सामाजिक बांधीलकी जपणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणारे ‘पितांबरी उद्योगसमुहा’चे व्यवस्थापकीय संचालक ठाणे येथील डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे) !

‘४.२.२०२६ या दिवशी ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा ६३ वा वाढदिवस आहे. ते मागील २७ वर्षांपासून सनातन संस्थेशी जोडलेले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘नामस्मरण’ आणि ‘सत्संग’ या माध्यमांतून त्यांची साधना उत्तम प्रकारे चालू आहे. त्यांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. गुरुदेवांनी सांगितलेली सर्व सूत्रे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. ते ‘पितांबरी उद्योगसमुहा’चे प्रत्येक नवीन उत्पादन गुरुदेवांना पाठवून त्यांचा आशीर्वाद घेतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळतो.

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची ‘संशोधन वृत्ती आणि व्यापकता’ यांमुळे ते सतत नवीन नवीन उत्पादने बाजारात आणण्याचा प्रयत्न करतात. ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करूनच प्रत्येक कृती करतात. त्यामुळे त्यांना यश मिळते. त्यांना मिळालेले यश ते कृतज्ञताभावाने गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतात. त्यांनी ‘व्यवसायामध्ये मिळवलेले यश आणि सामाजिक बांधीलकी जपून केलेले कार्य’ यांविषयीची सूत्रे या लेखात दिली आहेत.

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

‘पितांबरी उद्योगसमुहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांना त्यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे आज्ञापालन करणे

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांनी पूर्वी सांगितलेली सर्व सूत्रे प्रामाणिकपणे समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करतात. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘सर्व उत्पादनांमध्ये ईश्वराचे चैतन्य असून ते चैतन्य आपण घराघरांत पाठवत आहोत’, असा त्यांचा भाव असतो. (परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी देहत्याग केला.)

२. सामाजिक बांधीलकी लक्षात घेऊन ‘आदर्श गाव’ निर्माण करणार्‍या डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची व्यापकता !

२ अ. गावात सनातन संस्थेचे सत्संग चालू करणे : डॉ. प्रभुदेसाई सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या प्रत्येक सूत्राचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृती करतात. त्यांनी गावातील लोकांसाठी सनातन संस्थेचे सत्संग चालू केले. त्यामुळे अनेक लोक व्यसनमुक्त झाले आहेत आणि लोकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली आहे.

२ आ. गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे : एका सत्संगात त्यांनी गुरुदेवांना सांगितले, ‘‘मी आमच्या गावी (राजापूर तालुक्यात) एक मंदिर बांधत आहे. तेथे माझी शेतभूमी आहे. त्या भूमीत भात, आंबा, ऊस, बांबू (उदबत्ती बनवण्यासाठी काड्या लागतात. त्या बांबूपासून तयार करतात. – संकलक) आणि सुगंधी फुले लावली आहेत. उदबत्ती बनवण्यासाठी सुगंधी फुलांची ही लागवड केली आहे. त्यामुळे तेथील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे आणि तेथील अर्थव्यवस्था सुधारली आहे.’’

२ इ. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न : डॉ. प्रभुदेसाई यांनी त्यांच्या गावाजवळ बंद असलेल्या शाळा चालू करण्यासाठी प्रयत्न केले.

२ ई. रत्नागिरी जिल्ह्यात २ ठिकाणी ‘ऍग्रो डिव्हिजन पर्यटन’ विभाग चालू करणे : मुंबई शहरातील लोकांना ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी; म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात २ ठिकाणी ‘ऍग्रो डिव्हिजन पर्यटन’ विभाग चालू केला आहे. यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींना प्रोत्साहन दिले आहे. याचा अनेक लोक लाभ करून घेत आहेत. या ठिकाणी पर्यटनाला येणार्‍या लोकांना आकाशदर्शन करता यावे, यासाठी तेथे मोठी दुर्बिण ठेवली आहे. त्यातून आकाशातील तारे, ग्रह आदी जवळून पहाता येतात.

३. आस्थापनांतील कर्मचारी आणि सहकारी यांना साधनेचे महत्त्व सांगणे

श्रीमती स्मिता नवलकर

डॉ. प्रभुदेसाई यांनी ठाण्यातील त्यांच्या सर्व आस्थापनांतील कर्मचारी आणि सहकारी यांना व्यष्टी अन् समष्टी साधनेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. त्याचप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व सांगून ते त्यांच्याकडून प्रक्रियाही राबवून घेत करत आहेत.

३ अ. कर्मचारी आणि सहकारी यांनी साधना केल्यामुळे झालेले लाभ

१. आता कर्मचार्‍यांकडून कामामध्ये होणार्‍या चुका टाळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कर्मचार्‍यांच्या कामाची फलनिष्पत्ती अनेक पटींनी वाढली आहे. त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम झाला आहे.

२. कर्मचार्‍यांमधील मतभेद दूर होऊन त्यांच्यामध्ये जवळीक वाढली आहे. ते एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत.

३. ‘पितांबरी’ आस्थापन नवे प्रयोग करून अनेक नवीन उत्पादने बाजारात आणत आहे. त्यांचे उत्तम वितरण होऊ लागले आहे. त्यामुळे आस्थापनाचा विस्तार होऊन अनेक लोकांना रोजगार मिळत आहे.

४. अनेक कर्मचार्‍यांची कुटुंबे आता साधना करत असून जीवनात आनंदाचे क्षण अनुभवत आहेत.

‘डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह आणि तेथील कर्मचारी’ यांची भरभराट झालेली पाहून मला पुष्कळ आनंद वाटतो.

५. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य

५ अ. उद्योजकांवर साधनेचे महत्त्व बिंबवणे : डॉ. प्रभुदेसाई यांनी केवळ स्वतःच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनाच नाही, तर सहउद्योजकांनाही सनातन संस्थेशी जोडले आहे. त्यांना साधनेचे महत्त्व सांगितले आहे.

५ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘उद्योग ही साधनाच !’ ही लेखमाला चालू करणे : डॉ. प्रभुदेसाई यांनी मागील २७ वर्षे केलेल्या साधनेविषयी आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘उद्योग ही साधनाच !’ ही लेखमाला प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेले ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ यांविषयीची सूत्रे वाचतांना प्रत्येक गोष्टीतील त्यांनी अभ्यासलेले बारकावे पुष्कळ कौतुकास्पद वाटतात. त्यांची लेखमाला वाचून ‘आदर्श साधक कसा असायला हवा ?’ हे लक्षात येते. ‘त्यांची व्यवसायाच्या समवेत अध्यात्मातही प्रगती होत आहे’, हे आपल्या लक्षात येते.

५ इ. अहं अल्प असणे

१. मागील अनेक वर्षांत त्यांना विविध संस्था आणि मंडळे यांच्याकडून पुरस्कार मिळाले आहेत. मार्च २०२५ मध्ये त्यांना ‘टिळक महाराष्ट्र विद्यापिठा’च्या वतीने ‘डी.लिट.’ (‘डॉक्टरेट इन लिटरेचर’) ही पदवीही प्रदान करण्यात आली आहे; परंतु ‘या सगळ्याचा त्यांना गर्व नाही’, हे कौतुकास्पद आहे.

२. डॉ. प्रभुदेसाई विविध सामाजिक संस्थांना साहाय्य करतात; पण त्यांना संस्थांकडून कसलीही अपेक्षा नसते. ते सर्वांशी नम्रतेने वागतात. त्यांना संपत्तीचा जरासुद्धा गर्व नाही.

त्यांच्या या जीवनप्रवासात त्यांना त्यांच्या आई पू. श्रीमती कला प्रभुदेसाई (सनातनच्या ४९ व्या संत, वय ९० वर्षे) आणि त्यांचे वडील कै. वामनराव प्रभुदेसाई यांचेही आशीर्वाद लाभले आहेत. डॉ. प्रभुदेसाई यांच्या या प्रगतीत त्यांच्या पत्नी सौ. वृषाली, मुलगा श्री. परीक्षित, स्नुषा सौ. प्रिया आणि कन्या कु. प्रियांका यांचाही मोठा वाटा आहे.

आजच्या तरुण पिढीसाठी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई हे एक आदर्श उद्योजक आहेत. ‘त्यांची अशीच उत्तरोत्तर आध्यात्मिक आणि व्यावहारिक प्रगती होऊन त्यांचे नाव सर्वत्र होवो’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक