नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना पू. (सौ.) अश्विनी पवार (डावीकडे)

देवद (पनवेल), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या विक्रोळी, मुंबई येथील श्रीमती दिनप्रभा सामंतआजी (वय ८३ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा ३ फेब्रुवारीला येथील देवद येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी मुंबई येथील पू. आजींची कन्या सौ. वैशाली श्रीवास्तव, तसेच सनातनचे पू. रमेश गडकरीकाका, पू. (सौ.) अश्विनी पवार आणि पू. आजींसमवेत याआधी सेवा केलेले देवद आश्रमातील साधक उपस्थित होते. पू. आजी संत झाल्या, हे ऐकून सर्वांनाच पुष्कळ आनंद झाला.

अंतर्मनातून भावपूर्ण साधना करणार्‍या अन् आश्रमाप्रती कृतज्ञताभाव असलेल्या विक्रोळी, मुंबई येथील श्रीमती दिनप्रभा सामंत (वय ८३ वर्षे) सनातनच्या १३७ व्या संतपदी विराजमान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मूळचे ठाणे येथील सामंत दांपत्य आरंभी ठाणे येथील सेवाकेंद्रात राहून साधना करायचे. वर्ष २०१७ मध्ये ते सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून साधना करू लागले. ‘नम्रता आणि अहं अत्यल्प असणे’ या गुणांमुळे सदाशिव सामंत यांनी वर्ष २०१९ मध्ये सनातनचे १०३ वे संतपद प्राप्त केले. वर्ष २०२१ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी पू. सदाशिव सामंत यांनी देहत्याग केला. त्यांच्या पत्नी श्रीमती दिनप्रभा सदाशिव सामंत (वय ८३ वर्षे) या मागील २७ वर्षांपासून (वर्ष १९९८ पासून) सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. उतारवयात, म्हणजे वयाच्या ७४ व्या वर्षी त्या देवद आश्रमात वास्तव्यास आल्या. त्यांचे पूर्वीचे रहाणीमान, तसेच आहार-विहार सर्व भिन्न होते, तरी त्यांनी आश्रमातील सर्व जीवन आनंदाने स्वीकारले. ‘आपल्याला आश्रमात रहायला आणि सेवा करायला मिळते’, याविषयी त्यांच्या मनात अपार कृतज्ञताभाव असायचा. ‘भाव, तळमळ, स्वीकारण्याची वृत्ती, स्थिरता’ आदी गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होत राहिली. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूचा फेरा ओलांडला.

पू. सदाशिव सामंत यांच्या देहत्यागानंतर त्या आश्रमातून त्यांच्या मुलींकडे रहायला गेल्या. ही परिस्थितीही त्यांनी सहजतेने स्वीकारली. सध्या सामंतआजी देहाने आश्रमाबाहेर रहात आहेत; परंतु त्यांचे मन पूर्णपणे आश्रमातच असते. सामंतआजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधना अंतर्मनातून आणि भावपूर्ण रीतीने होत असल्याने त्यांच्या साधनेला स्थळ-काळाचे बंधन नाही. त्यामुळे देवद आश्रमात असो किंवा मुलींकडे, म्हणजे उत्तराखंड किंवा मुंबई येथे असो, आजींच्या साधनेत सातत्य आहे आणि त्यामुळेच त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे.

वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेला सामंतआजी यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती आणि आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या १३७ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. पती-पत्नी (पू. (कै.) सदाशिव सामंत आणि पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंत) संत झाल्याचे सनातनच्या इतिहासातील हे अकरावे उदाहरण आहे.

‘पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंत यांची पुढील आध्यात्मिक वाटचालही जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.२.२०२६)

असे उलगडले पू. सामंतआजींच्या संतत्वाचे गुपित !

पू. (सौ.) अश्विनी पवार, पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी आणि पू. रमेश गडकरी

देवद आश्रमात एका अनौपचारिक सत्संगात आश्रमात वास्तव्य करणारे वयस्कर साधक ‘उतारवयात व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड घालून साधना कशी करायची ?’, याविषयी सांगत होते. त्या वेळी श्रीमती सामंतआजी यांनीही त्यांच्या पूर्वायुष्यातील कठीण आणि खडतर प्रसंगांत साधनेचे प्रयत्न कसे केले ? तसेच प्रारब्धभोग आनंदाने कसे भोगले ? यांविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव सांगितले. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच मला साधनेत आणले आणि त्यांनीच माझ्या जीवनाचे कल्याण केले’, असेही त्यांनी सांगितले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. आजी म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत माझ्याकडून जी काही सेवा आणि साधना झाली, ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच करवून घेतली.’’

यानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा श्रीमती आजींविषयीचा संदेश वाचून दाखवला आणि सामंतआजी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. ‘संत’ झाल्याचे समजताच पू. आजींना पुष्कळ आनंद झाला. यानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार, पू. आजींची कन्या सौ. वैशाली श्रीवास्तव आणि उपस्थित साधक यांनी पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या सहवासात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली.

आज्ञापालन आणि सतत शिकण्याची वृत्ती यांमुळेच पू. आजी संतपदी पोचल्या ! – पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. (सौ.) अश्विनी पवार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जे जे साधनेविषयी सांगितले, त्याचे पू. सामंतआजींनी तंतोतंत आज्ञापालन केले. काही काळ आश्रमात राहिल्यानंतर काही कारणामुळे त्यांना घरी रहावे लागले; पण तरीही त्यांनी त्या परिस्थितीत सत्संगाला उपस्थित रहाणे, समष्टीसाठी नामजप करणे आदी सेवा तळमळीने केल्या. कोणतीही सेवा करतांना त्या सतत शिकण्याच्या स्थितीत असायच्या. स्वत:च्या मुलीला साधना शिकवतांना स्वत:ला शिकायला मिळते; म्हणून त्या तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायच्या. पू. आजी वयस्कर असल्या, तरी त्यांचे मन तरुण आहे. तंतोतंत आज्ञापालन, प्रत्येक प्रसंगातून शिकणे, त्यातून आनंद घेणे, गुर्वेच्छा म्हणून मनापासून स्वीकारणे या गुणांमुळे त्या मनाचे तारुण्य अनुभवत आहेत. दु:ख, ताण, नकारात्मकता यांचा लवलेशही त्यांच्या जीवनात दिसत नाही. पू. आजींनी शिष्यभावात राहून साधना केली. अशा दैवी गुणांमुळेच त्या संतपदी विराजमान झाल्या आहेत.

संत म्हणून घोषित केल्यावर पू. सामंतआजींनी व्यक्त केलेले मनोगत !

पू. सामंतआजी

परात्पर गुरुदेवांमुळेच हे झाले ! – पू. सामंतआजी

लहानपणापासूनच मी ‘श्रीकृष्ण’ असा जप करायचे. पू. सामंतआजोबा यांनीही प्रत्येक वेळी साधना करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. यामुळे मी साधना करू शकले. माझ्यावर परात्पर गुरुदेवांची पुष्कळ कृपा झाली. मला आनंद झाला. गुरुदेवांनी माझ्या जन्माचे कल्याण केले. सर्व काही त्यांनीच मला शिकवले आहे.

पू. आजींचा संदेश !

गुरुमाऊलींचे आज्ञापालन करा. संत आणि आश्रम यांवर श्रद्धा ठेवा. प्रामाणिकपणे सेवा करा. कुणाविषयी प्रतिक्रिया मनात आणू नका. अखंड नामस्मरण करा. कृतज्ञता व्यक्त करा आणि जन्माचे सार्थक करून घ्या !

सौ. वैशाली श्रीवास्तव

आश्रमात जसे वातावरण असते, तीच स्पंदने मला माझ्या घरात पू. आजींमुळे जाणवत आहेत. (पू. आजी सध्या सौ. वैशाली श्रीवास्तव यांच्या घरी रहात आहेत.)

– सौ. वैशाली श्रीवास्तव (पू. आजींची मुलगी)

यजमानांच्या पावलावर पाऊल टाकून पू. आजींनी संतपद गाठले ! – पू. रमेश गडकरी

पू. रमेश गडकरी

त्या मध्यंतरी काही काळ घरी रहात होत्या; पण ते त्यांनी परेच्छा म्हणून स्वीकारले. त्या दूर जाऊनही त्यांनी आश्रमाला सोडले नव्हते. शरिराने जरी दूर असल्या, तरी मनाने त्या आश्रमातच होत्या. मी या स्थितीत कशी सेवा करू शकते, अशी उत्कट तळमळ त्यांना होती. त्यांचे यजमान दिवंगत

पू. सामंतआजोबा यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी संतपद गाठले आहे. तळमळ, इतरांचा विचार करणे हे साधनेचे गुण त्यांनी खोली, कुटुंब, व्यवहार अशा सर्वच ठिकाणी, तसेच साधकांमध्ये वावरतांना साध्य केले आहेत.

सोहळ्याच्या वेळी वातावरणात अनुभवलेला वैशिष्ट्यपूर्ण पालट !

सोहळ्याच्या कालावधीत सर्वांनाच पुष्कळ आनंद अनुभवण्यास येत होता. तेथे आनंदाची स्पंदनेच जाणवत होती. पू. आजींच्या बोलण्यातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचेही उपस्थित साधकांना जाणवले.

पू. आजींचे बोलणे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते. ‘अंतर्प्रेरणा जागृत होऊन त्या बोलत आहेत’, असे वाटत होते.

आश्रम हृदयात वास करतो, याचीच जणू प्रचीती देणार्‍या पू. आजी !

पू. गडकरीकाका पू. आजींविषयी सांगतांना म्हणाले, ‘‘पू. आजी घरी रहात होत्या; पण मनाने आश्रमातच होत्या. त्यांनी आश्रमाला कधीच सोडले नाही.’’ पू. आजी म्हणाल्या, ‘‘आश्रमाने मला कधीच सोडले नाही. मला भरपूर प्रेम दिले.’’ पू. आजींच्या कन्या सौ. वैशाली म्हणाल्या, ‘‘आई आश्रमाला घेऊन घरी आली. तिने आश्रमच घरी आणला.’’

‘आश्रम हृदयात वास करतो’, याची जणू प्रचीती पू. आजींच्या उदाहरणातून येते.

क्षणचित्रे

१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी पू. (श्रीमती) सामंतआजी यांचा सन्मान केला. सन्मानानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार या पू. आजींच्या चरणी नतमस्तक झाल्या.

२. संपूर्ण सोहळ्यात पू. आजींचा मोकळा स्वभाव आणि सहजतापूर्ण बोलणे यांमुळे वातावरणात पुष्कळ हलकेपणा जाणवत होता.

३. संत घोषित केल्यावर त्यांची मुलगी सौ. वैशाली श्रीवास्तव यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले.

४. पू. आजींच्या वाक्यांमधून त्यांच्यातील कृतज्ञताभावाचे दर्शन होत होते.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक