
१. साधनेविषयी मूलभूत सूत्रे
१ अ. ‘व्यक्तीसाठी कोणता साधनामार्ग आवश्यक आहे ?’, हे केवळ गुरुच ठरवू शकतात !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अध्यात्माविषयी केवळ बोलणे अथवा ऐकणे, याला काहीच अर्थ नाही. अध्यात्माविषयी आपण जे काही ऐकतो, ते कृतीत आणायला हवे. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. ‘साधना करणे’, ही कृती आहे. साधना म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त करणे नव्हे. साधना केली, तरच आपण अध्यात्मात प्रगती करू शकतो.
ईश्वरप्राप्ती करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. समजा एखादी व्यक्ती आजारी आहे आणि पेठेत सहस्रो औषधे उपलब्ध आहेत. येथे लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे ‘स्वतःसाठी कोणते औषध घ्यायला हवे ?’, हे समजण्याची त्या व्यक्तीची क्षमता नसते. त्यामुळे ती व्यक्ती आधुनिक वैद्यांकडे जाते. आधुनिक वैद्य तिला जे औषध देतात, ती औषधे व्यक्ती घेते. ‘शारीरिक आणि मानसिक आजार असलेल्या रुग्णाने कोणते औषध घ्यायचे ?’, हे जसे आधुनिक वैद्यच ठरवू शकतात, तसेच आध्यात्मिक क्षेत्रातही ‘व्यक्तीसाठी कोणता साधनामार्ग आवश्यक आहे ?’, हे ती व्यक्ती स्वतः ठरवू शकत नाही. आध्यात्मिक आजार हा विषय इतका व्यापक आहे की, ‘कुणासाठी कोणता साधनामार्ग योग्य आहे ?’, हे केवळ गुरुच ठरवू शकतात. त्यामुळे ‘मी सर्वकाही शिकेन आणि नंतर कोणता साधनामार्ग अवलंबायचा, हे ठरवेन ?’, असा विचार केल्यास व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य केवळ आध्यात्मिक प्रगती साध्य करण्याच्या विविध पद्धती शिकण्यातच जाईल. संतांचे मार्गदर्शन घेणे, हा यावर सर्वांत उत्तम उपाय आहे.
१ आ. आवडलेला साधनामार्ग न निवडता जो स्वतःच्या प्रगतीसाठी उपयुक्त असेल, तोच निवडावा !
एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि ते संत एखाद्या विशिष्ट मार्गाने साधना करत असतील; परंतु तो साधनामार्ग त्या व्यक्तीसाठी योग्य नसेल, तर ते संत त्या व्यक्तीला अन्य संतांकडे जाण्यास सांगतात. एखाद्या व्यक्तीला साधना करण्याची आवड असल्याने तिने चार-पाच साधनामार्गांचा अभ्यास केल्यावर तिला त्यांतील एखादा साधनामार्ग मानसिक स्तरावर आवडतो. असे असले, तरी ती व्यक्ती ‘तो साधनामार्ग स्वतःच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहे कि नाही ?’, हे ठरवू शकत नाही. मानसिकदृष्ट्या व्यक्तीला वाटते, ‘मी हे औषध वापरून पाहीन’; परंतु ‘ते औषध तिला उपयुक्त आहे कि नाही ?’, हे तिला कसे कळेल ? मग सांसारिक जीवनातही समस्यांसाठी आपण कुणाचे तरी मार्गदर्शन घेतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनातही आपल्याला कुणाचे तरी मार्गदर्शन घ्यायला हवे.
१ इ. मन आणि बुद्धी यांचा लय होणारा साधनामार्ग निवडावा !
आपण कोणत्याही मार्गाने साधना करत असलो, तरी ‘आपले मन आणि बुद्धी यांचा लय होणे’, हे अध्यात्मातील मुख्य ध्येय आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जर तुम्ही स्वतःचा साधनामार्ग निवडण्यासाठी मन आणि बुद्धी यांचा वापर करत आहात, तर त्यांचा (मन आणि बुद्धी यांचा) लय कसा होऊ शकेल ?
२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !
२ अ. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ हा सर्व साधनामार्गांचा पाया आहे !
प्रश्न : ‘ध्यानधारणा करणे’ आणि ‘स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे’ यांत भेद काय आहे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ध्यान करतांना मन शांत आणि निर्विचार स्थितीत ठेवले जाते किंवा ही स्थिती साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वर्षांच्या सरावाने व्यक्ती ही स्थिती साध्य करते. अनेक वर्षे या स्थितीत राहिल्याने व्यक्तीचे स्वभावदोष उफाळून येत नाहीत आणि त्यामुळे ते हळूहळू न्यून होऊन नष्ट होतात. या प्रक्रियेला किमान १ सहस्र, २ सहस्र वर्षे लागू शकतात. पूर्वीच्या युगांत मनुष्याचे आयुष्य सहस्रो वर्षे असायचे. त्यामुळे लोक एकांतात जाऊन ध्यान लावत असत. सहस्रो वर्षे ध्यान केल्यानंतर त्यांची आध्यात्मिक उन्नती होत असे आणि त्यांच्याकडे आध्यात्मिक शक्तीही येत असे; परंतु सध्या कलियुगात मनुष्याचे आयुष्य अत्यल्प, म्हणजे जेमतेम ७० – ८० वर्षे इतकेच आहे.
२ अ १. ध्यानधारणा : ध्यानधारणेमध्ये लोक स्वतःचे मन रिक्त करतात किंवा अनावश्यक विचारांपासून मनाला अवरोधित करतात. असे केल्याने अनावश्यक विचारांचे मूळ असलेले स्वभावदोष हळूहळू नष्ट होतात. ‘शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होणारा स्नायूंची झीज’ (Disuse Atrophy), याप्रमाणे ते घडते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा वापर करत नाही, तेव्हा ती अकार्यक्षम होते, उदा. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पायाला ‘प्लास्टर’ घातले जाते, तेव्हा काही मासांनी तेथील स्नायू लक्षणीयरित्या शिथिल होतात. त्यामुळे व्यक्तीला पाय आणि सांधे यांची हालचाल करता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे ध्यानधारणेत अनावश्यक विचारांपासून मनाला अवरोधित केले जात असल्याने व्यक्तीमध्ये असलेले विविध स्वभावदोष न्यून होत जातात; मात्र या प्रक्रियेसाठी सहस्रो वर्षे लागतात.
२ अ २. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया : सनातन संस्थेमध्ये प्रामुख्याने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ?’, हे शिकवले जाते. ध्यानधारणा करून स्वभावदोष आणि अहं नष्ट होण्यासाठी सहस्रो वर्षे लागू शकतात; परंतु ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ राबवल्यास स्वभावदोष अन् अहं केवळ २० – ३० वर्षांत बरेच अल्प होतात.
हाच ‘ध्यानधारणा’ आणि ‘स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया’ यांत मुख्य भेद आहे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास साधक अल्प कालावधीत उच्च आध्यात्मिक स्तरावर पोचतात.
२ अ २ अ. कुठल्याही साधनामार्गात उपयुक्त असणारी प्रक्रिया : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे आणखी एक महत्त्व आहे. तुम्ही ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग किंवा कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा मार्ग, यांपैकी कोणताही साधनामार्ग निवडला, तरी जोपर्यंत तुमच्यातील स्वभावदोष न्यून होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमचे मन एकाग्र करू शकत नाही. तुम्हाला ध्यान लावायचे असेल; परंतु तुमच्यात स्वभावदोष असतील, तर काही मिनिटांतच तुमची एकाग्रता भंग होते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मार्गाने साधना करा; पण ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया’ ही सर्व साधनामार्गांचा पाया आहे.
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997394.html
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !