‘प्रेमभाव’ हा स्थायीभाव असल्याने अनेक नाती प्रेमाने जपणार्‍या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री (कै.) श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) !

आज (कै.) श्रीमती प्रभावती गजानन शिंदे यांच्या देहत्यागानंतरचा ११ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

‘माझी आजी श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहात असे. ९.१.२०२६ या दिवशी दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी तिचे देवद आश्रमात देहावसान झाले. माझे आई-वडील (सौ. मीनल शिंदे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे) हे दोघेही देवद आश्रमात रहातात अन् मी रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवा करते. आजीचा मृत्यू झालेल्या दिवशी देवाने मला पदोपदी अनुभूती दिल्या. त्या मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.

(कै.) श्रीमती प्रभावती गजानन शिंदे

१. स्वतःच्या आईची स्थिती अत्यवस्थ असतांना शांतपणाने सर्व परिस्थिती हाताळणारे आणि आवश्यक ते निर्णय घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

९.१.२०२६ या दिवशी सकाळी मला माझ्या बाबांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘गोव्याहून नवी मुंबई येथे येण्यासाठी किती वाजता विमान आहे ? आणि या विमानप्रवासाला साधारण किती खर्च येईल ?’, याची तू चौकशी करून ठेव. तू घरी जाऊन तुझ्या कपड्यांची बॅगही भरून ठेव. म्हणजे आवश्यकता वाटल्यास तुला पटकन निघता येईल !’’ साधारण त्याच वेळी आजीला श्वास घ्यायला त्रास होत होता. नंतर थोड्या वेळाने, म्हणजे सकाळी १० च्या सुमारास बाबा मला म्हणाले की, ‘‘तू विमानाचे तिकीट काढ आणि इकडे ये.’’ त्या वेळेस आजीचा रक्तदाब अल्प झाला होता.

त्या दिवशी बाबांना अनेक नातेवाइकांना संपर्क करावा लागत होता आणि माझ्याशीही ते मधे मधे बोलत होते. आजीसाठी तिथे नामजपादी उपाय आणि लागणारे अन्य साहाय्य करणे, अशी सर्व घाई गडबड चालू असतांनासुद्धा एकदाही मला बाबांच्या बोलण्यात चढउतार जाणवला नाही किंवा घाई गडबड जाणवली नाही. ते पुष्कळ स्थिरतेने मला परिस्थितीचा अंदाज आणि त्या त्या वेळी आवश्यक ते निर्णय देत होते.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

२. रामनाथी आश्रमातून घरी जाण्यास निघतांना एका संतांची भेट होऊन त्यांनी ‘आज काहीतरी चांगले होणार आहे’, असे सांगणे

देवद, पनवेल येथील आश्रमात जाण्यासाठी मला दोन घंट्यांत सर्व आवरून गोव्यातील विमानतळावर पोचायचे होते. तेव्हा मी स्वतःला सतत स्वयंसूचना देत होते की, ‘मला स्थिर आणि शांत रहायचे आहे. मला देवाला अपेक्षित असे वागायचे आहे.’ मी रामनाथी आश्रमातून घरी जाण्यास निघाले. तेव्हा आश्रमातील जिन्यावर माझी भेट एका संतांशी झाली. मी त्यांना नमस्कार केला. ते दोन मिनिटे थांबले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘आज काहीतरी चांगले होणार आहे.’’ त्या वेळी माझ्या अल्प बुद्धीला त्यांचे बोलणे कळले नाही. माझ्या मनात विचार आला, ‘आज आजीला बरे नाही, तर मग काय चांगले होईल ?’ तेव्हाच माझ्या मनात दुसरा विचारही आला की, ‘जे होईल, ते सर्व चांगलेच आणि देवाला अपेक्षित असे होईल !’

३. विमानप्रवास व्यवस्थित होऊन आजीच्या अंत्यदर्शनासाठी वेळेत पोचता येणे 

देवाच्या कृपेने माझा विमानप्रवास व्यवस्थित झाला. नवी मुंबई येथे मागच्याच मासात नवीन विमानतळ चालू झाल्यामुळे मला गोव्याहून वेळेत पनवेल येथील देवद आश्रमात पोचता आले. त्यामुळे मला आजीचे अंत्यदर्शन घेता आले. या परिस्थितीतही देवाने मला ही मोठी अनुभूती दिली.

४. आजीचे अंत्यदर्शन घेतांना

४ अ. निर्विचार स्थिती अनुभवणे : आजीचे अंत्यदर्शन घेतांना मी हात जोडले. तेव्हा माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते. मला ‘प्रार्थना काय करावी ?’, हेही सुचले नाही. मी निर्विचार स्थिती अनुभवत होते. अकस्मात् माझ्या मनात विचार आला आणि मी विचारले, ‘आजी, तू आनंदी आहेस ना ?’ तेव्हा लगेचच ‘हो’ असे उत्तर मिळाले आणि आजीचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. तेव्हा मला ‘आजी गुरुचरणी समर्पित झाली आहे’, असे वाटले.

४ आ. आजीचा चेहरा शांत आणि स्थिर वाटणे : आजीच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर मला तिचे मुखमंडल शांत, स्थिर आणि जिवंत वाटत होते. तिचे डोळे थोडेसे उघडे होते. तिच्याकडे पाहून मन प्रसन्न होत होते. कोणतेही दुःख किंवा त्रास जाणवत नव्हता. ‘आजी आनंदी आहे आणि सर्वांना भरभरून आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवत होते.

५. आजीने अनेक नातेवाइकांना प्रेमाने जोडून ठेवल्यामुळे अल्प कालावधीतही पुष्कळ नातेवाईक अंत्यदर्शनाला येणे

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

आजीच्या अंत्यदर्शनासाठी आमचे जवळचे नातेवाईक, तसेच अनेक स्नेही आले होते. आजीचे दुपारी निधन झाले आणि संध्याकाळी साधारण ६.३० नंतर आजीला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. एवढ्या अल्प कालावधीत इतक्या सर्वांपर्यंत निरोप पोचवणे खरेतर कठीण होते; पण ज्यांना ज्यांना निरोप मिळाला, ते सर्वजण लगेच निघाले आणि वेळेत आश्रमात आले. मी आश्रमात पोचल्यावर तेथे पुष्कळ माणसे जमलेली पाहून मला जाणवले की, ‘प्रेमभाव’ हा आजीचा स्थायीभाव होता. त्यामुळे आजीने तिच्या संपूर्ण जीवनप्रवासात बरीच नाती प्रेमाने जपली होती.’ आजी पुष्कळ प्रेमाने सर्वांचा पाहुणचार करायची. तिच्या तोंडून मी अनेकदा ऐकले होते की, ‘पूर्वी प्रतिदिन बरीच मंडळी जेवणासाठी घरी असायची. आजी सर्वांसाठी प्रेमाने स्वयंपाक करायची आणि कुणालाही जेवण न करता परत पाठवायची नाही.’ तिने पुष्कळ कष्ट केले आणि प्रत्येक नाते जपण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. त्याचेच हे फलित असावे की, एवढे नातेवाईक आजीच्या अंत्यदर्शनासाठी आले होते.

६. अध्यात्माविषयी विशेष माहिती नसलेल्या नातेवाइकांना आश्रमाचे महत्त्व ध्यानी येणे

अ. बरेच नातेवाईक आश्रमात आले होते. त्या वेळी वातावरणात हलकेपणा जाणवत होता. अनेकांनी सांगितले की, ‘आज वातावरणात दाब जाणवत नाही. एरवी अशा वेळी आमचे डोके दुखते; पण आज काहीच जाणवले नाही.’

आ. ‘आध्यात्मिक पातळीचे महत्त्व काय असते ?’, हेही अनेक नातेवाइकांच्या लक्षात आले.

इ. काही जण असे म्हणत होते की, ‘आश्रमात आजींना देवाज्ञा झाली. त्यांना येथील पवित्र वातावरण लाभले’, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे.’

त्या वेळी मला आश्चर्य वाटले की, ‘ज्यांना अध्यात्माविषयी विशेष माहिती नाही, त्यांनाही हे सर्व जाणवणे, ही खरोखरंच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची कृपा आहे.

७. नातेवाइकांना ‘धर्मशास्त्र आणि साधना’ यांचे महत्त्व सांगणे

बाबांनी आणि मी तेथे उपस्थित असलेल्या नातेवाइकांना ‘धर्मशास्त्र आणि साधना’ यांचे महत्त्व सांगितले. ‘आश्रम म्हणजे काय ? येथे आध्यात्मिक कार्य कसे केले जाते ?’, हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने मला सांगता आले. जणूकाही त्या वेळी देवाने मला माध्यम बनवून माझ्याकडून सेवा आणि साधना यांचे प्रयत्न करून घेतले. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

८. पूर्वी आजीला आश्रमात भेटायला येणार्‍या नातेवाइकांना ‘सनातन आश्रम’ आणि ‘सनातन संस्था’ यांविषयी माहिती झालेली असणे

आजी काही वर्षांपासून देवद आश्रमात रहात असल्यामुळे आश्रमात तिला भेटायला अनेक नातेवाईक येत. त्या निमित्ताने त्यांना ‘सनातन आश्रम म्हणजे काय ?’ हे लक्षात येत असे. अशा प्रकारे आजीच्या माध्यमातून अनेक नातेवाइकांना सनातन संस्थेच्या कार्याची ओळख झाली. देवाने आजीच्या माध्यमातून करून घेतलेली ही समष्टी साधनाच आहे !

९. आजीचा मृत्यूनंतरचा प्रवास 

९ अ. एका संतांच्या उद्गारांची प्रचीती येणे : नंतर मला एका संतांचे शब्द आठवले. ते म्हणाले होते, ‘‘आज काहीतरी चांगले होईल !’’ प्रत्यक्षात आजीचे निधन झाले आणि त्यानंतरच्या कृती करतांना कसलाही त्रास झाला नाही. आजीचे पुढच्या टप्प्यात मार्गक्रमण झाले आणि ती आनंदाने पुढे गेली. अशा प्रकारे एका संतांनी सांगितलेल्या गोष्टीची मला प्रचीती मिळाली. याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

९ आ. ‘आजींचा परलोकातील प्रवास उच्च लोकातून होत असल्याने हा प्रवास आनंददायी आहे’, असे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगणे : मी एका संतांचे उद्गार सद्गुरु बाबांना सांगितले. तेव्हा मला आणखी उलगडा झाला. बाबा म्हणाले, ‘‘आजीचा मृत्यू झाला; परंतु तिचा पुढील प्रवास आनंददायी आहे. आजीची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे, म्हणजेच गुरुकृपेने तिने जन्म-मृत्यूचा फेरा पार केला आहे. त्यामुळे तिला आता पुन्हा या मर्त्यलोकात (पृथ्वीवर) जन्म नाही. आता तिचे स्थान महर्लाेकात आहे. महर्लाेकात साधना करून तिचा पुढील प्रवास ‘जन, तप आणि सत्य’ या वरच्या लोकांकडे चालू झाला आहे. आजीने साधना करून स्वतःच्या जीवनाचे सार्थक केले. हा प्रवास कोणत्याही जिवासाठी आनंददायी असतो !’’

‘मला हे सर्व अनुभवण्याची संधी दिली. याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची मुलगी), फोंडा, गोवा. (११.१.२०२६)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक