Bangladesh Election 2026 : बांगलादेशाच्या निवडणुकीत केवळ ८० हिंदू उमेदवार !

बांगलादेशात ८० हिंदूंना उमेदवारी मिळाली, हीच मोठी गोष्ट म्हणावी लागेल !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशात १२ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.अनुमाने १७ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात उपलब्ध माहितीनुसार या निवडणुकीत एकूण ८० हिंदु उमेदवार रिंगणात आहेत. यांपैकी १२ अपक्ष असून ६८ विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांमध्ये १० महिला उमेदवारांचा समावेश आहे. देशाची एकूण लोकसंख्या आणि अल्पसंख्यांकांची संख्या लक्षात घेतल्यास हा आकडा अत्यंत अल्प आहे.

१. बांगलादेश निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार अल्पसंख्यांक समुदायातील ८८ उमेदवारांनी नामांकन प्रविष्ट (दाखल) केले होते. त्यांपैकी ५ उमेदवारांची नामांकनपत्रे फेटाळण्यात आली, तर ३ जणांनी नंतर माघार घेतली. परिणामी सध्या ८० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सध्या निवडणूक आयोगाकडे ६० राजकीय पक्ष नोंदणीकृत असून सत्ताधारी अवामी लीगचे नोंदणीकरण निलंबित केले आहे आणि त्यांच्या हालचालींवर निर्बंध आहेत.

२. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएन्पी), जमात-ए-इस्लामी यांच्यासह एकूण २२ राजकीय पक्षांनी अल्पसंख्यांक समुदायांतील उमेदवार उभे केले आहेत. डाव्या पक्षांनी सर्वाधिक अल्पसंख्यांक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. बांगलादेश कम्युनिस्ट पार्टीने १७ अल्पसंख्यांक उमेदवारांना तिकीट दिले असून कोणत्याही पक्षाकडून दिलेला हा सर्वाधिक आकडा आहे.

३. ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिस्ती एकता परिषदे’चे संयुक्त अध्यक्ष निर्मल रोसारियो यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक समुदाय राजकीय निर्णयप्रक्रियेत सक्रीयपणे सहभागी होऊ शकत नसतील आणि निवडणूक निकालांवर प्रभाव टाकू शकत नसतील, तर त्यांचे अधिकार, विकास आणि अस्तित्व यांचे संपूर्ण संरक्षण शक्य होणार नाही. त्यांनी अल्पसंख्यांकांनी निवडणूक राजकारण आणि लोकशाही प्रक्रियांमध्ये अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

४. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने अल्पसंख्यांक समुदायातील ६ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये पक्षातील २ ज्येष्ठ नेते आहेत. स्थायी समितीचे सदस्य गायेश्वर चंद्र रॉय ढाका-३ येथून, तर उपाध्यक्ष निताई रॉय चौधरी मागुरा-२ येथून निवडणूक लढवत आहेत. कपिल कृष्ण मंडल बागेरहाट-१, सोमनाथ डे बागेरहाट-४, दीपेन दीवान रंगमती आणि सचिंग प्रयू बंदरबन येथून रिंगणात आहेत.

५. राष्ट्रीय निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच जमात-ए-इस्लामीने अल्पसंख्याक समुदायातील उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. कृष्ण नंदी खुलना-१ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात हिंदूबहुल डाकोप आणि बाटियाघाटा उपजिल्ह्यांचा समावेश होतो. कृष्ण नंदी हे खुलना जिल्ह्यातील दुमुरिया उपजिल्ह्यातील चुकनगरचे रहिवासी असून दुमुरिया उपजिल्हा जमातच्या हिंदु समितीचे अध्यक्ष आहेत. खुलना-१ हा मतदारसंघ यंदा विशेष चर्चेत असून येथे एकूण ८ अल्पसंख्याक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये जमात, कम्युनिस्ट पार्टी यांच्यासह ६ पक्षांचे उमेदवार असून २ अपक्ष उमेदवारही याच समुदायातील आहेत.