Murshidabad Babri Masjid : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे बाबरी मशिदीचे बांधकाम चालू !

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील बेलडांगा भागात ११ फेब्रुवारीपासून बाबरी मशिदीचे बांधकाम चालू झाले. ‘जनता उन्नयन पक्षा’चे अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायू कबीर यांच्याकडून ही मशीद बांधली जात आहे. कबीर यांनी दावा केला की, पुढील २ वर्षांत या मशिदीचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या मैदानात मशीद बांधली जात आहे, त्याला ‘बाबरी मशीद मैदान’ असे संबोधले जात आहे.

हिंदु संघटनांकडून विरोधासाठी मोर्चा काढण्याची सिद्धता

या बांधकामाला हिंदु संघटनांनी आक्षेप घेतला असून मुर्शिदाबादकडे मोर्चा काढण्याची सिद्धता चालू आहे. आमदार हुमायू कबीर हेही बाबरी मशिदीसाठी यात्रा काढणार आहेत. २६५ किलोमीटरची ही यात्रा नदिया येथून चालू होऊन मालदा आणि मुर्शिदाबाद मार्गे उत्तर दिनाजपूर येथे समाप्त होणार आहे. याविषयी कबीर यांनी सांगितले की, काही स्वार्थी घटक बेलडांगा येथील बांधकामाविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याने लोकांना वस्तूस्थिती कळावी, हा त्यामागील उद्देश आहे.

बाबरी मशीद २ वर्षांत पूर्ण होईल, ५५ कोटी रुपये खर्च होतील ! – हुमायू कबीर

हुमायू कबीर

बाबरी मशिदीच्या बांधकामाविषयी आमदार हुमायू कबीर म्हणाले की, आम्ही अत्यंत आनंदी आहोत. अल्लाच्या कृपेने काम सुरळीत चालू आहे. काही लोक हे काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु अल्लाच्या साहाय्याने मशीद बांधण्याचे कार्य आज सुरक्षितपणे चालू झाले. बाबरी मशीद उभारण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मशिदीच्या प्रवेशद्वाराची उंची १४ मीटर आणि रुंदी ५ मीटर असेल. केवळ प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च होतील. अल्ला शक्ती देईल, तर ही मशीद २ वर्षांत पूर्ण होईल. जे लोक विरोध करत आहेत, त्यांना मी एवढेच सांगतो की, बाजूला व्हा. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म पाळण्याचा आणि मंदिर, चर्च किंवा इतर जे काही उभारायचे असेल ते उभारण्याचा अधिकार आहे. मी इस्लामच्या नावावर कोणताही विरोध करणार नाही. माझा प्रयत्न अल्लाला संतुष्ट करण्याचा आहे, कुणावर काही लादण्याचा नाही.

‘कयामत’च्या (पृथ्वीच्या अंताच्या) दिवसापर्यंत बाबरी मशीद उभी रहाणार नाही ! – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चेतावणी

योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील सभेत म्हटले की, आम्ही पूर्वी सांगितले होते की, रामलल्ला आम्ही येऊ आणि मंदिर त्याच ठिकाणी उभारू. अयोध्येत मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्ही ठामपणे सांगत आहोत की, कयामतच्या (पृथ्वीच्या अंताच्या) दिवसापर्यंतही बाबरी रचनेचे पुनर्निर्माण होणार नाही.

जे लोक कयामतचा दिवस येण्याचे स्वप्न पहात आहेत, ते तसेच नष्ट होतील; कारण तो दिवस कधीही येणार नाही.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीच हा आटापिटा चालू असला, तरी राजकीय स्वार्थाच्या नावाखाली भारतात बाबराच्या नावाने कोणतीही वास्तू किंवा मशीद उभी रहाणार नाही, यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !