किंवा तिच्या अस्तित्वाचाच ज्वलंत प्रश्न आहे, असे समजून लेखन किंवा चळवळी केल्या नाहीत’, हे खरे आहे; परंतु त्यामागील त्यांची दृष्टी, विचार, कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे. ज्या काळात सावरकर यांनी ‘स्त्री स्वातंत्र्या’च्या प्रश्नावर प्रकट चिंतन करावे, तो काळ होता त्यांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा, म्हणजेच वर्ष १९२५ नंतरचा. त्या वेळेस आणि त्या पूर्वीही सतत त्यांच्या मनचक्षूसमोर एकच ध्येय होते ते म्हणजे राष्ट्रस्वातंत्र्य ! या एकाच ध्येयासाठी त्यांचे सारे चिंतन, लेखन, कार्य आणि कृती होती. त्यामुळे केवळ स्त्री स्वातंत्र्यच नव्हे, तर अशा अनेक मानवी मूल्यांच्या संदर्भात सावरकर गप्प बसलेले दिसतात. मुख्य म्हणजे सावरकर यांच्या काळात पुष्कळच सामाजिक सुधारणा घडून आल्या होत्या. सतीचा प्रश्न पूर्णतः मिटला होता, मुलींच्या शिक्षणासाठीही समाज अनुकूल झाला होता. म. फुले किंवा गो.ग. आगरकर यांच्या काळात स्त्री शिक्षणाचा प्रश्न जेवढा ज्वलंत होता, तेवढा तो राहिलेला नव्हता. मुलीच्या लग्नाचे वय किती असावे, हाही वाद मिटला होता, इतकेच नाही, तर मुली पसंत करतांना ‘शिक्षण किती झाले आहे ?’, हाही प्रश्न विचारला जात होता. विधवा महिलांचा विवाहही हळूहळू समाजात मान्यता पावत होते. तरीही या संदर्भात सावरकर यांचे विचार किती पुरोगामी होते, हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी केलेली ‘बालविधवा दुःस्थिती कथन’ करणारी कविता वाचावी. सावरकर लिहितात,
‘धर्माभिमान, म्हणजे काही सुविवेकशून्यता नाही ।
कालस्थितीवश धर्महि आहे हे तत्व मान्य मान्यांहि ।।
सुज्ञाने सुविचार स्थित्यनुसार स्वधर्म सुधरावा ।
आपद्गतिचा धोपट मार्ग चि हा हट्ट व्यर्थ न धरावा ।।’
‘६० वर्षांच्या पुरुषांनी पुन्हा लग्न करायला हरकत नाही, तर तोच नियम स्त्रियांना का लावू नये ? विधवा आणि विधुर यांच्यामध्ये भेदभाव का ? पुरुषाला केव्हाही दुसरे लग्न करता येते, निपुत्रिक असला, तर तो मूल दत्तकही घेऊ शकतो, मग विधवेला मात्र वेगळे नियम का ?’, असे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. यावरून नक्कीच असे म्हणता येईल की, इतर सर्व क्षेत्रासमवेतच स्त्रीविषयक विचारांविषयीही सावरकर पुरोगामीच होते !
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– डॉ. (सौ.) शुभा साठे, प्रसिद्ध लेखिका, नागपूर. (१३.१.२०२६)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1016320.html
संपादकीय भूमिकासर्वच क्षेत्रांत पुरोगामी आणि क्रांतीकारी विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर स्त्रियांनाही राष्ट्रीय बांधीलकी जपण्यास सांगत, हे विशेष ! |

मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !