परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांची १५ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त…
‘परात्पर गुरु पांडे महाराज यांचे वास्तव्य सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात होते. ३.३.२०१९ या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीला सायंकाळी ५.२२ वाजता त्यांचे निर्वाण झाले. (‘निर्वाण होणे’, म्हणजे परात्पर गुरूंचा शिवात्मा सत्यलोकात जाणे.) त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मला जाणवलेली त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

१. वेळेचे पालन करणे
हा त्यांचा स्थायीभाव होता. वयाच्या ९१ व्या वर्षीही ते प्रत्येक कृती अगदी घड्याळाच्या काट्यानुसार करत. त्यात कधी एक मिनिटही इकडे-तिकडे होत नसे.
२. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणे
ते अत्यंत खणखणीत आवाजात संस्कृत श्लोकांचा उच्चार करत असत, तसेच त्यांचा भावार्थही साधकांना सांगत असत.
३. ते ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध असूनही स्वतःला ‘आश्रमातील एक साधा साधक’ म्हणवून घेत असत.
४. आसनशुद्धी करणे
ते आसंदीवर बोटाने श्रीयंत्र काढून नंतरच आसंदीवर आसनस्थ होत असत. अशी आसनशुद्धी करण्याची सवय त्यांनी आम्हा साधकांनाही लावली होती.

‘सुश्री मधुरा भोसले यांचा लेख वाचून मोक्षगुरु परात्पर गुरु पांडे महाराज यांची महती कळली. सुश्री मधुरा यांना मिळालेल्या सूक्ष्म ज्ञानातून लक्षात येते की, परात्पर गुरु पांडे महाराजांनी सत्ययुगाच्या प्रारंभी संतपद गाठले, तरीही ते प्रत्येक जन्मात अखंड शिष्यभावातच राहिले. साधकांवरील प्रीती आणि संशोधक वृत्ती यांमुळे त्यांनी साधकांना होणार्या त्रासांवर विविध उपाय शोधून काढले. ‘असे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही अहंशून्य असलेले मोक्षगुरु सनातनला लाभले’, हे आमचे केवढे भाग्य ! त्यांनी सनातनवर केलेल्या कृपावर्षावाबद्दल आम्ही त्यांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहोत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.२.२०२६)
५. कार्यक्रमाचा आरंभ ‘ॐ’काराने करून कार्यक्रमस्थळाची शुद्धी करणे
कोणत्याही कार्यक्रमाचा आरंभ ते ‘ॐ’काराने करत. ‘त्या ‘ॐ’काराच्या लहरी ब्रह्मांडपोकळीत पसरत आहेत आणि कार्यक्रमस्थळाची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवत असे.
६. ऋषिमुनींप्रमाणे संशोधक वृत्ती असणे
ते साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असत. या उपायांमध्ये ते आद्य शंकराचार्य यांच्या ‘सौंदर्यलहरी’ या ग्रंथामधील विविध देवतांच्या यंत्रांचे उपाय करत असत, उदा. शिवाचे मृत्युंजय यंत्र इत्यादी, तसेच ते नाथपंथातील ग्रंथ आणि अन्य धर्मग्रंथ यांत विविध समस्यांवर सांगितलेले मंत्र अन् यंत्र यांचे उपाय शोधून काढत असत, उदा. ते ताप उतरवण्याचे संबंधित देवतांचे मंत्र सांगत असत. त्यांच्यामध्ये ऋषिमुनींप्रमाणे संशोधक वृत्ती असल्यामुळे या उपायांचा प्रयोग ते ईश्वरी प्रेरणेने साधकांवर करत असत. ते नित्य नवीन उपायपद्धती शोधून काढत असत. त्यामुळे त्यांनी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होते.
७. ज्ञानगुरु
त्यांनी स्वतःकडे अनेक प्राचीन ग्रंथ जपून ठेवलेले होते. ते सतत त्यांतील काही संदर्भांचे वाचन करत असत. ते ज्ञानगुरु असल्याने देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येणार्या जिज्ञासूंना साधनेसाठी आवश्यक असलेल्या सूत्रांविषयीच नेमकेपणाने मार्गदर्शन करत असत. हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
८. अनुभूती
परात्पर गुरु पांडे महाराज यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘आधुनिक काळातील तपस्वी ऋषींचेच दर्शन होत आहे’, असे जाणवणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांचा जन्म या घोर कलियुगात होऊनही ते लहानपणापासून निर्वाणापर्यंत ‘धोतर, सदरा, कोट आणि टोपी परिधान करणे अन् कपाळाला गंध लावणे’, असे कठोर धर्माचरण करत असत, तसेच ते संतुलित आणि सात्त्विक आहार घेत असत. ते नियमितपणे व्यायाम करून आदर्श विहार करत असत आणि आदर्श जीवनशैली जगत असत. त्यामुळे त्यांचे छायाचित्र पाहिल्यावर मला ‘आपल्याला आधुनिक काळातील तपस्वी ऋषींचेच दर्शन होत आहे’, अशी अनुभूती येते.’
– सुश्री मधुरा भोसले
परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांनी विविध युगांत केलेली साधना आणि त्यांच्या साधनेचे वैशिष्ट्य !

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विविध मार्गांनी साधना करून अल्पावधीतच ‘ईश्वराचा परम प्रिय भक्त’, हे अत्युच्च आध्यात्मिक पद प्राप्त करणे
‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांच्या मागील जन्मांमध्ये विविध मार्गांनी साधना केली. जेव्हा त्यांनी भक्तीयोगानुसार साधना केली, तेव्हा त्यांनी भक्तीयोगातील कर्मकांडाच्या अंतर्गत विविध मंत्र सिद्ध केले आणि यज्ञयागादी वैदिक कर्मे केली. त्याचप्रमाणे त्यांनी श्री गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी ‘श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन (पूजा), वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन’, या नवविधा भक्तीही केल्या. त्यामुळे त्यांच्या सकाम साधनेचे रूपांतर निष्काम साधनेत होऊन त्यांनी अल्पावधीतच ‘ईश्वराचा परम प्रिय भक्त’, हे अत्युच्च आध्यात्मिक पद प्राप्त केले.
२. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देवतांची विविध साधनामार्गांनी केलेली उपासना !


टीप १ – परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामधील सिद्ध झालेल्या मंत्रशक्तीच्या दैवी सामर्थ्यामुळे त्यांनी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या असंख्य साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून त्यांचे आध्यात्मिक त्रास दूर केले. त्याचप्रमाणे अनेक पतित जिवांचे पापक्षालन करून त्यांना मुक्ती दिली आणि भूत, प्रेत, राक्षस, पिशाच इत्यादी आसुरी योनींत अडकलेल्या अनेक जिवांना सद्गती दिली. अशा प्रकारे परात्पर गुरु पांडे महाराज यांचे आध्यात्मिक सामर्थ्य अद्वितीय होते.
टीप २ – श्री गणेशाच्या कृपेने परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘श्री गणेश अध्यात्मदर्शन’, हा ग्रंथ लिहिला.
टीप ३ – परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामध्ये विकसित झालेल्या दैवी गुणांमुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व आदर्श आणि परिपूर्ण झाले होते.
३. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे विविध युगांतील जन्म, त्यांची शिष्यावस्था आणि त्यांना लाभलेले विविध मार्गदर्शक गुरु
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी आतापर्यंत पृथ्वीवर ७ जन्म घेतले आहेत. त्यांनी विविध जन्मांमध्ये शिष्यावस्थेत राहून विविध साधनामार्गांनी व्यष्टी आणि समष्टी साधना केली अन् ऋषींच्या विविध स्तरांवरील श्रेणी प्राप्त केल्या. प्रत्येक जन्मात त्यांचे मार्गदर्शक गुरु हे वेगवेगळे ऋषिमुनी होते.

टीप – परात्पर गुरु पांडे महाराजांनी सत्ययुगाच्या प्रारंभी संतपद गाठले आणि पुढील जन्मांमध्ये त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली. असे असले तरी, ते शिष्यावस्थेत राहून विविध महान ऋषींना गुरु करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यष्टी आणि समष्टी साधना करत होते. हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
४. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या चरणी साधिकेने अर्पिलेले कृतज्ञतापुष्प !
मोक्षगुरुपदावर असूनही अखंड शिष्यभावात रहाण्याची थोर शिकवण मोक्षगुरु असलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून आपल्याला मिळते. अशा सर्वार्थांनी आदर्श असणार्या ऋषितुल्य मोक्षगुरु परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी मी काव्य सुमनांजली अर्पित करते.
त्रैलोक्याचा नाथ आमुचा सदा सांगाती, सदा सांगाती ।
कशी वर्णावी मोक्षगुरु परात्पर गुरु पांडे महाराजांची महती ।।’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ५.२.२०२६, वेळ दुपारी : २.२० ते ३ आणि कालावधी : ४० मिनिटे; ज्ञानाचे टंकलेखन अन् संकलन करण्याचा दिनांक : ५.२.२०२६ आणि एकूण कालावधी : १ घंटा)
|
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !