आदर्श ‘सोफा (सुखासन)’ कसा असावा ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक ११५

अर्गाेनॉमिक्स

(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)

‘सध्या ‘घरी चांगला आणि भव्य सोफा असणे’, हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. ‘केवळ दिसायला चांगला किं‍वा ‘आरामात रेलू शकतो’, असा सोफा खरेदी केल्यावर कोणते त्रास होऊ शकतात ? आणि आदर्श सोफा कसा असावा ?’, ते आज आपण जाणून घेणार आहोत.

(भाग ११)

या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/997632.html

चित्र १

१. सोफा आरामदायक वाटण्याची कारणे 

आपल्याला कुणी एखाद्या कार्यालयीन आसंदीवर (office chair वर) आणि सोफ्यावर बसायला सांगितले, तर अधिक चांगले कुठे वाटेल ? बहुतेक सुदृढ व्यक्तींचे उत्तर ‘सोफा’, हे असेल. याची कारणे पुढे दिली आहेत.

अ. सोफ्यावर भरपूर जागा असल्याने तो बसायला ऐसपैस असतो.

आ. सोफा मऊ असल्याने त्याचा स्पर्श चांगला वाटतो.

इ. पाठीतून तिरके किंवा रेलून बसता येते; म्हणून सोफा आरामदायक वाटतो. (चित्र १ पहा)

‘आरामाचे आमीष दाखवणारा हा ‘सोफा’ आरोग्याच्या दृष्टीने कसा घातक ठरू शकतो ?’, ते पाहूया.

२. शरिराची ठेवण (‘पोश्चर’) बिघडवणारे सोफ्याचे घटक 

(Sofa Factors That Ruin Posture) (चित्र २ पहा)  

चित्र २

२ अ. तिरके बसण्याची शक्यता असणे : सोफ्यावर भरपूर जागा असल्याने व्यक्ती क्वचितच सरळ बसते. तिला थोडे तिरके बसण्याची सवय लागते. त्यामुळे स्नायूंमधील समतोल बिघडण्याची शक्यता असते.

२ आ. ‘सीट’ अल्प उंचीची असणे : यामुळे बसतांना कंबर गुडघ्यांपेक्षा खाली जाते. त्यामुळे श्रोणी (‘पेल्विस’) मागे जाते. पाठीचे नैसर्गिक वळण पालटून ती सपाट होते आणि पाठीच्या खालच्या भागावर अधिक ताण येतो.

२ इ. ‘सीट’ पुष्कळ खोल (आत) असणे : पाठ टेकून बसण्याचा प्रयत्न केल्यास पाय भूमीपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे शरीर पुढे सरकते, पाय आत घेतले जातात किंवा लोंबकळत असतात. परिणामी तिरके बसण्याची सवय लागते. गुडघ्यांच्या मागे सीटच्या कडेचा दाब पडतो. नसा आणि रक्तवाहिन्या दबल्या जातात अन् सुन्नपणा आणि अस्वस्थता वाढते.

२ ई. अतिशय मऊ (प्लश कुशन) असणे : सोफा मऊ असल्याने त्यावर बसल्‍यावर शरीर ‘सीट’मध्ये खाली जाते. कंबर आणि मांडी यांचे स्नायू निष्क्रीय होतात. शरिराचे वजन थेट अस्थिबंध (‘लिगामेंट्स’) आणि कंबर यांच्या मणक्यांतील डिस्कवर पडते. त्यामुळे अशक्तपणा जाणवतो आणि वेदना होऊ शकतात. हा मऊपणा आरंभी छान वाटतो; पण कालांतराने त्याचा शरिराच्या ठेवणीवर (‘पोश्चर’वर) विपरीत परिणाम होतो. हा आराम तात्पुरता आणि हानीकारक ठरतो.

२ उ. सीटचे ‘कुशन’ हळूहळू दबले जाणे (sag) : सोफ्याचा वापर होऊ लागल्यावर सीटचा ‘फोम’ दबला जातो. त्यामुळे श्रोणी (‘पेल्विस’) अधिक खाली जाते आणि शरिराची ठेवण (‘पोश्चर’) नकळत बिघडत जाते.

२ ऊ. पुष्कळ मागे असलेला सोफ्याचा पाठीमागचा भाग (‘बॅकरेस्ट’) : असा सोफा आराम मिळण्यासाठी आपल्याला आडवे बसायला प्रवृत्त करतो. त्यामुळे पाठीचा कणा वाकतो आणि कंबर, मान अन् खांदा यांवरीलही ताण वाढतो.

२ ए. कमरेला आधार (‘लंबर सपोर्ट’) नसणे : कमरेला आधार नसल्यामुळे ‘डिस्क’वरील दाब वाढतो, लवकर थकवा येतो आणि कंबरदुखी होते.

२ ऐ. आसंदीचे हात (armrests) पुष्कळ खाली असणे : यामुळे खांद्यांना आधार मिळत नाही. काही वेळा आसंदीचे हात (armrests) पुष्कळ पुढे असतात. त्यामुळे खांदेही पुष्कळ पुढे येतात किंवा वर उचलले जातात आणि मानेवर ताण येतो.

२ ओ. उठून उभे रहाणे कठीण जाणे : सीटची उंची बर्‍याचदा अल्प असते. त्यामुळे उठणे कठीण जाते आणि सांधे अन् पाठ यांवर अधिक ताण पडतो.

२ औ. वृत्ती मंद आणि आळशी होण्याची शक्यता : मणका सरळ असल्यास सतर्कता, एकाग्रता आणि आकलनक्षमता अधिक चांगली होते. सोफ्यावर बसण्याच्या पद्धतीमुळे मणका सरळ रहात नाही. तो वाकत असल्यामुळे वृत्ती अस्थिर, मंद आणि आळशी होण्याची शक्यता असते.

३. आदर्श सोफा कसा असावा ? (चित्र ३ पहा) 

चित्र ३

थोडक्यात सांगायचे, तर ही एक ‘अर्गोनॉमिक’ सोफा खरेदीची पडताळणी सूचीच (check list) आहे.

३ अ. सीटची उंची

श्री. निमिष म्हात्रे

१. बसल्यावर पाय भूमीला पूर्णपणे टेकलेले असावेत.

२. कंबर (hips) गुडघ्यांना समांतर किंवा थोडीशी वर असायला हवी.

३. उभे रहाण्यासाठी हातांनी जोर लावावा लागू नये.

३ आ. सीटची खोली 

१. सोफ्याच्या मागच्या भागाला (‘बॅकरेस्ट’ला) पाठ पूर्णपणे टेकलेली असावी.

२. गुडघ्यांच्या मागे २ – ३ बोटे जागा रहायला हवी.

३. पाय भूमीवरच रहायला हवेत आणि ते आत घ्यावे लागायला नकोत किंवा लोंबकळायला नकोत.

३ इ. सीटच्या कुशनचा कडकपणा (Firmness) 

१. कुशन थोडेसे दाबले जायला हवे; पण नंतर आत जायला नको.

२. गादीसारखे पुष्कळ मऊ वाटायला नको.

३. ५ मिनिटांनंतरही बसण्याची स्थिती आधारदायी (‘सपोर्टेड’) वाटायला हवी.

३ ई. पाठीमागचा भाग (‘बॅकरेस्ट’) 

१. सोफ्याचा मागचा भाग (‘बॅकरेस्ट’) सरळ किंवा थोडासा मागे असावा.

२. पाठीचा मधला आणि खालचा भाग नीट टेकायला हवा.

३. एखादी छोटी वळकटी (लंबर) ठेवता यायला हवी आणि ती जागेवर रहायला हवी.

३ उ. कंबर आणि शरिराची ठेवण (‘पोश्चर’) – ३० सेकंदांची चाचणी : सोफ्यावर साधारण ३० सेकंद बसून पुढील सूत्रांची पडताळणी करा.

१. कंबर नैसर्गिक किंवा थोडी पुढे असायला हवी.

२. पाठीचे नैसर्गिक वळण टिकायला हवे.

३. सरळ बसणे सहज वाटायला हवे. ते मुद्दाम टिकवून ठेवावे लागू नये.

३ ऊ. पाय आणि मांडी यांची स्थिरता 

१. पाय नैसर्गिकपणे भूमीवर रहायला हवेत.

२. मांड्यांना समान आधार मिळायला हवा.

३ ए. हात ठेवायची जागा (Armrests)

१. हात ठेवतांना खांदे शिथिल (‘रिलॅक्स’) असायला हवेत.

२. हात पुष्कळ वर किंवा खाली असायला नकोत.

३ ऐ. ‘सोफा अधिक सोयीचा होण्यासाठी त्यात पुढील पालट करता येतात का ?’, हे पहाणे 

१. ‘कुशन्स’ सैल किंवा काढता येणारी असावीत.

२. १ – २ उशा घेऊनच शरिराची ठेवण (‘पोश्चर’) सुधारता यायला हवी.

३ ओ. असा सोफा घेणे टाळावे !

१. पुष्कळ खोल आणि फारच मऊ सोफा

२. पुष्कळ खाली आणि अधिक मागे रेलून बसावे लागेल, असा दूरचित्रवाणी संचासारखा (टी.व्ही. टाईप) सोफा

३. उठतांना जोर लावावा लागणारा

४. बसल्यावर सतत आत जाणारा

५. तिरके बसायला भाग पाडणारा

३ औ. ‘पुढीलपैकी १ – २ पालट केल्यावर सोफा सोयीचा होईल’, असे पहाणे  

१. सीटवर कडक ५ ते ७ सें.मी. जाडीचा ‘सीट टॉपर’ घालणे

२. कमरेकडे ८ ते १० सें.मी. व्यासाची छोटी वळकटी (‘लंबर रोल’) ठेवणे

३. ५ ते १० सें.मी. उंचीचा लहान पायथळ (फूटरेस्ट) घेणे

अशा प्रकारे योग्य सोफ्याची निवड करून आपण आपले स्वास्थ्य राखू शकतो.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (५.१.२०२६)

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷