‘विश्वविद्यालय अनुदान नियमावली (यूजीसी) २०२६’चे प्रकरण
आरक्षण : सनातन (हिंदु) समाजामध्ये फूट पाडणार का ?
१३ जानेवारी २०२६ या दिवशी केंद्र सरकारने ‘विश्वविद्यालय अनुदान नियमावली (यूजीसी) २०२६’ प्रसारित करून त्यापूर्वीची (वर्ष २०१२ मधील) नियमावली रहित केली. या नियमावलीतील पालटांवर पुनर्विचार करण्याचा केंद्र सरकारचा विचार न दिसल्यामुळे काही सूज्ञ नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्वरित सुनावणी घेऊन ‘विश्वविद्यालय अनुदान नियमावली २०२६’ला स्थगिती देऊन ‘विश्वविद्यालय अनुदान नियमावली २०१२’ पूर्ववत् ठेवली आणि पुढील सुनावणीचा दिनांक १९ मार्च २०२६ ठेवला. २४ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विश्वविद्यालय अनुदान आयोग, आरक्षण अन् त्यावरून झालेली आंदोलने आणि मनुस्मृति’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा दुसरा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1011516.html

४. भारतात आलेल्या विदेशी प्रवासींची प्रवासवृत्ते आणि त्यांनी व्यक्त केलेली वर्णने
भारतवर्षाचा सहस्रो वर्षांचा इतिहास पहाता पुढील सत्ये दृष्टीस येतात. पुरावे पहातांना भारतीय इतिहासकारांवर न विसंबता वेळोवेळी देशात आलेले काही विदेशी प्रवासी आणि इतिहासकार भारतातील समाजस्थितीविषयी काय लिहितात, ते पाहू.
मेगॅस्थेनिस (Megasthenes – सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत, इसवी सनापूर्वी वर्ष ३०२ ते २९८), फा हिएन (Fa Hien – चिनी प्रवासी, इसवी सनाचे ५ वे शतक), ह्यूएन त्संग (Huian Tsang – चिनी प्रवासी, इसवी सन ६३२ ते ६४५), अल बिरुनी (Al Biruni – अरब प्रवासी, इसवी सनाचे ११ वे शतक), मार्को पोलो (Marco Polo – व्हेनिसचे प्रवासी, इसवी सनाचे १३ वे शतक) आणि वास्को द गामा (Vasco-da-Gama – पोर्तुगीज प्रवासी, इसवी सन १४९७ आणि १५०२) यांपैकी बर्याच विदेशी प्रवाशांनी भारताच्या विविध भागांत प्रवास केला. त्यांनी केलेली भारतीय समाजस्थितीची वर्णने अचूक आणि विश्वासार्ह म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी वर्णन केलेली प्रमुख सूत्रे –
अ. समाज प्रामुख्याने सनातन (हिंदु) असून सर्व वर्णांमध्ये सहिष्णुता होती.
आ. समाजामध्ये शांतता आणि सुबत्ता होती.
इ. शिक्षण, लेखन आणि कला यांना समाजात सन्मान होता.
ई. कर्माधिष्ठित वर्णव्यवस्था होती, जन्माधिष्ठित नव्हती. जाती व्यवस्था नव्हती.
उ. समाजामध्ये समानता (इक्विटी) असून उच्च-नीच असा भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) नव्हता.
ऊ. स्त्रियांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान होते.
५. भारतातील ब्रिटीश सत्ता आणि त्यांच्या गव्हर्नर्सने अहवालांद्वारे दर्शवलेली तत्कालीन समाजस्थिती
२३ जून १७५७ या दिवशी प्लासी येथे झालेल्या लढाईमध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा नबाब सिराज उद्दौला याचा पराभव केला. तेथून भारतामध्ये इंग्रजांची सरशी चालू होऊन वर्ष १८१८ मध्ये पेशवाई संपुष्टात आली. त्या वेळी भारतभर इंग्रजांचे राज्य पसरले. त्या वेळी ब्रिटीश इंडियाच्या मुलुखांना ‘बंगाल (पूर्व भारत), मद्रास (दक्षिण भारत), मुंबई (पश्चिम भारत) आणि उत्तर भारतातील प्रांतांना ‘अप्पर प्रॉव्हिन्सेस’ अशी नावे होती. या मुलुखांवर ब्रिटीश ‘गव्हर्नर्स’ होते आणि ‘अप्पर प्रॉव्हिन्सेस’वर ब्रिटीश ‘लेफ्टनंट गव्हर्नर्स’ होते. ते ‘गव्हर्नर्स’ आणि ‘लेफ्टनंट गव्हर्नर्स’ आपापल्या क्षेत्रातील समाजस्थितीचे अहवाल प्रतिवर्षी देत असत. ते सर्व अहवाल सरकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. जोनाथन डंकन (Jonathan Duncan) हे वर्ष १७९५ ते १८११ (१६ वर्षे) मुंबईचे गव्हर्नर होते. तत्पूर्वी ते बनारस संस्थानमध्ये ‘रेसिडेंट’ (निवासी) होते. त्यांचा ईस्ट इंडिया कंपनीशी कार्यकाळ वर्ष १७७२ मध्ये बंगालमध्ये चालू झाला. भारतातील ३९ वर्षांच्या सेवेमुळे त्यांना भारतीय समाजस्थितीचे उत्कृष्ट ज्ञान होते आणि त्यांना बंगाली, संस्कृत, मराठी अन् पर्शियन या भाषा उत्तम येत होत्या. ‘भारतीय राजांसमवेतच्या वाटाघाटींमध्ये निपुण’, असा त्यांचा लौकिक होता.
त्यांच्या वार्षिक अहवालांतील तत्कालीन समाजस्थिती पुढीलप्रमाणे –
अ. समाज संपन्न असून सामान्य माणूस सुखी होता.
आ. गुरुकुल शिक्षणपद्धत उत्कृष्ट रुजलेली असून प्रत्येक गावात गुरुकुल असे.
इ. कर्माधिष्ठित वर्णव्यवस्था असून सर्व वर्णांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विनामूल्य असे.
ई. कारागीर आणि शिल्पकार (Artisans & Craftsme) सधन असत.
उ. समाजामध्ये उच्च-नीच असा भेदभाव नव्हता.
ऊ. समाजामध्ये स्त्रियांना सन्मान होता.
त्या वेळेचे इतर गव्हर्नर्सचे अहवाल साधारणतः याच धर्तीचे अनुभव लिहीत.

६. लेखक जेम्स मिल यांनी पुस्तकाच्या माध्यमातून ‘भारतात उच्चवर्ग मागासवर्गांवर अत्याचार करतो’, असे खोटे प्रसारित करणे
अशी समाजस्थिती असतांना आपल्याला सांगितले जाते, ‘भारतामधील उच्चवर्ग मागासवर्गांवर अत्याचार करत असे, त्याला कोणता आधार आहे ?’ त्याचे उत्तर आहे, ‘स्कॉटिश इतिहासकार, अर्थतज्ञ आणि राजकीय लेखक जेम्स मिलचे पुस्तक ‘द हिस्ट्री ऑफ ब्रिटीश इंडिया’. ३ खंडांचे ते पुस्तक वर्ष १८१८ मध्ये प्रकाशित झाले. पुढे त्याचा विस्तार ६ खंडांमध्ये केला. ‘एडिंबर युनिव्हर्सिटी’तील शिक्षणानंतर धर्मगुरु बनण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वर्ष १८०२ मध्ये जेम्स मिल इंग्लंडमध्ये गेले. त्यांच्यापेक्षा २५ वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या जेरेमी बेनथॅम (Jeremy Bentham) आणि विल्यम ॲलन (William Allen) अशा उपयुक्ततावादी (Utilitarianists) लेखकांच्या प्रभावाखाली वर्ष १८०८ मध्ये आल्यापासून जेम्स मिल जहाल आणि भारतविरोधी साहित्य लिहू लागले. त्यांचे आवडते विषय होते, ‘कॉलनींना (वसाहतींना) गुलामगिरीमध्ये कसे राखावे’, ‘कॉलनींमधून अधिकाधिक राजस्व कसे पिळून काढावे’, ‘सर्व कैद्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी कारागृहाची रचना कशी असावी (Panopticon)’ इत्यादी. त्याच सुमारास जेम्स मिलने ‘द हिस्ट्री ऑफ ब्रिटीश इंडिया’ या पुस्तकाच्या लेखनास प्रारंभ केला. विशेष म्हणजे ‘स्वतः कधीही भारतात गेलो नसतांना आणि एकही भारतीय भाषा अवगत नसतांना आपण हे पुस्तक लिहिले’, असे दुराभिमानाने जेम्स मिल नेहमी सांगत असे.
‘त्या काळामध्ये युरोपमध्ये, विशेषतः ब्रिटनमध्ये राजेशाही आणि सरंजामशाही यांचा जबरदस्त पगडा होता अन् सरंजामशाहीच्या जुलुमाखाली सामान्य जनता भरडून निघत होती. अमेरिका आणि युरोप येथे गुलामगिरीमुळे ‘भेदभाव’ अन् ‘सामाजिक एकत्रीकरण’ हे प्रश्न होते. उपद्रव, जुलूम (Oppression) आणि भेदभाव हे सर्वत्र बोकाळलेले होते. तशीच अवस्था भारतवर्षात असणार’, या विचाराने ‘भारतामधील उच्चवर्ग मागासवर्गांवर अत्याचार करतो’, असे चित्र जेम्स मिलने या पुस्तकात रंगवले.
वर्ष १८१८ पर्यंत ‘Jurisprudence’, ‘Prisons’, ‘Government’ आणि ‘Law of Nations’ ही जेम्स मिल लिखित पुस्तके प्रकाशित झाली. योगायोगाने वर्ष १८१८ मध्येच जेम्स मिलना ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन कार्यालयामधील ‘Examiner of Indian Correspondence’ (भारतीय पत्रव्यवहाराचे परीक्षक) या विभागात नोकरी मिळाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात जाणार्या सर्व प्रशासकीय अधिकार्यांना जेम्स मिलच्या पुस्तकांचे, विशेषतः ‘द हिस्ट्री ऑफ ब्रिटीश इंडिया’चे वाचन वर्ष १९४७ पर्यंत अनिवार्य होते. त्यामुळे वर्ष १८१८ नंतर भारतात आलेले सर्व ब्रिटीश अधिकारी जेम्स मिलच्या ‘भारतविरोधी’ विचारांनी प्रभावित झालेले होते. पुढे वर्ष १८३० पर्यंत जेम्स मिलची उन्नती ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘कार्यालय प्रमुख’ या पदापर्यंत झाली. वर्ष १८३० च्या सुमारास जेम्स मिलच्या संपर्कात कुख्यात थॉमस मेकॉले (Lord Thomas Babington Macaulay, वर्ष १८०० ते १८५९) आले. जेम्स मिलने मांडलेला सिद्धांत जित ‘देशांची संस्कृती आणि शिक्षणपद्धत नष्ट करून त्यावर जेत्या देशाची संस्कृती अन् शिक्षणपद्धत लादून कॉलनींवर पक्का पगडा बसवणे’, हे थॉमस मेकॉलेने ब्रिटीश संसदेच्या गळी उतरवले आणि वर्ष १८३५ मध्ये भारतावर थोपवले.
७. भारतीय समाजाचे विघटन (Social Re-engineering)
‘भारतामधील उच्चवर्ग मागासवर्गांवर अत्याचार करतो’, या सिद्धांताचा उगम कुठे आहे, हे आता आपल्या लक्षात येईल. सन १८१८ पर्यंत भारतामध्ये अस्तित्वात नसलेली ‘जातीयता’ आणि ‘उच्चवर्ग-मागासवर्ग यांमधील तेढ’ इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा’ (Divide and Rule) या नीतीने भारतामध्ये रुजवली. थॉमस मेकॉलेच्या ब्रिटीश शिक्षणपद्धतीचा उद्देश होता, ‘ब्रिटिशांच्या भांड्याने पाणी पिणार्या आणि त्यांच्यासह एकनिष्ठ रहाणार्या भारतियांचा संच निर्माण करायचा, ज्याचे रक्त अन् रंग जरी भारतीय असला, तरी त्यांची पसंती, विचार, नैतिकता आणि बुद्धीमत्ता इंग्लिश असतील. (To create a pool of Indians capable of serving British interests and remaining loyal to them. This group would be “Indian by blood and colour, but English by tastes, opinions, morals, and intellect.”)’
सन १८१८ पासून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी संपूर्ण भारतात वरीलप्रमाणे पद्धतशीर सामाजिक विघटन चालू केले. परिणामतः जेम्स मिलच्या ‘भारतविरोधी’ विचारांनी प्रभावित झालेले ब्रिटीश प्रशासकीय अधिकारी आणि थॉमस मेकॉलेने भारतावर थोपलेली शिक्षणपद्धत हे दोन्ही सन १८५७ च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धास (Sepoy Mutiny) उत्तरदायी होते, असे अनेक ब्रिटीश इतिहासकारांनी लिहिलेले आहे.
अमेरिकेतील ‘सोफिया युनिव्हर्सिटी’तील प्राध्यापक कुंदन सिंह यांनी ‘जेम्स मिलचा वरील सिद्धांत आणि भारतीय समाजाचे विघटन’ या विषयांवर सखोल विश्लेषण अन् लेखन केलेले आहे, तसेच ‘भारतातील आरक्षण’ या विषयावर डॉ. नेहा दास यांचे विश्लेषण आणि लेखन समग्र आहे.
(क्रमशः)
– विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), पुणे. (१८.२.२०२६)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1012342.html
संपादकीय भूमिकाउच्च-नीचतेची बीजे इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा’ या धोरणात असून आताच्या सरकारने गुलामगिरीची जोखडे फेकून द्यावीत ! |
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !