व्यक्तीतील ‘ईश्वराप्रतीचा भाव’ हा घटक दर्शवणार्‍या ग्रहयोगांचे विवेचन !

‘अध्यात्मात ईश्वराप्रतीच्या भावाला पुष्कळ महत्त्व आहे. आध्यात्मिक भावामुळे साधकाला ईश्वराचे अस्तित्व अनुभवता येते, तसे त्याला जीवनाकडे पहाण्याची सकारात्मक आणि व्यापक दृष्टी लाभते. प्रत्येक साधकातील भावाचे स्वरूप निराळे असते. प्रस्तुत लेखात व्यक्तीतील ‘भाव’ हा घटक दर्शवणार्‍या ग्रहयोगांचे विवेचन केले आहे.   

(भाग १)

प्रतीकात्मक चित्र

१. आध्यात्मिक भावाचे महत्त्व

१ अ. ‘भाव’ म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव : ‘भाव’ म्हणजे ईश्वराला अनुभवण्याची जिवात असलेली क्षमता. व्यक्तीमध्ये भाव जितका अधिक, तितकी ती ईश्वराला अधिक प्रमाणात अनुभवू शकते. प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीप्रमाणे ईश्वराला अनुभवता येते. कुणी देवतेमध्ये, कुणी गुरूंमध्ये, कुणी निसर्गामध्ये, कुणी कर्मामध्ये, तर कुणी स्वतःमध्ये ईश्वराला अनुभवतात. कुणी ईश्वराच्या सगुण रूपाला, तर कुणी निर्गुण रूपाला अनुभवतात.

१ आ. व्यक्तीत भाव निर्माण होण्याची प्रक्रिया : सामान्य व्यक्ती अहंकेंद्रित जीवन जगत असते. अहंकार हा संकुचितता, अज्ञान आणि भेद निर्माण करतो. त्यामुळे व्यक्तीला जीवनात पदोपदी दुःख, असंतोष, अस्थिरता आणि अशांती अनुभवास येते. सत्संगामुळे किंवा आत्मपरीक्षणामुळे ‘अहं हेच आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे’, याची व्यक्तीला जाणीव होते. त्यामुळे ती आनंदाचा स्रोत असलेल्या तत्त्वाकडे लक्ष केंद्रित करते. आनंदाचा स्रोत असणारे तत्त्व म्हणजे ईश्वरी तत्त्व. ईश्वरी तत्त्व सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असल्यामुळे ते आनंदमय आहे. जेव्हा व्यक्ती या सर्वव्यापी तत्त्वाला अनुभवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या अंतःकरणात आनंदाचा झरा प्रवाहित होतो. या आनंदाची अनुभूती घेतल्यावर व्यक्ती पुनःपुन्हा ईश्वराला अनुभवण्याचा प्रयत्न करते आणि या तिच्या प्रयत्नांमुळे तिच्यात ‘भाव’ हा घटक विकसित होतो.

१ इ. व्यक्तीतील भावामुळे तिला जीवनात होणारे लाभ

श्री. यशवंत कणगलेकर

१. भावामुळे व्यक्तीचे जीवन ईश्वरकेंद्रित होते. तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो. ‘मी सर्वकाही ईश्वरासाठी करत आहे’ किंवा ‘ईश्वर माझ्याकडून सर्व करवून घेत आहे’, असा तिचा भाव निर्माण होतो.

२. ‘जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग ईश्वराने मला शिकवण्यासाठी आणि माझ्या उन्नतीसाठी घडवला आहे’, असा तिचा दृष्टीकोन बनतो. त्यामुळे जीवनातील प्रसंगांकडे ती सकारात्मकतेने पहाते.

३. ‘ईश्वर सर्वव्यापी आहे’, या जाणिवेमुळे व्यक्ती निर्जीव वस्तू, वृक्ष-वनस्पती, पशू-पक्षी, अन्य व्यक्ती आदींमध्येही ईश्वराला पहाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्यात सर्वांविषयी प्रीती निर्माण होते.

४. ‘विश्वातील प्रत्येक गोष्टीतून ईश्वर स्वतःलाच व्यक्त करत आहे’, या जाणिवेमुळे व्यक्तीला सर्वत्र ईश्वराचेच दर्शन होते. त्यामुळे तिच्या आनंदात वाढ होते.

५. ईश्वरी अनुसंधानामुळे व्यक्तीला सूक्ष्मातून ईश्वरी ज्ञान किंवा संकेत मिळतात. त्यामुळे तिला ईश्वराला अपेक्षित अशी कृती करता येते.

६. ‘आपल्याला मिळणारा आनंद इतरांनाही मिळावा’, यासाठी ती प्रयत्न करते. त्यामुळे तिच्यात व्यापकता येते.

२. ‘भाव’ या घटकाविषयीचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन

प्रत्येक व्यक्तीमध्ये भाववृद्धी करण्याची क्षमता असते; पण केवळ त्या भावाचे स्वरूप निराळे असते. जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीमध्ये असलेल्या भावाचे स्वरूप जाणता येते. भावाचे ‘व्यक्त’ आणि ‘अव्यक्त’ असे २ मुख्य प्रकार आहेत. त्यांच्याशी संबंधित ग्रहयोगांचे विवेचन पुढे दिले आहे.

२ अ. व्यक्त भाव : ‘व्यक्त भाव’ म्हणजे व्यक्तीचे नेत्र, वाणी, चेहरा, देहबोली आदींतून व्यक्त होणारा भाव. व्यक्त भाव हा मनःप्रधान आणि सगुण स्वरूपाचा असतो. मनाची संवेदनशीलता आणि कोमलता यांमुळे तो निर्माण होतो. व्यक्त भाव दर्शवणारे ग्रहयोग पुढे दिले आहेत.

२ अ १. ‘चंद्र’, ‘शुक्र’ आणि ‘गुरु’ यांचे परस्पर योग : ग्रहांमध्ये ‘चंद्र’ आणि ‘शुक्र’ हे ग्रह मनाच्या भावनांशी संबंधित आहेत. चंद्र हा वात्सल्य, करुणा, सहानुभूती आदी भावना दर्शवतो, तर शुक्र हा प्रेम, सुरक्षितता, स्नेह आदी भावना दर्शवतो. चंद्र आणि शुक्र यांचा ‘गुरु’ या ग्रहाशी शुभयोग असल्यास व्यक्तीमध्ये ईश्वराविषयी प्रेम आणि स्नेह निर्माण होऊ शकतो. अशा वेळी या ग्रहांचा ‘नेपच्यून’ या ग्रहाशी शुभयोग असल्यास व्यक्तीच्या भावामध्ये आणखी सूक्ष्मता आणि उत्कटता येऊ शकते.

२ अ २. ‘बुध’, ‘शुक्र’ आणि ‘गुरु’ यांचे परस्पर योग : ‘बुध’ हा ग्रह व्यक्तीच्या विचारांचे स्वरूप दर्शवतो. कुंडलीत बुधाचा ‘चंद्र’ आणि ‘शुक्र’ या ग्रहांशी योग असल्यास व्यक्तीचा कल अधिकतर प्रेम, सौंदर्य, कलात्मकता, सर्जनशीलता आदींकडे असतो. अशा वेळी या ग्रहांचा ‘गुरु’ आणि ‘नेपच्यून’ या ग्रहांशी शुभयोग असल्यास व्यक्ती प्रेम, सौंदर्य, कला आदींतून ईश्वराला अनुभवण्याचा प्रयत्न करते.

श्री. राज कर्वे

२ अ ३. ‘पृथ्वी’ आणि ‘जल’ तत्त्वांच्या राशी : वर दिलेले योग पृथ्वीतत्त्वाच्या राशी (वृषभ, कन्या आणि मकर) अन् जलतत्त्वाच्या राशी (कर्क, वृश्चिक आणि मीन) यांमध्ये होत असल्यास व्यक्तीत ‘व्यक्त भाव’ निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

२ आ. अव्यक्त भाव : ‘अव्यक्त भाव’ हा सहजतेने व्यक्त होत नाही; पण तो अंतःकरणात वृत्तीरूपात असतो. अव्यक्त भाव हा बुद्धीप्रधान आणि निर्गुण स्वरूपाचा असतो. व्यक्तीची विचारशीलता, अंतर्मुखता, विवेक आदींमुळे तो निर्माण होतो. अव्यक्त भावामुळे व्यक्तीमध्ये ईश्वराच्या समष्टी रूपाशी एकरूप होण्याची ओढ निर्माण होते. अव्यक्त भाव दर्शवणारे ग्रहयोग पुढे दिले आहेत.

२ आ १. ‘बुध’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांचे परस्पर योग : बुध ग्रह ‘विचार’, गुरु ग्रह ‘ज्ञान’ आणि शनि ग्रह ‘त्याग’ दर्शवतो. या ३ ग्रहांमध्ये होणारे परस्पर योग व्यक्तीमत्त्वात जिज्ञासा, चिंतनशीलता, विचारशीलता, सामंजस्य, अंतर्मुखता आदी वैशिष्ट्ये दर्शवतात. या वैशिष्ट्यांमुळे व्यक्ती अंतर्मुख होऊन जीवनाचा अर्थ शोधण्यास प्रवृत्त होते. ती निर्गुण ईश्वरी तत्त्वाला अनुभवण्याचा प्रयत्न करते, तसेच स्वतःला ईश्वराला अंश मानते.

२ आ २. ‘रवी’ या ग्रहाचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ या ग्रहांशी योग : ‘रवि’ हा ग्रह व्यक्तीतील आंतरिक आकांक्षा दर्शवतो. ‘रवी’ या ग्रहाचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ या ग्रहांशी योग असल्यास व्यक्तीत सत्यनिष्ठा असते. ती जीवनातील सत्यतत्त्वांना आणि उच्च आदर्शांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असते. तिच्यात ज्ञानशक्ती असते. त्यामुळे तिच्यात अव्यक्त भाव निर्माण होतो.

२ आ ३. ‘मंगळ’ या ग्रहाचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ या ग्रहांशी योग : ‘मंगळ’ हा ग्रह कर्मप्रधान प्रवृत्ती दर्शवतो. त्यामुळे ‘मंगळ’ या ग्रहाचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ या ग्रहांशी योग असल्यास व्यक्तीमध्ये समष्टीभाव असतो. ती समष्टीच्या हितासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित होते. त्याद्वारे तिच्यात व्यापकता येते. ती कर्माच्या माध्यमातून ईश्वराची सेवा करण्याचा प्रयत्न करते.

२ आ ४. ‘अग्नि’ आणि ‘वायु’ तत्त्वांच्या राशी : वर दिलेले योग अग्नितत्त्वाच्या राशी (मेष, सिंह आणि धनु) अन् वायुतत्त्वाच्या राशी (मिथुन, तूळ आणि कुंभ) यांमध्ये होत असल्यास व्यक्तीत ‘अव्यक्त भाव’ निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

वरील विवेचनावरून लक्षात येते की, प्रत्येक ग्रहयोग हा भावाचे निराळे पैलू दर्शवतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत ईश्वराप्रती भाव वृद्धींगत करण्याची क्षमता असते. व्यक्ती तिच्या प्रकृतीप्रमाणे ईश्वराला अनुभवू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात ईश्वरी तत्त्व सुप्तावस्थेत वास करते. त्या ईश्वरी तत्त्वाकडे लक्ष केंद्रित करून त्याला अनुभवण्याचा प्रयत्न केल्याने आनंदाची अनुभूती येऊ शकते.

३. उदाहरणे

अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : यांच्या कुंडलीत चंद्र-गुरु आणि शुक्र-गुरु हे व्यक्त भाव दर्शवणारे योग; तर गुरु-मंगळ, मंगळ-शनि, रवि-शनि आणि गुरु-शनि हे अव्यक्त भाव दर्शवणारे योग आहेत. त्यांच्यात व्यक्त भाव दर्शवणारे योग ३० टक्के असून अव्यक्त भाव दर्शवणारे योग ७० टक्के आहेत.

आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे : यांच्या कुंडलीत चंद्र-शुक्र, चंद्र-गुरु आणि शुक्र-गुरु हे व्यक्त भाव दर्शवणारे योग; तर बुध-शनि, रवि-मंगळ, रवि-गुरु आणि गुरु-मंगळ हे अव्यक्त भाव दर्शवणारे योग आहेत. त्यांच्यात व्यक्त भाव दर्शवणारे योग ४० टक्के असून अव्यक्त भाव दर्शवणारे योग ६० टक्के आहेत.

इ. पू. (सौ.) अश्विनी पवार : यांच्या कुंडलीत चंद्र-बुध, चंद्र-शुक्र, चंद्र-गुरु आणि गुरु-शुक्र हे व्यक्त भाव दर्शवणारे योग; तर शुक्र-शनि, गुरु-मंगळ आणि गुरु-शनि हे अव्यक्त भाव दर्शवणारे योग आहेत. त्यांच्यात व्यक्त भाव दर्शवणारे योग ५० टक्के असून अव्यक्त भाव दर्शवणारे योग ५० टक्के आहेत.

ई. पू. (कु.) दीपाली मतकर : यांच्या कुंडलीत चंद्र-बुध, चंद्र-शुक्र, चंद्र-गुरु आणि चंद्र-मंगळ हे व्यक्त भाव दर्शवणारे योग; तर बुध-गुरु, बुध-शनि, रवि-गुरु आणि रवि-शनि हे अव्यक्त भाव दर्शवणारे योग आहेत. त्यांच्यात व्यक्त भाव दर्शवणारे योग ५० टक्के असून अव्यक्त भाव दर्शवणारे योग ५० टक्के आहेत.’

– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.  (३.१२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काहीवेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक