मिया मुसलमानांना इतका त्रास द्या की, ते आसाम सोडून बांगलादेशात परत जातील ! – Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आवाहन

(मिया मुसलमान म्हणजे बंगाली मुसलमान)

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – होय, आम्ही मिया मुसलमानांची (बंगाली मुसलमानांची) मते रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी आपल्या देशात नव्हे, तर बांगलादेशात मतदान करावे. ते आसाममध्ये मतदान करू शकणार नाहीत, यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत. मतदार सूचींमध्ये चालू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकनाविषयी कुठल्याही आसामी नागरिकाला अडचण येत नाही; मात्र केवळ मिया मुसलमानालाच या प्रक्रियेचा त्रास होत आहे. मिया मुसलमानांना अडचणी येत असतील, तर आम्ही त्याची चिंता का करावी ?

कोणताही मिया मुसलमान रिक्शावाला भाड्याचे ५ रुपये मागत असेल, तर त्याला ४ रुपयेच द्या. त्याला फार त्रास द्या, म्हणजे तो आसाम सोडून पुन्हा बांगलादेशात जाईल, असे विधान आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका कार्यक्रमात केले. यावरून त्यांच्यावर काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून टीका करण्यात आली.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सरमा यांनी क्षमा मागावी !’ – काँग्रेसची मागणी

काँग्रेसने ‘एक्स’वर सरमा यांचे हे विधान प्रसारित करत म्हटले की, हे नीच वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांचे लाडके नेते हिमंत बिस्व सरमा यांचे आहे. ते राज्यघटनेची शपथ घेऊन राज्यघटनेची पायमल्ली करत आहेत आणि देशात द्वेषाची बीजे पेरत आहेत. ही भाजप-रा.स्व. संघ यांची द्वेषपूर्ण मानसिकता आहे. हे विधान केवळ अशोभनीयच नाही, तर बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर आणि आपल्या गंगा-जमुनी संस्कृतीवर (गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) थेट आक्रमण आहे, ज्याने प्रत्येक भारतियाला समानतेचा अधिकार दिला आहे. (घुसखोर मुसलमानांना हाकलून लावणे, हेच राज्यघटनेचे पालन करणे आहे. तसे न करणे राज्यघटनेचा अवमान आहे आणि काँग्रेस सातत्याने हा अवमान करत आली आहे अन् आताही करायला सांगत आहे. – संपादक) हिमंत बिस्व सरमा यांच्या या लज्जास्पद कृत्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी संपूर्ण देशाची क्षमा मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मुख्यमंत्री सरमा यांनी मुसलमानांचा अपमान करण्याचे सर्व विक्रम मोडले ! – मौलाना बरेलवी यांची टीका

मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना (इस्लामचा अभ्यासक) शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनीही मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्यावर टीका करतांना म्हटले की, सरमा यांची भूमिका मुसलमानविरोधी आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून ते सातत्याने मुसलमानांना लक्ष्य करत आहेत. सरमा मुसलमानांना घुसखोर आणि बांगलादेशी म्हणत आहेत. त्यांच्यावर अन्याय करत आहेत. निवडणुका जवळ येत असतांना त्यांनी मुसलमानांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ते मुसलमानांना ‘मिया’ म्हणून संबोधून त्यांचा अपमान करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे. मुसलमानांचा अपमान करण्याचे त्यांनी सर्व विक्रम मोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.