अर्गाेनॉमिक्स
निरोगी जीवनासाठी व्यायाम
लेखांक ११३
(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)
बहुतेक लोकांना वाटते, ‘बसतांना केवळ पाठ सरळ ठेवल्यास सगळे ठीक होते; पण खरेतर आपले पाय आणि टाचा हा आपल्या बसण्याचा पाया आहे. जसा इमारतीला भक्कम पाया हवा असतो, तसा शरिरासाठी पायांची स्थिती योग्य ठेवणे आवश्यक असते. पाय योग्य पद्धतीने ठेवले, तर शरीर आपोआप सरळ आणि स्थिर रहाण्यास साहाय्य होते अन् स्नायूंना अनावश्यक ताण घ्यावा लागत नाही. जर पाय चुकीच्या स्थितीत, उदा. हवेत लोंबलेले, केवळ बोटांवर टेकलेले किंवा एकमेकांवर ठेवलेले असतील, तर हा ताण शरिराच्या वरच्या भागांपर्यंत पोचतो आणि मग गुडघे, कंबर, पाठीचा कणा, खांदे अन् शेवटी मान या सर्व ठिकाणी अस्वस्थता जाणवू लागते. आज आपण बसण्याच्या चुकीच्या पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत.
(भाग १०)

१. बसल्यावर पाय हवेत लोंबकळणे

यामुळे मांडीवर अधिक दाब येतो आणि पाठीचा कणा वाकू लागतो.
२. आसंदीच्या खाली पाय घेऊन बसणे

या स्थितीत आपली पावले भूमीवर पूर्ण टेकत नसल्याने शरिराचे स्थैर्य न्यून होते. यावर उपाय म्हणून शरीर आपोआपच कंबर मागे घेते. त्यामुळे कमरेचे मणके झुकतात आणि मणक्यांचे नैसर्गिक वळण पालटून त्यांना बाक येतो. पाय भूमीला पूर्णपणे टेकत नसल्याने कमरेचे स्नायू निष्क्रीय होतात आणि मणक्यांतील गाद्या, तसेच अस्थिबंध यांवर ताण येतो. असे बसणे आरंभी आरामदायक वाटते; पण ते ५ – १० मिनिटेच चांगले असते. त्यानंतर योग्य पद्धतीने बसणेच भल्याचे असते.
३. पायांची केवळ बोटे टेकवून बसणे

३ अ. वरील स्थितीचे शरिरावर होणारे परिणाम

१. यामुळे पावले सतत खालच्या बाजूला (plantar flexion) रहातात. त्यामुळे पोटर्यांचे स्नायू घट्ट होतात. कालांतराने ‘धावणे, जिने चढ-उतार करणे’ इत्यादी कृती कठीण होऊ लागतात.
२. शरीर पुढे झुकते, पाय अन् गुडघा यांवर ताण येतो, रक्तप्रवाह अल्प होतो आणि पाय थंड किंवा सुन्न होऊ शकतात.
३. या स्थितीत बोटांवर अत्यधिक भार पडत असल्याने पावलांच्या लहान स्नायूंवर प्रचंड ताण पडतो. परिणामी ‘पायांत थकवा येणे, गोळे येणे, बोटे आत वळणे किंवा बसून उठल्यावर पाय दुखणे’, अशा समस्या उद्भवू लागतात.
४. या स्थितीमुळे गुडघ्यांवरही अतिरिक्त ताण पडतो. पावले खाली वाकलेली असतांना गुडघ्यांची हालचाल संतुलित रहात नाही. मांडीच्या पुढील भागातील स्नायू सक्रीय होतात; पण पायाकडून योग्य आधार न मिळाल्याने हा ताण थेट गुडघ्यांच्या सांध्यांवर जातो. त्यामुळे गुडघ्याच्या कुर्चेवरही (Meniscus वरही) दाब येतो आणि मांडीचे संतुलन बिघडते.
५. ही स्थिती शरिराला ‘आराम’ देत नाही, तर ‘सतर्क’ करते, म्हणजेच सर्व नसांमध्ये एक प्रकारचा तणाव सतत रहातो. त्यामुळे श्वास उथळ होतो, शरिरात हलका ताण रहातो, मन शांत रहात नाही आणि कामावर दीर्घकाळ मन एकाग्र करणे कठीण होते.
३ आ. या स्थितीविषयी केलेला अभ्यास
१. ‘जर्नल ऑफ फूट अँड अँकल रीसर्च – २०२० (Journal of Foot and Ankle Research- 2020)’ नुसार अशा बसण्यामुळे पायांच्या पुढच्या स्नायूंवर नेहमीपेक्षा ३ ते ५ पट जास्त ताण येतो. त्यामुळे स्नायू लवकर थकतात.
२. ‘अप्लाईड अर्गोनॉमिक्स – २०२१ (Applied Ergonomics -2021)’च्या आढाव्यानुसार पायांना पूर्ण आधार नसतांना बसल्यास गुडघ्यांवरील ताण २२ ते २८ टक्के वाढतो.
३. हार्वर्डमधील ‘एम्बॉडीड कॉग्निशन’चे संशोधन दर्शवते की, शरिराची ठेवण मानसिक स्थितीवर परिणाम करते. वरीलप्रमाणे ठेवण असल्यास आत्मविश्वास आणि शरिरावरील नियंत्रण न्यून होते.
४. पायावर पाय ठेवून बसणे

या स्थितीत बसल्याने शरिराचे वजन एका बाजूला अधिक जाते. त्यामुळे कंबर आणि कुल्हे संतुलित रहात नाहीत. याचा परिणाम म्हणून हळूहळू कंबरदुखी, कुल्ह्यात अस्वस्थता आणि ठेवण (पोश्चर) बिघडणे’, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शरीर नैसर्गिकरित्या समांतर स्थितीत न रहाता थोडे तिरके होते.’
भाग ११ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1000088.html
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
भावना बोथट झाल्या ?
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !