Assam SIR : ‘आसाम मुसलमानबहुल प्रदेश बनू शकतो’ ही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची चिंता ठरली खरी !

  • विधानसभा निवडणुकीपूर्वी विशेष सखोल मतदार सूची पुनरावलोकन पूर्ण

  • ८ मुसलमानबहुल जिल्ह्यांत मतदारवाढ

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी विशेष मतदार सूची पुनरावलोकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात ५ लाख ८६ सहस्र नवी नावे समाविष्ट करण्यात आली, तर २ लाख ४३ सहस्र नावे वगळण्यात आली आणि अंतिम मतदार सूची सिद्ध करण्यात आली. एकूण मतदारसंख्या अल्प झालेली असतांनाही सुधारित सूचीमध्ये  ८ मुसलमानबहुल जिल्ह्यांत मतदारसंख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे.

१. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार आसामच्या ३५ जिल्ह्यांपैकी केवळ १० जिल्ह्यांत मतदारसंख्या वाढली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने लोकसंख्यात्मक पालट आणि मतदारवाढ यांचे हे कल महत्त्वाचे मानले जात असून मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला हे आकडे दुजोरा देत असल्याचे दिसते.

२. एकूण २४ जिल्ह्यांत मतदारसंख्या अल्प झाली, तर मुसलमानबहुल जिल्ह्यांत वाढ दिसून आली. वर्ष १९५१ मध्ये आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या सुमारे १२ टक्के होती, ती २०११ च्या जनगणनेपर्यंत सुमारे ३४ टक्क्यांपर्यंत वाढली. काही जिल्ह्यांत हा टक्का ५० पेक्षा अधिक झाला आहे. अनेक भागांत लोकसंख्येचा समतोल वेगाने पालटत आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली चिंता

मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी राज्यातील पालटत्या लोकसंख्यात्मक रचनेविषयी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. सध्याचा प्रवाह असाच चालू राहिल्यास वर्ष २०४१ पर्यंत आसाम मुसलमानबहुल राज्य बनू शकते, असे त्यांनी विविध सार्वजनिक मंचांवर म्हटले आहे.

‘हीच गती कायम राहिल्यास आगामी जनगणनांमध्ये मुसलमान लोकसंख्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक होऊ शकते, ज्याचा राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय रचनेवर परिणाम होऊ शकतो’, असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून भूमी, संसाधने, राजकीय प्रतिनिधित्व आणि स्थानिक समुदायांची ओळख यांच्याशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले.

विशेष पुनरावलोकनानंतर मुसलमानबहुल जिल्ह्यांत दिसून आलेल्या मतदारवाढीच्या आकडेवारीमुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली चिंता अधोरेखित होत असल्याचे चित्र आहे.