अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठच !

‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’

धर्म विसरल्याने भारतातील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.

विज्ञानाचा एकमेव खरा उपयोग !

‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’

भक्तीभाव नसलेल्यांकडे मंदिरांचे उत्तरदायित्व देणे, हा धर्मद्रोहच !

‘सरकार रुग्णांवर उपाय करायला वैद्य (डॉक्टर) नसलेल्याला सांगत नाही. सरकारला न्यायालयात दावा लावायचा असेल, तर अधिवक्ता नसलेल्याला सांगत नाही; मात्र मंदिराचे व्यवस्थापन सांभाळायला भक्तीभाव नसलेल्यांकडे सरकार मंदिरांचे उत्तरदायित्व देते. त्यामुळे मंदिरांत भ्रष्टाचार होतो आणि मंदिरांची सात्त्विकताही नष्ट होत आली आहे !

गुरूंवर श्रद्धाच असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’

भारताच्या अधोगतीचे नेमके कारण !

‘स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या पिढ्यांना ‘देव नसतोच’, असे शिकवल्यामुळे त्या भ्रष्टाचारी, वासनांध, राष्ट्र आणि धर्म प्रेम नसणार्‍या झाल्या आहेत.’

अध्यात्मशास्त्राने विज्ञानातील संशोधनाला मान्यता दिली पाहिजे !

‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. असे विज्ञान अध्यात्मापेक्षा श्रेष्ठ मानणे, यापेक्षा अज्ञानाचे दुसरे मोठे उदाहरण नसेल.

‘हिंदु राष्ट्र’ हाच गलिच्छ राजकारणावर पर्याय !

‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻसर्वधर्मसमभाव’ शब्द अडाणीच बोलतात !

‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’

भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, याचा विचार करा !

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’