श्री अनंतानंद साईश प्रकटदिनी ।
साधकांसाठी आनंदाची पर्वणी ।।

रामनाथी (गोवा) – ९ फेब्रुवारी म्हणजे श्री अनंतानंद साईश यांचा दिनांकानुसार प्रकटदिन ! सनातनच्या साधकांना गुरुपरंपरेचे आशीर्वाद नेहमीच लाभत असतात. साधकांच्या साधनेला ऊर्जा देण्यासाठी या दिवशी आणखी एक सुवर्णयोग जुळून आला. या गुरुपरंपरेच्या आशीर्वादस्वरूपात त्या दिवशी आश्रमातील एका सत्संगाद्वारे ३ साधिकांच्या आध्यात्मिक उन्नतीची घोषणा करण्यात आली. प्रेमभाव, सेवेची तळमळ, श्री गुरूंप्रती अतुट श्रद्धा आणि कृतज्ञताभाव आदी विविध गुण असलेल्या श्रीमती क्षमा राणे (वय ७५ वर्षे), रायचूर (बागलकोट, कर्नाटक) येथील सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी (वय ६९ वर्षे) आणि त्यांची मुलगी डॉ. (सौ.) संगीता चौधरी (वय ४५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिली. त्यामुळे हा दिवस आश्रमातील साधकांसाठी खर्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरला.
या आनंदमय क्षणी आश्रमात त्यांच्या समवेत सेवा करणारे काही साधक उपस्थित होते. डॉ. (सौ.) संगीता चौधरी यांचे पती श्री. श्रीकांत चौधरी आणि संगीता यांची बहीण सौ. सौम्या कुदरवळ्ळी, भाचा कु. नंदन कुदरवळ्ळी यांनी भ्रमणभाषवरून या सोहळ्याचा आनंद घेतला.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती राणेकाकू यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !

१. सर्वांच्याच आधार बनलेल्या राणेकाकू !
साधनेच्या आरंभी आम्ही प्रसारात सेवा करत असू आणि मध्ये मध्ये सुखसागर येथेही जात होतो. तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यात राणेकाकूंचे नाव असायचे. प्रसाद म्हटला की, राणेकाकू ! कुणाच्या विवाहासाठी भेट द्यायची, तर राणेकाकू ! गुरुदेवांना काही लागले, तर ते राणेकाकूंना विचारण्यास सांगायचे. काकू सुखसागर येथे स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधिकांना दिशा द्यायच्या.

२. अनेक सेवांमधील राणेकाकूंचा सहभाग !
काही शिवण करायचे असेल, गाद्या-उशांच्या खोळी, आसंद्या अथवा संगणक यांचे कव्हर, बेकरीच्या मशीनला कव्हर, पडदे ही सेवा त्यांनी अन्य साधकांच्या साहाय्याने केली. आश्रमात साधकांसाठी आलेल्या आंब्यांचे वाटप, त्यावरील प्रक्रिया आदी कोणतीही सेवा असो ! तुम्ही कुठेही दृष्टी फिरवली, तरी त्या वस्तू पाहून काकूंची आठवण येते. त्या ग्रंथ विभागातही सेवा करतात. काकूंचा सहभाग नाही, अशा फार अल्प सेवा असतील. कोणत्याही सेवांच्या संदर्भात ‘काकूंकडून दिशा घ्यावी, त्यांना विचारावे,’ असे प्रत्येकालाच वाटायचे. त्यांनी त्या सेवांविषयी दिशा देऊन अनेक साधकांना सिद्ध केले.
३. श्री गुरूंचे आज्ञापालन म्हणून बेकरीत बिस्किटे बनवण्यास झालेला आरंभ !
गुरुदेवांना अपेक्षित होते की, आश्रमात बिस्किटे बनवावीत; पण त्या वेळी आपल्याकडे त्यासाठी अपेक्षित यंत्रणा उपलब्ध नव्हती. काकूंनी छोट्या छोट्या प्रमाणात प्रयोग करायला आरंभ केला. गुरुदेवांनी अनेक दृष्टीकोन देऊन काकूंना दिशा दिली. ‘आपत्काळात काही उपलब्ध नसेल, तेव्हा बिस्किटे किंवा अन्य काय बनवता येईल ? ते पहा !’, असे गुरुदेव सांगत. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काकू पुढचे पुढचे प्रयोग करू लागल्या.
४. राणेकाकू यांची अनासक्ती
काकूंना कशाचीही आसक्ती नाही. आधीपासूनच त्यांचे जीवन केवळ साधनेसाठीच आहे. राणेकाका असतांनाही तसेच होते आणि त्यांच्या मृत्यूनंतरही काकूंनी ‘आश्रमच माझे घर आहे’, या विचाराने स्वत:ला पूर्ण समर्पित केले. कौटुंबिक प्रसंगांना स्थिरतेने सामोरे गेल्या. वैराग्याप्रमाणे त्यांचे जीवन असून त्यांना मायेचे आकर्षण नाही.
५. ‘इतरांकडून अपेक्षा’, ‘पूर्वग्रह असणे आणि ते व्यक्त करणे’, ‘नकारात्मक विचार,’ असे काकूंच्या साधनेतील अडथळे होते; मात्र आता त्यांच्यातील पालट अनेकांनी अनुभवलेला आहे. वर्षभरामध्ये त्यांनी या मुख्य अडथळ्यांवर मन लावून आणि तळमळीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज त्यांनी हा स्तर गाठला आहे.
६. श्री गुरूंची राणेकाकूंना आध्यात्मिक प्रगतीरूपी प्रसादस्वरूप भेट !
काकू बेकरी विभागातील अन्य साधकांच्या साहाय्याने विविध पदार्थ, बिस्किटे बनवतात. आश्रमात बनवलेली बिस्किटे प्रसाद म्हणून आश्रमात येणारे अतिथी, शिबिरार्थी यांना आपण देत असतो. ही बिस्किटे प्रत्येकालाच आवडतात. काही जण ‘हाच प्रसाद द्या’, असे आवर्जून मागवून घेतात. समाजात असलेल्या अनेक बेकरींमध्ये आपल्यापेक्षा अनेक प्रकारचे पदार्थ बनतात; पण आपली बिस्किटे गुरुदेवांच्या संकल्पाने होत आहेत आणि सेवा करणारे साधक नामजप करत करतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनाही आश्रमातील बिस्किटांमधील सात्त्विकता अनुभवता येते. गुरुदेव आधी सांगायचे की, १-२ बिस्किटे खाल्ली, तरी पोट भरल्यासारखे वाटले पाहिजे. त्याचीच प्रचीती आता येते. एरव्ही काकू आणि साधक सर्वांना प्रसाद देत असतात. आज गुरुदेवांनीच त्यांना आध्यत्मिक प्रगतीरूपी प्रसादस्वरूप भेट दिली आहे. त्यांनी या सर्व सेवांद्वारे समष्टी रूपातील भगवंताला प्रसन्न करून घेतले आहे आणि आपल्या जन्माचे सार्थक केले आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सौ. विजयलक्ष्मी यांच्याविषयीचे कौतुकोद्गार !

१. सौ. विजयलक्ष्मीकाकू यांची होत असलेली आंतरिक साधना
काकूंना मराठी भाषा समजत नाही, तरी सत्संग ऐकत असतांना त्यांच्या चेहर्यावर हास्य आणि असे भाव आहेत की, त्यांना सर्वकाही समजत आहे. ‘शब्दांत जरी समजत नसले, तरी शब्दांच्या पलीकडले चैतन्य त्या सत्संगातून अनुभवत आहेत, त्यातील आनंद घेत आहेत’, असे जाणवते. साधनेची तळमळ असल्यास भाषेचे बंधन रहात नाही. आंतरिक स्तरावर साधकाची साधना चालूच रहाते, हे काकूंच्या उदाहरणातून श्रीगुरूंनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
२. सौ. विजयलक्ष्मीकाकूंमध्ये प्रचंड भाव असून अहं अल्प आहे !
काकूंकडे पाहून साधकांना त्यांच्यामध्ये लहान बाळासारखी निरागसता जाणवते; कारण त्यांच्यामध्ये श्रीगुरूंप्रती प्रचंड भाव असून अहं अल्प आहे. अहं अल्प असल्यामुळे त्यांचा चेहरा लहान मुलासारखा वाटतो. अनेक साधक त्यांना अधिक ओळखतही नाहीत; पण त्यांना पाहून पुष्कळ चांगले वाटते. अहं अल्प असला की, चेहरा कसा पालटतो, हे त्यांच्या उदाहरणातून शिकता येते.
आनंदवार्तांची घोषणा

१. श्रीमती क्षमा राणे यांच्या प्रगतीची अशी झाली घोषणा !
साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांच्या वृद्धीसाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अनौपचारिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गुरुकृपेने साधकांना वेगवेगळ्या सत्संगांचा लाभ होत असतो. व्यष्टी साधनेचे आढावे आणि प्रक्रियेचे सत्संग यांमुळे साधकांना होणारे लाभ, शिकायला मिळालेली सूत्रे आणि स्वत:मध्ये जाणवत असलेले परिर्वतन यांविषयी काही साधकांना विचारण्यात आले. प्रक्रियेचे प्रयत्न केल्यामुळे होणारा पालट चेहर्यावरही दिसतो. साधकांच्या चेहर्यावरील ताण न्यून होतो आणि आनंदी दिसू लागतो’, असा विषय चालू असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती राणे यांना पुढे बोलावून ‘साधनेच्या प्रयत्नांमुळे राणेकाकूंच्या चेहर्याकडे पाहून काय वाटते ?’ ते विचारले. त्या वेळी उपस्थित साधकांनी ‘त्यांचा चेहरा आनंदी आणि हसतमुख दिसतो. चेहर्यावर प्रकाश दिसतो. पूर्वी चेहर्यावर त्रस्तता, मन सतत काहीतरी विचार चालू असल्यासारखे जाणवायचे; पण आता त्यांच्याकडे पाहून मन शांत होते, स्थिरता आणि हलकेपणा जाणवतो. चेहरा पुष्कळ उजळला आहे’, असे सांगितले. त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती राणे यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता सर्वांना दिली.
२. सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी आणि डॉ. (सौ.) संगीता चौधरी यांच्या प्रगतीची अशी झाली घोषणा !
श्रीमती राणे यांची आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर ‘आजच्या सत्संगातून काय शिकायला मिळाले ?’ याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. दंडमुडी यांना विचारले. त्यांना मराठी भाषा येत नसल्याने त्यांनी त्यांचे विचार मातृभाषा तेलुगुमध्ये व्यक्त केले. यासह आढाव्यांमधून काय शिकायला मिळाले, हेही त्यांनी सांगितले. त्यांची मुलगी डॉ. (सौ.) संगीता यांनी त्याचे विश्लेषण केले.
त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘या दोघींचे बोलणे ऐकून काय वाटले ?’, असे साधकांना विचारले. त्यांच्या बोलण्यातून भावाची तरंगे, आनंद, शांती आणि भावजागृती होत असल्याचे साधकांनी सांगितले. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी पुढील काव्याद्वारे दोघींच्या आध्यात्मिक उन्नतीची घोषणा केली.
जन्म देऊनी मातेने स्थूल जग दाखवले लेकीला ।
आरंभ झाला तेथूनच भगवद्भेटीच्या प्रवासाला ।।
आश्रमी आली लेक, मागोमाग मायही आली ।
एकत्रित साधनेची सुरुवात आश्रमात झाली ।।
गुरुचरणी जाण्या मायलेकींनी धरला हातात हात ।
अन् चालू केला अध्यात्माचा दिव्य प्रवास ।।
मायलेकींच्या या नात्याला गुरुकृपेची झालर ।
संगतीने दोघींनी केला जन्म-मरणाचा फेरा पार ।।
आध्यात्मिक पातळी घोषित केलेल्या साधकांचे मनोगत

सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी
गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत आहे. त्यांच्या चरणांचे स्मरण होऊन आतून कृतज्ञता भरून येत आहे. मनात अन्य काहीच विचार नाही. ‘श्री गुरूंना अपेक्षित अशी माझी साधना अजून वाढू देत’, अशी प्रार्थना मनातून होत आहे. आनंद जाणवत आहे. बोलायला शब्दच सुचत नाहीत. जे काही झाले ते गुरूंच्या कृपेनेच झाले आहे. त्यांनीच केले आहे.
डॉ. (सौ.) संगीता चौधरी
मी काहीच प्रयत्न केले नाहीत, केवळ गुरुदेवांनी प्रयत्न करवून घेतले. त्यांनीच आयुष्यातील हा सुंदर क्षण अनुभवायला दिला, त्यामुळे पुष्कळ कृतज्ञतेने दाटून येत आहे. मनात अन्य काहीच विचार नाही, केवळ गुरुदेवांचे आणि त्यांच्या चरणांचे स्मरण होत आहे.
श्रीमती क्षमा राणे
वास्तविक ही जी आध्यात्मिक पातळी मी गाठली आहे, ती मी नाही, सौ. सुप्रिया माथूर यांनाच मी त्याचे श्रेय देते. ‘गुरुबीन कौन बतावे बाट । बडा बिकट यमघाट ।।’ (कबीरदास सांगतात की, आयुष्यात मोक्ष मिळवण्याचा किंवा कठीण यमघाट (मृत्यू/अंधार) पार करण्याचा मार्ग गुरूंशिवाय कुणीही सांगू शकत नाही.) हा यमघाट तर पुष्कळ कठीण आहे. त्यात माझे स्वभावदोष पुष्कळ होते. ते घालवणे मला शक्य नव्हते; पण तिने जे वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि चिंतन करायला सांगितले, त्या चिंतनातून जे घडले, ते आज समोर आहे. माझ्या प्रगतीचे ९९ टक्के श्रेय सौ. सुप्रियाताईला आणि १ टक्का माझ्याकडे आहे. ‘गुरुगोविंद दोऊ खडे, काके लागू पाय । बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय ।।’ (अर्थ : जर गुरु आणि गोविंद (ईश्वर) दोघेही एकाच वेळी समोर उभे असतील, तर आधी कुणाला नमस्कार करावा ? याचे उत्तर आहे, गुरूंना ! कारण गुरूंनीच आपल्याला ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे.) तिन्ही गुरु म्हणजे गोविंदच आहेत, त्या गोविंदापर्यंत पोचण्यासाठी जे अंत:चक्षू लागतात, ते मला सुप्रियाताईने दिले. त्यामुळे मी पहिले सुप्रियाताईलाच वंदन करीन, मग ३ गुरूंना (तीन गुरु म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) वंदन करीन.
प्रगती केलेल्या साधकांची त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. श्रीकांत चौधरी (डॉ. (सौ.) संगीता चौधरी यांचे पती आणि सौ. दंडमुडी यांचे जावई)
सासूबाई (सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी) साधनेचे प्रयत्न कसे करतात ? याविषयी संगीता नेहमी मला सांगत असते. ते ऐकून भावजागृती होते. त्यामुळे ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे’, असे वाटत होते. त्यांची मायेची ओढ पूर्णच गेली आहे. ‘साधनाच करायची आहे’, हा विचार ठाम आहे. संगीताच्या आध्यात्मिक प्रगतीविषयीही पुष्कळ कृतज्ञता वाटली. तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे. आधी संगीता हिला काही गोष्टींचा रागही यायचा. या १५ दिवसांत १ दिवसही ती काही नकारात्मक बोलली नाही. आईकडे आणि आश्रमातील साधकांकडे सकारात्मक आणि शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहाते. तिचे साधनेचे प्रयत्न चांगले चालू आहेत. माझ्या आई-वडिलांशी बोलून त्यांना वैद्यकीय दृष्टीने साहाय्य करते. माझी आई आधी माझ्याशी अधिक बोलायची. आता संगीताशी आपलेपणा वाटत असल्याने तिच्याशी अधिक बोलते. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची कृपा यांमुळेच तिच्यामध्ये पालट झाले, यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !
२. सौ. सौम्या कुदरवळ्ळी (सौ. दंडमुडी मुलगी आणि डॉ. (सौ.) संगीता चौधरी यांची बहीण)
पुष्कळ कृतज्ञता वाटली. आई बोलत असतांना कृतज्ञतेने डोळे भरून येत होते. साधनेच्या पहिल्या दिवसापासून तिच्या मनात गुरुदेवांप्रती भाव वाढतच गेला आहे. संगीताताई बोलतांना पुष्कळ आनंद वाटत होता. साधनेसाठी तिने पुष्कळ साहाय्य केले. दिवसातून एकदा तरी तिच्याशी मी बोलतेच. ती जे सांगते ते ऐकून करूया, एवढेच मनात असते. ताईने साधनेत पुष्कळ कष्ट घेतले आहेत. घरी मला काही अडचण आली किंवा मला त्रास होत असेल, तर नंदन (सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांचा मुलगा) सांगतो, ‘आधी संगीतामावशीला भ्रमणभाष कर’; कारण त्याला ठाऊक आहे की, तिच्याशी बोलल्यानेच मी बरी होते. घरातील सर्वांनाच ती सांभाळते. असा साधिका मी पाहिली नाही. तिचे पुष्कळ कौतुक वाटते.
३. कु. नंदन कुदरवळ्ळी (सौ. दंडमुडी यांचे नातू आणि डॉ. (सौ.) संगीता चौधरी यांचा भाचा)
आजी कुणाशीही बोलतांना ती सकारात्मक आणि आनंदी असते. जेव्हा साहाय्य हवे, तेव्हा ती लगेच करते. संगीता मावशीची तळमळ पुष्कळ आहे. मावशी गुरुदेवांशी संदर्भातील काही अनुभूती सांगतांना त्या ऐकतच रहाव्यात, असे वाटते. तिच्या बोलण्यात चैतन्य जाणवते.
४. श्री. अतुल दिघे (श्रीमती राणे यांचा भाचा)
आम्हा तिघांना (मी माझी पत्नी आणि मुलगी यांना) साधनेत आणणार्या राणेकाकूच आहेत. त्यांच्यामुळेच आम्हाला गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळाले. साधनेतही त्याच आम्हाला सगळे सांगायच्या. आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली, मगच आम्ही साधनेला लागलो. त्या मला आईसमानच आहेत. लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी बरेच साहाय्य केले आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. त्यांच्यामुळेच आम्ही सगळे साधना करू शकत आहोत. त्या त्यांच्या कर्तव्याचे पूर्ण पालन करतात. मागच्या ३-४ वर्षांत त्यांचे व्यापकत्व पुष्कळ वाढले आहे. ‘स्वत:साठी काही न करता इतरांसाठी काय करू ?’, हाच त्यांच्या मनात विचार असतो. त्यांची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे ऐकून पुष्कळ आनंद झाला.
५. सौ. अवंतिका दिघे (श्री. अतुल दिघे यांच्या पत्नी आणि श्रीमती राणेकाकू यांची सून)
विवाहानंतर राणेकाकू मला साधनेविषयी सांगायच्या. ऑस्ट्रेलियामध्ये असतांना आम्हाला साधनेबद्दल असलेले प्रश्न आम्ही त्यांना दूरभाष करून विचारायचो. त्यावर त्या पत्र लिहून उत्तर द्यायच्या. आम्हाला दत्त आणि कुलदेवी यांचा नामजप करण्यास सांगितला होता. ‘तो केला कि नाही ?’, याविषयी त्या विचारायच्या. नामजपाचे महत्त्व पटवून द्यायच्या. त्यांनी आम्हाला केलेल्या साहाय्यामुळे आम्ही साधनेत टिकून राहिलो.
६. कु. गार्गी दिघे (श्री. अतुल दिघे यांची कन्या आणि श्रीमती राणेकाकू यांची नात)
लहानपणापासून मी तिला कष्ट करतांना, साधना करतांना पाहिले आहे. सध्या मी जी काही साधना करत आहे, ती मी तिच्याकडूनच शिकले. ‘ती बोलतांना गुरुदेवच तिच्या माध्यमातून बोलतात’, असे वाटते. मी पुष्कळ भाग्यवान आहे की, मला अशी आजी मिळाली.
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !