कोणत्याही प्रवासाचा प्रारंभ ‘एस्.टी. स्टँड’वर (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावर) पोचल्यावर होत नाही, तर प्रवाशाच्या घरातून होतो. जेव्हा एखादा कष्टकरी, विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या प्रवासाचे नियोजन करतो, तेव्हा त्या नियोजनाचा पाया असतो – माहिती. ‘माझ्या गावाला जाणारी बस किती वाजता आहे ? गाडी वेळेवर आहे कि रहित झाली ?’, या साध्या; पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवाशाला सर्वाधिक आवश्यकता भासते ती, म्हणजे बसस्थानकाच्या ‘हेल्पलाईन’ क्रमांकाची (प्रवाशांनी संपर्क करण्यासाठीचा दूरभाष क्रमांक.)

आजच्या डिजिटल युगात ही माहिती सहज मिळणे अपेक्षित असतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (‘एम्.एस्.आर्.टी.सी.’च्या) संपर्क यंत्रणेची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झालेली दिसते.
सुंदर बसस्थानक पण…

१. संवादाविना सौंदर्याला अर्थ नाही !
आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधे उदाहरण पाहूया. आपण बाजारातून कितीही महागडा, चकचकीत आणि ‘ब्रँडेड स्मार्टफोन’ (भ्रमणभाष संच) विकत घेतला; पण जर त्याचा ध्वनीक्षेपक आणि माईकच बंद असेल, तर आपण तो भ्रमणभाष एका मिनिटात नाकारतो; कारण ज्या भ्रमणभाष संचावरून संवादच साधता येत नाही, तो कितीही महागडा अन् दिसायला सुंदर असला, तरी आपल्यासाठी केवळ एक निरुपयोगी वस्तू ठरतो, तसेच आपल्या घरातील ‘लँडलाईन’ (दूरभाष) किंवा भ्रमणभाष बंद पडला, तर आपण तो तातडीने चालू करण्यासाठी धडपडतो; कारण आपल्याला संवाद साधायचा असतो.
हेच सत्य एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानकांनाही लागू होत नाही का ? महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे, ठिकठिकाणी रंगरंगोटी होत आहे; पण जर तेथील अधिकृत संपर्क क्रमांकच ‘डेड’ (बंद) असेल, तर ते सुंदर स्थानक त्या ‘माईक बंद’ असलेल्या महागड्या भ्रमणभाषसारखेच ‘निकामी’ नाही का ?
९० टक्के ‘हेल्पलाईन’ केवळ कागदावर !

२. सुराज्य अभियानाचा ‘रिॲलिटी चेक’ (वास्तविक पडताळणी)
‘सुराज्य अभियाना’कडे अनेक तक्रारी आल्या. ‘सुराज्य अभियान’ने स्वतः पुढाकार घेऊन या तक्रारींची खात्री करण्यासाठी ‘एम्.एस्.आर्.टी.सी.’च्या संकेतस्थळावर दिलेले अधिकृत क्रमांक निवडले. राज्यातील अनेक विभागांतील ‘एस्.टी. हेल्पलाईन’ क्रमांकांची प्रत्यक्ष पडताळणी केली. यातून जे वास्तव समोर आले, ते अत्यंत धक्कादायक आहे.


संपर्क केल्यापैकी तब्बल ९० टक्के ‘हेल्पलाईन’ क्रमांक एकतर कायमस्वरूपी बंद आहेत किंवा त्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. ज्या क्रमांकांचा प्रसार महामंडळ ‘प्रवासी सुविधे’साठी करते, त्यातील १० पैकी ९ क्रमांकांशी संपर्कच होत नाही. हा केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर प्रवाशांच्या विश्वासाला दिलेला तडा आहे. घंटोन्घंटे प्रयत्न करूनही जेव्हा बसस्थानकातून प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा प्रवाशाचा प्रवास चालू होण्यापूर्वीच त्याचा मानसिक छळ चालू होत नाही का ?
‘एस्.टी.’ महामंडळाने नुकताच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियाना’चा निकालही घोषित केला. यात ‘अ’ वर्गात जळगावचे चोपडा, ‘ब’ वर्गात भंडार्याचे साकोली आणि ‘क’ वर्गात सातार्याचे मेढा बसस्थानक राज्यात प्रथम आले. ‘सुराज्य अभियाना’ने या निकालाचे स्वागत केले; पण जेव्हा वास्तवाची पडताळणी करण्यासाठी या ‘प्रथम’ क्रमांक मिळवलेल्या बसस्थानकांच्या ‘हेल्पलाईन’वर संपर्क केला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले –
अ. चोपडा बसस्थानक : अधिकृत क्रमांक (०२५८६-२२२०२७) लावूनही संपर्क होऊ शकला नाही.
आ. मेढा बसस्थानक : अधिकृत क्रमांकावर (०२३७८-२८५२६०) कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
इ. केवळ भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा दूरभाष क्रमांक लागला.
‘महाराष्ट्रात प्रथम आलेल्या बसस्थानकांची ही अवस्था असेल, तर राज्यातील इतर ९० टक्के बसस्थानकांची संपर्क यंत्रणा मृत आहे’, या ‘सुराज्य अभियाना’च्या दाव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे, असे म्हणता येईल.
३. ‘दोन’ गुणांचे मूल्य : अनुत्तीर्ण होण्याची भीती
राज्य परिवहन महामंडळाने या अभियानांतर्गत बसस्थानकांसाठी प्रतियोगिता आयोजित केली. या स्पर्धेच्या मूल्यमापन सारणीत (‘इव्हॅल्यूएशन चार्ट’मध्ये) संपर्क यंत्रणेसाठी केवळ ‘दोन’ गुण दिले आहेत. प्रशासनाने हे गांभीर्याने लक्षात ठेवावे की, एखादा हुशार विद्यार्थी जसा केवळ २ गुणांनी अनुत्तीर्ण होऊ शकतो, तसेच सरकारने कोट्यवधी रुपये व्यय करून राबवलेले अभियान या २ गुणांमुळे अनुत्तीर्ण होऊ शकते. प्रवाशाला जर बसची वेळच कळणार नसेल, तर त्या देखण्या इमारती प्रवाशाच्या काय कामाच्या ? संपर्क यंत्रणा ही केवळ तांत्रिक सोय नाही, तर ती एस्.टी.चा ‘श्वास’ आहे. त्याहून पुढे प्रश्न हा आहे की, ‘सुराज्य अभियाना’च्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये ९० टक्के यंत्रणा बंद आढळलेली असतांना या स्थानकांना गुण दिलेच कसे जातात ? चोपडा आणि मेढा बसस्थानकांना बक्षिसाचे हे कोट्यवधी रुपये या ‘२ गुणांच्या’ (संपर्क यंत्रणेच्या) अभावी दिलेच गेले कसे ? यावरून जनतेच्या दृष्टीने हे अभियान अनुत्तीर्ण झाले, असे म्हणावे का ?
४. माहितीचा अधिकार कि मानवाधिकाराचे हनन ?
प्रवासाची माहिती मिळवणे, हा केवळ सोयीचा भाग नाही, तर तो ‘प्रवाशाचा अधिकार’ आहे. जेव्हा एखादा रुग्ण किंवा महिला माहितीच्या अभावी बसस्थानकावर ताटकळत रहाते, तेव्हा तो त्यांच्या सुरक्षिततेशी केलेला खेळ असतो. प्रवाशाला वेळेवर अचूक माहिती न देणे, हे एकप्रकारे मानवाधिकाराचे हनन आहे.
५. नागरिकांनी काय करावे ? (स्वतःचे हक्क आणि कर्तव्य)
अ. लेखी तक्रार नोंदवा : जर एखाद्या आगाराचा दूरभाष क्रमांक लागत नसेल, तर तिथे गेल्यावर ‘तक्रार पुस्तिकेत’ नोंद करा. महामंडळाच्या ‘एक्स हँडल’वर किंवा ‘ई-मेल’वर पुराव्यासह तक्रार नोंदवा.
आ. गुणांचा जाब विचारा ! : मूल्यमापन समितीला विचारा की, संपर्क यंत्रणा बंद असतांना या स्थानकाला २ गुण कसे दिले गेले ?
इ. समाजमाध्यमांचा वापर : निष्क्रीय ‘हेल्पलाईन’ क्रमांकाचे छायाचित्र काढून ते परिवहनमंत्री आणि ‘एम्.एस्.आर्.टी.सी.’ यांच्या अधिकृत खात्याला ‘टॅग’ करून जाब विचारा.
ई. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा ! : आपल्या भागातील नगरसेवक, आमदार किंवा खासदार जेव्हा विकासाविषयी सांगतात, तेव्हा त्यांना ‘आमच्या एस्.टी. आगाराचा दूरभाष क्रमांक का लागत नाही ?’, हा मूलभूत प्रश्न विचारा.
चला, ‘एस्.टी.’ प्रशासनाला ‘जागे’ करूया !

‘सुराज्य अभियान’ राज्यातील एस्.टी. आगाराच्या या कोलमडलेल्या संपर्क यंत्रणेविरोधात प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या लढ्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. जर तुमच्या भागातील आगाराचा दूरभाष क्रमांक लागत नसेल, तर खालीलप्रमाणे कृती करा आणि आम्हालाही कळवा !
‘ई-मेल’ करा !
तुमची तक्रार पुराव्यासह (उदा. बंद क्रमांकाचा ‘स्क्रीनशॉट’) [email protected] वर पाठवा.
सामाजिक माध्यमांचा वापर
‘एक्स’वर ‘@msrtcofficial’, ‘@PratapSarnaik’ आणि ‘@SurajyaAbhiyan’यांना ‘टॅग’ करून स्वतःचा अनुभव प्रसारित करा. हा अनुभव आमच्या ‘[email protected]’ या ‘ई-मेल’ पत्त्यावर ही पाठवा. ‘#MSRTC_Helpline_Failure’ हा हॅशटॅग वापरा.
तक्रार पुस्तिका
बसस्थानकावर गेल्यावर तेथे असलेल्या ‘तक्रार पुस्तिकेत’ संपर्क यंत्रणा बंद असल्याविषयी लेखी नोंद करा आणि त्याचे छायाचित्र काढून पुढच्या पाठपुराव्यासाठी संग्रही ठेवा.
‘टोल फ्री’ क्रमांक
महामंडळाच्या १८००२२१२५० या क्रमांकावर संपर्क करून स्वतःची तक्रार नोंदवा.
६. अभियान जनतेच्या दरबारात उत्तीर्ण होण्यासाठी…
या अभियानाचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ असे आहे; परंतु प्रशासनाने हे विसरू नये की, जोपर्यंत बसस्थानकाची संपर्क यंत्रणा सक्रीय होत नाही, तोपर्यंत हे अभियान प्रवाशांपर्यंत पोचूच शकणार नाही. शरीर कितीही देखणे असले, तरी जोपर्यंत त्यातील ‘हृदय’ धडधडत नाही आणि संवादाची नाडी चालू रहात नाही, तोपर्यंत त्याला सजीव मानता येत नाही. जर हे अभियान प्रवाशांशी संवादच साधू शकले नाही, तर ते केवळ निर्जीव सुशोभिकरण ठरेल. हे अभियान यशस्वी करायचे असेल, तर बसस्थानकाच्या संपर्क यंत्रणाही तातडीने जिवंत करणे आवश्यक आहे. अन्यथा हे अभियान तांत्रिकदृष्ट्या ‘उत्तीर्ण’ झाले, तरी जनतेच्या दरबारात मात्र ‘अनुत्तीर्ण’च ठरेल.
– श्री. अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान, मुंबई.
सुराज्य अभियानाचा पत्तासुराज्य अभियानटपालाचा पत्ता : श्री. अभिषेक मुरुकटे, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संपर्क : ९८६७५५८३८४ संगणकीय पत्ता : [email protected] |
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रासह देशात सुशोभिकरण करत असतांना ते टिकण्यासाठी प्रशासन प्रभावी कार्यवाही करणारे अन् नागरिक नैतिक आचरण करणारे हवेत ! |
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !