‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’मध्ये ‘धर्मशास्त्र मार्गदर्शक’ नियुक्त करणार !

मंदिरांतील धार्मिक विधी धर्मशास्त्रानुसार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय !

मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) – मंदिरांतील विविध धार्मिक विधी धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? याविषयी पुरोहितांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’मध्ये ‘धर्मशास्त्र मार्गदर्शक’ नियुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. विधी आणि न्याय विभागाने २९ जानेवारी या दिवशी याविषयीचा ‘शासन निर्णय’ प्रसारित केला आहे. मंदिरांतील विविध धार्मिक विधी हिंदु धर्मशास्त्रानुसार साजरे होण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या प्रशासकांनी महाराष्ट्र शासनाला वर्ष २०२३ मध्ये अशा प्रकारच्या पदाची निर्मिती करण्याविषयी शासनाला प्रस्ताव सादर केला होता.

अशी असेल ‘धर्मशास्त्र मार्गदर्शक’ पदाची पात्रता !

संस्कृत भाषा, धर्मशास्त्र, वेद, आगमशास्त्र, पुराण, यज्ञकर्म यांचे उत्तम ज्ञान, सोळासंस्कार, देवस्थानाविषयी परंपरेने चालणार्‍या पूजापद्धती यांचे किमान ज्ञान, किमान १० वी उत्तीर्ण, शासनमान्य वैदिक पाठशाळेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र किंवा धर्मशास्त्रातील पदवी, अशी पात्रता ‘धर्मशास्त्र मार्गदर्शक’ या पदवीसाठी ठेवण्यात आली आहे.

हे असेल धर्मशास्त्र मार्गदर्शकाचे दायित्व !

मंदिरांतील धार्मिक विधी, नित्य पूजा, पालखी उत्सव, रथोत्सव इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रमांचे निरीक्षण आणि नियोजन करणे, परंपरागत शिस्तबद्धता कायम राखणे, अतीविशेष राजशिष्टाचार असलेल्या मान्यवर व्यक्तींच्या भेटीच्या वेळी त्यांच्या दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित सर्व नियोजनाचे समन्वय अन् मार्गदर्शन करणे, प्राचीन अन् संस्थानकालीन काळातील शिलालेख, ताम्रपट, अभिलेख आदींची पडताळणी करून त्यावरील योग्य अभिप्राय प्रशासनाला कळवणे, वज्रलेप-मूर्ती संवर्धन आदी संवेदनशील धार्मिक विषयांवर आवश्यक तज्ञ सल्ला देणे इत्यादी दायित्व धर्मशास्त्र मार्गदर्शकांना पहावे लागणार आहे.

संपादकीय भूमिका

असे धर्मशास्त्र मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील सर्व राज्यांमध्ये नियुक्त करणे आवश्यक आहे !