Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक


नवी देहली – माझ्या ३ अटी मान्य केल्या, तर मी उपोषण सोडीन, असे विधान विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी गेल्या ३ आठवड्यांपासून नवी देहलीतील जंतर-मंतर मैदानात उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी केले. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संकेतस्थळावर माहिती प्रसारित करत सरकार आणि खासदार यांच्यासमोर स्वतःच्या अटी मांडल्या.

वांगचुक म्हणाले, ‘‘शिक्षणव्यवस्थेतील पेपरफुटी, तसेच झालेला गैरव्यवहार यांचे दायित्व सरकारने घ्यावे. मी आणि ‘कॉकरोच जनता पक्षा’चे अभिजीत दीपके संसदेपर्यंत मोर्चा घेऊन पोचल्यास सर्वपक्षीय खासदारांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्वासन द्यावे. प्रकृती खालावल्यामुळे संसदेत जाणे शक्य न झाल्यासही खासदारांनी या मागण्यांसाठी संसदेत पाठपुरावा करण्याची हमी द्यावी. असे केल्यास मी उपोषण मागे घेण्यास सिद्ध आहे.’’

पोलिसांनी वांगचूक यांना १८ जुलैला नवी उपोषणस्थळावरून कह्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात भरती केले; मात्र सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले नाही.